Friday 17 August 2018



Reflections for the homily of 20th Sunday in Ordinary time 
(19-08-2018) by: Br Jameson Munis





सामान्य काळातील विसावा रविवार

दिनांक १९-०८-१८
पहिले वाचन नितीसुत्रे ९:१-६
दुसरे वाचन इफिसकरांस पत्र ५:१५-२०
शुभवर्तमान योहान ६:५१-५८





माझा देह खरे खाद्य आणि माझे रक्त खरे पेय आहे.


प्रस्तावना

     आज पवित्र ख्रिस्तसभा सामान्य काळातील विसावा रविवार साजरा करीत आहे. आपल्या रोजच्या जीवनात आपण अनेक प्रकारचे चविष्ट खाद्य व पेय सेवन करत असतो; परंतु आजची उपासना आपल्याला ख्रिस्ताचे शरीर व रक्तहेच खरे खाद्य व पेय आहे ह्यावर मनन-चिंतन करण्यास आमंत्रित करत आहे.
     नितीसुत्रे ह्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात  देव प्रजेला सुज्ञतेच्या मार्गावर चालावयास आवाहन करत आहे. तसेच इफिसकरांस लिहिलेल्या  पत्रातून घेतलेल्या आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल इफिस येथील लोकांना स्वतःचे आचरण ख्रिस्तमय करून व आत्म्याने परिपूर्ण होण्यास आमंत्रित करीत आहे. तसेच आजच्या योहानलिखित शुभवर्तमानात प्रभू येशू सांगतो कि, ‘माझे देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे; जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.’
     प्रभू येशूच्या ह्या जीवनदायी भाकरीची किंमत काय आहे याचे महत्व पटावे म्हणून या मिस्साबलिदानात विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन नितीसुत्रे : ९:१-६

     पहिल्या वाचनात उत्तम अशी सूत्रे मांडलेली आहे. जे आपणास देवावरील व आपल्या ज्ञानावर कसे प्रेम करावे हे शिकवतात. माणसाने माणसाशी कसे वागावे, सामाजिक व्यवहार कसे पार पडावेत आणि नीतीचे जीवन कसे जगावे ह्यावर मार्गदर्शन करत आहे. सर्व ज्ञानाचा आणि सुज्ञतेचा उगम देव आहे. देव सज्जनाला उंचावितो, परंतु दृष्टाला दंड देतो अशा प्रकारचा उपदेश हे वाचन करत आहे. तसेच येथे श्रीमंती सुज्ञता व श्रीमंत मूर्खता या दोघींनी आपापले आमंत्रण दिले आहे. येथे श्रीमंती सुज्ञता नगरच्या उच्चस्थानावरून  ओरडून म्हणते कि, तुम्ही माझी भाकर खा आणि मी मिसळेलेला द्राक्षरस पी”. सुज्ञपणे वागणे म्हणजे, प्रामाणिक वर्तन, न्याय आणि शहाणपणात वाढणे. म्हणून आजचे पहिले वाचन सुज्ञतेच्या मार्गाने चालण्यास आव्हान करत आहे.

दुसरे वाचन  : इफिसकरांस पत्र : ५: १५-२०

     दुसऱ्या वाचनात संत पौल इफिसकरांस सांगतो कि, तुम्ही अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सभोवार नजर ठेवून चाला. तुम्ही कसे जगत आहात याकडे लक्ष द्या. कोणत्या दिशेला चालला आहात ते पहा. तुम्ही पापमार्गाने चालू नका. सैतानाच्या धोरणाप्रमाणे चालणे शहाणपण नाही. विश्वासाचे जीवन जगा. आपल्या वेळेचा आपण कसा उपयोग करत आहोत या कडे लक्ष द्या. कारण जर ती प्रभूची इच्छा नाही, तर आपण प्रभूला संतोष देणार नाही. व त्याच्याविरुध्य वागणार. दारूचा दुष्परिणाम शरीरावर व बुद्धीवर होतो, म्हणून तुम्ही द्राक्षरसाच्या नशेत राहू नका, तर पवित्र आत्म्याच्या सहवासात राहा व येशू ख्रिस्ताचे धन्यवाद व आभार माना. त्यांनी आपल्याला त्याचे स्वःताचे शरीर व रक्त दिले आहे. जो आपल्याला एकमेकांशी व प्रभुशी संबंध चांगले ठेवतो.

शुभवर्तमान योहान : ६:५१-५८

     शुभवर्तमानात प्रभू येशू एक महत्वाचे विधान करत आहे. ते म्हणजे, “माझे देह खरे खाद्य आणि माझे रक्त खरे पेय आहे.तसेच प्रभू येशू पुढे सांगतो कि, मी जीवनाची भाकर आहे. मी स्वर्गातून उतरलो आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. येशू ख्रिस्ताची हि विधाने एकूण तेथे जमलेल्या लोकांना मोठे आश्चर्य वाटले. हि विधाने आजही खरी आहेत. इस्त्राईल लोकांनी चाळीस वर्षे अरण्यात मान्ना खाल्ला तरी त्यांना सार्वकालिक जीवन मिळाले नव्हते. ख्रिस्त स्वताः सार्वकालिक जीवन देतो. हे जीवन त्याच्यावर (येशूवर) विश्वास ठेवून म्हणजे त्याचा स्विकार करून मिळते. ज्याने ख्रिस्तावर विश्वास ठेवला, त्याला ते मिळाले आहे. सार्वकालिक जीवन जगाला देता यावे यासाठी येशूला वधस्तंभावर मरण सहन करावे लागले. वधस्तंभावर पापाच्या खंडणीसाठी टांगलेल्या ख्रिस्ताला स्विकार करणाऱ्याला सार्वकालिक जीवन मिळेल असे ख्रिस्ताने माझा देह खाणे व माझे रक्त पिणेया वाक्यांनी सुचविले आहे. जो येशू ख्रिस्ताकडे येऊन त्याचा स्विकार करतो तो आत्म्यात तृप्त होतो. त्याला आत्मिक भूक व तहान लागत नाही. जो कोणी ख्रिस्ताकडे जातो तो कोणीही असला तरी ख्रिस्त त्याला धिक्कारत नाही. तो अशा व्यक्तीला सार्वकालिक जीवन देतो. त्याचा कधीच नाश होणार नाही.

बोधकथा

     प्रिया नावाची एक सोज्वळ मुलगी होती व तिचे आईवडील तिच्या बालपणीच वारले होते. ती तिच्या आजीबरोबर  एका छोट्याश्या घरात रहात होती. परिस्थिती बिकट असल्यामुळे तिला एक दिवसाचे जेवणही मिळत नसे. त्यामुळे ती कधी कधी उपाशी राहत तर कधी चटणी-भाकर खाऊन राहत. प्रिया जरी दिसायला सुंदर असली , परंतु जेवण व इतर सुविधांच्या अभावामुळे ती अशक्त दिसत होती. तसेच ती शाररीकदृष्ट्याही दुर्बल झाली होती. त्यामुळे शेजारच्या रोजी काकीला तिचे दुःख पाहवेना म्हणून तिला प्रियाची दया आली. तिने तिला आपल्या घरी नेले. तिने तिला खायला-प्यायला व औषधही आणून दिले. त्यामुळे प्रिया काही दिवसातच सुधृढ झाली व तिला नव-चैतन्य लाभले.

मनन चिंतन

     आजची उपासना आपल्याला वरील कथेद्वारे आठवण करून देते की, आपल्या सर्वांना सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचे शरीर व रक्त ह्याचे स्मारक आपल्यापुढे ठेवले आहे. प्रभू येशू म्हणतो, मी जी भाकर देईन ती माझा देह असून ती जगाच्या कल्याणासाठी पोषक आहे व जो माझे सेवन करतो तो माझ्यामुळे जगेल.
     आपण सर्वजण देवाची प्रेमळ मुले-मुली आहोत. देव आपला स्वर्गीय पिता आहे. तो आपले तारण करतो. आपल्या इच्छा आणि आकांश पूर्ण करतो. तरीसुद्धा आपण देवाच्या इच्छेविरुद्ध वागतो आणि देवापासून दूर जातो. आपण देवापासून जेवढे दूर जातो तेवढा येशू आपल्या अधिक जवळ येतो. विशेषरित्या जेव्हा आपण ख्रिस्त-शरीर सेवन करतो तेव्हा येशू आपल्या अंतःकरणात येतो. येशू आपणास कृपा व शक्ती देतो. याच ख्रिस्त-शरीराला जीवनाची भाकर असे म्हटले आहे. ही जीवनाची भाकर स्विकारून आपण ख्रिस्ताला स्विकारतो व ख्रिस्तमय बनतो. व आपण पवित्र बनतो.
     आपल्या रोजच्या जीवनात आपली शाररीक भूक भागवण्यासाठी आपण चांगले व पोषक अन्न घेत असतो. पोषक अन्न सेवन करून सुद्धा काही वेळा आपली शाररीक भूक भागत नाही व काही वेळा शरीरावर विपरीत परिणाम होत असतात. कधी-कधी आपल्याला वेगवेगळे आजार जडत असतात. परंतु आजच्या, उपसानामध्ये आपल्याला सर्वकालीक जीवनाच्या भाकरीचा उल्लेख आहे. मी जीवनाची भाकर आहे. जो कोणी माझे शरीर खातो, तो सर्वकाळ जगेल.” (योहान ६ : ५८) या संत योहांनच्या सहाव्या अध्यायात प्रभू येशू ख्रिस्त हेच सत्य सांगत आहे कि, आपले जीवन फलदायी झाले पाहिजे.
     आपल्या आईवडिलांना,  भावा-बहिणींना मदत केली पाहिजे. मित्र-मैत्रिणींची सेवा केली पाहिजे. दुसऱ्यांच्या अडी-अडचणीत मदत करून त्यांना उत्तेजन केले पाहिजे. दुसऱ्याना चांगली प्रेरणा दिली पाहिजे. त्यासाठी आपण देवाचे देह आणि रक्त अनुभवले पाहिजे. ते म्हणजे, आपण प्रभू ख्रिस्ताला त्याच्या आज्ञाद्वारे व चांगल्या कृत्याद्वारे चिकटून राहिले पाहिके कारण प्रभू येशूला अशक्य असे काहीच नाही आणि जे तो करतो ते सर्व चांगलेच असते. म्हणून आपण शाररीक इच्छेला जास्त प्राधान्य न देता, सार्वकालिक जीवनाच्या भाकरीकडे लक्ष केंद्रित करून आपली अध्यात्मिक वाढ करण्याचा प्रयत्न करूया.     

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद : हे प्रेमळ परमेश्वरा आमची प्रार्थना एकून घे.

१)     आमचे पोप महाशय, सर्व बिशप, धर्मगुरू, धर्म-बंधू-भगिनी यांनी त्यांच्या आचार-विचारातून लोकांसमोर चांगला आदर्श ठेवावा तसेच त्यांच्या सुवार्ताकार्यात प्रभूचा वरदस्त त्यांना सतत लाभावा व त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या ख्रिस्ती धर्माची प्रगती होत राहावी म्हणून आपण प्रभू कडे प्रार्थना करुया.
२)     आजच्या उपासनेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांनी त्यांची अंतकरणे उघडवून येशू स्वःता जीवनाची भाकर आहे, यावर खऱ्या श्रद्धेने व विश्वासाने येशूच्या शरीराचे व रक्ताचे सेवन करावे व त्याच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.
३)     आपल्या देशातील राज्यकर्त्ये व विविध अधिकारी ह्यांनी देशाच्या व लोकांच्या प्रगतीसाठी योग्य ते श्रम करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४)     या पावसाच्या ऋतूमध्ये आपणा सर्वांना चांगला पाऊस मिळावा व शेतीची चांगली वाढ व्हावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
५)     ज्या कुटुंबामध्ये विविध कारणांमुळे जी भांडणे व वाद चालू आहेत, अशा सर्व कुटुंबात शांती व प्रेम नांदावे व परमेश्वराचा आशीर्वाद राहावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
६)    आता आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक हेतुसाठी प्रार्थना करूया.





No comments:

Post a Comment