Thursday, 5 April 2018

Reflection for the Homily of Second Sunday Of Easter (08-04-2018) By Br Brandone Noon






पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार

दिनांक: ०८-०४-२०१८
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ४:३२-३५
दुसरे वाचन: १ योहान ५:१-६
शुभवर्तमान: योहान २०:१९-३१




प्रस्तावना:

     आज आपण पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार व दैवी दयेचा सण साजरा करीत आहोत. आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, श्रद्धावतांचा समुदाय एकदिलाचा व एकजीवाचा होता व त्यांना कधीही काहीही कमी पडत नव्हते. दुसरे वाचन आपल्याला सांगते की, जो व्यक्ती ‘येशू हा ख्रिस्त आहे’ असा जो विश्वास धरतो तो देवापासून जन्मलेला आहे व तो जगावर विजय मिळवितो. शुभवर्तमानात आपण ऐकतो की थोमा येशूवर विश्वास ठेवतो आणि म्हणतो “माझ्या प्रभू, माझ्या देवा”. येशू पुनरुत्थित झाल्यावर आपल्या शिष्यांना भेटून त्यांचा आत्मविश्वास वाढवतो; तसेच पवित्र आत्मा त्यांच्यावर पाठवून दुसऱ्यांना क्षमा करण्यास त्यांना आदेश देतो व देवाचे राज्य सर्वत्र पसरविण्यास त्यांना प्रोस्ताहन देतो. ह्या  मिस्साबलिदानात सहभागी होत असताना परमेश्वराकडे प्रार्थना करूया आणि आपल्या हृदयाचे दरवाजे उघडे ठेवूया, जेणेकरून आपणालाही पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वराची कृपा लाभेल.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ४:३२-३५

     सर्व शिष्य आपली सर्व संपत्ती प्रेषितांच्या चरणाशी ठेवीत व त्यांना काहीही उणे पडत नसे. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात ख्रिस्ती धर्माचा व ऐक्याचा उगम कसा झाला याबाबत आपणास ऐकायला मिळत आहे. येशूच्या स्वर्गरोहनानंतर शिष्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांना छळ, अडचणी व मनस्ताप सहन करावा लागला परंतु त्याची प्रभूवरील श्रद्धा दृढ असल्यामुळे हा समुदाय एक मनाचा व एक जीवाचा होता. ख्रिस्तामुळे त्यांच्यात ऐक्य होते आणि त्यामुळेच त्यांना जगातील कुठलीही शक्ती ख्रिस्तापासून दूर करू शकली नाही.

दुसरे वाचन: १ योहान ५:१-६

     संत योहान विश्वासू लोकांना सांगतो की, देवाच्या आज्ञा कठीण नाहीत. आपण देवावर प्रीती करतो म्हणून आपण त्या पाळल्या पाहिजेत. संत योहानाला माहित होते की, ख्रिस्ती समूदयाना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत होते. आम्ही कोणावर विश्वास ठेवावा व का ठेवावा ? म्हणून या प्रश्नाचे उत्तर संत योहान देतो. जो व्यक्ती ‘येशू हा ख्रिस्त आहे’ असा जो विश्वास धरतो तो देवापासून जन्मलेला आहे व तो जगावर विजय मिळवितो. जग तुम्हाला आनंदी करील. पण हा आनंद सर्वकाळ टिकणार नाही; म्हणून देवावरील विश्वासाने देवाच्या प्रीतीचा अनुभव घ्या.

शुभवर्तमान: योहान २०:१९-३१

     आपल्या गुरुनंतर आपले काय होईल? ह्या प्रश्नाने ते भयभीत झाले होते. घरात लपून बसलेले असताना पुनरुत्थित प्रभू त्यांच्याकडे येऊन उभा राहतो व दर्शन देताना म्हणतो, “तुम्हास शांती असो”. थोमा हा त्यांच्यामध्ये नव्हता व त्यामुळेच तो म्हणाला “त्याच्या हातात ख्रिस्ताचे व्रण पाहिल्यावाचून व खिळे होते त्याजागी आपले बोट घातल्यावाचून मी विश्वास धरणाच नाही”.
आपल्या बंधूबरोबर एकत्र न राहिल्यामुळे त्याला पुनरूत्थित येशूला भेटण्याची संधी लाभली नाही. तरीही विशेषरीत्या येशू पुन्हा थोमाला दर्शन देतो. थोमाचे हृदय प्रीती व भक्तीने ओसंडून वाहते म्हणूनच तो उद्गारतो, “माझ्या प्रभू, माझ्या देवा”.  

मनन चिंतन:

     ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांनो आज आपण ‘दैवी दयेचा’ म्हणजेच दयावंत येशूचा सण साजरा करीत आहोत.
     एकदा एक राजा होता व त्याचे भरपूर सैनिक होते. एके दिवशी एका सैनिकाने गुन्हा केला. जेव्हा हे राजाला कळले तेव्हा त्याने त्याला काहीही न बोलता माफ केले. परंतु जेव्हा दुसऱ्यांदा त्याच सैनिकाने गुन्हा केला तेव्हा तो राजा चिडला. त्याचा राग मस्तकात शिरला व राजाने त्या सैनिकास मरणदंडाची शिक्षा फर्मावली. जेव्हा ही गोष्ट त्या सैनिकाच्या आईला कळली की तिच्या मुलाला मरणदंडाची शिक्षा फर्मावली आहे तेव्हा ती आई मात्र अगदी खोळबून व खचून गेली. ती राजाकडे येऊन  गयावया करते  व मुलाची शिक्षा रद्द करण्यासाठी विनवणी करते परंतु राजा तिला सांगतो की एकदा नाही तर दोन वेळा तुझ्या मुलाने गुन्हा केला आहे. तो मरणदंडाच्या शिक्षेस पात्र आहे. तेव्हा ती आई राज्याला म्हणाली, “मी तुमच्याकडे दयेची भिक्षा मागते, माझा हा एकुलता एक मुलगा आहे व तोच माझ्या म्हातारपणाचा एक मेव सहारा आहे.” राजाने तिला उत्तर दिले की, तुमचा मुलगा दयेस पात्र नाही तेव्हा ती आई म्हणाली होय महाराज मला ठाऊक आहे की माझा मुलगा दयेस पात्र नाही आणि म्हणूनच तर मी द्येची भिक मागते, नाहीतर मी भिक मागितलीच नसती. त्या बाईच्या सततच्या रडण्याने व गयावया करण्याने राज्याचे हृद्य भरून आले व राजा त्या आईच्या उत्तराने डगमगला व  तिला द्या दाखवून त्या सैनिकाची शिक्षा रद्द केली.
     होय माझा प्रिय भाविकांनो दयेसाठी आपणही पात्र नाही आहोत परंतु आपला परमेश्वर इतका प्रेमळ व दयाळू आहे की आपण कितीही मोठा गुन्हा केला, पाप केले, परमेश्वरापासून दूर गेलो तरीही परमेश्वर आपणास द्या दाखवत असतो.
     आज देऊळ माता ‘दैवी दयेचा’ म्हणजेच दयावंत येशूचा सण साजरा करीत आहे. संत जॉन पोल दुसरे यांनी ३० एप्रिल २००० मध्ये संत फॉस्तीना हिला संत पद बहाल केले. कारण संत फॉस्तीनाला प्रभुने दर्शन देऊन दयावंत येशूच्या प्रतिमेचे चित्र दाखवले होते. ज्यामध्ये येशूच्या खुशीतून रक्त व पाणी येत आहे. परमेश्वराची किंवा ख्रिस्ताची द्या अपार आहे जर ह्या दयेस आपण पात्र नसलो तरी येशू ह्या दयेचा  झरा आपणासाठी सतत वाहत आहे. ह्या दयेच्या झऱ्याने आपण वाचले जाणार आहोत आपणा सर्वांचे तारण होणार आहे. म्हणूनच संपूर्ण जगभर द्यावंत येशूचा सण साजरा केला जातो व आपणा सर्वाना द्या मिळावी म्हणून आपण प्रार्थना करीत आहोत.
     आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकले आहे की, येशू पुनरुत्थानानंतर आपल्या शिष्यांना दर्शन देतो परंतु तेथे संत थॉमस हजर नव्हता. आपणास कोणालाही ठाऊक नाही की संत थॉमस कुठे गेला होता. यदाकदाचित सर्व शिष्य घाबरून बंद खोलीत लपले होते म्हणून संत थॉमस त्यांना अन्न आणावयास गेला असेल किंवा बाहेर फेरफटका मारायला गेला असेल. परंतू जेव्हा थॉमस परत येतो तेव्हा शिष्य त्याला सांगतात की येशू आला होता. येशू पुनरुत्थित झाला आहे, थॉमस विश्वास ठेवत नाही व म्हणतो “जो पर्यंत मी येशूच्या खिळे ठोकलेल्या जागी बोट घातल्यावाचून विश्वास ठेवणारच नाही”. शेवटी एक आठवड्यानतंर येशू पुन्हा संत थॉमसला आपल्या शिष्यासमोर दर्शन देतो, मग संत थॉमस विश्वास ठेवतो व त्यांच्या तोंडातून उद्गार येतात “माझ्या देवा, माझ्या प्रभू.” हेच उद्गार जेव्हा धर्मगुरू भाकर व रक्ताचा प्याला उंच करतात तेव्हा उच्चारले जातात व आजही मी शांतपणे हे शब्द उच्चारतो परंतु मला ठाऊक नाही आपणापैकी कितीजण उद्गारतात. ही तर संत थॉमसने दिलेली विश्वासाची साक्ष आहे.
जर आपण पाहिले तर ख्रिस्ताला आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही परंतु आपण विश्वासाने ख्रिस्ताला पाहत असतो. संत थॉमसचा पहिला अविश्वास ख्रिस्त पुनरुत्थित झालेला नाही असा होता. देऊळमातेने आपणास पवित्र संस्कार व चिन्हे दिलेली आहेत की आपणही परमेश्वरावर विश्वास ठेवू. आताही पुनरुत्थित ख्रिस्त आपणामध्ये हजर आहे. ख्रिस्त आपणा सर्व ख्रिस्ती बांधवात आहेत आणि आज या इस्टरच्या जळत्या मेणबतिच्या रुपात येशू आपणामध्ये हजर आहे. ही जळती मेणबत्ती  ख्रिस्त नसून मेणबत्तीच्या रुपात आज ख्रिस्त हजर आहे परंतु आपण विश्वासाने पाहणे गरजेचे आहे, आध्यात्मिक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. थॉमसची दुसरी शंका येशूचे पाच घाय होती आणि या मेणबत्तीवरील पाच खुणा येशूच्या पाच घायांची आपल्याला आठवण करून देत आहेत की येशू पुनरुत्थित झालेला आहे,  घाबरून बसण्याची गरज नाही आहे. परमेश्वराने त्याची शांती आपणास दिलेली आहे व पवित्र आत्मा आपल्या बरोबर आहे म्हणून देवाची सुवार्ता सर्वत्र पसरविणे आपले कर्तव्य आहे.  
     पहिल्या वाचनात आपण ऐकले आहे की श्रद्धावनतांचा समुदाय एकदिलाचा व एक जीवाचा होता. सर्वजण एक दुसऱ्याविषयी काळजी करत होते. एक दुसऱ्याच्या बरोबर मिळून मिसळून राहत होते परंतु आज आपल्या घरात, गावात, शेजोळात, चर्चमध्ये काय चालले आहे हे आपण सर्वाना ठाऊक आहे म्हणून दैवी दयेचा आदर्श घेऊन आपण आपल्या विश्वासात वाढ करावी व आपल्यावर केलेल्या ख्रिस्ताच्या दयेप्रमाणे आपणही दुसऱ्यावर द्या करावी व ख्रिस्ती समुदयासारखे एकदिलाने व एकजीवाने राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: प्रभो आमची श्रद्धा वाढव.

१. आपले परमगुरु पोप फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ लोकांनी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या विश्वासूपूर्वक पार पाडाव्यात आणि लोकांना दैवी दयेचा अनुभव घेण्यास मदत करावी म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया.
२. आपण सर्वांनी प्रथम ख्रिस्तसभेसारखे एक दिलाचे व एक जीवाचे व्हावे, एक-दुसऱ्याच्या अडी-अडचणीत व सुख:दु:खात मदतीचा हात पुढे करावा म्हणून प्रभूचरणी प्रार्थना करूया.
३. जे लोकं निराश होऊन देवापासून दूर गेलेले आहेत, त्यांना प्रभुने स्पर्श करून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडून आणावे व त्यांनी पुन्हा एकदा प्रभूने दाखवलेल्या मार्गावर चालावे म्हणून प्रभूचरणी प्रार्थना करूया.
४. जगात शांती निर्माण करण्यासाठी व समेट आणण्यासाठी आज जगभरात अनेक संघटना कार्यरत आहेत त्यांना त्यांचे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी, दैवी कृपेचा व देवाचा आशीर्वाद मिळावा म्हणून प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.               

Sunday, 25 March 2018


Reflection for the Homily of Easter  Sunday (01-04-2018) 
By Fr. Malcolm Dinis









पास्काचा सण
(सकाळची मिस्सा)

दिनांक: १/४/२/०१८
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १०:३४ अ. ३७-४३
दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र ३:१-४
शुभवर्तमान: योहान २०:१-९







प्रस्तावना:

“ख्रिस्त आज विजयी झाला मरणा जिंकुनी या उठला”

आज संपूर्ण ख्रिस्तसभा ‘पास्काचा सण’ साजरा करीत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मरणावरती विजय मिळवला म्हणजेच ख्रिस्ताने पाप, मरण व सैतान ह्यावर विजय मिळवला. पुनरुत्थानामुळे ख्रिस्तावर श्रद्धा ठेवणाऱ्या भाविकांना जशी विजयी जीवनाची आशा प्राप्त होते त्याचप्रमाणे सार्वकालिक जीवनावरील श्रद्धाही बळकट होते. ख्रिस्ताचे पुनरुत्थान म्हणजे अंधःकाराच्या राज्यावर मिळविलेला विजय होय. या विजयामुळे सैतानी शक्तीचा कायम निःपात करण्यात आलेला आहे. ख्रिस्ताच्या ह्या आगळ्यावेगळ्या शक्तीमुळे त्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांना विजयी जीवन जगण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले. ख्रिस्ताने मरणावर विजय मिळवून प्रत्येक मानवाच्या मनात आशेचा अंकुर फुलविला आहे. त्याच्या पुनरुत्थानाने आपणास नवजीवन व आशा प्राप्त करून दिली आहे. जसा गव्हाचा दाणा कुजतो, रुजतो तेव्हा हजारो दाणे निघतात तसेच ख्रिस्ताच्या मरणाने प्रत्येक मानवाचे तारण झाले आहे. आपल्या सर्वांना विजयी जीवन जगण्यास पुनरुत्थित ख्रिस्ताचा आशिर्वाद, कृपा व सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून ह्या पवित्र मिस्साबलित विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १०:३४ अ. ३७-४३

संत लूकचा खरा मुख्य हेतू असा होता की, प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे आणि सर्व लोक येरुशलेममध्ये त्याच्या पुनरूत्थानाचे साक्षीदार होतील. हीच साक्ष संत पेत्र ह्या वाचनात देत आहे की, नाझरेथकर येशूला देवाने पवित्र आत्म्याच्या व सामर्थ्याचा अभिषेक केला कारण देव त्याच्या बरोबर होता. अशाप्रकारे सर्व यहुदिया, गालील व शोमरोन ह्या प्रदेशातील मंडलीस स्वास्थता मिळाली आणि तिची उन्नती होऊन ती प्रभूच्या कृपेत व पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत असता वाढत गेली. ही पुनरुत्थानाची साक्ष खुद्द प्रभूने आम्हास दिलेली आहे व आज्ञा केली की, लोकांस उपदेश करा आणि अशी साक्ष द्या की, देवाने नेमलेला असा जीवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल अशी साक्ष सर्व संदेष्टे त्याच्याविषयी देतात.

दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र ३:१-४

     या जगातील गोष्टी क्षणभंगुर व व्यर्थ आहेत. देवाच्या गोष्टी सार्वकालिक व सार्थ आहेत म्हणूनच आपले लक्ष ख्रिस्तावर केंद्रित करणे स्वर्गीय लाभाचे आहे. जे ख्रिस्ताशी जडलेले आहेत ते त्याच्या विचारांशी सुद्धा जडलेले आहेत. विश्वासणारा ख्रिस्ताबरोबर मेला तर त्याच्याबरोबर जिवंतही होईल. कारण ख्रिस्त स्वतः विश्वासणाऱ्याचे जीवन आहे हे सत्य आपल्या नवीन जीवनाचा पाया आहे. जो ख्रिस्तावर आपले संपूर्ण जीवन केंद्रित करतो तो मेला तरी जगेल व त्याच्या गौरवात प्रगट होईल.

शुभवर्तमान: योहान २०:१-९

     पुनरुत्थानाविषयी घटना सांगताना योहानाने निवडक प्रसंगाचाच उल्लेख केल्याचे स्पष्टच दिसते. या घटनेमधून शिकावयाच्या काही आध्यात्मिक धडयांचे विवरण करण्याचा त्याचा उद्देद्श आहे
      चारही शुभवर्तमानकरांनी सांगितलेल्या विविध प्रसंगांची एकवाक्यता साधून त्यातून एकच सलग चित्र उभे करणे सोपे नाही. मरीया मग्दालीया एकटीच कबरे जवळ होती असे योहान सांगतो, तर मत्तय व मार्क हे यात इतरांचाही समावेश करतात. तथापि मरीया मग्दालीया तेथे होती यावर सर्वांचे एकमत आहे.   
            कबरेमध्ये असलेल्या वस्त्रांची जागा योहानाने नेमकेपणे सांगितली आहे. डोक्याला असलेला रुमाल वेगळा एकीकडे होता, यावरून असे समजून येते की, त्यांना कुणीच हात लावला नाही हे सूचित होते. लाजर कबरेतून प्रेतवस्त्रे गुंडाळलेला असा बाहेर आल्याचे आठवण योहानाने कदाचित हे वेगळेपणा दाखवले असेल. येशूच्या कार्यध्येयामध्ये शास्त्रलेख परिपूर्ण होण्याचे महत्त्व काय व किती आहे ते आरंभीच्या ख्रिस्ती लोकांना पुढे नंतरच समजले.

बोधकथा:

     दुसऱ्या महायुद्धानंतर एक जपानी अधिकारी उद्वस्त झालेल्या परिस्थितीची पाहणी करत होता, सर्वत्र राख, अर्धवट जळालेली प्रेते, झाडांच्या खोडामधून निघणारा धूर अश्या परिस्थितीत त्या अधिकाराचे लक्ष एका लहानशा झाडाकडे गेले, त्या झाडाला नवीन पालवी फुटली होती. त्या माणसाने विचार केला जर ह्या लहानश्या झाडाला अश्या परिस्थितीत पालवी फुटते तर मग ह्या आमच्या मानवी जीवनाला काय झाले आहे, आमच्या मनाला व विचारांना पालवी का फुटू नये ? अश्या विचाराने ह्या माणसाने इतरांना पुन्हा उठण्याची व भरारी मारण्याची प्रेरणा दिली.
     येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान आम्हाला आज हेच शिकविते.        

मनन चिंतन:

     मनुष्याचे या जगातील जीवन अतिशय क्षणिक आहे. या जीवनाची अखेर ज्या घटनेने होते, तिला आपण मरण म्हणतो. गवताप्रमाणे मनुष्यजीवन अल्पकाळ टिकते, सृष्टीतील पशुप्राणी, वनस्पती देखील नश्वरतेच्या अधीन आहेत. आपल्याला एक दिवस हे जग सोडून जावे लागणार आहे. इथली धनदौलत, उच्च पदव्या, नातेवाईक, मित्रमंडळी सगळ्यांचा निरोप घ्यावा लागणार आहे. ही वस्तुस्थिती मानवी जीवनावर नैराश्याचे सावट आणणारी आहे. जसे मनुष्याचे पृथ्वीवरील जीवन क्षणभंगूर आहे, तसे पृथ्वीवरील आनंदही क्षणभंगुर आहेत. मधुर फळ खाताना आनंद होतो. नवा कोरा पोशाख चढवताना आनंद होतो. चित्रपट पाहताना आनंद होतो. मात्र हे सर्वच आनंद विरघळून जातात. केवळ अल्पकाळ टिकणारे जगिक आनंदाचे क्षण उपभोगण्यासाठी जर मनुष्य जगत असेल व मरणानंतर आपलं काय होत हे त्याला ठाऊक नसेल तर मानवी जीवन ही एक क्लेशदायी शोकांतिका आहे.
     परंतु मरण हा ख्रिस्ती जीवनाचा पूर्णविराम नसून तो एका खऱ्या नवजीवनाचा प्रारंभ आहे. म्हणूनच गुडफ्रायडेला अर्थ आहे तो इस्टरच्या पुनरुत्थित प्रभू येशूच्या प्रकाशात कारण पुनरुत्थित प्रभू येशूख्रिस्त हा आदि आणि अंत आहे, प्रारंभ आणि शेवट आहे. आपल्या जीवनाचा पाया आणि कळस आहे. रात्र आणि दिवस ह्यांच जस नात आहे तस गुडफ्रायडे आणि इस्टर ह्या दोन दिवसाचं नात आहे. रात्रीनंतर निश्चितपणे पहाट होत असते तशीच गुडफ्रायडेच्या अंधारानंतर इस्टरची मंगल पहाट फुटत असते. किंबहुना इस्टरची सुंदर पहाट होण्यासाठी गुडफ्रायडेच्या रात्रीची आवश्यकता आहे. असत्याची सर्व बंधने तोडून सत्य हे आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या रुपात पुनरुत्थित झाले आहे.
आजचा दिवस हा आम्हा श्रद्धावंतासाठी एक आनंदाचा दिवस आहे. पुनरुत्थान म्हणजे ‘पूर्ण बद्दल’ राखेतून पुन्हा उठण्याचा अनुभव.
     अनेक वेळा जीवनातील दुःखभोग, वेदना, अरिष्टे, संकटे, एकाकीपणा यामुळे आम्ही निराश आणि हतबल होतो. सर्व आशा गमावून बसतो. हे चित्र बदलण्याची किमया प्रभू येशूने केली. आपल्या पुनरुत्थानाने त्याने वधस्तंभालाच अर्थपूर्ण केले. म्हणूनच ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर श्रद्धा ठेवणाऱ्यांना निश्चितच भविष्यात आशा आहे. ह्या आशेच्या किरणामुळेच निराशेतून आशेकडे, अपयशातून यशाकडे, दु:खातून सुखाकडे, असत्याकडून सत्याकडे मार्गक्रमण करण्यास सामर्थ्य प्राप्त होते. कारण ख्रिस्ताने पुनरुत्थित होऊन जगावर, मृत्यूवर आणि सैतानावर संपूर्णपणे विजय मिळवलेला आहे. ख्रिस्त मेलेल्यातून उठला आणि आजही तो आपल्यामध्ये जिवंत आहे. ज्यांना ह्या जिवंत ख्रिस्ताचा अनुभव झालेला आहे त्यांनी देवाला अनुभवलेला आहे. जेव्हा आपण आपल्या जीवनात स्वच्छ अंतःकरणाने प्रभू येशुला शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो आपल्याला दर्शन देत असतो. ज्याप्रमाणे शुभवर्तमानामध्ये ज्या शिष्यांनी येशूला सोडून दिले पण जेव्हा त्यांनी शुद्ध अंतःकरणाने प्रभूला शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रभूने त्यांना दर्शन दिले व ही आनंदाची शुभवार्ता इतरांना देण्यासाठी त्यांना पाठविले.
     आज जगात पुनरुत्थान व जीवन ह्यांची गरज आहे. अर्धेअधिक लोक मेलेले आहेत. त्यांचे विचार, त्यांच्या कल्पना, त्यांची ध्येयधोरणे मेलेली आहेत. जगात द्वेष, हेवा प्रचंड प्रमाणात आहे. त्यामुळे खून, रक्तपात, जाळपोळ, युद्ध होत आहेत. पुरुष व्यसनात जळून जात आहेत. स्त्रिया वेश्या व्यवसायात कुजून गेलेल्या आहेत. राजकीय नेते पैशांच्या गुलामगिरीत बंदिस्त आहेत. व्यापारी लोक फसवेगीरीच्या साखळदंडानी बांधले गेले आहेत. अन्याय, अत्याचार अशा विकृतीत जीवन जगणाऱ्या सर्वांना प्रभू येशूच्या जीवनाची व पुनरुत्थानाची अधिक गरज आहे. ज्यांची स्वप्ने धुळीस मिळाली आहेत असे प्रेमभंग झालेले लोक, ज्यांना लुटून गेले आहे असे उद्ध्वस्त झालेले लोक ह्या सर्वांना पुनरुत्थान व जीवन ह्यांची गरज आहे.
     ज्याप्रमाणे प्रभूने मरणावर विजय मिळवला त्याचप्रमाणे आपणदेखील ह्या आपल्या आधुनिक संकटावर विजय मिळवूया. कारण आपण पुनरुत्थित प्रभूचे लोक आहोत आणि ‘आल्लेलूया’ हे आपले गीत आहे. म्हणजेच ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची आनंदाची शुभवार्ता संपूर्ण जगाला घोषित करूया व म्हणूया “विजयी तुतारी फुंकीन मी, गीत प्रभूचे गाईन मी”.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे परमेश्वरा द्या कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१. आपले पोप महाशय फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू-भगिनी आपल्या कार्याद्वारे आपल्या लोकांना आणि स्वतःच्या जीवनात नवजीवनाचा अनुभव यावा म्हणून कष्ट घेतात. त्यांच्या कार्यात पुनरुत्थित येशू ख्रिस्ताच्या कृपेने यश लाभावे म्हणून प्रार्थना करूया.
२. ख्रिस्ताच्या मळ्यात काम करण्यास तरूण तरुणींनी पुनरुत्थित ख्रिस्ताच्या आदर्शातून पाचारण घडावे म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया.
३. आपल्या धर्मग्रामातील गरजवंत, आजारी व एकाकी लोकांना पुनरुत्थित ख्रिस्ताचा आधार मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. राष्ट्रा-राष्ट्रांमधील, देशांतर्गत चाललेले वाद व हिंसाचार निवळावे, आपण सर्व एकाच देवाची लेकेरे आहोत ही ऐक्य भावना वाढीस लागावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आता आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजीक हेतूसाठी प्रार्थना करूया. 




Reflection for the Homily of  'Easter Vigil' (31-03-2018)

पुनरुत्थान रविवार


जागरण विधी 


दिनांक: ३१/०३/२०१८
पहिले वाचन: उत्पत्ती १:१-२,
दुसरे वाचन: उत्पत्ती २२:१-१८
तिसरे वाचन: निर्गम १४:१५-१५:१अ
चौथे वाचन: यशया ५४:५-१४
पाचवे वाचन: यशया ५५:१-११
सहावे वाचन: बारुख ३:९-१५.३२-४:४
सातवे वाचन: यहेज्केल ३६:१६-२८
आठवे वाचन: रोमकरांस पत्र ६:३-११
शुभवर्तमान: मार्क १६:१-७ 

आजच्या ह्या विधीचे चार मुख्य भाग आहेत.  

पहिला भाग: 

·   प्रकाश विधी- ह्या विधीमध्ये पुनरुत्थित येशू जगाचा प्रकाश आहे हे आपण घोषीत करतो.

दुसरा भाग: 

·    प्रभुशब्द विधी-  ह्या विधीमध्ये जुन्या व नवीन करारातील निवडक वाचने वाचली जाणार आहेत. ह्या सर्व वाचनांतून देवाचे मानवावरील अपार प्रेम आहे हे दिसून येते. 

तिसरा भाग: 

·   पाण्याला आशीर्वाद- ह्या विधीमध्ये बाप्तिस्म्या संस्कारासाठी लागणा-या पाण्याला आशीर्वाद दिला जातो. बाप्तिस्मा संस्काराने आपण देवाची मुलं होतो. पुनरुत्थानाचे पहिले गोड फळ म्हणजे बाप्तिस्मा. ख्रिस्तामध्ये आपला बाप्तिस्मा होणे हा देवाचा अनन्यसाधारण आशीर्वाद आहे.

चौथा भाग: 

·   ख्रिस्तप्रसाद विधी-  ह्या विधीमध्ये आपण सर्वजण पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकारणार आहोत. पुनरुत्थित येशूला आपण आपल्या जीवनात नव्याने स्वीकारणार आहोत.
       
प्रस्तावना:

तो उठला आहे 

ख्रिस्ताठायी जमलेल्या प्रिय भाविकांनो आज ह्या पवित्र रात्री प्रभू येशू ख्रिस्ताने मृत्यूवर विजय मिळविला आहे. त्याने दु:ख सोसले, त्याला क्रुसावर खिळण्यात आले आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे आज तो मरणावर विजय मिळवून पुनरुत्थित झाला आहे. येशू मरणातून उठलेला आहे हा आपला दृढ विश्वास आहे आणि ह्या विश्वासाच्या बळावर आज अखिल ख्रिस्तसभा बांधण्यात आली आहे. आपल्या पापांचे ओझे येशूने स्वत:च्या खांद्यावर घेऊन आम्हाला विसावा दिला. आमच्या पापांसाठी तो क्रुसावर मेला. येशू पुनरुत्थित होऊन आम्हा सर्वांना शाश्वत जीवनात सामील केले आहे. येशूच्या जीवनात प्रामाणिकपणा, ध्येय आणि विश्वास होता. जन्मापासून ते पुनरुत्थित होई पर्यंत त्याने प्रामाणिकपणे आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा पूर्ण केली. शेवटी त्याने आपल्या जीवनाचे सार्थक केले.
ह्या पवित्र मिस्साबलिदानात सहभागी होत असताना पुनरुत्थित येशूचा प्रकाश, कृपा आणि शांती आम्हावर सदैव रहावी आणि आम्ही सुद्धा आमचे ख्रिस्ती जीवन आणि कार्य, प्रामाणिकपणा आणि विश्वास ह्या मुल्यांनी भरावे म्हणून प्रभूकडे याचना करूया. 
सम्यक विवरण:

     आजचा विधी हा पास्काचा जागरण विधीम्हणून ओळखला जातो. ख्रिस्ती धर्माने हे नाव व दिवस यहुद्यांच्या पास्काच्या सणावरून घेतलेले आहे. इजिप्त देशात देवाचा दूत यहुद्यांची घरे ओलांडून गेला व इजिप्त वासियांच्या प्रथम जन्मलेल्या बालकांचा वध केला; हे सर्व यहुद्यांची फारोच्या गुलामगिरीतून सुटका व्हावी म्हणून करण्यात आले. ख्रिस्ती धर्माने हा सण प्रभूच्या पुनरुत्थानाचा सणम्हणून घोषित केला. प्रभूने आपले मरण व पुनरुत्थानाने पापांवर विजय मिळविला. मरणातून सार्वकालिक जीवनाकडे प्रभूने केलेले हे ओलांडण यहुद्यांनी ज्याप्रमाणे गुलामगिरीतून सुटका झाल्यानंतर परमेश्वराठायी एका नव्या जीवनाला सुरुवात केली; त्याचप्रमाणे प्रभूच्या पुनरुत्थित जीवनाद्वारे आपणास एका नव्या जीवनाला प्रारंभ करण्यास मुभा मिळते. म्हणूनच आजच्या दिवशी स्नानसंस्कार दिला जातो व स्नानसंस्काराच्या वचनांचे नुतनीकरण केले जाते. म्हणूनच प्रभूच्या जीवन, मरण व पुनरुत्थानाला ‘paschal mystery’ ‘पास्काचे रहस्यम्हणून संबोधित केले जाते व ख्रिस्ती श्रद्धेत महत्वाचे स्थान दिले जाते.
अ) जुन्या करारातील सात वाचने आपणास परमेश्वराच्या दैवी नियोजनाची पुर्तता मानवी जीवनात कशी होते याची प्रचीती देते. देव शून्यातून विश्वाची निर्मिती करतो, आपल्याच प्रतिरुपाप्रमाणे तो मानवास निर्माण करतो व त्यास सा-या निर्मितजणांचा अधिपिता करतो. मानवाचे वर्चस्व त्यांस देवापासून दूर घेऊन जाते व तो पापांच्या खाईत पडतो. परंतु देव मानवाच्या तारणासाठी आपल्या निवडलेल्या लोकांद्वारे, संदेष्ट्यांद्वारे मानवास आपल्या जवळ आणतो. पाप व मुक्तता याची पुन्हा-पुन्हा होणारी पुनरावृत्ती याचे दर्शन आपणास ह्या वाचनात घडते.
ब) संत पौल रोमकरांस लिहिलेल्या पत्रात ख्रिस्ती बांधवांना प्रभूमध्ये जीवन जगण्यास प्रवृत्त करत आहे. पौल म्हणतो, “स्नानसंस्काराद्वारे प्रत्येक ख्रिस्ती हा ख्रिस्तामध्ये मरतो व ख्रिस्तामध्ये पुनरुत्थित होतो”. त्याचे सर्व जीवन हे ख्रिस्ताद्वारे सुरु होते व ख्रिस्तामध्येच संपते. संत पौल हा खिस्ती लोकांविषयी फार चिंतित होता, कारण त्यांनी आपले ख्रिस्ती जीवन चांगल्याप्रकारे सुरू केले होते, परंतु अनेक वेळा ते कुमार्गाला जात होते. त्यामुळेच पौल त्यांस ख्रिस्ती जीवनाचा मार्ग कसा क्रमण करावा ह्याचे धडे देतो. तो म्हणतो, स्नानसंस्काराद्वारे मानवाने आपला पूर्वीचा कुमार्ग सोडावा व तो अशाप्रकारे सोडावा की त्याने जणू म्हणावे मी पापासाठी मेलो आहे. मृत व्यक्ती चोरी करत नाही, व्यभिचार करत नाही, खुण करत नाही म्हणजेच तो आपल्या पापी जीवनाला मरतो व ख्रिस्तामध्ये नवजिवीत होऊन जगतो. अशाप्रकारे स्नानसंस्काराद्वारे प्रत्येक व्यक्ती देवाचे लेकरु होते. जोपर्यंत ख्रिस्त माझ्यात नाही व मी ख्रिस्तात नाही, तोपर्यंत मी प्रभूच्या सानिध्यात जीवन जगू शकत नाही.
क) मार्कलिखित शुभवर्तमानात आपण प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी ऐकतो. यहुदी लोक मृत व्यक्तीस काळजीपूर्वक दफन करीत असत. विविध गंधरस लावून ते प्रेतास जपत असत. शब्बाथ दिवस आड आल्याने प्रभू येशूचा मृतदेह घाईत दफन केला गेला होता. त्यामुळे स्त्रियांना यहुदी रीतीप्रमाणे गंधरस लावता आले नव्हते. ह्यासाठीच त्या भल्या पहाटे ही उत्तरक्रिया पूर्ण करण्यासाठी थडग्यापाशी गेल्या होत्या. त्यांनी हे कृत्य येशुठायी असलेल्या प्रेमापोटी व श्रद्धेपायी केले.
     प्रभू येशूच्या पुनरुत्थानाची प्रचिती आपणास खालील मुद्द्यावरून येते:
१. कबरेचा धोंडा बाजूला सारला होता.
२. कबरेत दूताने दिलेला संदेश
३. रिकामी कबर 
४. प्रभूला ज्या वस्त्रात गुंडाळून ठेवले होते ते वस्त्र येशुविरहित तेथे पडलेले होते.
हे सर्व दृश्य पाहून स्त्रिया भयभीत झाल्या होत्या. त्या शिष्यांना काय जाब देणार? म्हणूनच दूत त्यांना म्हणतो, ‘भिऊ नका प्रभू मरणातून उठला आहे.स्त्रिया आश्चर्यचकित झाल्या; कारण हे असले अजब कधीच घडले नव्हते व ऐकलेही नव्हते. फक्त मार्कच्या शुभवर्तमानातच दूताचा आदेश आपणास आढळतो: जा, व त्याच्या शिष्यांना व पेत्रास सांगा.दूत स्त्रियांस ही शुभवार्ता घोषीत करण्याचे आदेश देतो. शुभवर्तमानाच्या शेवटी आपण ऐकतो की, ह्या स्त्रिया भीतीपोटी हा संदेश कुणालाच सांगत नाहीत.
खरे पाहता, संदेश किंवा शुभवर्तमान प्रसारण करण्याचे कार्य हे देवाचे आहे. जोपर्यंत देव आदेश देत नाही तोपर्यंत त्या संदेशाचा प्रसार कुणीच करू शकत नाही. दूताने पेत्राचे नाव विशेष घेतले कारण जे काही प्रभूने भाकीत केले होते त्याची पूर्तता झाली आहे ह्याची खात्री पेत्राला व्हावी. पेत्र जरी बेईमान ठरला तरी त्याने पश्चातापाद्वारे प्रभूच्या दयेची प्राप्ती केली. त्यामुळे आपल्या पुनरूत्थानाचा संदेश पेत्राला नक्कीच संतोष देईल ही प्रभूला खात्री होती. प्रभू पापी माणसासाठी क्रुसावर मरण पावला व मरणातून उठला. पश्चातापी  लोकांस आपल्याजवळ घेणे प्रभूला नक्कीच संतुष्टकारक ठरेल. 
बोधकथा:

     आपल्या राज्याचा भावी राजा ठरवण्यासाठी वृद्ध राजाने एक परीक्षा घेण्याचं ठरवलं. आपल्या चारही पुत्रांना बोलावून त्याने प्रत्येकाला एक ‘बी’ दिली आणि सांगितलं, ही बी नेऊन तिची लागवड करा. आलेल्या झाडाची उत्तम जोपासना करा. एक वर्षानंतर तुमच्या झाडांची मी पाहाणी करेन. त्यातून उत्तम ठरलेल्या तुमच्यापैकी एकाची मी राजा म्हणून निवड करेन.
     एका वर्षानंतर राजाने चौघांनाही बोलावलं. धाकटा जायला तयार नव्हता. कारण त्याच्याकडचं बी रुजलचं नव्हतं. पण जे घडलं ते सरळ सांगावं या इराद्याने तोही पोहोचला. राजाने आपल्या पुत्रांनी जोपासलेली झाडं पाहिली आणि त्यांचं कौतुक केलं. धाकटा मात्र शांत उभा होता. राजाने त्याच्या झाडाबद्दल विचारलं तेव्हा त्याने जे घडलं ते सांगितलं. आपले प्रयत्न अयशस्वी ठरल्याबद्दल राजाची क्षमा मागितली. तसा राजा झटकन पुढे झाला आणि स्वत:च्या डोक्यावरचा राजमुकुट त्याने धाकट्याच्या डोक्यावर ठेवला.
     राजाची ही कृती पाहून बाकीचे पुत्र चकित झाले. धाकट्याचे झाड उगवलं नसताना त्याची निवड का ? असा प्रश्न त्यांनी राजाला केला. तेव्हा राजा म्हणाला, ‘मी तुम्हा सर्वांना उकडलेल्या बिया दिल्या होत्या. त्यातून झाड उगवणे शक्यच नव्हतं. तुम्ही तिघांनी अप्रामाणिकपणा केला. दुसरंच बी रुजवून झाड उगवलंत. धाकट्याने मात्र प्रामाणिकपणे प्रयत्न केले. तो सत्याशी प्रामाणिक आणि प्रामाणिकतेशी वचनबद्ध राहिला. मला राज्यासाठी असा राजा हवा, जो आपल्या प्रजाहिताच्या ध्येयासाठी आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कार्याशी वचनबद्ध राहील. कारण वचनबद्धता राखणारा माणूसच यशस्वी ठरतो.
( ‘ध्येयाशी व्हा वचनबद्ध’ हे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या जीवनात देखील पाहता येते. येशू जन्मापासून ते पुनरुत्थित होईपर्यंत आपल्या पित्याशी आणि शिष्यांशी प्रामाणिक राहिला. येशूचे हे प्रामाणिकपणाचे जीवन आम्हा सर्वांचा विश्वास दृढ करते.)    

मनन चिंतन:

     प्रत्येक माणसाचे ध्येय असते. प्रत्येकाला महत्वकांशी व्हायचे असते. म्हणून एखादे विशिष्ट प्रकारचे ध्येय गाठण्यासाठी श्रमाची, विश्वासाची, प्रामाणिकपणाची आणि सातत्याची गरज असते. आपल्या स्वप्नांना चिकटून रहा, कारण जर स्वप्नेच मेली तर जीवन पंख तुटलेल्या पक्षासारखे होईल. ह्या गोष्टींचा जर अभाव असेल तर आपले जीवन समुद्रात नावाडी नसलेल्या होडी प्रमाणे होईल, होडी वाऱ्याच्या प्रभावामुळे कुठेही जाईल.
     आज आपण मोठ्या उल्लासाने ‘आलेलूया’ गातो. गोड सुराने देवाची महिमा गातो. का? कारण आज ध्येयाला वचनबद्ध असलेला येशू पुनरुत्थित झाला आहे. देवाचे वचन सांगते, ‘असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दु:ख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून उठावे (लूक २४:४६). जर आपण बारकाईने येशूच्या जीवनावर मनन चिंतन केले तर आपल्याला असे आढळून येईल की येशूच्या शब्दाला व कृतीला प्रतिबिंब आहे; म्हणजेच येशूचे जीवन परिणामकारक आहे. उत्पती पुस्तकात जेव्हा सृष्टीची निर्मिती करण्यात आली तेव्हा देव बोलला, तेथे प्रकाश होवो आणि तेथे प्रकाश झाला. अशाप्रक्राचे येशूचे जीवन आहे. येशू म्हणतो, मी जीवनाचा प्रकाश आहे आणि खरोखर तो प्रकाश झाला. येशू इतर लोकांना विविधप्रकारे प्रकाश झाला ह्याची ग्वाही किंवा साक्ष पवित्र शास्त्र देते. हेच वचनबद्ध येशूचे जीवन त्याच्या पुनरुत्थित कृतीला शोभा देते.
     गुलाबाच्या फुलाला ज्याप्रमाणे काट्यांच्या मार्गातून वाट काढावी लागते, त्याप्रमाणे येशूचे पुनरुत्थित जीवन संकटानी, दु:खानी आणि मोहाने भरलेले होते. पण ह्या सर्वांवर मात करत येशू पुनरुत्थित झाला. देवाने आपणा सर्वांसाठी तारणारा पाठवला. शिष्यांच्या मते हा तारणारा तलवार घेऊन सर्वांचा नाश करेल. त्यांच्यामते तारणारा हा मोठा राजा असेल. परंतू तारणारा कसा आला? तो गाढवावर बसून आला. हातात तलवार नव्हती. तर त्याचे जीवन फक्त शांतीने, क्षमेने आणि प्रेमाने भरलेले होते. आयुष्यभर येशूने हिंसक गोष्टी नाही केल्या तर शांतीचा झेंडा हातात घेऊन गर्विष्ठ लोकांची मान लाजेने खाली झुकवली. आज आपण ह्याच येशू ख्रिस्ताला शांतीचा, प्रेमाचा राजा संबोधतो.
     येशूने बहुतेक वेळा पवित्र शास्त्रात म्हटले आहे की, मला जीवे मारले जाईल, परंतू मी तिसऱ्या दिवशी मरणातून उठेन. आज खरोखर डोळ्यातून अश्रू खाली पडत आहेत. का ? कारण निष्पाप येशूला यहुद्यांनी क्रुसावर जीवेशी मारले. माझ्या, तुमच्या आणि सर्वांच्या पापांसाठी येशूने क्रूस वाहिला. पण आज डोळ्यातून आनंदाचे अश्रू बाहेर यायला पाहिजे. कारण येशूने जे सांगितले होते त्याची आज पूर्तता झाली आहे. आज तिसरा दिवस. ह्या तिसऱ्या दिवशी येशू पुनरुत्थित झाला आहे. शुभवर्तमानात आपण ऐकले की मग्दालीया मरिया, योकोबाची आई मरिया व त्या सलोमे ह्यांनी येशूला सुगंधद्रव्ये लावण्यासाठी कबरेजवळ आल्या. परंतु त्यांना कबर उघडी दिसली. कबरेच्या आत गेल्या तेव्हा पांढरा झगा घातलेल्या एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या. तो त्यांना म्हणाला, चकित होऊ नका; वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेथकराचा शोध तुम्ही करीत आहा. तो उठला आहे, तो येथे नाही.
तो उठला आहे याचा अर्थ येशू पुनरुत्थित झाला आहे. त्याने मरणावर विजय मिळवला आहे. आपण नव्या करारामध्ये पाहतो: विशेषकरून;
·        मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दु:खे भोगावी, वडीलमंडळ, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, जीवे मारले जावे आणि त्याने तीन दिवसानंतर पुन्हा उठावे (मार्क ८:३१).
·        मनुष्याच्या पुत्राला पापी जणांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खिळण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे, ह्याचे अगत्य आहे (लूक २४:७).
·        आणि तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जिवे मारिले; पण देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले ह्याचे आम्ही साक्षी आहो (प्रेषितांची कृत्ये ३:१५).
पुनरुत्थित होऊन येशूने आपल्या पित्याची इच्छा पूर्ण केली. सर्व मानवजातीस पापमुक्त करणे हे येशूचे ध्येय होते. ते त्याने पूर्ण केले. येशूने स्वत:चा प्राण गमावला. स्वत: निस्वार्थी जीवन जगून इतरांना प्रभूकडे आणले. त्याची महत्वकांक्षा ही प्रेमाने, शांतीने आणि समेटाने व्यापून गेली होती. सदैव तो आपल्या जीवनात प्रामाणिक राहिला. जेव्हा शिष्यांनी येशूची बिकट हालअपेष्टा बघितली तेव्हा त्यांनी कदाचित विचार केला असेल की हा येशू आमचा तारणारा स्वत:ला वाचवू शकत नाहीत मग आम्हाला कस काय वाचवू शकेल? शिष्यांच्या शंकेचे निरासन येशूने पुनरुत्थित होऊन केले. पुन्हा एकदा शिष्यांचा विश्वास दृढ झाला. कित्येक शिष्य येशूची सुवार्ता घोषविण्यासाठी तप्तर झाले. जगाच्या काना कोपऱ्यात जाऊन येशूचा मार्ग प्रगट केला. त्यांनी देवराज्याची घोषणा केली. काहींनी आपला प्राण गमावला. हीच आहे पुनरुत्थित येशूची घोषणा.
आपल्या जीवनातील ध्येय काय आहे ? पैसा, मालमत्ता, नाव-लौकिकता, बंगला, गाडी हे सर्व आहे का? ह्याच्या व्यतिरिक्त येशू आणि येशूची शिकवण असली पाहिजे. देवाचे वचन सांगते, ‘तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील (मत्तय ६:३३). आजचा हा पुनरुत्थित येशूचा दिवस आपणा सर्वांना त्याच्या ध्येयाने भरून जावो अशी प्रभूकडे विनवणी करूया. ज्याप्रमाणे येशू जन्मापासून ते पुनरुत्थित होई पर्यंत आपल्या पित्याशी विश्वासू राहिला, प्रामाणिकपणाने जगाला; त्याप्रमाणे आपण ख्रिस्ती बांधव सुद्धा आपल्या ख्रिस्ती जीवनात प्रामाणिक राहावे व आपल्या विश्वासाला चिकटून राहावे म्हणून प्रार्थना करूया.        

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: प्रभो आंम्हास कृपेचे नवजीवन दे.

. आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरू आणि धर्मबंधूभगिनींना पुनरुत्थित प्रभूचा आनंद व आशा त्यांच्या प्रेषितीय कार्यात सतत मिळावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
२. आपला ख्रिस्ती समुह पापांच्या दरीतून मुक्त होऊन, परस्पर प्रेम व सौख्यभावनेने रहावा म्हणून आपण प्रार्थना करुया.
३. आज ज्यांनी नव्याने स्नानसंस्कार स्वीकारला आहे अश्यांनी प्रभूठायी विश्वासू राहून एक चांगले ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करुया.
४. ज्या लोकांना ख्रिस्ताची अजूनही ओळख पटलेली नाही अशांना प्रभूच्या प्रेमाची ओळख त्याच्या निवडलेल्या लोकांद्वारे व्हावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
५. आपण सर्वांनी विश्वासात घेतलेला पुनरुत्थित प्रभूचा अनुभव सदाकाळ आपल्या मनी बाळगून त्या सार्वकालिक जीवनात सहभाग घेता यावा म्हणून आपण प्रार्थना करुया.