Thursday, 12 August 2021

Reflection for The Assumption of the Blessed Virgin Mary (15/08/2021) By Bro. Suhas Farrel



पवित्र मरीयेच्या स्वर्गनयनाचा सोहळा


दिनांक: - १५/०८/२०२१

पहिले वाचन: - प्रकटीकरण ११: १९अ- १२: १- ६अ, १०अ ब

दुसरे वाचन: - १ करिंथ १५: २०-२७अ

शुभवर्तमान: - लुक १:३९-५६


“स्त्रियांमध्ये तूं धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य!”


प्रस्तावना

        योहानाच्या शुभवर्तमानात अध्याय १७:२१ मध्ये आपण वाचतो कि, प्रभू येशूने आपल्या मरणापूर्वी स्वर्गीय पित्याकडे आपल्या शिष्यांसाठी कळकळीची प्रार्थना केली कि, “हे पित्या, जसे आपण दोघे एक आहोत, तसेच माझ्या शिष्यांना, माझ्या अनुयायांना देखील तू सदैव एकत्र ठेव”.

        आज ख्रिस्तसभा पवित्र मरीयेच्या स्वर्गनयनाचा सोहळा साजरा करीत आहे. आजच्या दिवशी पवित्र मरीयेला सदेह स्वर्गात घेतलं गेलं. आणि त्याद्वारे ती स्वर्ग आणि पृथ्वीची राणी झाली. हीच पवित्र मरिया देवाने आपणाला आपल्या सर्वांची आई म्हणून दिली आहे. पवित्र मरिया संपूर्ण जीवनभर प्रभूच्या शब्दाशी एकनिष्ठ राहिली. हीच पवित्र मरिया आपल्या सर्वांसाठी एक उत्तम आदर्श आहे. सार्वकालिक जीवनासाठी ती एक आशा आहे. करण आपण जर मरीये प्रमाणे आपले जीवन जगलो तर आपणालाही एके दिवशी सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.

        आज आपण दोन मातांचा सण साजरा करीत आहोत. एक स्वर्गीय माता आणि दुसरी भारत माता. आपल्या स्वर्गीय मातेप्रमाणे भारत मातेचा सन्मान करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडता यावे व त्यासाठी लागणारी कृपा आपणा सर्वांना लाभावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

मनन चिंतन

        एकदा एका माणसाची मोठ्या जहाजाने जलप्रवास करण्याची खूप इच्छा होती. आपली ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने अनेक अशा जहाज कंपन्यांचा शोध केला. आणि कालांतराने आवश्यक इतके पैसे जमा झाल्यावर तो आणि त्याची बहिण हे दोघेही जलप्रवासासाठी जाणार या विचारानेच ही व्यक्ती इतकी आनंदित होती कि ती आपल्या सर्व मित्र-मैत्रिणींना त्याविषयी सांगत फिरली. जलप्रवासाला जाण्याच्या महिन्या भर अगोदर रॉयल कॅरीवियन कंपनी कडून ह्या माणसाला एक (DVD) पाठविण्यात आला. त्या (DVD) मध्ये प्रवासाचं नियोजन कस असणार आहे? ते जहाज कुठे-कुठे मुक्कामासाठी थांबणार आहे? असे सर्व काही चित्रीकरण करण्यात आले होते. ती (DVD) पाहताच ह्या माणसाचा आनंद गगनात मावेनासा झाला. (DVD) मध्ये पाहत असलेला देखावा हा इतका रमणीय होता कि तो मनमुक्त झाला. तो एकदम भारावून गेला करण त्याला माहित होते कि, काही दिवसानंतर तो ती सगळी स्थळ स्वतःहून पाहणार आहे.

किती छान संकल्पना आहे ना? ज्या स्थळांना आपण भेट देणार आसतो त्या पहिल्यांदा टीव्ही अथवा कॉम्पुटरवर पाहणे. किंवा दुसरी एखादी गोष्ट जी आपण भविष्यामध्ये करणार आहोत त्याचा आढावा आपल्याला एखाद्या (DVD) द्वारे पाहण्यास मिळाला तर किती छान वाटेल? लग्न म्हणा किंवा एखादी नवीन नोकरी म्हणा कि ज्याच्याविषयी आपल्याला पूर्ण संकल्पना असली की आपली उत्सुकता अजून वाढते.

