Wednesday, 20 December 2023

 



Reflection for the 4th Sunday of Advent (24/12/2023) by Br. Rakesh Ghavtya.




आगमन काळातील चौथा रविवार

दिनांक: २४-१२-२०२३ 

पहिले वाचन:  २ शमुवेल ७:१-५८ब-१२,१४अ,१६

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १६:२५-२७

शुभवर्तमान:  लुक १:२६-३८



प्रस्तावना:

आज आपण आगमन काळातील चौथा व शेवटचा रविवार साजरा करत आहोत. आजची उपासना येशू बाळाच्या आगमनासाठी आपली आध्यात्मिक तयारी सखोलपणे करण्यास पाचारण करत आहे.

आजच्या उपासनेचा विषय, पवित्र मरीयेने गाब्रिएल देवदूताला दिलेल्या प्रतिसादातून घेतला आहे आपण सांगितल्याप्रमाणे मला होवो. या उद्गाराने पवित्र मरीयेने आपले सर्वस्व परमेश्वराला समर्पिले व ती परमेश्वराची झाली. थोडक्यात ती परमेश्वराला शरण गेली. पवित्र मरिया तारणप्राप्ती मिळवण्याचे महत्त्वाचे साधन बनली. तिच्या होकारामुळे तारणप्राप्तीचा मार्ग मोकळा झाला. अशा प्रकारे देवाचे मानवावरील व मानवाचे देवावरील नातेसंबंध जोडले जाऊन देवाने आपले प्रेम व्यक्त केले व आपली योजना प्रकट केली. आजही देव प्रत्येकासाठी अचूक अशी योजना आखतो.

आज आपण जगाच्या तारणाऱ्याच्या आगमनासाठी उत्सुक झालो असताना आम्ही-ही आपले सर्वस्व परमेश्वराला समर्पुया. तसेच आपल्या अंतकरणात येणाऱ्या तारणार्याला जागा तयार करूया म्हणजे आपल्याला देवाच्या प्रेमाचा व कृपा-आशीर्वादाचा अनुभव घेता येईल.


मनन चिंतन:

परमेश्वराची योजना, परमेश्वराचे मार्ग, परमेश्वराच्या कल्पना व संकल्पना मानवाच्या समजण्याच्या पलीकडच्या आहेत. परमेश्वराने संपूर्ण सृष्टी निर्मिली, मानवाला रचले व मानवाच्या जीवनात आपली योजना आखून घेतली. सुरुवातीपासून, परमेश्वराचा योजना आखण्याचा हाच उद्देश आहे कि, संपूर्ण मानवजातीचे पापांतून तारण व्हावे, मानवाला मुक्ती मिळावी व मानवाचे तारण संपूर्णपणे व्हावे. परमेश्वराने जसे ठरवले तसे घडले व आजही घडत आहे व यापुढे घडणार ह्यात तिळमात्र शंका नाही.

परंतु आज मानव कोणावर अवलंबून आहे; स्वतःवर की परमेश्वरावर? जर मनुष्य स्वतःवर अवलंबून असेल तर सहाजिकच तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगेल, स्वतःची योजना राबवील व त्याप्रमाणे जीवन जगेल. पण अशा परिस्थितीत मानव कधीही समाधानी राहणार नाही. उलट त्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागेल. परंतु जर मनुष्य परमेश्वरावर अवलंबून राहिला तर नक्कीच तो परमेश्वराची इच्छा महत्त्वाची समजून त्या इच्छेप्रमाणे जगे व देवाची योजना समजून त्यामध्ये सहकार्य दाखवणार. अशा प्रकारे त्याला खरे समाधान मिळून तो त्याचे सर्वस्व देवाला समर्पण करणार.

 परमेश्वरासमोर लीन झालेल्या प्रत्येक  व्यक्तीला परमेश्वर आशीर्वादाने भरतो. पवित्र मरीयेला परमेश्वराने कृपेने भरले. पवित्र मरीयेने देवाच्या इच्छेला होकार देऊन, देवाची योजना पार पाडण्यासाठी त्यामध्ये सहकार्य केले, म्हणून तिने तारणप्राप्तीमध्ये मोठी भूमिका बजावली असे दिसून येते. म्हणूनच आज पवित्र मरीयेला मान-बहुमान दिला जातो.

