Friday 18 June 2021

   Reflection for the 12th Sunday in Ordinary Time (20/06/2021) By Fr. Benher Patil 



सामान्यकाळातील बारावा रविवार
दिनांक: १३/०६/२०२१
पहिले वाचन: - ईयोब ३८: १, ८-११
दुसरे वाचन: - २ करिंथ ५: १४-१७
       शुभवर्तमान: - मार्क ४: ३५-४१ 

“उगा राहा, शांत हो.”

प्रस्तावना:

          सामान्यकाळातील बाराव्या रविवारची उपासना आज आपणास स्पष्टपणे सांगते की अखिल नभोमंडळ आणि आपण राहत असलेल हे अफाट जग परमेश्वराने निर्माण केले आहे. ह्या विश्वात असलेले सर्वकाही: अगणित तारे, उंच पर्वत, अफाट समुद्र, त्याचप्रमाणे सुंदर आणि निरनिराळे पशु, पक्षी आणि मानवप्राणी हि देवाची अदभूत अशी किमया आहे. ह्या सृष्ठीतील प्रत्येक सजीव आणि निर्जीव चराचरावर फक्त देवाचीच सत्ता असून सर्वकाही त्याने आखलेल्या योजनेप्रमाणे नियमितपणे तो चालवतो. तर आजच्या शुभवर्तमानात आपल्याला असं कळून येत कि, देव सर्वशक्तिशाली असून, ह्या जगातल्या सर्व शक्तीवर आणि नैसर्गिक आपत्तीवर त्याच साम्राज्य आहे आणि सर्व त्याच्या नियंत्रणात आहे. म्हणूनच आपल्या आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या ईश्वरावर आपण नितांत श्रद्धा ठेवावी आणि हर एक आपत्तीत सर्वशक्तीशाली परमेश्वराचा धावा करण्याची सुबुद्धी आपणास मिळावी म्हणून ह्या मिस्साबलीत विशेष प्रार्थना करूया.

मनन-चिंतन:

          एकदा एक प्रवाशी बोट सागरातून मार्गक्रमण करत असताना वादळात सापडते. तुफानी वारा आणि खवळलेला समुद्र पाहून सर्व प्रवाशी घाबरून गेले होते. मात्र एक चिमुकला मुलगा बिनधास्तपणे बोटीत खेळत होता. जेव्हा त्याला  विचारण्यात आल: “बाळा तुला भिती वाटत नाही का?” तेव्हा तो उत्तरतो: “नाही, कारण माझे वडील ह्या बोटीचे कॅप्टन आहेत आणि ते हि नौका कधीही बुडू देणार नाहीत.”

          प्रिय बंधू-भगिनींनो, आपण सर्व परमेश्वराची प्रिय लेकरे आहोत. तो आपली निगा राखतो, काळजी घेतो आणि आपल्या संकटसमयी तो आपलं रक्षण करण्यास धावून येतो. आजच्या उपासनेत देवाच्या आपल्यावरील महान प्रेमाची आणि सामर्थ्याची प्रचीती होते. आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो कि देवाचा खरा भक्त, ईयोबच्या जीवनात एकामागून एक अशी असंख्य संकटे आणि आपत्ती आल्या: त्याचं संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालं, सर्व संपती हरवली, आणि त्याला आजाराने ग्रासलं. अश्या केविलवाण्या परिस्थितीत सुद्धा  त्याने देवावर विश्वास ठेवला. म्हणूनच देवाने त्याला वाऱ्यावर सोडलं नाही. त्याच्या दृढ विश्वासामुळे त्याला आजारातून बरं केलं आणि त्याची समृद्धी त्याला पुन्हा प्राप्त करून दिली आणि ती ही दोन पटीने.

          संत मार्क, आजच्या शुभवर्तमानात आपल्याला देवाच्या सामर्थ्याची आणि नैसर्गिक शक्तीवर असलेल्या त्याच्या अधिकाराची जाणीव करून देतो. येशू आणि त्याचे शिष्य बोटीतून गालील समुद्र पार करत असता अचानक त्यांची बोट वादळाच्या तडाख्यात सापडली. मोठ मोठ्या लाटांनी बोट बुडू लागल्याची जाणीव होताच घाबरलेले शिष्य येशूला हाका मारतात, त्याला झोपेतून उठवतात, आणि त्याच्याकडे विनवणी करतात. तेव्हा येशू वादळाला धमकावतो: “उगा राहा, शांत हो”, आणि ताबडतोब वादळ निवांत झाले. आणि ह्या चमत्काराने अचंबित झालेले शिष्य उद्गारतात: “हा आहे तरी कोण? वारा व समुद्र देखील ह्याचे ऐकतात.” ह्या चमत्कारातून संत मार्क आपणास येशूची खरी ओळख करून देतो. येशुमध्ये देव मानवीरूप घेऊन आपल्यात आणि ह्या जगात वास करतो. त्याद्वारे येशू हा देवाचा पुत्र असून, त्याच देवत्व / दैविपणा आणि दैवी सामर्थ्य सिद्ध होते.

          संत पौल, येशूचा विश्वासू सेवक, ह्याला यहुदी लोकांकडून येशुमुळे आणि त्याच्या सुवार्तेमुळे अनेक छळ, दुःख, नकाररुपी वादळांचा सामना करावा लागला. त्याला कितीतरी संकटांना सामोर जावं लागलं, तरी येशू हाच जगाचा खरा आणि एकमेव तारणारा आहे आणि त्याच्याच ठायी राहिल्याने आपणास नवजीवनाचा लाभ होतो, असं ठामपणे संत पौल आजच्या दुसऱ्या वाचनात सांगतो.          

          माझ्या प्रिय बंधू-भगिनीनो, आपलं जीवन हि एक नौका आहे. ह्या जगाच्या भवसागरातून दैनंदिन प्रवास करत असताना, आपल्यावर सुद्धा ईयोब आणि संत पौल प्रमाणे पुष्कळ संकटे येतात, वैयक्तित आणि कौटुंबिक समस्या उदभवतात. आपली जीवनरूपी बोट मोह, नैराश्य, परीक्षा, आर्थिक अडचणी, मानसिक आणि शारीरिक आजार अशा नानारूपी वादळांशी झुंजत असताना आपण कोणावर विसंबून राहतो? अश्या कठीण आणि बिकट प्रसंगी आपण निराश न होता किंवा घाबरून न जाता येशू हाच आमचा खरा तारणारा आणि सर्व संकटातून निवारण करणारा एकमेव स्वामी म्हणून त्याचा स्वीकार केला पाहिजे. कसोटीच्या समयी डगमगून न जाता आपल्या जीवनाची सूत्र येशूच्या हाती सुपूर्द करायला शिकलं पाहिजे. त्याने सर्व ऐहिक शक्तीवर विजय मिळविला आहे, नैसर्गिक आपत्तीवर तो सत्ता चालवतो, भयंकर जीवघेण्या आजारातून तो आपणास बरे करण्यास सक्ष्यम आहे. आपल्या जीवनातील कोणतेही वादळ शमविण्यास तो समर्थ आहे, असा त्याच्या दैवी सामर्थ्यावर आपण ठाम विश्वास ठेवला पाहिजे. जेव्हा आपण विश्वासाने जीवनरूपी मचव्यात येशूला स्वीकारतो आणि आपल्या ह्या बोटीच सुकाणू त्याच्या हाती सोपवतो तेव्हा तो आपल्याला सुखरूप पैलतीरी जाण्यास मदत करतो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद : हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक.

1. हे परमेश्वरा तुझ्या सेवेत बोलाविलेले आमचे पोप फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप, फादर्स व सर्व व्रतस्त बंधूभगिनी, ह्यांना तुझे कार्य करण्यास शारीरिक व मानसिक आरोग्य मिळावे. तुझ्याशी एकनिष्ठ राहून जगाला तुझी ओळख द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

2. जे लोक देवापासून दूर गेले आहेत. त्या सर्वाना दैवी दयेचा स्पर्श व्हावा व त्यांनी देवाकडे वळून एक नवीन, विश्वासू जीवन जगावे म्हणून प्रार्थना करूया.

3. जी कुटुंबे दैनिक वाद-विवादाला बळी पडून मोडकळीस आली आहेत, त्या कुटुंबात शांती नांदावी व प्रेमाला भर यावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.

4.  जी दांपत्ये, असून बाळाच्या देणगीसाठी वाट पाहत आहेत, त्याची प्रार्थना परमेश्वराने ऐकावी व बाळाच्या देणगीने त्याचे जीवन आनंदमय व्हावे म्हणून प्रार्थाना करूया.

5. ह्या पावसाळी हंगामात चांगला पाऊस पडावा व सर्व प्राणी, पक्षी व शेतीची वाढ चांगल्या प्रकारे व्हावी म्हणून प्रार्थना करूया. 

6. थोड्या वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment