Friday 25 June 2021

    Reflection for the 13th Sunday in Ordinary Time (27/06/2021) By Fr. Suhas Pereira



सामान्य काळातील तेरावा रविवार 


दिनांक: २७/०६/२०२१

पहिले वाचन ज्ञानग्रंथ :- १:१३-१५; २:२३-२४

दुसरे वाचन - कारीथकरांस दुसरे पत्र :- ८:७.९.१३-१५

शुभवर्तमान - मार्क :- ५:२१-४३

प्रस्तावना

          प्रिय बंधू आणि भगिनींनो, कोरोना महामारी आपल्याला सुरक्षित शारीरिक अंतर ठेवण्यास, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्यास आणि इतरांची शारीरिक उपस्थिती टाळण्यास भाग पाडत  आहे. शोकांतिका अशी कि, इतकी खबरदारी घेऊनसुद्धा या प्राणघातक कोरोना विषाणूने आपल्या शरीरामध्ये घर केलेलं आहे का, हे आपल्याला माहित पडत नाही. आपल्या संपर्कात येणाऱ्या कोणत्याच व्यक्तीला या रोगाच्या संसर्गाच्या धोक्यात आणण्याची/ कोणत्याच व्यक्तीला कोरोनाच्या जीवघेण्या संकटात ढकलण्याची आपली इच्छा नाही. दुसऱ्यांच्या सुरक्षिततेच्या खबरदारीचा हा विचार खुद्द आपल्या स्वतःच्या जीवनाला असलेला धोका आणि आपल्या विवशतेचं किंव्हा असहाय्यतेचंसुद्धा चिन्ह आहे.

          करिंथिकरांस पाठवलेल्या दुसऱ्या पत्रात संत पौल म्हणतो कि, "परमेश्वराचे सामर्थ्य हे मानवी दुर्बलतेमध्ये पूर्णत्वास येते"(१२: ९). परमेश्वर हा जीवंताचा देव आहे. तो मरणाचा किंव्हा मृत्यूचा देव नाही. त्याने सर्व सृष्टीला जीवन दिलेलं आहे, मरण नाही. जिवंताच्या मरणात किंवा नाशात त्याला आनंद वाटत नाही.  म्हणूनच "अधोलोकाची सत्ता पृथ्वीवर नाही", असे आपण शल्मोनाच्या ज्ञानग्रंथातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात ऐकतो. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशूने आपल्या गुणकारी आणि पवित्र स्पर्शाने याईरच्या कन्येला बरे केल्याचा आणि त्याचप्रमाणे  बारा वर्ष रक्तस्रावाने पिडलेल्या महिलेला बरे केल्याबद्दलचा वृत्तांत संत मार्क आपल्याला सांगत आहे. रक्तस्रावाने पिडलेल्या महिलेने आणि याईर आणि त्याच्या कन्येने येशू-ख्रिस्ताप्रति जी श्रद्धा दाखवली तशाच श्रद्धेने आपण येशू आपला बंधू आणि प्रभू ह्याकडे वळूया. कारण त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या सर्व शारीरिक आणि मानसिक दुर्बलता आणि आजारांतून मुक्त करण्याचे सामर्थ्य आहे. तोच आपला खरा वैद्य आहे.

मनन-चिंतन

          मुखावाटे निघालेला चांगला शब्द एखाद्याच्या हृदयाला, आत्म्याला स्पर्श करून जातो, नैराश्याचे रूपांतर नव्या उमेदीत करून जातो. एक सौम्य हस्तांदोलन, एखादा कोमल स्पर्श शारीरिक आणि मानसिक व्यथा कमी करू शकतात. प्रभू येशूने आपल्या चांगल्या वक्तव्याद्वारे आणि शुभ-वृत्ताद्वारे लोकांना जगण्याची नवीन आशा आणि उमेद दिली. प्रभूचे शब्द हे जीवनाचे शब्द होते, चांगले, शुभ शब्द होते. या शुभ शब्दांच्या सामर्थ्यानेच प्रभूने लोकांना बरे केले, त्यांच्या व्याधींतून त्यांना मुक्त केले. "सर्व समुदायांची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालू होती, कारण त्याच्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांस निरोगी करीत होते" (लूक ६, १९).  "तेव्हा त्यांचे स्वागत करून तो त्यांच्याबरोबर देवाच्या राज्याविषयी बोलत होता, आणि ज्यांना बरे होण्याची जरुरी होती, त्यांना तो बरे करीत होता" (लूक ९, ११).

          परंतु प्रत्येक वेळेला येशूने लोकांना निरोगी केले नाही. त्याच्या प्रत्येक प्रबोधनानंतर त्याने आपल्या सामर्थ्याने लोकांना बरे केले नाही. किंबहुना तो बरे करू शकला नाही. का बरे? जेथे संशयवाद आणि अविश्वास असतो तेथे दैवी चमत्कार कसे होऊ शकतील? प्रभू येशूच्या काळातील अनेक लोकांचीसुद्धा तीच परिस्थिती होती. येशूचे चमत्कार आणि त्याचे सामर्थ्य पाहून, त्याचा बोध ऐकून सर्व लोकं थक्क आणि चकित होत होती. परंतु तरीसुद्धा त्यांतील अनेकांनी त्याच्यावर अविश्वास दाखवला, ज्या गोष्टीचं प्रभू येशूलासुद्धा आश्चर्य वाटलं. म्हणूनच थोड्याशाच रोग्यांवर हात ठेवून त्याने त्यांना बरे केले" (मार्क ६, ५). 

          जेथे जागतिक ऐश्वर्य, स्वार्थ आणि मोह ठाण मांडून बसलेलं असते, तेथे दैवी रोगनिवारक सामर्थ्य आपला प्रभाव दाखवू शकत नाही. परंतु परमेश्वराचं रोगनिवारक सामर्थ्य अशा ठिकाणी प्रभावशाली ठरते जेथे मानवी जीवन फक्त आणि फक्त आशेच्या जोरावर आणि बळावर अस्तित्वात असतं आणि जेथे जीवनाकडून इतर काहीच अपेक्षा नसतात. रक्तस्त्रावाने पिडलेल्या स्त्रीचीसुद्धा तशीच परिस्थिती होती. तिच्या व्याधीमुळे तिच्या शरीराची पार जणू चिंधी झालेली. तिने रोगमुक्त होण्यासाठी आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला गुण न येतां तिचा रोग बळावला होता. कदाचित ती स्त्री श्रीमंत होती. परंतु त्या श्रीमंतीने तिला काय दिलेतिची श्रीमंती, तिचा पैसा-अडका तिला तिच्या रोगातून आणि तिच्या पीडेतून  मुक्त करू शकला नाही. निस्तेज मृत्य हाच आता तिचा अखंड सांगाती बनला होता. ती स्त्री जणूकाही एक जिवंत प्रेत बनली होती.

          हताश हृदयाने, आणि त्याचबरोबर मिणमिणत्या परंतु जिवंत असलेल्या आशेच्या ज्योतीच्या बळावर, ती पीडित स्त्री येशूच्या लक्षातसुद्धा येणार नाही अशी हळूच आणि कोणत्याही मागणीशिवाय किंव्हा दाव्याशिवाय येशूकडे अली. तिला गाजावाजा करावयाचा नव्हता. दैवी सामर्थ्य जे गुप्तपणे आणि डोळ्यांना न दिसता आपले कार्य सिद्धीस नेते आणि जे सामर्थ्य देवपुरुष प्रभू येशू ख्रिस्तामध्ये दृश्यमान होते, त्या दैवी सामर्थ्यावर तिचा विश्वास होता. ते सामर्थ्य खुद्द प्रभू ख्रिस्ताच्यासुद्धा एकदा लक्षात येणार नव्हते.  ती स्त्री येशूच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली. आणि त्या क्षणाला त्या ठिकाणी दैवी सामर्थ्य त्या स्त्रीच्या मानवी अशक्तपणात पूर्णत्वास आले (२ करिंथ १२, ९).  तिच्या आजारपणामुळे त्या स्त्रीला वाळीत टाकण्यात आलेलं होतं आणि तिच्याकडे कोणी ढुंकूनसुद्धा पाहत नव्हतं. परंतु तिने येशूच्या कपड्यांना स्पर्श केल्यानंतर जेव्हा येशू तिच्याकडे वळला तेव्हा संपुर्ण जमावाच्या नजरा त्या स्त्रीकडे वळल्या आणि त्या स्त्रीच्या उपस्थितीला अचानक महत्व प्राप्त झाले.

          या घटनेवेळी दैवी कृपेच्या सामर्थ्याची आग नेहेमीप्रमाणे प्रभू येशूने स्पर्श केल्याने आरक्त झाली नाही. शुभवर्तमानांत आपण अनेक वेळा वाचतो किंव्हा ऐकतो कि, येशूने आपल्या हाताच्या स्पर्शाने लोकांना बरे केले, निरोगी केले. परंतुआज त्या ठिकाणी झालेल्या चमत्काराचं माध्यम प्रभू येशूने त्या स्त्रीला केलेला स्पर्श नव्हता तर परमेश्वरी कृपेस आणि दयेस आपण पात्र नाहीत, अशी भावना हृदयी ठेवून त्या पीडित स्त्रीने प्रभू येशूच्या वस्त्राच्या फक्त कडेला केलेला घुटमळणारा स्पर्श. तिच्या विश्वासाने तिला बरे केले.

        त्यानंतरच्या घटनेतसुद्धा दैवी सामर्थ्य मानवी अशक्तपणात पूर्णत्वास येण्याची प्रचिती आपल्याला होते. याईरची कन्या आजारी होती. परंतु येशू याईरच्या घरी जाईपर्यंत उशीर झाला आणि तिचा मृत्यू झाला. परंतु येशू तरीसुद्धा याईरच्या घरी गेला. त्याच्या घरी जमलेला आणि रडणारा आणि आकांत करणारा लोकांचा समुदाय आणि त्याचबरोबर येशूला हसणारे सर्वजण बाहेरच राहिले. येशू फक्त मुलीचे आई-बाप आणि आपल्या तीन शिष्यांना घेऊन त्या मृत मुलीकडे आतमध्ये गेला आणि दरवाजा बंद केला. परंतु रक्तस्रावाने पीडित असलेल्या महिलेप्रमाणे हि मृत मुलगी मात्र येशूला स्वतःहून स्पर्श करू शकत नव्हती. तिच्यामध्ये जीवनाचं कोणतच चिन्ह नव्हतं. अशा परिस्थितीत येशू त्या मृत मुलीचा हात धरून म्हणला: "तालिथा कूम", म्हणजेच, "मुली, मी तुला सांगतो, उठ"(मार्क ५, ४१).  आणि ती मुलगी जीवंत झाली, आणि उठून चालू लागली.

          आजची उपासना आपल्याला एक महत्वाचा संदेश देत आहे, कि, परमेश्वराची कृपा, जी मानवी अशक्तपणात, दुर्बलतेमध्ये पूर्णत्वास येते आणि कार्यसिद्ध होते, ती कृपा आपल्या चांगल्या शब्दांद्वारे आणि कृत्यांद्वारे कार्यान्वित करण्यासाठी आपल्याला या जगात पाठवण्यात आलेलं आहे. आपण हि जबाबदारी एकनिष्ठेने आणि सातत्याने पार पाडावी म्हणून त्याच परमेश्वराचा आशीर्वाद मागू या.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

हे रहस्यमय परमेश्वरा, आमच्या डोळ्यांनी आम्ही तुला पाहू शकत नाहीत. म्हणूनच तुझी या जगातील सक्रियता आमच्यापासून लपलेली राहते. परंतु श्रद्धेच्या डोळ्यांनी आम्ही सृष्टीच्या सुंदरतेमध्ये, माणसाच्या चांगुलपणामध्ये आणि खास करून दुःखी, कष्टी लोकांमध्ये तुझे रूप पाहू शकतो. तुजवरील विश्वासात आम्ही आमच्या विनंत्या आणि गरजा तुझ्या चरणी अर्पण करतो.

आपले उत्तर: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१) तुझ्या पवित्र आत्म्याला आमच्या पवित्र ख्रिस्तसभेचे नूतनीकरण करावयाचे आहे. परंतु अनेक वेळा  आम्हीच त्या नूतनीकरणाला विरोध करून त्याच्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. हे परमेश्वरा, बदलत्या वेळेची आणि काळाची चिन्हे आणि गरज ओळखून त्याप्रमाणे आमच्यातसुद्धा बदल घडवून आणण्यासाठी आम्हाला विश्वासू आणि धाडशी हृदय दे.

२) संपूर्ण मानवजातीला आजाराने पछाडलेले आहे. आज मानव स्वार्थी, मतलबी जीवन जगत आहे. त्यामुळे निसर्ग प्रतिकार करत आहे आणि वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींद्वारे मानवाशी संघर्ष करत आहे.  परमेश्वरा तू आमच्या जीवनावर आणि हृदयावर राज्य करतोस. आम्हाला निसर्गाचा मान आणि काळजी राखण्यास, निसर्गाचे संगोपन आणि संवर्धन करण्यास शिकव.

३) पर्यावरणाच्या होणाऱ्या नाशामुळे जागतिक शांतीसुद्धा ऱ्हास पावत आहे. तू या जगाच्या सुरुवातीला आम्हाला दिलेले शांतीचे दान आम्ही हरवून बसलेलो आहोत. हे परमेश्वरा तुझ्या ख्रिस्तसभेला तू शांतीचं वाहन बनाव आणि तुझी शांती आमच्या हृदयात आणि आमच्या जीवनात वाढीस लागू दे.

४) आमच्या सर्व आजारी बंधू-भगिनींवर दया कर आणि त्यांना तुझ्या कृपेच्या स्पर्शाने बरं कर.

५) या कोरोना महामारीच्या काळात मृत्युरूपी राक्षस जगामध्ये आणि खास करून आमच्या देशात भयंकर आणि भयावह असे मनुष्यरूपी पीक घेत आहे. परंतु आमच्या मृत्युद्वारे आम्ही तुझ्याबरोबर अनंतकाळच्या जीवनात असू असा आमचा विश्वास आहे. या महामारीच्या काळात हे जग सोडून गेलेल्या आमच्या सर्व बंधू-भगिनींवर दया कर आणि त्यांना तुझ्या स्वर्गराज्यात चिरंतन शांती दे.


No comments:

Post a Comment