Monday 14 April 2014

Reflections for Homily by:- Cajeten Pereira












पवित्र शुक्रवार






 पूर्ण झाले आहे

दिनांक: १८/४/२०१४.
पहिले वाचन: यशया ५२:१३-५३:१२.
दुसरे वाचन: इब्री ४:१४-१६, १५:७-९.
शुभवर्तमान: योहान १८:१-१९:४२.

प्रस्तावना:
            आज शुभ शुक्रवार! येशूच्या दु:खसहनाचा दिवस! आजच्या दिवशी येशूने मानवाला पापमुक्त करण्यासाठी दु:खयातना सोसून क्रुसावर प्राणार्पण केले म्हणूनच शुभ-शुक्रवार हा महान आणि अतिपवित्र दिवस म्हणून गणला जातो. आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा सेवक गीताद्वारे ख्रिस्ताच्या दु:खप्राय यातना व मरणाचे भाकीत करतो. आपणा सर्वांचे पाप अंगीकारून, तो आपल्या अपराधामुळे घायाळ झाला, आपल्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला व त्याला बसलेल्या फटक्यांनी आपणास जीवन प्राप्त झाले. प्रभू येशूने आपल्या पापांचे ओझे स्वतःवर लादून आपणाला पापातून मुक्त केले.
            आजचे दुसरे वाचन आपणास जाणीव करून देते की, प्रभू येशू ख्रिस्त हा उत्कृष्ट प्रमुख याजक आहे कारण तो परीपूर्ण आणि पूर्णपणे मानव आहे. येशूने क्रुसावरील वेदनादायक मृत्युद्वारे अनंतकालीक तारण आणले. त्याद्वारे त्याने देवाला आपल्याजवळ आणिले व आपणाला देवाजवळ नेले.
            शुभवर्तमानातील येशूचे दु:खसहन आणि यातनादायक मरण फार प्रभावी आणि प्रेरणादायी आहे. काळाच्या पूर्णतेस जगाचा तारणारा वधस्तंभी खिळला गेला. देवाचा पुत्र पापी मनुष्यासाठी मरण पावला आणि देवाची बिनशर्त क्षमा बहाल केली. आज आपण प्रभू येशूचे दु:खसहन व मरण ह्यावर चिंतन करीत असताना आपल्यालाही येशूप्रमाणे क्षमा करता यावी म्हणून आजच्या उपासनेमध्ये आपण येशूकडे प्रेरणा व कृपा मागूया.

पहिले वाचन: यशया ५२:१३-५३:१२.
            यशया संदेष्टा आजच्या सेवकगीताद्वारे देवाचा नीतिमान सेवक(येशू ख्रिस्त) मानवाला पापमुक्त करेल व देवाची बिनशर्त क्षमा बहाल करेल ह्याचे वर्णन करतो. यशयाचे हे काव्य(सेवकगीत) समप्रमाण असून त्यात पाच काव्य भाग आहेत. या काव्याच्या प्रारंभी व शेवटी सेवकाची थोरवी वाढविल्याचे वर्णन आहे(पहिले व पाचवे काव्य भाग). या दोहोंच्या दरम्यान दोन व चार या काव्य भागातून त्याचा अव्हेर केल्याचा वृत्तांत सांगितला आहे आणि या चौकटीतच केंद्रस्थानी ते महत्वाचे काव्य भाग आहे(यशया ५३:४-६) जेथे दु:खसहनाचे महत्व विवरण केले आहे. सेवकाच्या बेअब्रूचा अर्थ स्पष्ट केला आहे.

 दुसरे वाचन: इब्री ४:१४-१६, १५:७-९.
    कधीही पाप केलेले नसताना आमचा स्वर्गीय प्रमुख याजक आमच्या दुर्बलपणाविषयी सहानभूती कशी बाळगतो ते आजच्या दुसया वाचनातून स्पट केले आहे. येशू देवाचा पुत्र आहे, तो आकाशातून पार गेलेला थोर प्रमुख याजक आहे, हिच आपण स्वीकारलेला विश्वास दृढ धरून राहण्यास मोठी प्रेरणा आहे. देवाचा पुत्र या नात्याने तोच देवाचे अंतिम, सर्वश्रेठ प्रकटीकरण आहे आणि देवाचे विश्वासाच्या संबंधात असलेले हेतू व उद्देश त्याच्यामध्ये पूर्ण झाले आहे. येशूने सोसलेल्या दु:खातून तो आज्ञाधारकपणा शिकला. दुख, यातना आणि परीक्षा यांना तोंड देताना तो देवाशी विश्वासू राहिला, लोकांच्या पापासाठी  प्रायक्षित करण्यासाठी त्याने मरण सोसले, यातूनच त्याने पाप, मरण आणि सैतान याच्यापासून तारण साध्य केले आणि जीवनात त्याने आपणाला स्वत:बरोबर वाटेकरी केले आहे.

सम्यक विवरण:
येशू ख्रिस्ताचे दु:ख, यातना आणि मरण हे ख्रिस्ताच्या जीवनाचे एक महत्वपूर्ण अंग आहे. त्याचे दु:ख सर्व मानवी दु:खाच्या परिसीमा ओलांडणारे होते. सज्जन आणि तारणारा येशू, लोकांचे भले करीत असतानाही, त्याला अपमान सहन करावा लागला.
     येशूचे दु:खसहन, मरण व यातना या घटनेचे चित्रण योहान शुभवर्तमानकाराने विशेषरीत्या केले आहे. योहानाचे वृतांत समदर्शी शुभवर्तमानकर वृत्तांतापेक्षा वेगळा आहे. येशूला क्रुसावर खिळलेले असताना त्याच्या हातापायातून आणि कुशीतून रक्त भळभळ वाहत होते. शेवटचे काही क्षण मोजत असताना सर्व शक्ती एकवटून थकलेल्या आवाजात तो अंतिम शब्द उचारतो, त्याचे अंतिम शब्द प्रेमाने, दया-क्षमेने व ताराणदायी भावनेने भरलेले होते. ख्रिस्ताने अंतिम सात शब्द उच्चारले परंतु सातही शब्दाचा उलेख योहानाच्या  वृत्तांतात आढळत नाही. ते समदर्शी शुभवर्तमानात पहावयास मिळतात.
ह्या शब्दांविषयी बोलताना कार्डीनल फुल्टन शीन म्हणतात, ‘क्रुसावरील ख्रिस्तासारखा प्रवचनकार अजूनही जन्माला नाही. क्रुसाच्या वेदिसमोरील भाविक आणि श्रोते अजूनही कुठे दिसत नाही आणि या सात शब्दांच्या प्रवचनासारखे भावी प्रवचन अजूनही झाले नाही.त्या सात शब्दांत येशूचे संपूर्ण जीवन, त्याची शिकवण आणि व्यक्तिमत्व प्रकट झाले आहे. दोषारोप व वाईट चिंतन्याएवजी सर्वांना शमा करीत येशू म्हणाला, “हे पित्या त्यांना शमा कर कारण ते काय करतात ते त्यांना  समजत नाही.
त्यांना: येशूच्या क्षमाशील प्रार्थनेतील त्यांनाहे कोण आहेत? ‘त्यांनाहे म्हटले तर पुष्कळ जण आहेत. तलवार घेऊन उभे असलेले शिपाई, स्वतःच्या मुखातून येशूला नाकारणारा पेत्र, येशूला ऐकलकोंडा सोडून पळणारे शिष्य, येशूला फसवणार यहुदी, याजक, परुशी आणि प्रमुख याजक, येशू निर्दोष आहे हे ठाऊक असूनही लोकसमुदयांच्या हाती सोपवणारा रोमन पिलात, आणि येशूला वधस्तंभी खिळण्यासाठी आरडा-ओरडा करणारा समुदाय हे सर्व येशूने उच्चारलेल्या ‘त्यांना’ ह्या शब्दामध्ये सामावलेले आहेत. येशूने ह्यां सर्वांना क्षमा केली कारण येशू त्याच्या पापांसाठी मरणार होता.
क्षमा हा शब्द बायबलमध्ये उत्पत्तीपासून ते प्रकटीकरणापर्यंत प्रत्येक पुस्तकात आढळतो. उदा. उत्पत्ती १८:२४, ५०:१७; निगम १०:१७; नेहम्या १४:१९१राजे ८:३४; मत्तय ६:१४, ९:६; मार्क २:७, २:१०; लूक ५:२४; १७:२३.
येशू निर्दोष असतानाही त्याला वधस्तंभी खिळले परंतु येशूच्या मनात कोणाच्याही विषयी राग, मत्सर किंवा हेवा नव्हते. त्याने सर्वांना क्षमा केली. ज्यांना पश्चाताप झाला होता त्यांना आणि ज्यांना अजूनही झाला नव्हता त्यांच्यासाठी त्याने प्रार्थना केली. येशू आपल्याला इथे शिकवितो की इतरांस आपण क्षमा केली पाहिजे, आपण इतरांस क्षमा कशी करतो हे आपल्यावर अवलंबून आहे.