आज मरीयेच्या स्वर्गनयनाचा सण साजरा करीत असतांना देऊळमाता आपल्याला आपल्या इष्टस्थळाची एक झलक दाखवीत आहे. आपणा सर्वांना ठाऊक आहे की, मरिया ही सदेह स्वर्गात घेतली गेली आणि आपणा सर्वांचे ध्येयही स्वर्गात जाणे हेच आहे. आपला प्रभू येशूख्रिस्त खुद्द आपल्याला शाश्वती देतो की, तो आपल्याला स्वर्गाराज्यामध्ये घेऊन जाणार परंतु त्यासाठी आपल्याला प्रभू येशूख्रिस्तामध्ये राहायला लागेल. जेव्हा आपण ख्रिस्तामध्ये आणि ख्रिस्त आपणामध्ये असेल तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने स्वर्गामध्ये सामील होण्यासाठी पात्र ठरू. करण प्रभू येशू ख्रिस्त हाच आपण सर्वांच्या तारणाचा एकमेव मार्ग आहे. मरीयेचे तारण हे प्रभू ख्रिस्ताद्वारेच झाले. ज्याप्रमाणे आपणा सर्वांना प्रभू येशूख्रिस्ताने स्वर्गाराज्याचे वचन दिले आहे, अगदी त्याचप्रमाणे मरीयेला देखील देवाने वचन दिले होते. मरीयेने देवाचा शब्द तंतोतंत पाळला आणि देवावर संपूर्ण विश्वासाने आपले जीवन समर्पण केले. मरीयेच्या त्या विश्वासाचे फल म्हणजेच आज आपण साजरा करीत असलेला ‘स्वर्गनयनाचा सण’.  मरिया ही तिच्या जन्मापासून परिपूर्ण म्हणजेच तिच्या आईच्या उदरामध्ये असतांनाच देवाने तिला पापांपासून वंचित ठेवले होते. पापाचा अंत हा मृत्यूमध्ये होत असतो. आणि मरिया ही पापांपासून मुक्त असल्याकारणाने ती मृत्यूला सामोरे न जाता परमेश्वराच्या वचनाप्रमाणे सदेह स्वर्गात घेतली गेली.

आपली पहिली आई, हेवा, ही पापात पडली आणि स्वर्गाचे द्वार बंद झाले. याउलट आपल्या सर्वांची आई पवित्र मरिया हिने पापांपासून वंचित राहून आपल्यासाठी स्वर्गाचे द्वार पुन्हा एकदा उघडे केले आहे. त्यामुळेच आता देवराज्यामध्ये फक्त कुमारी माता, पोपसाहेब, धर्मगुरू- धर्मभगिनी ह्यांनाच नाही तर आपणा प्रत्येकांसाठी जागा निश्चित केली आहे. आजचा हा सोहळा साजरा करीत असतांना मरिया माता ही आपणा सर्वांना अपले जीवन हे प्रभू येशूच्या जीवनाप्रमाणे जगण्यासाठी प्रेरित करीत आहे. तसे केल्यानेच आपण खऱ्या अर्थाने स्वर्गराज्यात प्रवेश करण्यासाठी पात्र ठरू.

ज्याप्रमाणे कथेतील माणसाने जलप्रवासास जाण्यासाठी त्याच्या कित्येक महिन्याची कमाई गोळा केली. त्यासाठी त्याने कित्येक अशा गोष्ठी बलिदान केल्या होत्या. आपण स्वर्गराज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी काय काय बलिदान करत आहोत? जर एखाद्या जलप्रवासास जाण्यासाठी तो माणूस इतका उत्सुक होता तर स्वर्गराज्यामध्ये जाण्यासाठी आपण किती उत्सुक व्हायला पाहिजे? आज मरीयेच्या जीवनाद्वारे प्रेरित होऊन आपणही आपले जीवन प्रभू ख्रिस्ताच्या मार्गावर चालण्यासाठी प्रयत्न करूया.        

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: पवित्र माते, आम्हासाठी विनंती कर.

१. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, सर्व बिशप, धर्मगुरू व व्रतस्त बंधू- भगिनी, जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करतात त्यांची श्रद्धा बळकट व्हावी व इतरांची श्रद्धा त्यांनी बळकट करावी, म्हणून आपण मरिया मातेसह प्रभूकडे प्रार्थना करूया.

२. ज्या स्त्रिया मातृपदाची अपेक्षा आपल्या मनात बाळगून आहेत, अशांवर देवाचा आशीर्वाद यावा व त्यांना मातृपद प्राप्त व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी प्रार्थना करूया. सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. खाजगी व सार्वजनिक क्षेत्रात प्रामाणिकपणे त्या कार्यरत आहेत. त्याची छळणूक होऊ नये, म्हणून पवित्र मातेच्या मध्यस्थीने परमेश्वर पित्याजवळ प्रार्थना करूया.

४. सर्व स्थानिक कार्यकर्त्यांनी शांतता व न्यायासाठी एकत्र यावे तसेच संपूर्ण जगात शांतता पसरविण्यासाठी प्रयत्न करावेत, म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आता, थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजा प्रभूचरणी  ठेऊया.

Thursday, 5 August 2021

                                  


Reflection for the 19th Sunday in Ordinary Time (08/08/2021) By Bro. Roshan Rosario


सामान्य काळातील एकोणिसावा रविवार 


 दिनांक : ०८/०८/२०२१

पहिले वाचन - १ राजे १९:४-८

दुसरे वाचन – इफिसकरांस पत्र ४:३०- ५:२

शुभवर्तमान – योहान ६:४१-५१


स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे; ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल


प्रस्तावना

आज आपण सामान्य काळातील एकोणिसावा रविवार साजरा करीत आहोत आणि आजची उपासना आपणास प्रभू येशुख्रिस्त, जिवंत भाकर, जी स्वर्गातून उतरलेली आहे, ह्यावर विश्वास ठेवण्यास सांगत आहे.

भाकर ही मानवी जीवनातील एक महत्वाचा घटक आहे. भाकर आपली भूक भागविते, आपल्याला तृप्त करते, तसेच पुढचे कार्य करण्यास प्रबळ बनवते. हेच आज आपण पहिल्या वाचनात ऐकणार आहोत. एलिया संदेष्ट्याने एका दिवसाची वाट चालून जेव्हा तो थकून झोपी गेला तेव्हा परमेश्वराने त्याला भाकर व पाणी दिले; जिच्या बळावर तो चाळीस दिवस व चाळीस रात्र चालून देवाच्या पर्वतावर म्हणजे होरेब पर्वतावर गेला.

आजच्या शुभवर्तमानामध्ये लोकांनी येशू जिवंत भाकर, जी स्वर्गातून उतरलेली आहे, ह्यावर विश्वास न ठेवता त्याच्याविषयी कुरकुर करतात व संशय धरतात. ह्यावरून येशू त्यांना उघड सांगतो कि, जो माझ्यावर विश्वास ठेवणार त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल करण मीच जीवन देणारी स्वर्गीय भाकर आहे, आणि ही भाकर जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल.

प्रभू येशूख्रिस्त हा स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे, ह्यावर विश्वास ठेऊन तीचा आपल्या अंतःकरणात स्वीकार करावा म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करू या.

 

बोधकथा

आजच्या वाचनाविषयी मला एका गोष्टीची आठवण येते: एकदा एका व्यक्तीने एका वर्तमानपत्राच्या संपादकाला असे लिहिले की, तो गेल्या तीस वर्षापासून चर्चमध्ये जात आहे व त्याने हजारो प्रवचन ऐकले आहेत आणि त्यातले त्याला एकही  प्रवचन आठवण नाही. तर त्याला असे वाटले की चर्चमध्ये जाण्याची त्याला गरज नाही आणि आणखी उपदेश ऐकण्याची गरज नाही. ह्यावर कोणी एका व्यक्तीने त्याला उत्तर दिले की, तुझ्या लग्नास तीस वर्षांहून अधिक वर्षे झाले असतील आणि तेव्हापासून तुझ्या पत्नीने बरेच पदार्थ बनवले असतील आणि तिने सर्व बनवलेले पदार्थ तुला आठवत आहेत का? तेव्हा तो व्यक्ती त्याला नाही असे म्हणाला. ह्यावर पुन्हा प्रश्न विचारात दुसरा व्यक्ती त्याला म्हणाला, “मग तू आता तुझ्या पत्नीच्या हाताचे अन्न कधीच खाणार नाही?” त्यावर पहिली व्यक्ती म्हणाली, “परंतु त्यातून मला रोजचा आहार मिळतो.” तेव्हा दुसरी व्यक्ती त्या पहिल्या व्यक्तीला म्हणते कि, जेव्हा तू पवित्र मिस्सामध्ये प्रभूचा शब्द ऐकतोस, पवित्र भाकर स्वीकारातोस तेव्हा तुझे आध्यात्मिक पोषण होते जे तुला आध्यात्मिक जीवन जगण्यास मदत करते.

बालच्या संदेष्ट्यांशी लढाई झाल्यानंतर संदेष्टा एलीयाला प्रोत्साहन आणि पाठिंब्याच्या स्वरूपात पोषणाची गरज लागते. राजा अहाबची पत्नी ईजबेलने त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने त्याचा जीव धोक्यात होता. अश्या वेळी एलीयाला एकाकीपणाचा अनुभव झाला म्हणून त्याने प्रभूकडे प्रार्थना केली कि, परमेश्वरा, मला आता मरु दे; माझ्या पूर्वजांपेक्षा माझ्यात काय बरे आहे? त्याच्या मृत्यूची वाट बघत तो झोपी गेला; परंतु परमेश्वराची प्रेमळ नजर एलीयावर होती. त्याच्या प्रेमाखातर त्याने त्याला भाकर व पाणी पुरविले.

जेव्हा आपण परमेश्वराकडे रोजची भाकर मागतो, तेव्हा आपण फक्त सामान्य भाकर किंवा शारीरिक अन्नच मागत नाही, तर आत्म्याला पोषण देणारे आध्यात्मिक अन्न मागतो. एलीयाप्रमाणेच आपण कधीकधी एखाद्या संकटात सापडतो; ती संकटे आर्थिक किंवा वैवाहिक असू शकतात. त्या क्षणी आपण आध्यात्मिक आहाराची इच्छा जोपासतो धरतो आणि ते आहार आपल्याला प्रभू येशू मिस्साबलीदानात देत असतो, जे आपल्याला संदेष्टा एलीयासारखे  जीवनात पुढे जाण्यासाठी पोषण देते.  

ह्या जगाचा निरोप घेन्यागोदर प्रभू येशूने आपल्या शिष्यांना शेवटचे भोजन दिले जिच्यात त्याने भाकरीला आशीर्वाद देऊन स्वतःचे शरीर त्यांस दिले. प्रत्येक मिस्साबलीदानात प्रभू येशू स्वतः आपणास त्याचे शरीर भाकरीच्या रुपात देतो. हे आध्यात्मिक अन्न जे खातात ते येशुबरोबर आध्यात्मिक रूपाने एक होतात. म्हणूनच गलतीकरांस पत्र २: २० मध्ये संत पौल म्हणतो, “ह्या पुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो”.

ज्या प्रमाणे परमेश्वराने एलीयाला भाकर दिली, त्याच प्रमाणे प्रत्येक मिस्साबलीदानात प्रभू येशू आपल्यालाही जीवनाची भाकर देत असतो, ज्याच्याने आपल्याला एलीयासारखे सामर्थ्य व कृपा मिळते.

जसं परमेश्वराने आपणास स्वतःच शरीर देऊन आपलं तारण केलं, आपल्याला कृपा सामर्थ्य दिलं, त्याचप्रमाणे आपण ही इतरांना त्यांच्या कामात त्यांना सहाय्य करून, व त्यांना मदतीचा हात देऊन, त्यांच्या जीवनात आनंद आणावा म्हणून प्रार्थना करू या.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू, स्वर्गातून उतलेली जिवंत भाकर आम्हांस दे.

१. आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरू व धर्मभगिनी व व्रतस्थ ह्यांनी सर्व भाविकांची अध्यात्मिक तयारी करावी व स्वर्गीय भाकरीचा अनुभव घेण्यास मदत करावी, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

२. ख्रिस्त आपली जिवंत भाकर आहे, यावरील आपला विश्वास बळकट व्हावा व प्रत्येक मिस्साबलिदानामध्ये ही जिवंत भाकर खऱ्या अर्थाने सेवन करण्यास प्रभूचे सामर्थ्य लाभावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

३. आपल्या धर्मग्रामासाठी प्रार्थना करूया कि, जेणेकरून या धर्मग्रामातील प्रत्येक भाविकाला प्रभू परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव यावा व त्यांनी परमेश्वराच्या कृपेने एकत्र येऊन, एक कुटुंब म्हणून कार्य करावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

४. आपल्या धार्मिक जीवनात येशूला ओळखण्यास व त्याच्या अधिक जवळ जाण्यास सामर्थ्य लाभावे, म्हणून प्रार्थना करूया.

५. जे लोक आजार, अन्याय, यातना, हिंसा यांना बळी पडले आहेत अशा सर्वांना स्वर्गीय भाकरीद्वारे कृपेचा अनुभव यावा, म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.

६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजासाठी प्रार्थना करूया.




Wednesday, 28 July 2021

                  

Reflection for the 18th Sunday in Ordinary Time (01/08/2021) By Dn. David Godinho

सामान्य काळातील अठरावा रविवार


दिनांक: ०१/०८/२०२१

पहिले वाचन: निर्गम १६:२-४, १२-१५

दुसरे वाचन: इफिसकरांस ४: १७, २०-२४

योहान ६: २४-३५


विषय: - आम्ही भुकेलेलो आहोत.



प्रस्तावना

        आज आपण सामान्य काळातील अठरावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणास आपल्या जीवनातील एका मुलभूत गोष्टीवर म्हणजे भुकेवर मनन चिंतन करण्यास बोलावीत आहे. प्रत्येक व्यक्तीस कशाची ना कशाचीतरी भूक लागलेली असते. आणि ती भूक भागवण्यासाठी किंवा तृप्त करण्यासाठी ती व्यक्ती अतोनात प्रयत्न करीत असते.

        आजची वाचनेदेखील आपणास ह्याच विषयावर बोध करीत आहेत. पहिल्या वाचनामध्ये आपण वाचतो कि, इस्त्राएली लोकं परमेश्वराविरुद्ध कुरकुर करतात; तर शुभवर्तमानात अनेक लोक आपली शरीरिक भूक भागविलेल्या प्रभूच्या शोधात असलेली आपणास आढळून येतात. प्रभू त्यांस सांगतो कि, शारीरिक भूक भागविण्यासाठी नव्हे तर आत्मिक भूक भागविण्यासाठी प्रयत्नशील असा. आपण कशासाठी भुकेले आहोत? हा प्रश्न आपण स्वतःला विचारूया. व ह्या ख्रिस्तयागात सहभागी होऊया.

मनन चिंतन  

        भूक लागणे ही एक नैसर्गिक बाब आहे. प्रत्येक जीवाला भूक–तहान लागते. आपणा प्रत्येकाला सुद्धा त्याचा अनुभव आहे. आणि ही भूक थांबविण्यासाठी आपण काही ना काही करीत असतो. बायबलमध्ये अनेक अशी उदाहरणे आपल्या निदर्शनास येतील. आदाम व एवेने भुकेमुळे एदेन बागेतील झाडाची फळे खाल्ली (उत्पत्ती ३). आब्राहामाने त्याच्या जवळ आलेल्या तीन पुरुषांना भुकेले पाहून जेवण तयार केले व त्यांस दिले (उत्पत्ती १८). दुष्काळात धान्य मिळविण्यासाठी मिसर देशात आलेल्या आपल्या भावांना योसेफाने धान्य पुरविले (उत्पत्ती ४२). आणि भुकेमुळे इस्त्राएल प्रजेने देवाविरुद्ध कुरकुर केली तेव्हा देवाने अरण्यात त्यांना जेवण पुरविले व त्यांची भूक थांबविली, ह्याचे वर्णन आजच्या पहिल्या वाचनात करण्यात आले आहे. तसेच भुकेमुळे दावीद राजाने अहिमालेख राजाकडून पवित्र भाकर घेऊन ती खाल्ली व त्यांनी आपली भूक भागविली (१ शमुवेल २१). दुष्काळात आपली भूक भागविण्यासाठी एलिया प्रवक्त्याने साराफत येथील विधवेकडून भाकर भाजून खाल्ली (१ राजे १७). एवढेच नव्हे, तर गेल्या रविवारी आपण शुभवर्तमानात ऐकले कि, प्रभू येशूने पाच हजार भुकेल्या लोकांना जेवण घातले (योहान ६). एवढेच नव्हे, तर भुकेमुळे शेतातून जात नसतांना शब्बाथ दिवशी येशूच्या शिष्यांनी देखील शेतातील कणसे मोडून खाल्ली (मत्तय १२). आणि भुकेमुळे प्रभू येशूने अंजिराच्या निष्फळ झाडाला शाप दिला (मार्क ११), हे देखील आपण ऐकलेले आहे.

        ह्या सर्व उदाहरणांवरून आपणाला प्रत्यक्ष शारीरिक भुकेचे महत्त्व समजते; पण प्रभू येशू म्हणतो कि, शारीरिक भुकेपेक्षा, आध्यात्मिक भूक भागविणे फार गरजेचे आहे आणि म्हणूनच प्रभू येशू म्हणतो, “मनुष्य केवळ भाकरिने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल” (मत्तय ४:४). आज अनेक लोकांजवळ जगाच्या सर्व सुखसोयी आहेत; परंतु त्यांच्या जीवनात समाधान आणि शांतीची उणीव आहे.

टॉम फिलीप हा वयाच्या चाळीसाव्या वर्षी अमेरिकेतील एका मोठ्या व प्रसिद्ध कंपनीचा अध्यक्ष झाला होता. जगातील सर्व सुख- होईल त्याच्या पायाखाली होत्या. त्याचा मोठा असा बंगला होता, चांगले कुटुंब होते, चांगल्या गाड्या होत्या. मर्सिडीज सारखी नावाजलेली गाडी त्याच्याजवळ होती. असा हा सुप्रसिद्ध व श्रीमंत माणूस सर्वकाही त्याच्याजवळ असूनही जीवनात आनंदी नव्हता. काहीतरी कमी असल्याचा भास त्याला रोज होत असे. एके दिवशी न्यूयॉर्क शहरात जात असता त्याला एक धार्मिक अनुभव झाला. त्या अनुभवाने त्याच्या जीवनाचा कायापालट झाला. त्या अनुभवाविषयी सांगताना तो म्हणतो की, माझ्या जीवनात ज्याची कमतरता होती ती मला समजली आणि ती म्हणजे प्रभू येशूख्रिस्ताची कमतरता. जगातील कुठल्याही सुख- सोयी आपल्याला खरे समाधान देणार नाहीत किंवा आपली अध्यात्मिक भूक भागवू शकणार नाहीत; फक्त आणि फक्त परमेश्वरच आपली भूक भागवू शकतो. म्हणूनच संत अगस्तीन म्हणतात, “ हे परमेश्वरा, आमची हृदये तुझ्यासाठी निर्माण केली आहेत आणि तुझ्यात विसावा घेतल्यावाचून ती अस्वस्थच राहतील”. हेच प्रभू येशूख्रिस्त आजच्या शुभवर्तमानात आपणा प्रत्येकास सांगत आहे की, “नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका; तर पिता जो देव ह्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हांस सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल त्यासाठी श्रम करा”. आणि हे अन्न म्हणजे खुद्द प्रभू येशू ख्रिस्त जिवंत स्वर्गीय भाकर होय. जो ही भाकर खातो त्याला भूक व तहान लागणार नाही.

आपण, ही जिवंत भाकर कशाप्रकारे मिळवू शकतो?

१. नवीन मनुष्य धारण करावा: - इफिसकरांस पत्र ह्यातून घेतलेल्या दुसऱ्या वाचनात, आपणास सांगितले आहे ते म्हणजे, पहिल्या प्रथम आपण आपला जुना जीवितक्रम म्हणजे कपट, वासना यांतून मुक्त होऊ, म्हणजेच अंधकारमय जीवनाचा त्याग करून सत्यापासून निर्माण होणारा नवा मनुष्य धारण करावा.

२. येशूचा शोध करावा: - ज्याप्रकारे लोकांनी प्रभू येशूचा शोध करीत त्याच्या मागे आले, तसेच आपणही प्रभू येशूच्या शोध करायला पाहिजे. आणि त्याने सांगितल्याप्रमाणे तो आपणास जे गरीब, भुकेलेले, तहानलेले, वस्त्रहीन, परके, उघडे, आजारी, लोकांमध्ये सापडेल  (मत्तय २५).

३. येशूवर विश्वास ठेवणे: - येशूवर विश्वास ठेवणे म्हणजे त्याने केलेले कार्य आपणही करणे. त्याच्या शब्दांप्रमाणे आपले जीवन जगणे. आज कोरोना महामारीत अनेक लोक बेरोजगार झाले आहेत; अनेक लोकांना दोन वेळचे अन्न मिळणे कठीण झाले आहे. अशा सर्वांना आपल्यापरीने मदत करणे म्हणजेच येशूवर विश्वास ठेवणे होय. जेव्हा आपण ह्या बंधू-भगिनींची सेवा करू, त्यांना मदत करू, तेव्हा आपण सार्वकालिक जीवनासाठी / अन्नासाठी श्रम करू व ज्याप्रमाणे गरीब व गरजवंतामध्ये संत मदर तेरेसा ह्यांना येशूचा अनुभव आला, त्याचप्रमाणे आपणास देखील प्रभूचा अनुभव येईल.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: - हे परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐक.

१. ख्रिस्तसभेच्या पुढार्‍यांनी मोशे व आहारोन प्रमाणे त्यांच्या हाती सोपविलेल्या प्रजेचे, अध्यात्मिक तहान - भूक भागविण्यास सतत कार्यरत असावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आपल्या राजकीय पुढाऱ्यांनी ह्या कोरोनाच्या काळात लोकांच्या उद्धारासाठी झटावे, तसेच जे गरीब, बेरोजगार व निराश्रित आहेत अशांना सहाय्य करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. आपणा सर्वांना परमेश्वराने योग्य प्रमाणात पाऊस द्यावा व सर्व शेतकरी बंधू - भगिनींना त्यांच्या श्रमाचे चांगले फळ मिळावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. ह्या कोरोना महामारीचा लवकरात लवकर अंत व्हावा, परमेश्वराने आपला सर्वांचा ह्या महामारीपासून बचाव करावा, व जी लोकं या आजाराला बळी पडली आहेत त्या सर्वांना त्याचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक व वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.

Wednesday, 21 July 2021

                                    

 Reflection for the 17th Sunday in Ordinary Time (25/07/2021) By       Dn. Julius Rodrigues


सामान्य काळातील सतरावा रविवार 


दिनांक २५-७-२०२१

पहिले वाचन २ राजे ४:४२-४४

दुसरे वाचन इफिसकरांस पत्र ४:१-६

शुभवर्तमान योहान ६:१-१५


"पाच भाकरी आणि दोन लहान मासे"



प्रस्तावना

आज देऊळ माता सामान्य काळातील सतरावा रविवार साजरा करीत आहे. आजच्या पहिल्या वाचनात देवाने संदेष्टा अलीशाद्वारे केलेल्या चमत्काराविषयी या वृत्तांत ऐकणार आहोत. परमेश्वराच्या अगम्य आशीर्वादामुळे गव्हाच्या वीस भाकरी व काही हिरवी कणसे माणसांना पुरवून उरल्या. त्याचप्रमाणे आजचे शुभवर्तमान पाच हजारांना जेवण ह्या येशूच्या चमत्काराविषयी सांगत आहे. ह्यातून आपणास एकच उपदेश मिळतो की, आपण नेहमीच आपल्याकडे असलेल्या गोष्टी इतरांना देण्यासाठी तयार असले पाहिजे. परमेश्वर आपल्याला त्याचे प्रतिफळ देत असतो. आपणामध्ये घेण्याची वृत्ती कमी होऊन, देण्याची वृत्ती वाढावी म्हणून प्रार्थना करूया.

 

सम्यक विवरण

पहिले वाचन : २ राजे ४: ४२-४४

       शंभर जणांना जेवण घालणे हे त्यांना शक्य नव्हते. परंतु हे शंभर लोक बहुदा संदेष्ट्याच्या समुदायातील होते. वीस भाकरी फार लहान होत्या व त्या इतक्या जणांना पुरे पडल्या नसत्या म्हणून सेवकाने चकित होऊन प्रश्न केला, तेव्हा देवाने दिलेला संदेश एलिशा सांगतो कि, अन्न भरपूर होईल व त्यातून काही अन्न उरेल. असे देवाने सांगितलेल्या भविष्यवाणी द्वारे घडले.

दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र : ४:१-६

       यहुदी व परराष्ट्रीय यांना ख्रिस्तामध्ये कसे एक करण्यात आले. याविषयी सांगितल्यावर पौलाने त्यांच्या करिता अशी प्रार्थना केली की, त्यांनी ख्रिस्ताच्या प्रीतीने एक व्हावे.

       विश्वासणाऱ्याचे वैयक्तिक आचारण ख्रिस्ताला शोभेल असेच असावे. एकमेकांच्या उणीवा दिसत असल्या तरीही, एकमेकांशी अति नम्रतेने व सौम्येतेने वागा. सहनशिलतेने एकमेकांचे दुःख सहन करा. ख्रिस्ताच्या प्रीतीने एकमेकांस वागवून घ्या. हेच पाचारणास शोभेल असे आचारण आहे.

शुभवर्तमान योहान ६:१-१५

कोणतीही परिस्थिती येशू ख्रिस्ताला अवघड वाटत नव्हती. दैवी सामर्थ्याने तो रोग्यांना बरे करी. पाच हजार लोकांना भाकर व मासलीने तृप्त केले. हे देवाचे सामर्थ्य होते. यावरून तेथे जमलेल्या लोकांनी येशू हा देव आहे हे ओळखायचे होते. या उद्देशाने येशू ख्रिस्ताने हा चमत्कार केला. म्हणून त्यास चिन्ह म्हटले आहे. तरी त्या लोकांनी त्याचे दैवत्व मानले नाही ते त्याला फक्त संदेष्टा म्हणत.

तो देव आहे व हजारों लोकांस अन्न देण्यास समर्थ आहे यावर शिष्यही विश्वास ठेवत नाही. म्हणून येशू ख्रिस्ताने त्या पाच भाकरी हातात घेतल्या व देवापित्याचे आभार मानले. तो त्या मोडत राहिला. त्याने आपले सामर्थ्य प्रकट केले. सर्वजण जेवून तृप्त झाले. हाच प्रभू आपल्या गरजा पुरवून शांती व समाधान देतो.

 

मनन चिंतन

God loves the cheerful giver (2 Cor 9:7). संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो, आणि आपण हे अनेक वेळेस घेतलेले आहे. देणे आणि घेणे ह्या दोन्ही गोष्टी आपण आपल्या जीवनात अनुभवत असतो. आपण देवू ही शकतो आणि घेऊ ही शकतो. जो हात देत असतो तो सदासर्वदा प्रगती होत असते आणि जो हात घेतो त्याची नेहमीच अधोगती होत असते; आणि हे सर्व आम्हाला आमच्या रोजच्या जीवनातील अनुभवावरून माहित आहे. संत तुकाराम महाराज आपल्या २८४५ ह्या अभंगामध्ये म्हणतात, “पाहिजे तो कळवळा| मग बळा काय उणे||

                              तुका म्हणे उदारपणे| का उणे मानावि||

ह्याचा अर्थ असा आहे की, कोणत्याही कार्यात त्याबद्दलचा कळवळा असणे गरजेचे आहे. मग त्या कार्यासाठी लागणारे सामर्थ्य देखील अंगी सहज येते. तुकोबाराय शेवटी म्हणतात की, त्याप्रमाणेच जो खऱ्या अर्थाने उदारपणे लोकांना मदत करून केव्हाही मागेपुढे पहात नाही; मग भले त्याच्या स्वतःकडे काहीही नसले, तरीदेखील त्याचा उदारपणा किंवा दानशूरपणा कमी होत नाही, उलट ते म्हणतात, अशा माणसाकडे काही उणे आहे असे मानू देखील नये.

आजच्या वाचनाद्वारे आपणास देण्याचे महत्त्व किती आहे, हे समजून देत आहे. असाच एक शुभवर्तमानातील दाखला तुमच्यासमोर ठेवू इच्छितो. येशु भंडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकत आहेत, हे पाहत होता. त्यावेळेस अनेक असे धनवान श्रीमंत लोक मोठ्या मोठ्या रकमा भांडारात टाकत होते. अशा वेळेस त्या ठिकाणी एक गरीब बाई आली आपल्याकडे असलेले एकूते एक नाणे त्या भांडारात टाकते आणि हे पाहताच प्रभू येशू आपल्या शिष्यांना जवळ बोलावून त्यांस म्हणतो, हे जे भांडारात टाकत आहेत त्या सर्वांपेक्षा या गरीब विधवेने अधिक दान टाकलेले आहे”.

वरील उताऱ्यावरून ती विधवा बाई आपणास उदारपणाचा कित्ता घालून देत आहे. त्या बाईने किती रक्कम टाकली याकडे लक्ष न देता, आपल्याकडे जे आहे त्यातून आपण  इतरांना किती देतो हे महत्वाचे आहे.

आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की कोणी एका मनुष्याने आपल्याला झालेल्या उत्पादनातून थोडेसे अन्न म्हणजेच वीस भाकऱ्या व काही धान्याची हिरवी कणसे ही देवाच्या माणसाकडे घेऊन आला. आणखी  पुढे आपण ऐकतो की, शाप्रकारे परमेश्वराने त्या ठिकाणी चमत्कार घडवून आणला.

तशाचप्रमाणे शुवर्तमानातही एका लहानशा बालकाने दाखविलेल्या पाच भाकरी व दोन माशांच्या उदारतेमुळेच येशू पाच हजारांना भोजन देऊ शकला. त्या लहान बालकाकडे अगदी त्याच्यापुरता होईल इतकेच होते. परंतु त्यांनी स्वार्थी भावना मनात आणली नाही. असे म्हणतात, लहान मुले, ही देवाघरची फुले,’ ह्याचा साक्षात्कार त्या छोट्याशा बालकाने सिद्ध करून दिला. जे आपल्याकडे होते ते सर्व काही सरळ हाताने इतरांना दिले. दुसऱ्याची भूक तृप्त व्हावी यासाठी स्वतः खुशीने अर्पण केले.

आपण नेहमी बोलत असतो, अतिथी देवो भव!” म्हणजे घरी असलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार झालाच पाहिजे कारण ते देवाच्या रूपात येत असतात. आज हाच अनुभव खुद्द येशू आपणास देत आहे. आपल्याकडे आलेल्या सर्व लोकांचा पाहुणचार करतात, त्यांची आध्यात्मिक व शारीरिक भूक आपण भागवत असतो.

आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक वेळेस स्वार्थी वागत असतो. ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे, अशांना आपण मदतीचा हात देत नाही, इतरांना आधार हस्ते मदत करत करत नाही. ह्या महामारीच्याकाळात अनेक अशा लोकांनी सरळ हस्ते इतर लोकांना मदत केलेली आहे. त्याचप्रमाणे काही जण फक्त स्वतःचात विचार करून स्वार्थीपणाची भूमिका बजावत आहेत.

आज पाच हजारांना भोजन हा चमत्कार खरा आहे, की खोटा, यावर आपण आपले लक्ष केंद्रित न करता, ह्या चमत्काराद्वारे येशू आपणा सर्वांना उदारपणाचा, दानशूरपणाचा महामंत्र शिकवत आहे. पुढे तो आपणास सांगत आहे की, घेणारे होऊ नका, तर देणारे व्हा, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि म्हणून, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे God loves the cheerful giver.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे परमेश्वरा, आमची ओंजळ तू प्रेमाने भर

१. ख्रिस्तसभेचे पुढारी पोप फ्रान्सिस तसेच बिशप्स व इतर सर्व सहकारी वर्ग, ह्यांनी देव प्रीतीचा संदेश संपूर्ण जगाला आपल्या कार्याद्वारे द्यावा, व असे करण्यासाठी त्यांना परमेश्वराचे योगदान लाभावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.

२. हे परमेश्वरा, सृष्टीतील वस्तूवर व्यक्तींवर अवलंबून न राहता, तुझ्यावर विसंबून राहण्या शिकव व आमचा विश्वास वाढव, म्हणून आपण प्रार्थना करू या.

३. समाजात जास्तीत जास्त देण्याची प्रवृत्ती निर्माण होऊन जे गोर- गरीब आहेत, जे गरजवंत आहेत; अशा सर्वांना त्याचा लाभ व्हावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.

४. आजही आपल्या देशात अनेक लोकांना एक वेळचे पुरेसे अन्न मिळत नाही, अशा लोकांची तू भूक भागवण्यासाठी उदार नागरिकांना पुढे पाठव, म्हणून आपण प्रार्थना करू या.

५. आपण आपल्या वैक्तिक, कौटुंबिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थाना करू या.