Thursday 9 August 2018


Reflection for the Homily of 19th Sunday of Ordinary Time (12-08-18) By Br. Cedrick Dapki





सामान्य काळातील १९ वा रविवार




“मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे.”


दिनांक : १२/०८/२०१८
पहिले वाचन - १ राजे १९:४-८
दुसरे वाचन – इफिसकरांस पत्र ४:३०-५:२
शुभवर्तमान – योहान ६:४१-५१



प्रस्तावना

     आज आपण सामान्य काळातील एकोणिसावा रविवार साजरा करत आहोत. आजची उपसना आपणास येशू ख्रिस्त हीच आपली खरी भाकर आहे; जी शारीरिक व आध्यात्मिक अशा दोन्ही भूक भागवते असे सांगत आहे.
     पाहिल्या वाचनात आपण बघतो कि, एलियाला देवाच्या देव दूताने शक्ती पुरविली आणि त्या कृपा शक्ती मुळेच तो हेरोब डोंगरावर पोहोचला आणि देवाचे कार्य हाती घेतो.
     दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला सांगत आहे कि, खऱ्या व पवित्र जीवनासाठी आपल्याला पवित्र आत्म्याची गरज असते व त्यासाठी तो सर्वांना पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाखाली राहण्यास आमंत्रण करीत आहे. शुभवर्तमानात संत योहान येशू बद्दल आम्हास सांगत आहे की, येशू ख्रिस्तच स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. हीच स्वर्गीय भाकर जीवन देणारी असून ती सर्वकाळ प्रेम व आनंद देणारी आहे. आजच्या मिस्साबलिदाना द्वारे स्वर्गीय भाकरीचे दर्शन सर्वांना घडून हे जीवन जगण्यास कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करूया की.

सम्यक विवरण
पहिले वाचन : १ राजे  १९:४-८

       एलिया संदेष्ट्याला होरेब पर्वतावर आज्ञा मिळताच तो तेथे जाण्यास निघाला. एक दिवसाची वाट चालून झाल्यानंतर एलियाला वाटले की, तो आता मरणार व त्याच्याने पुढची वाटचाल होणार नाही. तो खूप थकला होता. त्याने परमेश्वराकडे प्रार्थना केली की, “आता पुरे झाले मला मरू दे.ही इच्छा मानवाच्या विरुद्ध आहे, कारण मरण  हे फक्त परमेश्वराच्या हातात असते. म्हणून एलीयाने मरू नये यासाठी परमेश्वर देवदूताच्या सहाय्याने त्याच्यासाठी भाकर पाठवतो. त्या भाकरीने तो तृप्त होऊन देवाचे कार्य चालू करण्यास सरसावतो व पुढचा प्रवास सुरु करून देवाच्या होरेब डोंगरावर पोहोचतो.

दुसरे वाचन : इफिसकरांस पत्र : ४:३०-५:२

       संत पौल इफिसकरांस सांगतो की, पवित्र आत्म्याला तुम्ही दुःखवू नका किंवा खिन्न करू नका कारण पवित्र आत्मा हा आपल्याला अडचणीत मदत करतो. तो देवाचा आत्मा आहे जो नेहमी आपल्या भोवती व आपल्यामध्ये असतो. जो देवाचे कार्य सुरळीत पणे पार पडण्यास सहाय्य करतो. जर आपणास चांगले रहायचे असेल, ख्रिस्ताच्या प्रेमात जगायचे असेल व त्याचे कार्य पुढे न्यायचे असेल तर सर्व प्रकारचा द्वेष, संताप, क्रोध व मत्सर याला तिलांजली दिली पाहिजे म्हणजेच आपल्याला ख्रिस्ताच्या प्रेमात राहून ख्रिस्ताचे अनुकरण करता येईल. जशी देवाने आपल्यावरती प्रीती केली अशीच आपणही इतरांवर करावी. हे सर्व तेव्हाच शक्य होईल जेव्हा आपण येशूवर विश्वास ठेवू व पवित्र आत्म्याच्या सहाय्याने कार्य करू.

शुभवर्तमान – योहान ६:४१-५१

“येशू ख्रिस्त स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे”, असे संत योहान आजच्या शुभवर्तमानात आपणास सांगत आहे. मानवाच्या तीन मुलभूत गरजांपैकी अन्न हि पहिली गरज आहे. जर मानवाने अन्न सेवन केले नाही तर काही दिवसांत तो मारून जातो. कारण अन्नातून जी शक्ती व पोषण शरीरासाठी हवे असते ते मिळत नाही. तसेच आपणास आध्यात्मिक भूक भागविण्यासाठीही अध्यात्मिक भाकरीची गरज असते आणि ती भाकर ख्रिस्त आहे. त्याचा स्विकार केल्यानेच आपण ख्रिस्तामध्ये जिवंत राहू शकतो. म्हणूनच येशू ख्रिस्त म्हणतो, “स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की, ती जर खाल्ली तर तो मरणार नाही”  योहान ६:१५ ह्याच विश्वासाने आपण भाकरीचा स्विकार केला पाहिजे म्हणजेच ख्रिस्तामध्ये आपणास सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.

बोधकथा

       एका गावी एक दगडफोड्या राहत होता. त्याला हे दगड फोडायचे काम आवडत नव्हते. ह्या मुळे तो उदास व कंटाळलेला होता. एक दिवस असाच काम करीत असताना एक राजा त्याच्या बाजूने जाताना त्याला दिसला. राजाला पाहून तो दगडफोड्या स्वतःला म्हणाला, “राजा होणे किती चांगले आहे.असे म्हणून त्याने देवाकडे प्रार्थना केली. देवा मला राजा बनव. देव त्याची प्रार्थना एकतो व त्यास राजा करतो. एकदिवस  पाथरवट जो राजा झाला होता तो वाटेने चालत असताना त्याला खूप ऊन लागत होते. हे पाहून त्यास वाटले की, सूर्य माझ्या पेक्षा महान आहे. म्हणून त्याने देवाला म्हटले कि मला सूर्य बनव. त्याची इच्छा पूर्ण झाली.
जेव्हा सूर्य बनून चमकत होता तेव्हा त्याने पहिले कि, ढग त्याची किरणे पृथ्वी पर्यंत पोहचण्यास अडथळा आणतात. म्हणून त्यास वाटले कि, ढग सूर्यापेक्षा महान आहे. म्हणून त्याने ढग बनण्याची इच्छा व्यक्त केली आणि देवाने त्याची प्रार्थना ऐकली. तो ढग झाला. व त्याने ढगातून प्रजन्यवृष्टी केली. तेव्हा त्यास वाटले कि पाणी खूप श्रेष्ठ आहे. परंतु त्याच्या लक्षात आले कि त्याचा प्रवाह दगडाने रोखला होता. तेव्हा त्यास वाटले कि दगड पाण्यापेक्षा शक्तिशाली आहे. म्हणून तो दगड होण्यासाठी प्रार्थना करतो. देव त्यास दगड बनवतो. एक दिवस एक पाथरवट येऊन त्या दगडाचे लहान-लहान तुकडे करण्यास सुरवात करतो. त्या दगडास वाटले कि, हा पाथरवट दगडापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून तो देवाकडे पुन्हा पाथरवट बनण्यासाठी विनंती करतो. शेवटी तो जसा अगोदर होता तसाच बनला.

मनन चिंतन

       बिशप वालेगासच्या मतानुसार मनुष्याला कुरकुर करण्यास व तक्रार करण्यास खूप आवडते. शुभवर्तमानामध्ये जेव्हा येशूने यहुदी लोकांस म्हटले की, मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे, तेव्हा ते सर्वजण लगेच आपापसात कुरकुर करू लागले. हा येशू आम्ही ह्याला ओळखतो. तो सुताराचा मुलगा, मारिया त्याची आई आणि दुसरे त्याचे भाऊ आणि बहीणी. हा आमच्या मध्ये वाढला. मग हा का म्हणू शकतो की, मी स्वर्गातून उतरलो आहे? अश्या तक्रारी त्यांच्या मनात चालू होत्या. अशामुळे येशू कोण आहे, हे त्यांच्या लक्षात कधीच आले नाही. येशू काय संदेश देत आहे हे त्यांना कधीच समजले नाही. कारण त्यांच्या मनात एकच विचार होता आणि तो म्हणजे येशू हा सुताराचा मुलगा व साधारण मनुष्य आहे. त्या पलीकडे त्यांनी येशूला कधीच पहिले नाही.
       आपण दररोज भाकर खातो आणि  ती आपल्या जेवणात असलीच पाहिजे कारण आपली भूक ही भाकरीवर अवलंबून आहे. अशा भाकरीने फक्त शाररीक भूक भागते; परंतु आपली अध्यात्मिक भूक ख्रिस्ताकडून मिळणाऱ्या भाकारीनेच भागवली जाते. आपण प्रत्येकांने विचार केला पाहिजे कि, आपली भूक काय आहे? आणि ती कोण भागवू  शकते? संत योहान म्हणतो’ “येशू ख्रिस्त स्वर्गातून उतरलेली भाकर आहे जी शाररीक व अध्यात्मिक अशा दोन्ही भूक भागवू शकते.” आणि ती भाकर खाल्ल्याशिवाय म्हणजेच येशू ख्रिस्ताचा स्विकार केल्या शिवाय आपली अध्यात्मिक भूक पूर्ण होणार नाही.
येशू ख्रिस्ताच्या रूपकात्मक भाषेमुळे काही लोकांना त्याची भाषा समझत नव्हती म्हणून काही लोक त्याला सोडून गेले. अशामुळे ख्रिस्त त्यांच्या जीवनातून निघून गेला होता. व त्याची भूक कधीच भागली नाही.परंतु आपण ख्रिस्ताला भाकरीच्या रुपामध्ये ओळखले आहे. तो भाकरीच्या रुपात आपणामध्ये येतो. आपली भूक भागवतो. आपणास नव-जीवन देतो. व प्रभू कडे जाण्याचा मार्ग सुरळीत करतो.
       आपण जेव्हा दररोज मिस्साला येतो, मिस्साबलिदानामध्ये भाग घेतो. तेव्हा आपण अक्षरशः ख्रिस्ता बरोबर सहभोजन करत असतो. ख्रिस्ताचा स्विकार करत असतो व अध्यात्मिक भूक भागवत असतो. अशाच विश्वासाने आपण ख्रिस्ताचा स्विकार करूया व सार्वकालिक जीवनाचा अनुभव घेऊया. आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभू स्वर्गीय भाकरीने आमचे तारण कर.

१.     आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरू व धर्मभगिनी व व्रतस्थ ह्यांनी सर्व भाविकांची अध्यात्मिक तयारी करावी व स्वर्गीय भाकरीचा अनुभव घेण्यास मदत करावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
२.     ख्रिस्त आपली जिवंत भाकर आहे, यावरील आपला विश्वास बळकट व्हावा व प्रत्येक मिस्साबलिदानामध्ये हि जिवंत भाकर खऱ्या अर्थाने सेवन करण्यास प्रभूचे सामर्थ्य लाभावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३.     आपल्या धर्मग्रामासाठी प्रार्थना करूया कि, जेणेकरून या धर्मग्रामातील प्रत्येक भाविकाला प्रभू परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव यावा व त्यांनी परमेश्वराच्या कृपेने एकत्र येऊन, एक कुटुंब म्हणून कार्य करावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४.     आपल्या धार्मिक जीवनात येशूला ओळखण्यास व त्याच्या अधिक जवळ येण्यास सामर्थ्य लाभावे म्हणून प्रार्थना करूया.
५.     जे लोक आजार, अन्याय, यातना, हिंसा यांना बळी पडले आहेत अशा सर्वांना स्वर्गीय भाकरीत कृपेचा अनुभव यावा म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
६.     थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजासाठी प्रार्थना करूया.



No comments:

Post a Comment