पहा मी प्रभुजी दासी आहे आपण सांगितल्याप्रमाणे मला हो या उद्गाराने पवित्र मरीयेने, परमेश्वराची दासी म्हणून स्वीकारले व ती देवाच्या तारणप्राप्तीच्या योजनेत सहभागी झाली. पवित्र मरीयेने सर्वस्वाचा त्याग केला व देवाच्या योजनेला प्रथम स्थान दिले.

आजच्या उपासनेद्वारे देवाचे वचन आपल्याला हेच सांगत आहे की, देवाने आपली योजना आपल्या सेवकांसाठी वेगवेगळ्या मार्गाने व वेगवेगळ्या व्यक्तीमार्फत प्रगट केली. त्यासाठी देवाने पुढाकार घेऊन आपल्या सेवकांसाठी योजना आखली.

पहिल्या वाचनात शामूवेलाच्या दुसऱ्या पुस्तकात आपण ऐकतो की, परमेश्वराने नाथान या संदेष्ट्याद्वारे दाविदासाठी आखलेली योजना प्रकट केली. परमेश्वराने दाविदाशी आपला करार नाथान मार्फत केला. जेव्हा दावीद राजाने नाथानासमोर मंदिर बांधण्याचा प्रस्ताव ठेवला तेव्हा नाथान संदेष्ट्याने त्याला मान्यता दिली परंतु, परमेश्वराने त्यासाठी नकार दिला. कारण ते मंदिर परमेश्वर स्वतः बांधणार होता. या योजना दाविदाच्या पुत्राच्या म्हणजेच तारणार्याला पाठवण्याच्या परमेश्वराच्या योजनेच्या पुर्ततेवर अवलंबून आहेत.

दुसऱ्या वाचनात संत पौल रोमकरांस पत्रात असे नमूद करतो की, परमेश्वराने आपल्या संदेष्ट्याच्या लेखांच्याद्वारे आपली योजना सर्व राष्ट्रातील लोकांना प्रकट केली. तारणप्राप्तीचे जे रहस्य होते ते त्यांना प्रकट केले. अर्थात येशूच्या जीवन, मरण व पुनरुत्थानाने सर्वांचेच तारण होईल हे गुपीत असलेले रहस्य प्रकट केले.

शुभवर्तमानात आपण ऐकतो की, परमेश्वराने गाब्रिएल देवदूतामार्फत पवित्र मरीयेसाठी आखलेली योजना प्रकट केली. जेव्हा गाब्रिएल देवदूताने पवित्र मरीयेला अभिवादन केले तेव्हा ती गोंधळून गेली. परंतु देवदूताने तिला पुढे स्पष्ट करून सांगितलें की, जे तुझ्याबाबतीत घडणार आहे ते दैवी शक्तीने होय आणि मानवी कृतीने नव्हे, कारण देवाला सर्व काही शक्य आहे असे देवदूत म्हणाला. तेव्हा पवित्र मरीयेने ही देवाची योजना समजून देवाच्या हाकेला होकार देऊन तीने तयारी दाखवली.

आजसुद्धा परमेश्वर आपल्याला अनेक मार्गाने व वेगवेगळ्या व्यक्तीमार्फत आपल्यासाठी योजना आखत असतो. त्यासाठी आपण तत्पर असायला हवे. आम्ही देवाच्या योजनेत सहभाग घेऊन सहकार्य करावे म्हणजे आमची इच्छा नव्हे, तर देवाची इच्छा समजून आपले जीवन जगावे. माझ्या स्वतःच्या जीवनात मला असा अनुभव आला आहे कि, एका धर्मगुरु मार्फत मला परमेश्वराने आपली योजना प्रकट केली की, मी धर्मगुरू बनावे व देवाची आणि देवाच्या लोकांची सेवा करावी. आज मला देवाच्या योजनेत सहभाग घेताना व सहकार्य करताना मला समाधान वाटते. खरोखरच देवाने मला आज त्याच्या कृपा-आशीर्वादाने भरले आहे. आज देवाने इतके उपकार माझ्यावर केले आहेत की, मी या प्रेम देवाची परतफेड करू शकणार नाही.

तुमच्या सुद्धा जीवनात देवाने आपली योजना काही व्यक्तीमार्फत नक्कीच प्रकट केली असेल. थोडावेळ शांत राहून आठवण करा व देवाला त्याबद्दल धन्यवाद द्या.

आज आपण आपल्या तारणारा बाळ येशूच्या जन्माची तयारी करत असताना, त्याच्या योजना पूर्णत्वास नेण्यासाठी सिद्ध राहुया. तसेच पवित्र मरीयेप्रमाणे स्वतःला लीन करून, आपले सर्वस्व देवाला समर्पून देवाच्या इच्छेला प्राधान्य देऊन, देवाला शरण जाऊया व देवाची योजना पार पडताना, त्यामध्ये योग्य सहभाग घेऊन सहकार्य करू या. म्हणजे आपल्याला देव त्याचे प्रतिफदेईल.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे परमेश्वरा, आम्हाला तुझे स्वागत करण्यास तयार कर.

१. आपले पोपमहाशय फ्रांसिस पहिले, सर्व महागुरु, धर्मगुरु व व्रतस्थ बंधू-भगिनी यांना देवाची योजना पार पाडताना चांगले आरोग्य लाभावे व त्यांच्या प्रत्येक विकट परिस्थितीत त्यांना परमेश्वराचा पाठिंबा मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.


२. प्रत्येक धर्मग्रामातील सर्व भाविकानी या आगमन काळात योग्य प्रकारे प्रायश्चित संस्कार स्वीकारला आहे व काही जण अजून स्वीकारणार आहेत, त्या सर्वांनी बाळ येशूसाठी आपले अंतःकरण तयार करावे व त्यात योग्य ती जागा त्याला द्यावी म्हणून प्रार्थना करुया.


३. सर्व राजकीय व सामाजिक पुढार्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करावे व निस्वार्थी सेवेने व प्रेमाने लोकांच्या वेगवेगळ्या समस्या व गरजांना हातभार लावावा म्हणून आपण प्रार्थना करूया.


४. जी लग्न झालेली जोडपी  बाळाच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांना परमेश्वराने स्पर्श करून बाळाची देणगी त्यांना द्यावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.


५. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या सर्व वैयक्तिक आणि सामुदायिक गरजांसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करूया.


Wednesday, 13 December 2023

 

Reflection for the 3rd Sunday of Advent (17/12/2023) by 
Br. Reon Andrades.




दिनांक: १३-१२-२०२०

पहिले वाचन: यशया ६१:१-२१०-११

दुसरे वाचन: १ थेस्सलनीकाकरांस पत्र ५:१६–२४

शुभवर्तमान:  योहान १:६-८१९-२८


आगमन काळातील तिसरा रविवार



प्रस्तावना:

आज आपण आगमन काळाचा तिसरा रविवार साजरा करत आहोत. आजचा रविवार (Gaudete Sunday) ‘गावदाते संडे’ म्हणजेच आनंद, हर्ष, उत्साह करण्याचा रविवार आहे. आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा इसरायेली लोकांना बाबीलोनच्या हद्दपारीची घटना लवकरच संपणार आहे, म्हणून उत्साह करण्यास

संदेश देत आहे. तर दुसऱ्या वाचनात संत पौल थेसलोनीकरांस आनंद करण्यास, चांगले करण्यास व वाईट टाळण्यास प्रोत्साहित करत आहे. योहान लिखित शुभवर्तमानात योहान बाप्तीस्ता प्रभूची वाट तयार करण्याचा संदेश, आनंदानें पाण्याच्या बाप्तीस्म्याद्वारे पसरवत आहे. आपण ही आनंदाचे ख्रिस्ती जीवन जगावे व शुभवर्तमानाचा आनंद इतरांपर्यंत पोहचवावा म्हणून ह्या मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.


मनन चिंतन:

आगमन काळाचा तिसरा आठवडा आपणास उत्साह करण्यास सांगत आहे. पोप फ्रांसिस म्हणतात आपण सदा परमेश्वरामध्ये आनंदी असलो पाहिजेत. Evangelii Gaudium या आपल्या परिपत्रकामध्ये शुभवर्तमानाचा आनंद ह्याचा उल्लेख ते करत आहेत. ख्रिस्ती असलेल्या नात्याने आपण सदा आनंदाने राहायला पाहिजे व ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यासाठी आनंदाने पुढे सरसावलो पाहिजेत.

सर्वप्रथम आपण वाचनाची पार्श्वभूमी पाहूया. पहिल्या वाचनात यशया संदेष्टा लोकांना आशेचा व आनंदाचा संदेश देत आहे. बाबिलोनच्या हद्पारीतून लवकर आपल्या लोकांची सुटका होणार आहे व ते आपल्या घरी परतणार आहेत, बंदीवानांची सुटका व अनेकाना न्याय व स्वातंत्र्य मिळणार आहे. घरी परतण्याच्या

या भविष्यवाणीने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला, कारण आता त्यांची सुटका होणार होती, त्यांना स्वातंत्र्य मिळणार होते. याच वाचनाने आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जागतिक कार्याची सुरुवात करत असताना आपल्या निदर्शनास येते. दुसऱ्या वाचनात संत पौल ह्यांनी आपल्या दुसऱ्या मिशनरी दौर्यात थेसालोनिका येथे स्थापन केलेल्या ख्रिस्तसभेला पत्र लिहून उपदेश करत आहे. तो व अखिल ख्रिस्तसभा तारणार्याच्या दुसऱ्या येण्याची अथवा आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या घटकेची पूर्व तयारी म्हणून तो त्यांना, (अ) आनंदित रहाण्याची (ब) सर्वकाळ प्रार्थना करण्याचे (क) पवित्र आत्म्याला परीक्षेत न पाडण्याचे (ड) देवाच्या संदेशाचा स्वीकार करण्याचे व त्याला फेटाळून न लावण्याचे (ई) चांगलेतेच करण्याचे व वाईट टाळण्याचा उपदेश ते करत आहेत.

शुभवर्तमानात योहान बाप्तिस्ता ह्याची किर्ती सर्वीकडे झळकत असल्याचे आपल्या निदर्शनास येते. योहानाने याजक व लेवी यांच्या सर्व प्रश्नांना नकारात्मक उत्तर देऊन, येशू ख्रिस्ताची साक्ष मोठ्या आनंदाने, हर्षाने प्रगट करत होता. “माझ्या मागे येत आहे तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करणार” अशी साक्ष तो लोकांना देत होता. अगदी अशाच प्रकारे पोप महाशय आपणाला येशूची शुभवार्ता, सर्व जगभर मोठ्या आनंदाने पसरविण्यास सांगत आहेत. ते म्हणतात ‘सुवार्तेचा आनंद येशूला भेटणाऱ्या सर्वांच्या हृदयात आणि जीवनात भरतो’.

आपणापुढे अशाच व्यक्तींची उदाहरणे मी सदर करू इच्छितो. सर्वात प्रथम पवित्र मरिया माता, गाब्रियल दूताचा संदेश ऐकताच तीन हर्षानें गीत उद्गारले, “पावन पावन नाम प्रभुचे, केले मजला धन्य किती, मन माझें आनंदे भरले गाते प्रभुरायाची स्तुती.” अलीशिबा मारियेला पाहताच आनंदानें उद्धरली, “माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे, इतका मान मला कोठून.” योहान बाप्तीस्ता आपल्या आईच्या उदरात असताना, पवित्र मरीयेला व बाळ येशूला ओळखून आपल्या आईच्या उदरात आनंदानें उडी मारतो. दावीद राजा आनंदाने कराराच्या कोशा समोर नाचतो. भारताची धन्यवादित सिस्टर रानी मरिया, हिचा खून करणारा व्यक्ती आनंदित होतो जेव्हा त्याला कळते की, तिच्या कुटुंबाने त्याला क्षमा केलेली आहे. त्याचे स्वागत जेव्हा तिच्या घरामध्ये केले जाते, ते पाहून तो क्षमेच्या आनंदाने भरून आनंदाचे अश्रू गाळू लागला. मदर तेरेजा, ही अगदी आनंदाने गरजू व समाजाने बहिष्कृत केलेल्या लोकांची सेवा करून, त्याना आनंदमय जीवनाचा आस्वाद त्या देत होत्या.

अगदी अश्याच प्रकारे आपणही आनंदी जीवन जगावे व इतरापर्यंत आपण हा आनंद पसरावा, हा संदेश आजची उपासना आपणास देत आहे. आपणही शुभवर्तमानाचा प्रसार आनंदाने करावा व प्रभूचे स्वागत आनंदाने करण्यास आपण सक्षम व तयार असावेत म्हणून प्रार्थना करूया. आमेन.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू, आम्हाला तुझ्या आनंदाचे साक्षीदार बनव.

१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप फ्रान्सिसबिशप्ससर्व धर्मगुरुधर्मबंधु-भगिनी व प्रापंचिक ह्यांनी जे प्रभू येशूची सुवार्ता पसरवण्याचे कार्य हाती घेतले आहे ते त्यांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने योग्य प्रकारे करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. ह्या आगमन काळात प्रभू येशूचे स्वागत करण्यास आम्ही आमच्या अंत:करणाची तयारी करावी व आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला इतरांमध्ये ओळखाव म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. आमच्या सरकारी व राजकीय नेत्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव व्हावी व त्यांनी आपला देश प्रगतीच्या मार्गावर आणावा म्हणून आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.

 ४. सर्व पालकांनी आपल्या मुलांमध्ये चांगले गुणधर्म जोपासावेतत्यांना देवराज्याविषयी शिकवण द्यावीपरमेश्वराच्या वचनाप्रमाणे व आज्ञेप्रमाणे वागून मुलांपुढे चांगला आदर्श ठेवावाम्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपल्या धर्मग्रामात जे लोक दु:खीआजारी व बेरोजगार आहेत, अशा लोकांस आपण मदतीचा हात देण्यास तयार असण्यास आणि अशाप्रकारे परमेश्वराच्या येण्यासाठी तयारी करण्यास परमेश्वराचा आधार मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. आता आपण आपल्या सर्व गरजा शांतपणे प्रभूचरणाशी अर्पण करूया.


Thursday, 7 December 2023

 



Reflection for the 2nd Sunday of Advent (10/12/2023) by Br. Benjamin Alphanso.



आगमन काळातील दुसरा रविवार

दिनांक१०/१२/२०२३

पहिले वाचन: यशया ४०:१-५,९-११

दुसरे वाचन: २ पेत्र ३:८-१४

शुभवर्तमान: मार्क १:१-८



प्रस्तावना

आज पवित्र देउळमाता आगमन काळातील दुसरा रविवार साजरा करत आहे. आजची तिन्ही वाचने आपल्याला येशूच्या दुसऱ्या येण्याच्या स्वागतासाठी तयार राहण्यास आमंत्रित करत आहे. आपण पश्चात्तापी अंतकरणाने आपलीं मनें, हृदये जीवन देवासाठी व देवाला स्वीकारण्यासाठी सज्ज ठेवली पाहिजेत. आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा इस्रायल लोकांचे सांत्वन करतो. त्यांना पापापासून दूर राहून पश्चातापाचे जीवन जगण्यासाठी आमंत्रित करतो. तर दुसऱ्या वाचना संत पेत्र आपल्याला सांगतो की, जर मानवाला देवाची इच्छा पूर्ण करायची असेल तर पश्चात्तापाद्वारे त्याची सुटका व तारण करून घ्यावे. बाप्तिस्मा करणारा योहान ह्यांनी येशूच्या आगमनाची तयारी कशी करावी हे आजच्या मार्क लिखित शुभवर्तमानात सुचविले आहे. आगमन काळाच्या दुसऱ्या रविवारी येशू आपल्यामध्ये आगमन करत असताना पश्चात्तापी जीवन जगून जीवनाकडे सदा सकारात्मक दृष्टिकोनातून पाहाण्याची कृपा आपल्याला मिळावी म्हणून या मिस्साबलीदानात आज विशेष प्रार्थना करूया.


मनन चिंतन

सोरेंग केकेगार्ड नावाचा सुप्रसिद्ध तत्त्वज्ञानी होता. केकेगार्ड एक सुंदर अशी कथा सांगतात, ते म्हणतात एकदा एक लोकप्रिय सर्कस होता. तो सर्कस बघण्यासाठी लोकांची फार गर्दी असायची. त्या सर्कशीत असलेला विदूषक लोकांना फार आवडायचा. तो लोकांना खूप हसवायचा. एकदा सर्कस सुरु असताना सर्कशीच्या तंबूला मोठी आग लागली. ही गोष्ट विदूषकाला समजली व तो लोकांना ओरडून सांगू लागला कि, तंबूला आग लागली आहे बाहेर पडा पण लोक विदूषकाच्या ह्या बोलण्यावर फक्त हसत राहिले. कुणीहि विदूषकाचा संदेश (घोषणा) ऐकली नाही. तंबूची आग पसरत होती. ह्याचा परिणाम असं झाला कि, लोकं मध्ये राहिली व भरपूर लोकं बाहेर न पडता आल्याने जळून मरण पावली. ही गोष्ट आपल्या सर्वांच्या जीवनाशी जोडून आहे. देवाने इस्रायली जनतेसाठी आपल्या पुत्राच्या जगात येण्याचा संदेश पाठवला. परंतु हा संदेश लोकांने स्वीकारला नाही व आपल्या जीवनात ते व्यस्त राहिले म्हणून अनेक लोकांचा नायनाट झाला. जर आपण आपल्याला जो संदेश पवित्र लोकांद्वारे मिळत आहे तो स्वीकारला नाही तर आपलीही व्यथा अथवा परिस्थिती अगदी अशीच होऊ शकते.

