Tuesday 16 April 2019


Reflections for the homily for Good Friday (19-04-2019) by Br. Julius Rodrigues





पवित्र शुक्रवार

दिनांक: १९/४/२०१९
पहिले वाचन: यशया ५२:१३-५३:१२
दुसरे वाचन: इब्री ४:१४-१६१५:७-९
शुभवर्तमान: योहान १८:१-१९:४२




“बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही!

प्रस्तावना:
          आज पवित्र शुक्रवार! ख्रिस्ताच्या दु:खसहनाचा दिवस! आणि आपल्या हातून घडलेल्या चुकांची आठवण करून देणारा हा दिवस. मानवाला पापमुक्त करण्यासाठी ख्रिस्ताने दु:खयातना सोसून क्रुसावर आपले बलीदान केले म्हणूनच ह्या दिवसाला पवित्र शुक्रवार म्हणून मानला जातो. आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा सेवक गीताद्वारे ख्रिस्ताच्या दु:खप्राय यातना व मरणाचे भाकीत करतो. आपणा सर्वांचे पाप अंगीकारूनतो आपल्या अपराधामुळे घायाळ झालाआपल्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला व त्याला बसलेल्या फटक्यांनी आपणास जीवन प्राप्त झाले. प्रभू येशूने आपल्या पापांचे ओझे स्वतःवर लादून आपणाला पापातून मुक्त केले.
            आजचे दुसरे वाचन आपणास जाणीव करून देते कीप्रभू येशू ख्रिस्त हा खरा याजक आहे आणि त्याच्याद्वारे आपणास तारण मिळणार आहे आणि म्हणून आपण त्याच्या आज्ञेत राहिलो पाहिजे.
       योहानलिखित   शुभवर्तमानाद्वारे येशूचे दु:खसहन आणि यातनादायक मरण फार प्रभावी आणि प्रेरणादायी आहे हे आपल्या पुढे मांडण्यात आलेले आहे. देवाचा पुत्र पापी मनुष्यासाठी मरण पावला आणि त्याने देवाची क्षमा आपणास बहाल केली. आज आपण प्रभू येशूचे दु:खसहन व मरण ह्यावर चिंतन करीत असताना आपल्यालाही येशूप्रमाणे क्षमा करता यावी म्हणून आजच्या उपासनेमध्ये आपण परमेश्वराकडे प्रेरणा व कृपा मागूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ५२:१३-५३:१२.
          यशया संदेष्टा आजच्या सेवकगीताद्वारे देवाचा नीतिमान सेवक मानवाला पापमुक्त करेल व देवाची बिनशर्त क्षमा बहाल करेल ह्याचे वर्णन करतो. या काव्याच्या प्रारंभी व शेवटी सेवकाची थोरवी वाढविल्याचे वर्णन आहे.

 दुसरे वाचन: इब्री ४:१४-१६१५:७-९.
    कधीही पाप केलेले नसताना आमचा स्वर्गीय प्रमुख याजक आमच्या दुर्बलपणाविषयी सहानभूती कशी बाळगतो ते आजच्या दुसऱ्या वाचनातून स्पष्ट केले आहे.  येशूने सोसलेल्या दु:खातून तो आज्ञाधारकपणा शिकला. दुःखयातना आणि परीक्षा यांना तोंड देताना तो देवाशी विश्वासू राहिला.

शुभवर्तमान: योहान १८:१-१९:२
येशूचे दुखःसहन, मरण व यातना या घटनेचे चित्रण योहान शुभवर्तमानकाराने विशेषरीत्या केले आहे. येशू ख्रिस्ताचे दुःख, यातना आणि मरण हे ख्रिस्ताच्या जीवनाचे एक महत्त्वपूर्ण घटक आहेत. त्याचे दुःख सर्व मानवी दुःखाच्या परिसीमा ओलांडणारे होते. सज्जन आणि तारणारा येशू, लोकांचे भले करीत असतानाही, त्याला अपमान सहन करावा लागला. परंतू येशू ख्रिस्ताने त्यांना शिव्याशाप देण्याऐवजी प्रेम दाखवले. दोषारोप व वाईट चिंतण्याऐवजी क्षमा करीत येशु म्हणाला: हे पित्या त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही.येशूच्या मनात कोणाच्याही विषयी राग, मत्सर किंवा हेवा नव्हता. येशूने सर्वांना क्षमा केली. शुभवर्तमानामध्ये येशु ख्रिस्त सांगत आहे की, ‘जशी मी इतरांना क्षमा दाखविली तशी तुम्ही इतरांना क्षमा दाखवा’.

मनन चिंतन:
“बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही!
          आज आपल्यासाठी हा दिवस फार महत्वाचा आहे, कारण ह्याच दिवशी दोन हजार वर्षापूर्वी त्याच ख्रिस्ताने आपल्यासाठी त्याच्या प्राणाची आहुती दिली होती आणि म्हणूनच आजपर्यंत आणि यापुढे देखील हा दिवस अजरामर राहणार आहे. सुंदर अशा एका गीताच्या ओवी अशा आहेत, ‘मी वेचिले फुलांना, काटे ख्रिस्ता मिळाले!’ खरोखर ख्रिस्ताने आपल्या शरीरावर आपल्या पापांचे काटे स्वीकारले आणि आपल्याला मात्र मखमली चादाराने गुंडाळीले. किती हा मोठेपणा त्या ख्रिस्ताचा, ज्याने स्वतःचा विचार कधीच केला नाही. तो राजा होता, परंतु सेवक झाला. आज ख्रिस्त कालवरी डोंगराची वाट चालत आहे. असंख्य त्रास सहन करत आहे तो फक्त तुमच्या आणि माझ्या पापांसाठी. दुःख, वेदना, त्रास ह्यांनी तो खचून गेला आहे. परंतु त्याचे आपल्यावर असलेले प्रेम काडीमात्र कमी झालेले नाही. ‘बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना ठाऊक नाही.’ हे शब्द ख्रिस्त आपल्या शेवटच्या घटकेला उच्चारत आहे. विचार करा ज्या रोमन शिपायांनी त्याला क्रुसावर खिळले ते काय विचार करत असतील, जेव्हा त्यांच्या कानावर हे शब्द पडले.
          गुन्हेगाराला क्रुसावर खिळण्याची त्याकाळची प्रथा होती. जेणेकरून लोकांपुढे त्याच्या चारित्र्याची खच्चीकरण करून अगदी तो तुच्छ आहे असे समाजापुढे त्यास दर्शविले जात असे. ख्रिस्ताच्या ह्या अशा क्षमादायी शब्दावरून मला असे वाटते की, ख्रिस्त सांगू इच्छितो की, त्यांना माहीत नव्हते की ख्रिस्त कोण आहे की तो देव आहे किंवा तो देवाचा पुत्र आहे. म्हणूनच तो त्याच्या पित्याला त्याच्या मारेकऱ्यांना क्षमा करण्यास सांगत आहे. ख्रिस्ताच्या मरणाद्वारे आज मानव जातीला क्षमा झाली आहे आणि मानवाचा परमेश्वराशी समेट झाला आहे.
          त्या रोमन शिपायाप्रमाणे तुम्ही आणि मी, ख्रिस्ताला आपल्या दैनंदिन जीवनात क्रुसावर खिळत आहोत. आज आपण अनेक अशा पद्धतीने ख्रिस्ताच्या मस्तकावर धार धार काट्यांचा मुकुट परिधान करीत आहोत. आपल्या शब्दावारे व कृत्याद्वारे आज ख्रिस्ताला चाबकाचे फटके मारत आहोत. आणि तोच ख्रिस्त ज्याने २००० वर्षा पूर्वी आपले रक्त सांडले होते तो ख्रिस्त आज देखील स्वतःच्या रक्ताने माखलेला आहे आणि विद्रूप झालेला आहे. आपल्याला खऱ्या ख्रिस्ताची ओळख झालेली नाही आणि त्याच्या कार्याची अनुभती आली नाही. कालचे जे रोमन शिपाई होते, ते मात्र आजचे आपण झालो आहोत. म्हणून आपल्याला ख्रिस्ताच्या दैवीपणाची जाणीव झाली नाही. आज आपण एकच संदेश घेऊन घरी जाऊया, असिसिकार संत फ्रान्सिस च्या शब्दात दुसऱ्यांना क्षमा करण्यातच, आपली क्षमा दडलेली आहे.

1 comment: