Tuesday 15 April 2014

Reflections for Homily By Amol Gonsalves.








पास्काचा सण


पुनरुत्थान व जीवन मीच आहे




दिनांक: २०/४/२०१४.
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १०:३४,३७-४३.
दुसरे वाचन: कलस्सेकरांस पत्र: ३:१-४.
शुभवर्तमान: योहान २०:१-९.

प्रस्तावना:
स्वर्गीय पित्याचा राखीलास मान,
करुनी स्वत:च्या प्राणाचा अपमान!
उठता, पडता चढला कालवरी
पापांचा क्रूस घेउनी खांद्यावरी!
राहणारा नव्हतास तू भूमीच्या गर्भात
कारण ! जगाचा विजय होता तुझ्या पुनरुत्थानात!
     ख्रिस्त मरणातून उठला आहे ! त्याने मरणावर विजय मिळविला आहे.आपल्या ख्रिस्ती जीवनातील अति महत्वाचे घटक म्हणजे, ‘येशू ख्रिस्ताचे मरण व पुनरुत्थान.आजच्या उपासनेतील सर्व वाचने आपणास ख्रिस्ताने मरणावर मिळविलेल्या विजयाविषयी सत्य पटवून देत आहेत. परागवाची व असत्याची सर्व बंधने तोडून आज प्रभू ख्रिस्त वैभवात पुनरुत्थित झाला आहे. आपण ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची स्मृती करीत असताना आपल्याला लाभलेल्या शाश्वत जीवनाबद्दल देवाला धन्यवाद देऊ या. मरणावर विजय मिळवून ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वर्गीय नंदनवनाचे प्रवेशद्वार उघडेल आहे. ख्रिस्ताने म्हटल्याप्रमाणे, ‘पुनरुत्थान व जीवन मीच आहे.ह्यावर आपला विश्वास वाढावा आजच्या ख्रिस्तयागात आपण प्रार्थना करू या.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १०:३४,३७-४३.
     प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात प्रामुख्याने आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने पुनरुत्थित झाल्यानंतर आपल्या शिष्यांना दिलेल्या दर्शनाविषयी तसेच शुभवर्तामानाच्या प्रचाराविषयी केलेल्या आज्ञेबद्दल वृत्तांत आढळून येतात. आजच्या पहिल्या वाचनात आपण मरणातून पुनरुत्थित झालेल्या ख्रिस्ताविषयी संत पेत्राने दिलेल्या गाव्हीविषयी ऐकत आहोत.
संत पेत्र म्हणतो, ‘पवित्र आत्म्याने अभिषिक्त केलेला नाझरेथकर येशूने मरणावर विजय मिळवून; तो जीवंताचा व मेलेल्यांचा न्यायधीश बनला आहे. त्यांच्यावर श्रध्दा ठेवणा-या प्रत्येकाला त्यांच्या नावाखाली पांपाची क्षमा लाभली आहे.
ख्रिस्ताने मरणावर विजय मिळवून आम्हाला स्वर्गीय नवजीवनाचे भागीदार बनविले आहे. ज्या देवाने ख्रिस्ताला मरणातून उठविले आहे. तोच देव आम्हाला सुध्दा न्याय-दिनाच्या दिवशी मरणातून उठवून व आपल्या मांगल्यामय जीवनाचे सार्थक घडवून आणील.

दुसरे वाचनः कलस्सेकरांस पत्र: ३:१-४.
आजच्या दुस-या वाचनात संत पौल कलस्सैकरांना, “ख्रिस्ताबरोबर पुनरूत्थित होण्याचे परिणाम स्पष्टपणे नमुद करून देत असताना आपल्याला उद्देशून म्हणतो की ख्रिस्ताबरोबर आपण देखील उठवले गेलो आहोत. आता आपण त्यांच्या पुनरूत्थित जीवनात सहभागी झालो आहोत.
ह्यास्तव, आपले जीवन आता वेगळे असायला हवे. स्वर्गीय गोष्टीकडे लक्ष वेधण्यास संत पौल आपल्याला विंनती करतो. कारण तेथे ख्रिस्ताच्या प्रकाशाची, प्रेमाची व सत्याची सत्ता स्थापित आहे.

शुभवर्तमान: योहान २०:१-९.
शुभवर्तमानकार संत योहान आपल्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्ताच्या पुनरूत्थानाविषयीच्या घडलेल्या घटनेचे विवरण करीत असताना ‘“रिकामी कबर”’ ह्या प्रसंगाचा उल्लेख प्रथमरीत्या नमुद करतो. येशूची रिकामी कबरहा आपल्या ख्रिस्ती विश्वासाचा गाभा मानला जातो व ख्रिस्ताच्या गौरवशाली पुनरूत्थानाचा एक अविभाज्य असा भाग मानला जातो.
तथापिः या घटनेमधून संत योहान आपल्यासमोर काही आधात्मिक धड्याचे विवरण साधू इच्छितो. तसे पाहिल्यास चारही शुभवर्तमानकांरानी (मत्तय, मार्क, लूक व योहान) सांगितलेल्या पुनरुत्थानाविषयीची विविध प्रंसगाची एका वाक्यात सलगपणे चित्र उभे करणे सोपे नाही.
उदाः संत योहान अध्याय २० ओवी १ मध्ये, “मरिया माग्दालिया एकटीच कबरेजवळ”  असल्याचे नमुद करतो. तथापि संत मत्तय आपल्या २८ व्या अध्याय १ ओवीत, “मरिया माग्दालिया व दुसरी मरीयाह्या दोन व्यक्ती कबरेजवळ असल्याचे नमुद करतो. तर, संत मार्क अध्याय १६ ओवी १ ह्यामध्ये, “मरीया माग्दालिया, याकोबाची आई मरिया व सलोमेह्या तीन व्यक्तीची ओळख देतो.
ह्या विविध वृत्तांतावरून साध्य करण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्त मरणातून उठला आहे व त्यांने मेलेल्यांतून पुन्हा उठावेअसा जो शास्त्रलेख लिहिला गेला होता तो आज परिपूर्ण झाला आहे.
तसेच आजच्या शुभवर्तमानात येशूच्या बारा शिष्यापैकी दोन शिष्यांचा उल्लेख केला गेला आहे. शिमोन पेत्र ह्यांचे नाव शुभवर्तमानात स्पष्टपणे मांडण्यात आले आहे. परंतू, दुस-या शिष्याचे नाव गुपीत असल्याचे दिसून येते. पण, त्या शिष्यांविषयी येशूठायी असलेले प्रेम दर्शविण्यात आले आहे. येशूचा अतिप्रिय शिष्य म्हणून संत योहानाला संबोधले जाते.
मरिया माग्दालिया हिने दिलेल्या वृत्तांतवरून दोन शिष्य, पेत्र व योहान, येशूच्या रिकामी कबरे जवळ येतात व, ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे, ‘मी तिस-या दिवशी मरणातून पुन्हा उठेन”’ ह्या वचनावर विश्वास ठेवतात.

बोध कथाः
लंडन ह्या शहरात घडलेली ही घटना आहे. १६६६ मध्ये संत पौलाला समर्पित केलेल्या एका महामंदिराला भल्या पहाटे आग लागली व काही क्षणातच ते कथींड्रल त्या आगीने भस्म करून टाकले. तब्बल दहा वर्षाचा काळ उलटल्यानंतर पोप महाशयाने ख्रिस्तोफर बेल्न ह्या नवशिक्या शिल्पकाराला (आर्किटेक्ट) त्या चर्चच्या पुर्न-बांधकामासाठी हवा असलेला आरखडा बनविण्यास सांगितला. ख्रिस्तोफरने त्या जागेचे चांगल्याप्रकारे निरक्षण केले व परिसराचा अभ्यास केला. सुरूवातीला काम थोडे अवघड दिसत होते कारणत्याला हवे असलेले निकाल मिळत नव्हते.
परंतुएके दिवशी विध्वंसत झालेला त्या चर्चच्या ढिगा-यातून त्यांने एक शिल्प (दगड) उचलले व त्यावर कोरलेल्या शब्दांना वाचून तो आर्श्चय़चकित झाला. आता त्याचा विश्वास बसला की ह्या चर्चची पुर्न-बांधणी होणे शक्य. त्या शिल्पावर कोरलेले शब्द होते, ‘होयमी पुन्हा उठेल.
ख्रिस्त आज मरणातून उठला आहे व त्यांने सांगितले भाकीत पूर्ण झाले आहे.

मनन-चिंतनः
चारही शुभवर्तमानकांरानी आपल्या शुभवर्तमानात ख्रिस्ताच्या पुनरूत्थानाचा प्रत्यक्ष साक्षीदार कोण आहे ह्याचे वर्णन केले नाही. किंबहूना, ख्रिस्ताचे पुनरूत्थान कसे घडले हे देखील सादर केलेले नाही. परंतू, “धन्य ती पवित्र रात्र, धन्य ती पवित्र कबरजेथे येशूचा मृत देह ठेवण्यात आला होता. कारण, त्या पवित्र रात्रीने, त्या कबरेने येशू ख्रिस्ताचे पुनरूत्थान जवळून पाहिले. खरोखरच, किती भाग्यवान असेल ती कबरजिला येशूच्या पुनरूत्थानाचा क्षण पाहावयाला मिळाला. आज सर्व मानवजात केवळ आपल्याला दिलेल्या विश्वासामुळे ख्रिस्ताच्या पुनरूत्थानावर विश्वास ठेवते. परंतू, त्या कबरेने मात्र  प्रत्यक्षात ख्रिस्ताच्या पुनरूत्थानाचा अनुभव घेतला.
ख्रिस्ताचे पुनरूत्थान व रिकामी कबर आपल्या ख्रिस्ती श्रध्देचे एक महत्त्वपूर्ण घटक मानले जातात. म्हणूनच पवित्र मिस्साबलिदानामध्ये आपण आभार घोषणेत येशू ख्रिस्ताच्या पुनरूत्थानाची श्रध्दापूर्व अंतःकरणाने आठवण करतो. ख्रिस्ताचे पुनरूत्थान ह्या परिवर्तनकारी घटनेमध्ये फार मोठे सामर्थ्य आहे. पुनरूत्थानामुळे आपल्याला शांतीचे व ऐक्याचे दान बहाल केले आहे.
ख्रिस्ताच्या प्रेमाने झपाटलेला प्रेषित संत पौल करिथंकरास पाठविलेल्या पहिल्या पत्रात अध्याय १५ ओवी १४ मध्ये म्हणतो, “ ‘ख्रिस्त उठविला गेला नाही, तर आमची घोषणा व्यर्थ व तूमचा विश्वासही व्यर्थ आहे”.’
रात्र व दिवस, गायक आणि सूर, लोखंड व चुंबक ह्यांचे जसे एक अतूट व जवळीक नाते आहे, तसेच, वधस्तंभ व पुनरूत्थान (गुडफ्रायडे आणि ईस्टर) ह्यांचे देखील ऐकमेकांत जोडलेले एक अतूट नाते आहे. पुनरूत्थानाशिवाय वधस्तंभ अर्थहीन आहे व वधंस्तभाशिवाय पुनरूत्थान आज एक पराभवाची शोकांतिका बनली असती. गौरवशाली पुनरूत्थानाच्या प्रकाशाशिवाय जगातील अंधकार अधिकच काळा बनला असता. जीवनाला अर्थ नसता. नवा करार एक दंत कथा बनली असती व ख्रिस्तीतत्वे काल्पनिक बनली असती.
आपले मानवी जीवन हे दुःखापासून, वेदनेपासून, संकटापासून, अरिष्टेपासून व एकाकीपणापासून वंचित नाही. ह्या सर्व गोष्टीमुळे ब-याच वेळी आपण आपल्यातील विश्वास, श्रध्दा व आशा गमवून बसतो. जिवंत असताना सुद्धा आपण मेलेल्या मृत-देहाचा अनुभव घेत असतो.
ख्रिस्ताला देखील मानवी जीवन जगत असताना अनेकदा ह्या सर्व गोष्टीना सामोरे जावे लागले पण हे चित्र बदलण्याची किमया प्रभू येशूने केली. आपल्या पुनरूत्थानाने त्यांने केवळ वधस्तंभालाच नव्हे तर संपूर्ण मानवी जीवनाला नवीन अर्थ प्राप्त करून दिला. ज्याच्या जीवनात गुडफ्रायडेचा अनुभव येऊन गेला आहे तोच ख-या अर्थाने पुनरूत्थानाचा आंनद लुटू शकतो.
पुनरूत्थानाने पाप व मृत्यू यावर ख्रिस्ताने विजय मिळविला म्हणून पास्काचा सण आपणासाठी आंनदाचा दिवस आहे. पुनरूत्थानामुळे सार्वकालिक जीवनाचा दरवाजा आम्हासाठी खुला केला गेला आहे. ख्रिस्ताशी एकनिष्ठ राहण्याची प्रेरणा पास्काच्या सणापासून आम्हाला लाभली आहे.
ख्रिस्ताच्या पुनरूत्थानावर पूर्णपणे विश्वास ठेवून आपण आपले वैयक्तिक जीवन जगत असताना दुस-यांचे ओझे हलके करण्याचा प्रयत्न करू या व त्यांना देखील पुनरूत्थानाचा आंनद देऊ या.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: ख्रिस्त आज विजयी झाला, मरणा जिंकुनिया उठला.
१. आपले परमगुरुस्वामी फ्रान्सीस, आध्यात्मिक मेंढपाळ बिशप थॉमस डाबरे, सर्व धर्मगुरू, धर्मबंधू व धर्मभगिनिंना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा अनुभव त्यांच्या कार्यात यावा. ख्रिस्ती श्रद्धावंतांना त्यांच्या श्रद्धेत व विश्वासात त्यांनी आपल्या कार्याद्वारे प्रेरित करावे व स्वर्गीय नवजीवनाचा आनंद उपभोगण्यास मनोबल द्यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. पुनरुत्थित येशू ख्रिस्ताच्या विजयाचा, आनंदाचा व प्रकाशाचा संदेश जे धर्मगुरू व धर्मभगिनी आज ईतरांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्यांच्या कार्यात प्रभूची कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले गेले आहेत, त्यांनी आपल्या विवेकबुद्धीला जागवून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून जनतेचे प्रश्न व अडचणी जाणून घ्याव्यात व देश्याच्या प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. सतत आजारामुळे ज्या कुटुंबांवर आज उपासमारीची वेळ आलेली आहे, त्यांना पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या वैभवशाली शक्तीने दिलासा दयावा व सर्व आजारातून त्यांची सुटका करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
५) सर्व धर्म सहभाव, सर्व धर्म स्नेहभाव, सर्व धर्म समीपभाव व सर्व धर्मसन्मानभाव या चौकटीवर विविध धर्मांच्या लोकांनी एकत्रित येऊन ऐकमेकांचा उध्दार व सन्मान करावा, गुण्यागोविंदाने नांदत राहावे व जगात शांतीचे व प्रेमाचे वातावरण निर्माण करावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.
६) आता आपल्या कौटुंबिक व सामाजिक गरजेसाठी प्रार्थना करू या.  


No comments:

Post a Comment