यशया ह्या संदेष्ट्याद्वारे बंधीवासात असलेल्या इस्रायेल जनतेला देव एक नवीन संदेश देऊन त्यांना जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक जीवन म्हणजे नवीन जीवन जाण्यासाठी बोलावत आहे. ते नवीन जीवन ख्रिस्ताद्वारे मिळणार आहे. ते मिळण्यासाठी जीवनातील खाच-खळगे आणि वाकडेतिकडे मार्ग दूर सारून, नवीन पश्चात्तापमय जीवन जगायला सांगितले आहे. परमेश्वराची वाणी ऐकणे, त्याचे मार्ग सिद्ध करणे म्हणजे जीवनात बदल घडवून आणणे होय.

 नकारात्मक जीवन जगणारा मनुष्य दलदलीत पडत असतो पण सकारात्मक जीवन जगण्यासाठी डोंगर टेकडी सल होते. उच्चनीच जागा सपाट होते. सकारात्मक दृष्टिकोणातून जगणारा मनुष्य परमेश्वराचे वैभव पाहतो आणि दुसरा उच्च स्वराने सुवार्ता सांगतो. सकारात्मक दृष्टिकोणातून जगणारा मनुष्य देवाचे सांत्वनपर शब्द इतरापर्यंत पोहचतो. आजच्या दुसऱ्या वाचनात पेत्र आपणाला सांगतो की, पश्चात्तापाद्वारे सर्व मानवजातीचे तारण व सुटका व्हावी अशी देवाची इच्छा आहे. देवाची प्रीती येशूद्वारे महान आहे. तो सहनशील असून कोणत्याही नाशाची कल्पना करत नाही. उलट आधी पश्चात्तापाद्वारे आपल्याला तारण व मुक्तता मिळावी असे त्याला वाटते. आजच्या शुभवर्तमानात आपल्याला योहान बाप्तिस्ता कोण होता? त्याचे कार्य काय होते? हे समजते. त्याचे कार्य येशूची वाट तयार करण्याचे होते व येशू त्याच्यापेक्षा महान आहे हे सांगण्याचे होते.

आजच्या आगमन काळातील दुसऱ्या रविवारी प्रभू येण्यासाठी विलंब लावणार नाही, कुणाचा नाश होऊ नये व परमेश्वराच्या वचनांवर व पश्चात्तापावर विश्वास ठेवून पावित्र्याचंसुभक्तीची वर्तणूक करण्या सांगत आहे. योहान बाप्तिस्ता त्यागमय जीवन जगून, प्रभूच्या येण्याची तयारी करण्यास, जीवनातील पापांची खळगी भरून पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा घेऊन पवित्र जीवन जगण्यासाठी आमंत्रण देत आहे. जीवनात येणाऱ्या अडीअडचणीला तोंड देऊन दुःखाची दरी ऐल तीरावरून पेल तीरावर पार करण्यासाठी जो सकारात्मक दृष्टिकोन मानवाकडे असावा तो दृष्टिकोण ख्रिस्ताकडून आजच्या मिस्साबलीदानामध्ये मागुया.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद:  हे प्रभू, आमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदल.

१. हे सर्व समर्थ दयाळू परमेश्वरा आज आम्ही तुझ्याकडे आमचे परमगुरु पोप फ्रांसिस, आमचे सर्व महागुरू, धर्मगुरु, धर्मभगिनी, धर्मबंधू व सामान्यजन यांच्यासाठी प्रार्थना करतो की, त्यांचा जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन सकारात्मक असावा तसेच सर्वांनी देवाच्या इच्छे प्राधान्य द्यावे म्हणून त्यांना सहाय्य कर.

२. हे प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्याकडे सर्व तरुण तरुणी, लहान मुले यांच्यासाठी प्रार्थना करतो, जिवना त्यांना योग्य मार्ग दाखव व त्यांचा विश्वास मजबूत कर

३. हे दयाळू परमेश्वरा, आम्ही जे लोक अडचणीत आहेत, आजारी आहे त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करतो त्यांना चांगले आरोग्य दे व त्यांना सहाय कर.

४. हे प्रेमळ परमेश्वरा आम्ही आज या देशासाठी प्रार्थना करतो, जेथे युद्ध, मारामाऱ्या, द्वेष, सूड प्रवृत्ती आहे तेथे शांती प्रस्थापित कर व तिथल्या नेत्यांना व लोकांना त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदल म्हणून आपण प्रार्थना करू या

५. वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.