Thursday 7 March 2019


Reflection for the Homily of 1st SUNDAY OF LENT
(10-03-19) By Br. Amit D’Britto    





उपवास काळातील पहिला रविवार


दिनांक: १०/०३/२०१९
पहिले वाचन: अनुवाद २६:४-१०
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १०:८-१३
शुभवर्तमान: लूक ४:१-१३





"मोहापासून आम्हाला दूर ठेव"

प्रस्तावना:
     आज आपण उपवास काळातील पहिला रविवार साजरा करत आहोत. आजची उपासना आपल्याला येशूने कशाप्रकारे मोहावर विजय मिळवला हे दाखवून आपणां सर्वांना सुद्धा मोहांवर विजय मिळविण्यास पाचारण करीत आहे.
     अनुवाद ह्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वराने इस्रायली लोकांची आरोळी ऐकून त्यांना मिसऱ्यांच्या छळातून मुक्त करून दुधामधाचे पाट ज्या देशात वाहतात त्या देशांत सुखरूप आणिले असे ऐकतो. दुसऱ्या वाचनात संत पौल जो अंत:करणात येशूवर विश्वास ठेवतो व तोच विश्वास त्याच्या मुखाने कबूल करतो त्याचे तारण होईलअसे सांगत आहे. तर लूकलिखित शुभवर्तमानात अरण्यात सैतानाने घेतलेली येशूची परीक्षा व येशूने मोहांवर मिळविलेला विजय ह्याविषयी ऐकावयास मिळते.
येशूने मोहावर मिळवून आपल्यासाठी तो एक आदर्श बनला आहे. म्हणून त्याच्यावर असलेला आपला विश्वास अधिकाधिक दृढ व्हावा व दैनंदिन जीवनात जे मोह आपल्याला परमेश्वरापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतात त्या मोहांवर मात करण्यासाठी ह्या मिस्साबलीत विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: अनुवाद २६:४-१० 
पुरातन इस्रायलमध्ये परमेश्वराची केली जाणारी पूजा-अर्चना ही देवाने त्यांच्यावर केलेल्या उपकारांची परतफेड आणि मिसऱ्यांपासून त्यांच्या सुटकेबद्दल दिलेली उपकार स्तुती व धन्यवादाचा भाग होता. ह्या ऋणानिर्देशात त्यांना जमिनीच्या देणगीहूनही अधिक प्रिय होते ते म्हणजे देवाची आठवण व उपकारस्तुती. (ओवी ५-१०) हा अनुवाद २४ ह्या अध्यायातील महत्वाचा गाभा आहे. ह्या उताऱ्यात इस्रायली लोकांनी परमेश्वराच्या पुढ्यात मांडलेली अर्पणे ही त्यांच्या प्रायश्चिताचे प्रतिक आहे. कारण पूर्वजांच्या जमिनीशिवाय त्यांचे अस्तित्व शून्य आहे असे ते मानात. देवाने त्यांच्यावर त्यांच्या पूर्वजांकरवी केलेल्या ह्या महत्कृत्यामुळे त्यांनी देवाला उत्पन्नाचा दशांस भाग अर्पण केला. एक परिवार म्हणून केलेले सहभोजन हासुद्धा त्यांच्या आनंदोत्सवाचा व ऋणानिर्देशाचाच भाग होता.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १०:८-१३
          संत पौलाचा प्रस्तुत उताऱ्यात यहुद्यांविषयीचा कठोरपणा दिसून येतो, परंतु ह्यामागचा हेतू हाच होता की, त्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवावा व त्यांच्याद्वारे यहुद्यांचे तारण व्हावे. परंतु हे सत्य जरी पौलाने मायेने सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनी त्यात कटुता आणि ताठरपणा अनुभवला. यहुद्यांना देवाबद्दल आस्था व लगाव आहे, ह्याची जरी पौलाला जाणीव होती, तरी त्यांची ही आस्था चुकीचे मार्गक्रमण करत होती हे त्याला ठाऊक होते. यहुदी पंत हा नियम व रूढी पाळण्यात अतिशय चाणक्ष होता. त्यांची अशी खात्री होती की, हे सर्व नियम कटाक्षाने पाळल्याने त्यांना देवाची कृपावरदाने लाभेल व ते देवाच्या अगदी जवळ जातील.
यहुद्यांनी नियमानुसार, लोकांनी केलेल्या चांगल्या वाईट वर्तणुकीवरून त्यांची वर्गवारी केली होती. ह्या सर्वांना अंत म्हणून संत पौल सांगतो, की, येशू ह्या नियमांचा शेवट किंवा अंत असा आहे. तो म्हणतो, ‘ख्रिस्तानुमते देवाला समाधानी करण्यासाठी अशा नियमांचे पालन करणे रास्त नाही तर देवाचे प्रेम, दया आणि कृपा ह्यांचे अंत:करणात जतन करून कृतीत उतरविणे योग्य आहे’. संत पौल येथे देवावरील विश्वासाने आपले तारण होईल असे म्हणतो.

शुभवर्तमान:  लूक ४:१-१३ 
शुभवार्तिक संत लूकने येशूची जनसमुदयासमोर कामगिरी करण्यापूर्वीची तयारी लिखित केली आहे. यार्देन नदीत योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेतल्यानंतर नभातून झालेल्या पित्याच्या वाणीने त्यास त्याचा परमप्रिय पुत्र व मसीहा म्हणून घोषित केले. तद्नंतर पवित्र आत्म्याने त्यास यार्देन जवळील अरण्यात परीक्षा घेण्यास नेले. तेथे येशूने चाळीस दिवस रात्र उपवास केला आणि नंतर सैतानाने त्याची परीक्षा घेतली. पहिल्या ख्रिस्ती समूहाने ह्या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेता हा प्रसंग तीनही शुभवर्तमानात मुख्य स्वरुपात मांडलेला आहे. ही घटना विशेष आणि महत्वाची आहे कारण ह्यात येशूचा मानवी स्वभाव दिसून येतो.
सैतानाने त्याची परीक्षा घेतली : सैतानाने केलेल्या परीक्षेत येशू खालील तीन विशेष मोहांवर विजय मिळवितो.
१) ऐहिक (एैश्वर्य) गोष्टींचा मोह. २) अधिकाराचा मोह ३) प्रतिष्ठेचा मोह
परंतु येशू उचित बायबल मधील ओव्यांनी किंवा देवाच्या वचनांद्वारे ह्या सर्वांवर मात करतो व त्यावर विजय मिळवतो. उदा: अनुवाद ८:३; ६:१३; ६:१६. सैतान येशूला मोहात पाडण्यात अपयशी ठरला परंतु तो पुन्हा काहीतरी अशाच गोष्टींची संधी शोधत होता.

बोधकथा :
एकदा सॅॅमसन आपल्या आजोबा सोबत बागेत फिरत होता. फिरत असताना आजोबा सॅॅमसनला समाजात होत असलेल्या अत्याचार व हिंसा ह्याविषयी सांगत होते. तेव्हा सॅॅमसन आजोबांना प्रश्न विचारतो कि, “तुम्हाला ह्या हिंसा व अत्याचाराबद्दल काय वाटते?” तेव्हा आजोबा उत्तरतो, “मला असे वाटते कि, माझ्या हृदयात दोन वाघ भांडण करत आहेत. त्यामधील एक वाघ हा रागीट, खुन्नसी आणि हिंसक आहे; तर दुसरा वाघ हा प्रेमळ, क्षमाक्षील आणि दयाळू आहे.” सॅॅमसन परत विचारतो, “त्यामधील कोणता वाघ यशस्वी ठरेल.आजोबा म्हणतो, “ज्या वाघाला मी अधिक प्रोस्ताहित करून उत्तेजन देतो तोच यशस्वी होईल.
ह्या उपवास काळात आपल्याला होणाऱ्या मोहाला वाव किंवा उत्तेजन न देता आपण त्यावर प्रभू येशुप्रमाणे विजय मिळवण्याचा प्रयत्न करूया. जर आपण आपल्या मोहास पाठबळ दिले तर आपण देवापासून दूर जाऊ; आणि जर आपण मोहावर विजय मिळवला तर आपण प्रभूच्या समीप येऊ शकतो.

मनन चिंतन:
आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की, प्रभू येशूला आत्म्याने चाळीस दिवस रानात नेले; आणि तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली. आपले प्रथम पालक आदाम व हव्वा ह्यांना मोह झाला व ते त्या मोहास बळी पडले. इस्राएली प्रजेची वाळवंटात परीक्षा पाहिली आनी ते सुध्दा अपयशी ठरले. परंतु येशूला झालेल्या मोहावर तो विजय मिळवतो. येशूची अरण्यातील ही परीक्षा उपवासकाळाच्या सुरुवातीला पाहिली जाते. कारण ती उपवास काळातील चाळीस दिवासांशी समांतर आहे.
          ‘मोह होणे’ हे काही पाप नाही; परंतु पाप करण्यास एक प्रकारचे आमंत्रण ठरते. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला विविध प्रकारचे मोह होत असतात.  तसेच मोह होण्यापासून या जगातील कोणतीही महान व्यक्ती सुटली जात नाही. अब्राहम, मोशे, ईयोब, मरिया अनेक संत ह्या सर्वांना मोह होते होते. इतकेच नव्हे, तर खुद्द देवपुत्र प्रभू येशुलाही मोह झाला. पण जर आपण त्या मोहाला बळी पडलो तरच परिस्थिती गंभीर होते. मोह हा सैतानापासून येत असतो आणि त्याचा हेतू हा आपला घात करून आपल्याला देवापासून दूर नेण्याचा असतो. सत्य असे आहे की, आपल्याला मरेपर्यंत मोह होत राहतील.
          सैतान आपल्याला देवापासून दूर नेण्यासाठी पुढील तीन प्रकारच्या मोहाचा वापर करतो: ऐहिक गोष्टी, अधिकार, प्रतिष्ठा. आजसुद्धा सैतान ह्या तिन्ही गोष्टींच्या सहाय्याने आपल्याला मोह करीत आहे.
१) पहिला मोह हा धोंड्याचे रुपांतर भाकरीत करण्याचा होता. कारण प्रभू येशूने चाळीस दिवस प्रार्थना व उपवास केल्याने तो खूप उपाशी व भुकेला होता. सैतान असा मोह करतो की, मानवी जेवण हे मिशनरी कार्यासाठी पुरेसे आहे व प्रार्थना, दान उपवास ह्याची गरज नाही. परंतु येशू म्हणतो, “मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही." म्हणजेच आपली शाररीक भूक नव्हे तर, आत्मिक आणि आध्यात्मिक भूक भागवणे सुद्धा अतिशय महत्वाचे आहे. हा होता भौतिक गोष्टींचा किंवा संपत्तीचा मोह.
२) दुसऱ्या मोहात सैतान येशूला जगातील सर्व राज्ये दाखवतो आणि त्याला म्हणतो की, “ह्यावर सर्व अधिकार तुला देईन, परंतु मला नमन कर.” येशू जाणून होता की संपूर्ण विश्वावर देवाचा अधिकार आहे. म्हणून सैतान हा खोट बोलत आहे. हा मोह अधिकार मिळण्याबाबत होता. म्हणून येशू म्हणतो, “परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व त्याचीच सेवा कर.” इतकेच नव्हे, तर प्रभू येशू आपल्या पित्याच्या आज्ञेप्रमाणे क्रुसावर प्राण अर्पण करून नतमस्तक होतो.
३) तिसऱ्या मोहात सैतानाने येशूला उंच मंदिरावरून खाली उडी मारण्यास सांगितले. “कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, तो तुझे रक्षण करावयास दूतांना आज्ञा देईल.” येशूने उत्तर दिले, “परमेश्वर जो तुझा देव आहे त्याची परीक्षा पाहू नको.” हा प्रतिष्ठा मिळविण्याबाबतचा मोह होता.
संपत्ती, अधिकार, आणि प्रतिष्ठा ह्यांचा मोह अतिशय घातक आहे. प्रत्येक मनुष्याला आपल्या जीवनात अशा मोहाच्या आहारी जाणे योग्य वाटते. परंतु आपण ह्या मोहापासून दूर राहिले पाहिजे. कारण ते आपली आत्मिक भूक भागवू शकत नाही. आपल्याकडे संपत्ती, अधिकार आणि प्रतिष्ठा कितीही प्रमाणात असली तरीही आपण तृप्त होऊ शकत नाही. हजार, लाख, करोड, अब्ज अशी ही वाटचाल आहे, ज्याला शेवट नाही.
          तसेच संपत्ती, अधिकार आणि प्रतिष्ठा ह्यांच्या मोहामुळे आपण अतिशय गर्विष्ठ बनतो व आपल्या सभोवतालच्या व्यक्तींना, जगाला विसरून जातो. येशूला झालेला मोह हा जरी बायबल मध्ये एकाच ठिकाणी नमूद केला असला तरीही आपल्या लक्षात येते की, येशूला पृथ्वीवर जीवन जगत असताना अनेक वेळा अशाच प्रकारे मोह झाला कारण तो आपल्याप्रमाणे मानवा होता. परंतु प्रत्येक क्षणी त्याने मोहावर विजय मिळवला व आपणही तसेच केले पाहिजे.
          ह्या उपवासकाळात तयार होण्यासाठी फादर वि. मा. दासन ह्यांच्या पुस्तकातील पुढील मुद्द्यावर मनन चिंतन करून आपण ते आत्मसात करूया.
१) उपवासकाळ हा तयारीचा काळ आहे:- प्रभू येशूने आपले सामाजिक कार्य सुरु करण्यापूर्वी चाळीस दिवस उपवास व प्रार्थना करून तयारी केली. आपणही ह्या उपवास काळात प्रभूच्या दुःखसहनावर मनन चिंतन करून आपली योग्य अशी तयारी करूया.
२) उपवासकाळ म्हणजे शुद्धीकरण:- जर आपल्याला देवाचे मित्र व्हायचे असेल, तर आपल्यामधील वाईट गुणांचा त्याग करून आपले आंतरिक शुद्धीकरण केले पाहिजे.
३) उपवास काळातील सहभाग:- प्रभूच्या दुःखसहनात सहभागी होत असताना आपण उपवास करून, आपली पापे शुद्ध करून व गरिबांना दानधर्म करून आपला सहभाग दर्शविला पाहिजे.
४) उपवासकाळातील आपला जाहीरनामा:- ह्या उपवासकाळात आपला प्रभूवरील विश्वास म्हणजेच, “येशू प्रभू आहे, जो मरण पावला आणि मेलेल्यांतून उठला.” (रोमकरांस पत्र १९:९) हे जाहीर करावे.
अशाप्रकारे देवाचे सवंगडी बनण्यासाठी व ह्या उपवासकाळात मोहावर विजय मिळविण्यासाठी अधिक प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू तुझ्याबरोबर आमचा समेट घडवून आण.
) आपले पोपबिशप्सधर्मगुरूव धर्मभगिनी ह्या सर्वांना देवाने चांगले शारीरिक व मानसिक आरोग्य दयावे तसेच ह्या उपवास काळामध्ये त्यांनी उपवासाचेप्रार्थनेचे व दानधर्माचे महत्व आपल्या दररोजच्या जीवनाद्वारे लोकांना पटवून दयावेम्हणून आपण प्रार्थना करूया.
२) जे  लोक देवापासून दूर गेले आहेत त्यांना ह्या उपवास काळात देवाने स्पर्श करावा व त्यांनी देवाच्या प्रेमाचा अनुभव घेऊन देवाजवळ परत यावेम्हणून आपण प्रार्थना करूया.

३) या प्रायश्चित काळात प्रार्थना, उपवास व दानधर्माच्या मदतीने आपण आपल्या जीवनाला एक नवीन वळण द्यावे व प्रभूची सुवार्ता आपल्या जीवनाद्वारे समाजात पसरावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) आपण सर्वांनी ह्या प्रायश्चित काळात पापांपासून दूर राहून चांगले पवित्र जीवन जगावे व दुसऱ्यांना योग्य अशी मदत, प्रेम व क्षमा करावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.

५) थोड्या वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक विनंत्या प्रभूचरणी मांडूया. 

No comments:

Post a Comment