Thursday 4 April 2019

Reflections for the homily of 5th Sunday of Lent (07-04-2019) by Br. Rahul Rodrigues






उपवास काळातील पाचवा रविवार
दिनांक: ०७/०४/२०१९
पहिले वाचन: यशया ४३:१६-२१
दुसरे वाचन: फिलीप्पैकरांस पत्र ३:८-१४
शुभवर्तमान: योहान ८:१-११




मग मीही तुझा न्याय करीत नाही. आता तू जाऊ शकतेसपण परत पाप करु नकोस.

प्रस्तावना:
          आज उपवास काळातील पाचव्या आठवड्यात आपण पदार्पण करीत आहोत. आजची उपासना पुन्हा एकदा आपल्याला देवाच्या दयेची व क्षमेची जाणीव करून देत आहे. मागच्या रविवारी आपण उधळ्या पुत्राचा दाखला यावर मनन चिंतन केले. आज आपण पुन्हा एकदा दैवी दयेवर व प्रेमावर मनन चिंतन करणार आहोत.
          आजच्या पहिल्या वाचनात प्रवक्ता यशया म्हणतो की, “देव आपल्या लोकांसाठी काहीतरी नवीन करणार आहे. ज्यामुळे त्याचे जीवन अधिक चांगले व सुंदर बनले. तर दुसऱ्या वाचनात संत पौल फिलीप्पैकरांस लिहिलेल्या पत्रात म्हणतो की, येशूला मिळवणे हे एकमेव ध्येय त्याच्या जीवनात आहे व बाकी सर्वकाही त्याच्यासाठी व्यर्थ आहे. पुढे योहानलिखित शुभवर्तमानात आपण पाहतो की, पापविरहित देवाने एका पापी स्त्रीला शिक्षा देण्यास नकार दिला, परंतु पापी लोकांनी त्या स्त्रीला शिक्षा देण्याचे ठरवले होते.
आपला देव हा दयाळू व प्रेमळ आहे. तो सतत आपल्याला आपले जीवन सुधारून त्याच्या मार्गावर चालण्यास पुनःपुन्हा संधी देत असतो आणि उपवासकाळ ही अजून एक संधी आहे, जिथे आपण आपल्या पापांबद्दल प्रायश्चित करतो व देवाच्या जवळ जातो. तर ह्या पवित्र मिस्साबलीदानात देवाच्याजवळ जाण्यास व पापी जीवन सुधारण्यास लागणारी कृपा व शक्ती परमेश्वराजवळ मागुया.

पहिले वाचन: यशया ४३:१६-२१
          यशया हा संदेष्टा बाबीलोनच्या हद्दपारीतील लोकांचे सांत्वन करतो  व सांगतो की, “जो समुद्रात मार्ग, प्रचंड प्रवाहात वाट करितो व ज्याने रथ व घोडे, सैन्य व वीर ह्यांस बाहेर काढले तोच परमेश्वर म्हणतो की, पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. कारण मी एक नवीन गोष्ट करणार आहे. मी तुम्हा सर्वांना एकत्र करणार आहे. तसेच परमेश्वर सांगत आहे की, ‘तुम्ही तुमच्या जुन्या गोष्टीवर विचार करत बसू नका, तर पुढे काय करणार त्यावर विचार करा. कारण मी तुमचा परमेश्वर अरण्यात सडक करील व मरुभूमीत नद्या वाहविन. जर परमेश्वराला ह्या सर्व गोष्टी शक्य असतील, तर परमेश्वर आपल्याला वाईट मार्गावरून चांगल्या मार्गावर जाण्यासाठी नक्कीच मदत करील.

दुसरे वाचन: फिलीप्पैकरांस पत्र ३:८-१४
          आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो की, तो स्वतः यहुदी पंडित असल्यामुळे त्याला समाजात मोठ्या मानाचे व आदराचे स्थान होते. परंतु ख्रिस्तासमोर त्याला त्या सर्व गोष्टी केरकचरा वाटू लागल्या. कारण त्या सर्व गोष्टी ख्रिस्ताविषयीचे ज्ञान मिळविण्याच्या आड येत होत्या. ज्यांना ख्रिस्ताचा लाभ झाला. ते ख्रिस्ताठायी आढळले. ‘ख्रिस्त विश्वासणाऱ्यात राहतो व विश्वासणारे ख्रिस्तात’ हे सत्य आपल्या जीवनात प्रगट व्हावे, अशी पौलाची इच्छा होती. नियमशास्त्र पाळून नीतिमान ठरणाऱ्याच्या मागे तो आता लागला नव्हता. ख्रिस्तावरील विश्वासाने देवापासून मिळालेल्या नितीमत्त्वाने तो पूर्ण समाधानी होता. ख्रिस्ताची ओळख अधिकाधिक होत जावी, ही पौलाची उत्कट इच्छा होती. पौलाने अजूनही त्याचे ध्येय गाठले नव्हते. आपण ख्रिस्ताप्रमाणे म्हणजेच ख्रिस्ताचा स्वभाव धारण करावा ह्या ध्येयाच्या मागे पौल, लागला होता. यासाठी ख्रिस्ताने त्याला स्वतःचे केले होते. तो मोठ्या निश्चयाने हे महान ध्येय गाठण्यासाठी धावत होता. त्याच्या जीवनातील मागील गोष्टीकडे त्याने मुद्दामच दुर्लक्ष केले होते. त्याने जे सर्व मिळवले होते किंवा ख्रिस्ती जीवनात जी वाटचाल केली होती, तिच्या विषयीही तो विचार करीत बसला नाही तर, ख्रिस्ताने त्याला ज्या उद्देशाने बोलावले होते किंवा निवडिले होते, तो पूर्ण व्हावा ह्यासाठी धावण्याच्या शर्यतीत पहिले स्थान मिळविण्याच्या इच्छेने धावावे, तसे तो त्या ध्येयामागे लागला होता. ख्रिस्तासारखे होण्याची इच्छा सर्वांनी बाळगावी असे संत पौल कळकळीने लिहितो. ख्रिस्तासारखे होत जाण्याची व ख्रिस्ताबरोबर सतत वाटचाल करण्याची व वाढत जाणारी इच्छा म्हणजे ख्रिस्ती प्रौढतेचे लक्षण आहे.

शुभवर्तमान: योहान ८:१-११
          येशू ख्रिस्ताला स्वतःचे असे ठिकाण नव्हते. असे असूनही त्याने आळसात दिवस काढले नाहीत. पित्याच्या इच्छेप्रमाणे तो दरोरज आपले जीवन जगला. विरोधामुळे त्याने त्याचे कार्य बंद ठेवले नाही. पहाटेस तो मंदिरात गेला व तेथे जमलेल्या लोकांना शिकवू लागला. परमेश्वर पित्याने त्याला दिलेले काम तो तत्परतेने व विश्वासुपणे करत राहिला. हे काम करीत असता त्याला कुठच्या तरी गुन्ह्यामध्ये पकडण्याचा परुशी लोकांचा बेत चालूच होता. म्हणूनच धर्मपुढारी एका व्याभिचारी बाईला मंदिरात घेऊन आले. ती व्यभिचार करताना तिला पकडण्यात आले होते, परंतु व्यभिचार करणाऱ्या पुरुषाला मात्र त्यांनी सोडून दिले होते. त्यांना न्याय दानाची आस्था नव्हती. येशूला दोषी ठरविण्याचा हा त्यांचा फक्त एकमेव डाव होता. जर येशूने दगडमार करा असे म्हटले असते, तर तो रोमी कायद्याविरुद्ध चेतावणी देतो असा आरोप त्यांनी ठेवला असता व जर दगडमार करू नका असे म्हटले असते, तर हा मोशेचे नियमशास्त्र पाळू नका असे शिकवितो असा प्रचार त्यांनी केला असता. येशू उठून उभा राहिला व त्या धर्मपुढाऱ्याना म्हणाला, ‘तुम्हामध्ये जो निष्पाप आहे, त्याने प्रथम दगड टाकावा.’ प्रभू येशूला त्या प्रत्येकाचे जीवनचरित्र ठाऊक होते. ख्रिस्ताच्या पावित्र्यासमोर त्यांना स्वतःच्या पापाची इतकी बोचणी लागली की, ते सर्व तेथून निघून गेले. येशू ख्रिस्ताने त्या स्त्रीला पापक्षमा दिली व पुन्हा पाप न करण्याची आज्ञा दिली.

बोधकथा:
          एक गावात एक चांगला मनुष्य राहत होता. तो फार चांगले जीवन जगत होता. त्याला समाजात चांगले मानाचे व सन्मानाचे स्थान होते. परंतु तो त्याच्या स्वतःच्या जीवनाबद्दल खुश नव्हता; कारण तो एक विशिष्ट पाप खूप वर्षापासून पुन्हा पुन्हा करत होता. प्रत्येक वेळी तो सुधारण्याचा प्रयत्न करी, परंतु तो त्याच पापाच्या आहारी जात असे. मग त्याने निश्चय केला की, जर मी हे पाप पुन्हा केले तर, मी माझ्या डोक्यावरचे दहा केस उपटणार व अखेरीस आत्महत्या करणार.
          एका महिन्यानंतर त्या माणसाच्या डोक्यावर फार कमी केस राहिले होते, अर्थात तो त्या पापाच्या जाळ्यातून सुटू शकत नव्हता. अखेरीस त्या मनुष्याच्या डोक्यावर एकही केस राहिला नाही. मग त्याने विचार केला की, मी ह्या पापापासून वंचित राहू शकत नाही व बंदूक घेऊन स्वतःला गोळी घालणार एवढ्यात एक देवदूत त्याच्यासमोर येतो व त्यास थांबवितो. परंतु तो मनुष्य म्हणतो, मला मरू दे कारण मी निश्चय केला आहे व मी सुधारू शकत नाही. मग देवदूत त्याला म्हणाला थांब. ‘देव तुला काही तरी देऊ इच्छितो व तो एक बॉक्स त्यास देतो. मनुष्य तो बॉक्स उघडतो व पाहतो तर त्या मध्ये एक केसाचा टोप (wig) होता.

मनन चिंतन:
आजच्या शुभवर्तमानात आपल्याला तीन प्रकारची व्यक्तिमत्व पहावयास मिळत आहेत. ते म्हणजे शास्त्री-परुशी, व्यभिचारी स्त्री व येशू.
१. शास्त्री व परुशी:
          शास्त्री व परुशी हे लोक स्वतःला फार उंच व सज्जन मानत असत. व्यावहारिकरित्या पाहिल्यास परुशी हे धर्म पंडिताचे काम करत असत, तर शास्त्री हे कारभारी होते. काही शास्त्री व परुशी लोक येशूच्या विरुद्ध होते. कारण येशूचे वागणे त्यांना त्रासदायक व हानिकारक होते व त्यामुळे ते येशूचा काटा काढण्यासाठी सतत प्रयत्न करीत होते.
          जेव्हा ते त्या व्यभिचारी स्त्रीला घेऊन येतात तेव्हा त्यांना येशूला फसवायचे असते. त्या स्त्रीच्या अब्रूची त्यांना काही पर्वा नसते. त्यांना फक्त त्यांचे उद्दिष्ट महत्वाचे होते व त्यासाठी ते त्या व्यभिचारी स्त्रीला एक साधन म्हणून वापरतात.
          जेव्हा ते येशूला त्या स्त्रीला काय शिक्षा द्यावी असे विचारतात तेव्हा ते येशूला त्याच्या स्वतःच्या शब्दामध्ये पकडण्याचा प्रयत्न करीत होते. कारण मोशेच्या नियमानुसार एखादी व्यक्ती जर का व्याभिचारात पकडल्यास त्यास मरणदंडाची शिक्षा होत असे. जर येशूने तसे करण्यास सांगितले तर ते येशूच्या शिकवणुकी विरुद्ध होईल कारण येशू सतत प्रेम, दया, शांती ह्याविषयी शिकवण देत असे. तसेच रोमी अधिकाऱ्याशिवाय मरणदंडाची शिक्षा कोणी देऊ शकत नव्हते व जर येशूने तसे केले तर त्याला रोमी अधिकाऱ्यानाही उत्तर द्यावे लागेल. तसेच जर का येशूने त्या स्त्रीला तसेच सोडून दिले, तर येशू मोशेने दिलेल्या नियमाचे उल्लंघन करील. परंतु येसू असे काही करत नाही व त्यांनी पसरवलेल्या जाळ्यात त्यानांच पकडतो.
२. व्यभिचारी स्त्री:
          ही स्त्री अतिशय दुर्बल अवस्थेत दिसत आहे. जिची अब्रू त्या परुशी आणि शास्त्री लोकांनी चवाट्यावर काढली होती. तिच्या पापापेक्षा अधिक त्यांनी तिचा छळ केला. ती पूर्णपणे हताश व कमजोर झाली होती. तिच्यामध्ये स्वतःची बाजू मांडण्याची किंवा स्वतःची सुटका करण्याची देखील शक्ती उरली नव्हती.
          येशू तिच्या मदतीस धावून आला कारण तो पाप्यास तारावयास आला आहे. येशू निराश व हताश लोकांचे सांत्वन करून त्यांना बरे करण्यास आला आहे. जेव्हा शास्त्री व परुशी निघून गेले तेव्हा येशूने तिला माफ केले व नव्याने जीवन जगण्यास सांगितले.
३. येशू:
          ह्या दाखल्याद्वारे येशूची करूणा व दया आपणास पहावयास मिळते. शेवटी फक्त दोन व्यक्ती राहीले होते: येशू आणि स्त्री. संत अगस्तीनच्या शब्दात म्हणायचे म्हणजे, “तेथे फक्त दुर्बळपणा (स्त्री) आणि अनंत करुणा (येशू) राहिले होते.” येशू हा पाप-विरहित होता त्यामुळे त्या पापी स्त्रीला शिक्षा देणे येशूच्या हातात होते परंतु, येशू तिला क्षमा करतो. येशू आपल्याला आपल्या पापातून मुक्त करून तारावयास आला आहे.
          आजच्या शुभवर्तमानातून आपणास समजून येते की, आपण आपल्या पापासाठी जबाबदार असतो. आपल्या पापामुळे आपण देवाच्या कृपेपासून वंचित राहिलो आहोत. परंतु आपण आपले पापी जीवन सोडून नेहमी देवाकडे जाऊ शकतो. देव दयाळू आहे व तो सतत आपल्या परत येण्याची वाट पाहत असतो. ज्याप्रमाणे येशू एका पापी स्त्री मध्ये संत बनण्याची क्षमता पाहतो त्याचप्रमाणे ती क्षमता आपल्यामध्ये सुद्धा आहे.
          देव आपल्या पापाकडे पाहत नाही, तर आपल्या परिवर्तनाची वाट पाहत असतो. देवाला आपल्या भूतकाळापेक्षा भविष्यकाळाची चिंता असते. त्यामुळे तो आजच्या पहिल्या वाचनात सांगत आहे की, “तुम्ही आरंभी घडलेल्या गोष्टी आठवू नका, फार पूर्वी घडलेल्या गोष्टींचा विचार करू नका.” “जा आणि पुन्हा पाप करू नको” हे काही निर्णय करणारे विधान नाही, तर प्रोस्ताहित करणारे विधान आहे. देव आपल्याला सतत आपले पापी जीवन सुधारून पवित्र जीवन जगण्यास प्रेरणा व कृपाशक्ती देत असतो.
          एखादी शर्यत जिंकण्यासाठी मागे न पाहता पुढे पाहून धावणे गरजेचे असते. मागे पहिले, तर आपण नक्कीच अडखळून पडू. त्यामुळे संत पौल दुसऱ्या वाचनात सांगत आहे की, “भूतकाळ विसरा व भविष्यकाळाकडे नव्याने वाटचाल करा.” हा उपवासकाळ आपल्याला पुन्हा एकदा आपले पापी जीवन बदलून पवित्र जीवन जगण्यास नव्याने संधी देत आहे. आपले हे पापी जीवन सुधारण्यास लागणारी कृपा शक्ती आपण ह्या मिस्साबलिदानात मागुया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:   
प्रतिसाद: हे प्रभू, आम्हाला पवित्र कर.
१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे पोप फ्रान्सिस, महागुरू, धर्मगुरू व सर्व व्रतस्थ ह्यांनी त्यांच्या कार्याद्वारे येशू ख्रिस्ताची ओळख इतरांना पटवून द्यावी व देवाच्या दयेचे व प्रेमाचे अनुभव इतरांना द्यावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आज जे लोक ख्रिस्तापासून दूरावलेले आहेत, पापाच्या मोहात अडकलेले आहेत त्यांना ख्रिस्ताच्या प्रेमाचा व दयेचा अनुभव यावा व त्यांनी आपले पापी जीवन सोडून ख्रिस्ताच्या मार्गावर चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. जे कोणी नोकरीच्या शोधात आहेत, जीवनात हताश झाले आहेत त्यांना प्रभूचा स्पर्श व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. ह्या पवित्र मंदिरामध्ये जमलेल्या आपल्या सर्वांना प्रभूने चांगले आरोग्य द्यावे व ख्रिस्ताप्रमाणे दयाळू बनण्यास शक्ती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करुया.

५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक गरजा प्रभूचरणी अर्पण करूया.

No comments:

Post a Comment