Friday 4 June 2021

      Reflection for the SOLEMNITY OF THE MOST HOLY BODY AND BLOOD OF THE LORD (06/06/2021) By Br. Gilbert Fernandes



येशूच्या अतिपवित्र शरीर व रक्ताचा सोहळा


दिनांक: ०६/०६/२०२१

पहिले वाचन: निर्गम २४:३-८

दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र ९:११-१५

शुभवर्तमान: मार्क १४:१२-१६, २२-२६


प्रस्तावना:

ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आज आपण प्रभू येशूच्या अतिपवित्र शरीराचा आणि रक्ताचा सण साजरा करीत आहोत. परमेश्वराने आपल्याला पापातून मुक्त करण्यासाठी आपला एकलुता एक पुत्र ह्या धरतीवर पाठविला आणि येशू ख्रिस्ताने वधस्तभावर आपला बळी देऊन आम्हाला आमच्या पापातून मुक्त केले. प्रभू येशूने आपले रक्त पुष्कळांकरिता वाहिले आहे.

आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, इस्त्रायल लोकांनी देवाचे वचन ऐकावे व त्याच्या आज्ञा पाळाव्यात म्हणून मोशे रक्त शिंपडून करार करतो. दुस-या वाचनात आपण एकतो कि,ख्रिस्ताने स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परम पवित्र स्थानांत गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळविली. तर शुभवर्तमानात ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना भाकर व द्राक्षारस देऊन स्वतःला प्रकट केले, असा बोध करण्यात येतो.

प्रभू येशूच्या शरीर व रक्ताचा सण साजरा करत असताना आपणा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचा आणि रक्ताचा एक घटक होता यावे म्हणून ह्या पवित्र मिस्साबलीदानामध्ये भक्तिपूर्वक मनाने सहभागी होऊया.

मनन-चिंतन:

          ख्रिस्ती धर्मात मिस्साबलीदानाला अतिशय महत्व आहे. ख्रिस्ती लोकांसाठी मिस्साबलीदानातून जीवनासाठी आवश्यक असलेले दान मिळते व श्रद्धा बळकट होऊन आध्यात्मिक जीवनात वाढ होते आणि त्यामुळेच ख्रिस्तसभेत ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीराचा व रक्ताचा सण आपण साजरा करतो. ह्या सणाची सुरुवात सर्वप्रथम बेल्जियम ह्या देशात झाली. पोप उर्बन चौथे ह्यांनी संपूर्ण कॅथलिक देऊळमातेत हा सण साजरा करण्यास सातशे वर्षापूर्वी सुरुवात केली.

          येशूच्या अतिपवित्र रक्ताचा व शरीराचा सण हा ख्रिस्तसभेला मिळालेले खूप अप्रतिम असे वरदान आहे. भाकररूप ख्रिस्त शरीर हे ख्रिस्त धर्मातील एक महान रहस्य आहे. ख्रिस्ताचे आम्हाला दिव्य दर्शन घडावे, आमचे आत्मिक पोषण व्हावे, त्याच्या मायेचा ओलावा आम्हांला सदैव मिळावा त्याची सोबत आम्हांला नित्य लाभावी म्हणून ख्रिस्त भाकररूप बनला.

प्रभू येशु ख्रिस्ताने क्रूसावरील समर्पणाद्वारे स्वत:चे रक्त सांडून मानव आणि परमेश्वर पिता ह्यामध्ये नवीन कराराची स्थापना केली. आपण पवित्र मिस्साबलिदानात भाकरीचे म्हणजेच प्रभू येशूच्या शरीराचे सेवन करतो व त्याद्वारे आपण प्रभूमध्ये सामील होतो. आपण प्रभूबरोबर एकजीव बनतो. जेव्हा आपण ख्रिस्तशरीर स्विकारतो तेव्हा आपला विश्वास न डळमळता आपण त्या भाकररुपी ख्रिस्ताला आपल्या हृदयात स्विकारले पाहिजे. व ह्या सेवनानंतर आपल्या जीवनात परिवर्तन घडून आले पाहिजे.

ह्या जगात असे पुष्कळ लोक आहेत ज्यांना ख्रिस्तशरीर स्वीकारण्याची जरी त्यांची इच्छा असली तरी त्यांना मिळत नाही. आज ह्या कोरोना महामारीच्या काळात आपण ख्रिस्तशरीर स्वीकारू शकत नाही. पुष्कळ लोक प्रभूचा स्विकार करण्यासाठी तळमळत आहेत. कारण अशा सर्व लोकांना प्रभूच्या शरीरातून मिळणाऱ्या आनंदाची, कृपेची व मायेची जाणीव झाली आहे.

आजपर्यंत आपण खूप वेळा पवित्र ख्रिस्तशरीराचे सेवन केले असेल. जेव्हा आपण सर्वप्रथम ख्रिस्तशरीराचे सेवेन केले तोच भक्तीभाव आजपर्यंत आहे का ? आपल्याला ख्रिस्तशरीराबद्दल योग्य असा आदर वाटतो का ? व आपण त्यामध्ये येशू स्वत: हजर आहे हे जाणून घेतो का ?

जर ह्या प्रश्नांचे उत्तर नाही असेल तर आपले काहीतरी चुकत आहे. आपण योग्य मार्गावर नाहीत व देवापासून दूर जात आहोत. जेव्हा आपण चर्चमध्ये रांगेत ख्रिस्तशरीर स्विकारण्यास जातो तेव्हा आपण मनात निर्धार केला पाहिजे की मी एखादी भाकर नाही तर ख्रिस्तशरीर स्विकारणार आहे. आपण स्विकारतो तो, त्याच येशूला जो बेथलेहेममध्ये जन्माला आला होता. तसेच आपण त्याच ख्रिस्ताला स्विकारतो जो क्रुसावर आपल्यासाठी मरण पावला आणि आपण त्याच प्रभूला स्विकारतो जो मरणातून उठला.

आज ख्रिस्तशरीर ह्या सांक्रामेतामुळे अनेक लोक ख्रिस्तसभेच्या जवळ येत आहेत. जर आपण तर्कशक्तीच्या बळावर ख्रिस्तशरीरातील येशूच्या अस्तित्वाचे सत्य पाहण्यास गेलो तर आपल्याला उत्तर मिळणार नाही परंतु विश्वासानेच ह्या सर्व गोष्टी साध्य होतात. व ह्याच विश्वासाने आपण प्रभुचे सेवन करू शकतो.

आज आपण ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीराचा व रक्ताचा सण साजरा करत असताना आपण त्याचा स्वीकार करण्यास आणि त्याच्याशी एकजीव होण्यास पात्र ठरावे म्हणून प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो, तुझ्या शरीर व रक्ताद्वारे आमचे रक्षण कर.

१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे परमगुरुस्वामी फ्रान्सीस, सर्व महागुरू, धर्मगुरू, व्रतस्त व प्रापंचिक या सर्वांवर देवाचा विशेष आशिर्वाद यावा व त्यांना त्यांच्या पवित्र कार्यात प्रभूचे मार्गदर्शन व कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

२. ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करण्यासाठी आपल्या परिसरातील अनेक तरुण-तरुणींना पुढे येण्यास पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

३. आज आपण प्रभू येशु ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीर व रक्ताचा सण साजरा करीत असताना आपण आपल्या शरीररूपी मंदिरात देवाला प्रथम स्थान द्यावे व आपले जीवन त्याच्याठायी समर्पित करावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

४. आपल्या धर्मग्रामात जे दु:खीत, पिडीत आहेत, तसेच जे असाध्य आजाराने पछाडलेले आहेत, विशेषकरून जे कोरोनाच्या महामारीने ग्रासलेले आहेत त्यांना परमेश्वरी कृपेचा अनुभव यावा व नवजीवनाची वाट त्यांना दिसावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

५. यंदाच्या वर्षात भरपूर पर्जन्यवृष्टी व्हावी, शेतक-यांच्या सर्व गरजा पूर्ण व्हाव्यात व सर्वांनी शांतीने, प्रेमाने रहावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

६. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.

1 comment:

  1. ह्या महामारी च्या काळामध्ये पोप महाशयांनी श्रद्धावंत यांना सर्वच संस्कारांपासून मुक्तता (General Ab solution)दिलेली आहे तर वास्तविक ख्रिस्त शरीर संस्कार प्रत्यक्षात न घेता आले तरी ते मनोमन (Spiritual Communion)कसे स्वीकारावे ह्या बाबतीत काही सूचना हव्या होत्या.

    ReplyDelete