बोधकथा:
१. कॅन्सर सारख्या महाभयंकर आजाराने पिडीत पडलेली मॉंनिका कित्येक दिवसापासून चांगल्या मरणाची वाट पाहत होती. नामांकित वैद्यांनी सर्व प्रकारचे औषधे उपचार करूनही मॉंनिकाच्या प्रकृतीत बदल घडून येत नव्हता. तिला असाह्य त्रास सोसावा लागत असे. मृत्यूच्या दारात उभी असूनही तिला मृत्यू येत नव्हता. त्रास पाहून सर्वांना तिचा कळवळा यायचा.
महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी धर्मगुरू नेहमीप्रमाणे आजा-यांना ख्रिस्तशरीरदेण्यासाठी त्या दवाखान्यात आले. तिची परिस्थिती पाहून, तिने चांगल्याप्रकारे पापनिवेदन करून मृत्यूला आपल्या जीवनात सकारात्मक दृष्टीकोनातून स्विकारावे असे धर्मगुरूला वाटले. धर्मगुरूने तिचे पापनिवेदन ऐकले. काही दिवसांचा काळ उलटल्यानंतर मॉंनिकाची प्रकृती अधिक गंभीर झाली. परंतु मृत्यूची व मॉंनिकेची काही गाठ होत नव्हती. तिचे मन खंततेने भाराक्रांत झाले होते. आपला मानसिक समतोल बिघडत आहे असे तिला जाणवत होते.
            धर्मगुरूने दवाखान्यात येऊन मॉंनिकावर प्रार्थना करावी असे तिच्या नातेवाईकांना वाटत होते. ठरविल्याप्रमाणे तिच्या नातेवाईकांनी धर्मगुरूला बोलावून घेतले व तिच्यावर प्रार्थना करावयास सांगितले. काही दिवसानंतर मॉंनिकेच्या वागणूकीत शांतता दिसून आली. परंतु तिचे मन अस्वथ असल्याचे धर्मगुरूने जाणून घेतले. तिला नक्की कोणता त्रास होतो हे धर्मगुरूने समजले. त्यांनी तिच्या सर्व नातेवाईकांना तिच्यासमोर उभे राहण्यास सांगितले व तिच्या पायाला स्पर्श करून तिच्याकडून कळत-नकळत झालेल्या सर्व अपराधांची क्षमा मागण्यास सांगितले. थोरापासून धाकट्यापर्यंत सर्वांनी असे केल्यामुळे अवघ्या पंधरा मिनिटात मॉंनिकाला चांगले व शांत मरण लाभले.
क्षमा केल्याने आपल्याला चांगले आरोग्य व चांगले मरण प्राप्त होते. क्षमा न केल्याने आपण दोन्ही गोष्टींपासून वंचित राहतो.

२. जनरल मत्तय हा अमेरिकन अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टनचा एक जिवलग मित्र होता. जनरल मत्तयचा एक कट्टर शत्रू होता. तो नेहमी जनरल मत्तयच्या नावाची बदनामी करायचा व त्यांचा अपमानही करायचा.
काही दिवसानंतर काही कारणास्तव जनरल मत्तयच्या शत्रूवर एके दिवशी देशद्रोह्याचा आरोप लादण्यात आला. त्याला मरणदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जेव्हा जनरल मत्तयला ही बातमी कळली, तेव्हा जनरल मत्तय जॉर्ज वॉशिंग्टनकडे त्याच्या कट्टर शत्रूला क्षमा मिळविण्यासाठी ७० मैल चालत गेला. परंतु जॉर्ज वॉशिंग्टन आपला मित्र, जनरल मत्तयला म्हणाला, 'नाही मी तुला तुझ्या मित्राचे जीवन किंवा आयुष्य बहाल करू शकत नाही.' 'माझ्या मित्रा', जनरल मत्तय उदगारला, 'हा माझा जिवलग मित्र नसून माझा कट्टर शत्रू आहे.' जॉर्ज वॉशिंग्टनला आश्चर्य वाटले. 'तु तुझ्या शत्रूचे जीवन वाचविण्यासाठी ७० मैल पायी प्रवास केलास! ही सर्व परिस्थिती वेगळाच प्रकाश उभा करते. मी ह्या माणसाला सर्व आरोपापासून मुक्त करतो. त्याला जीवन बहाल करतो.
प्रभू येशूने आपल्याला पापमुक्त करण्यासाठी क्रुस घेऊन कालवारीचा प्रवास केला व क्रुसावर आपला प्राण अर्पण केला. हे केवळ आपल्याला क्षमा करून नवजीवन बहाल करण्यासाठी.  

मनन चिंतनः
नव्या कराराच्या वेगवेगळ्या लिखाणामध्ये आढळणारा क्षमाहा विषय ख्रिस्ती पावित्र्याचा मूलभूत घटक आहे. येशू पेत्राला सांगतो की, क्षमेचे दान मोजायचे नसते. सात वेळा नव्हे तर साताच्या सत्तर वेळा क्षमा केली पाहिजे (मत्तय; १८:२१-२२). मार्कच्या शुभवर्तमानात येशू शिष्यास सांगतो की, ‘तुम्ही जेव्हा प्रार्थना करावयास उभे राहता तेव्हा तेव्हा तुमच्या मनांत कोणाविरूध्द काही असेल तर त्याची क्षमा करा, अशासाठी की, तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी.थोडक्यात, देवाची क्षमा ही  मानवी क्षमेचे प्रतिक आहे.
लेविस स्मॅडेस म्हणतो, “क्षमा वास्तविकता बदलत नाही किंवा हिंसेने निर्माण झालेला राग नष्ट करीत नाही, तर फक्त एखाद्याचा राग-द्वेष मुक्त करते.जेव्हा एखादी व्यक्ती क्षमा करते, तेव्हा देव क्षमा करीत असतो.
आपण इतरांना क्षमा केली पाहिजे व इतरांकडून क्षमा मांगितली पाहिजे, कारण क्षमा हा एकच मार्ग आहे जो आपणास शांती, प्रेम, आनंद आणि सुख देऊ शकतो. शांतीप्रिय मनुष्य म्हणजे क्षमाप्रिय मनुष्य होय. क्षमाप्रिय मनुष्याला शांतीचा लाभ होतो. शांतीची अपेक्षा करणा-या मनुष्याने आपला अपराध मान्य करून क्षमेची याचना करावी व दुस-याचा अपराध असेल तर त्याला मोठ्या उदारतेनं क्षमा करावी.
जोपर्यंत आपण इतरांना क्षमा करीत नाही तोपर्यंत आपण आपल्या वेदनेतून, खोल जखमेतून कधीही बरे होऊ शकत नाही. क्षमादान आपल्यात नसेल तर आपल्या शरीरात आणि मनात विष आहे. एक लेखक म्हणतो, ‘क्षमादान नसणे म्हणजे, एका विषारी सापाने चावणे आणि त्याला मारण्यास त्याचा पाठलाग करणे होय. आणि त्या सापाला काही करण्याआधी ते विष शरीरात पसरून त्या व्यक्तीला मारून टाकते.
चिनी भाषेत एक म्हण आहे, ‘जो कोणी सूडबुद्धीचा उपयोग करतो त्याने दोन थडगे खोदावे. आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याविरुद्ध अपराध करणारे अनेक लोक आहेत. कुणी आपली निंदा करते, कुणी आपल्याला बेअब्रू करतो, कुणी आपले नुकसान करतो तर कुणी आपला छळ करतो. या सर्वांस आपण क्षमा करावयास तयार आहोत का? जर आपण या सर्वांना क्षमा केली नाही तर आपणास ख-या मन:शांतीचा अनुभव घेता येणार नाही. एखादयाला क्षमा न करणे म्हणजे जणू विषाचे प्राशन करून दुसरा केव्हा मरतोय ह्याची वाट पाहणे होय.
येशू ख्रिस्ताने आपल्याला क्षमेचा महामंत्र दिला आहे. ह्या महामंत्राद्वारे आपण चांगले ख्रिस्ती जीवन जगू शकतो. देवाने आपल्याला क्षमा केल्यामुळे आपण सार्वकालिक जीवनाचे सभासद होण्यास लायक ठरलो आहोत. त्यामुळे क्षमा हा ख्रिस्ती तारणाचा अनुभव केंद्र आहे. क्षमा न्यायकृत्य आहे, जे दुस-यांच्या तारणावर विश्वास ठेवते व आशा धरते.
देव जसा बिनशर्तपणे क्षमा करीतो तशीच क्षमा करण्यास आपणाला प्राचारीले आहे. देवाच्या प्राचारणाला होकार देऊया व एकमेकांना क्षमा करून सुखी जीवन जगूया.    



No comments:

Post a Comment