Thursday 21 March 2019


Reflection for the Homily of 3rd SUNDAY OF LENT 
(24-03-19) By Br. Godfrey Rodrigues






 उपवास काळातील तिसरा रविवार

दिनांक: २४/०३/२०१९
पहिले वाचन: निर्गम ३:१-८अ, १३-१४
दुसरे वाचन: १ करिंथ १०:१-६, १०-१२
शुभवर्तमान: लुक १३:१-९





पश्चात्ताप करण्याविषयी बोध



प्रस्तावना:

आजच्या प्रायश्चित्त काळातील ह्या तिसऱ्या रविवारी आपण केलेल्या पापांचा आपण पश्चात्ताप करावा, तसेच प्रायश्चित्त संस्कार घेऊन आपल्या पापी जीवनावर मनन चिंतन करण्यासाठी आपली देऊळमाता आपणास बोलावत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, इस्राएली जनतेची सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून सुटका व्हावी व त्यांनी पापांचा पश्चात्ताप करावा म्हणून देव मोशेला पाचारण करीत आहे. आजच्या दुसऱ्या वाचनात इस्राएली लोकांचा अविश्वास व पापीवृत्ती याचा उल्लेख संत पौल करत असून त्याच्या पापीवृत्तीमुळेच देवाने त्यांचा नाश केला असे सांगत आहे. तर आजच्या लूकलिखित शुभवर्तमानाद्वारे प्रभू येशू सांगत आहे की, जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा नाश होईल व हे एका अंजिराच्या झाडाच्या दाखल्याद्वारे नमूद केले आहे. आज आपली देऊळमाता पुन्हा एकदा आपणा सर्वांना आपल्या पापांची कबुली करून आपले परिवर्तन करण्याची संधी देत आहे. ह्या संधीचा लाभ घेऊन पापी जीवना पासून परावृत्त होऊन देवाकडे परत यावे व पश्चातापी अंतःकरणाने पापक्षमा मागण्यास व देवाशी एकनिष्ठ राहण्यास लागणारी कृपा व आशीर्वाद मिळावा म्हणून विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: निर्गम ३:१-८अ, १३-१४

          वरील उताऱ्यात इस्राएल लोकांना इजिप्तमधून बाहेर नेण्याची जबाबदारी देव मोशेवर सोपवत आहे. मोशेला देव सर्वप्रथम जळत्या झुडुपामधून दर्शन देतो. हे आपल्याला सांगण्यात आले आहे व देव पवित्र आहे हे जाणून मोशे आपले जोडे काढतो. दिव्य पवित्रतेचा हा विचार निर्गमाच्या पुस्तकात एक प्रमुख विषय म्हणून सादर केलेला आहे. मोशेला एक शंका होती की, मला देवाने पाठवले आहे, हे राजाला व इस्रायली लोकांना कसे पटवून द्यावयाचे? म्हणून देव स्वतःची ओळख स्पष्ट करून देतो. मोशेने देवाचे नाव विचारले कारण नावामधून व्यक्तीचे तत्त्व स्पष्ट होते, असे इस्रायल लोक मानत असे. येथे देवाने यहोवा या व्यक्तिवाचक नामाने स्वतःची ओळख करून दिली. ह्याचा अनुवाद बहुदा ‘देव’ असा केला आहे. यहोवा हे हिब्रू भाषेतील ‘देवाचे नाव’ होय. त्याचाच उल्लेख ‘मी जो आहे, तो आहे’ ह्या शब्दांनी केला आहे.

दुसरे वाचन: १करिंथ १०:१-६, १०-१२

          संत पौल आपल्याला मिळालेल्या महान आशीर्वादाची आठवण करून देत असताना सांगत आहे की, आपला नाश होणार नाही, आपण अपात्र ठरणार नाही असे कोणी मानू नये. जरी देवाने इस्राएली लोकांना इजिप्त देशातील गुलामगिरीतून सोडविले तरी देव त्यांच्याविषयी संतुष्ट नव्हता. म्हणून त्यांच्या पापामुळे व त्यांच्या अविश्वासामुळे देवाने त्यांचा नाश केला. संत पौल आपल्याला आठवण करून देत आहे की, आपण सर्व पापी आहोत, आपण आपल्या पापांचा पश्चाताप केला पाहिजे. माझ्याकडून पाप होणार नाही अशी घमेंडी वृत्ती आपण सोडून दिली पाहिजे.

शुभवर्तमान: लुक १३:१-९

          प्रभू येशू अंजिराच्या दाखल्याद्वारे आपल्याला सांगत आहे की, जो पश्चाताप करतो तो स्वतःचे पाप ओळखतो, स्वतःचे पातके व मलीन स्थिती पाहतो व त्यापासून देवाकडे वळतो व ख्रिस्ताकडे पापक्षमेची याचना करतो. ख्रिस्त त्याला पापक्षमा देतो व तो मनुष्य बदलतो ज्याला फळ नाही येत ते तोडून टाक असे मालक म्हणतो, म्हणून प्रत्येकाने पश्चाताप करून फळ द्यायला हवे.      

मनन चिंतन

          आजची तिन्ही वाचने आपल्याला एकच संदेश देतात ते म्हणजे, पश्चाताप करा आणि प्रभूच्या प्रेमामध्ये नव्याने जन्म घ्या. ख्रिस्त म्हणतो नव्याने जन्म घेतल्या शिवाय कोणीही देवाचे राज्य पाहू शकणार नाही. ह्याचा अर्थ नव्याने जन्म घेणे म्हणजे पश्चाताप करणे होय. ख्रिस्ती जीवन सुरक्षित चालावे म्हणून परमेश्वराने आपणाला दहा आज्ञा देलेल्या आहेत हे नियम पाळले नाहीत तर आपले अध्यात्मिक जीवन विकसित होणार नाही. उपवास काळात प्रभू येशू आपल्याला सांगतो की, जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा नाश होईल. पश्चाताप म्हणजे आपल्या पापांची जाणीव करून तो देवासमोर व्यक्त करून त्यांचा त्याग करणे होय.
          आज प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येकाला अंजिराच्या झाडाच्या दाखल्याद्वारे प्रायश्चित करण्यास बोलावत आहे.  परमेश्वराची आपल्या कडून एकच अपेक्षा असते ती म्हणेज आपण  चांगली गोड, रसाळ फळे द्यावीत; तसेच आपल्याला प्राप्त झालेल्या वरदानांचा योग्य तो वापर करून स्वतःचे तसेच इतरांचे जीवन फुलविण्यास पात्र व्हावे म्हणून परमेश्वर आपल्यावर जबाबदारी सोपवतो. मात्र आपण आपल्या स्वार्थी अहंकारी स्वभावामुळे प्रभूची आज्ञा धुडकावून लावतो व पापास प्रवृत्त होतो. पापामुळे आपले जीवन निष्फळ अंजीराच्या झाडासारखे होते. आपण आपल्या पापी वृत्ती मुळे गोड व रसाळ फळे इतरांना देऊ शकत नाही. 
          ह्या उपवास काळातील तिसऱ्या रविवारी, आपण आपल्या पापांची आठवण करु या. आपल्या हातून घडलेल्या पापांबद्दल मनात दुःख व्यक्त करून, यापुढे पाप न करण्याचा निश्चय करुया. सरते शेवटी परमेश्वराने दिलेल्या संधीचा फायदा घेऊन प्रायश्चित संस्कार स्वीकारून देवाच्या प्रेमाचा, क्षमेचा, दयेचा व कृपेचा अनुभव आपण घेऊया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
आपला प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१. आपले परमगुरु फ्रान्सिस सर्व बिशप्स, धर्मगुरू-धर्मभगिनी ह्या प्रभुने शाररीक, मानसिक व अध्यात्मिक आरोग्य द्यावे व योग्य निर्णय घेण्यासाठी त्यांना पवित्र आत्म्याची शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपण सर्व पापी आहोत ह्याची जाणीव आपणा प्रत्येकाला व्हावी व या प्रायश्चित काळात आपण सर्वांनी आपल्या पापांचा पश्चाताप करून प्रायश्चित संस्कार घेऊन देवाची करुणा व दया आपल्या जीवनात अनुभवावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे देवापासून दूर गेलेले आहेत त्यांना प्रभूची दया, क्षमा व करुणेचा स्पर्श व्हावा व त्यांनी पुन्हा एकदा प्रभू खिस्तामध्ये आनंदाचे जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे बेरोजगार आहेत त्यांना त्यांच्या कला-कौशल्यावर आधारित योग्य ती नोकरी मिळावी जेणेकरून त्यांना त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येईल म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपल्या सामाजिक व कौटुंबिक हेतूसाठी प्रार्थना करूया.


1 comment: