Friday 2 June 2023

 



Reflections for the Homily of Most Holy Trinity Sunday (04-06-2023) By Br. Rockson Dinis.



पवित्र त्रैक्याचा सण

दिनांक: ०४/०६/२०२३

पहिले वाचन: निर्गम ३४:४-६८-९

दुसरे वाचन: २ करिंथकरांस पत्र १३:११-१३

शुभवर्तमान: योहान ३:१६-१८



प्रस्तावना:

आज ख्रिस्तसभा पवित्र त्रैक्याचा सण साजरा करीत आहे. पवित्र त्रैक्याचे रहस्य हे ख्रिस्ती श्रद्धेचे आणि जीवनाचे केंद्रीय रहस्य अथवा मूलभूत रहस्य असे समजले जाते. आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, इजरायली  लोकांना दहा आज्ञा देऊन त्यांनी देवा बरोबर व शेजाऱ्यांशी कसे वागावे हे देवाने स्पष्ट केले. ह्या दहा आज्ञेत देव स्वतःच्या गुणांचे वर्णन करतो. तो कधी न बदलणारा, निरंतर, तसाच असणारा, विश्वसनीय देव आहे. देव हा फारच दयाळू आहे. आणि मंदक्रोध आहे म्हणजे तो  पश्चाताप करण्यास  प्रत्येक व्यक्तीला वेळ देतो. तो फारच सहनशील आहे. दयेचा व सत्याचा सागर आहे.

संत पौल करंथीकरास लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात म्हणतो की "प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हासह राहील" म्हणून देवपित्याच्या आश्रयाखाली समाधानात राहू या. व प्रभूच्या वचनाप्रमाणे वागत राहून एकमेकांशी चांगले संबंध ठेवूया.

तसेच आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो की, "देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे".

आजच्या ह्या पवित्र मिस्साबलिदानात सहभागी होत असताना, पवित्र त्रैक्याने आपली श्रद्धा बळकट करावी व त्याच श्रद्धेद्वारे आपल्या ख्रिस्ती जीवनात एकता, शांती, प्रेम प्रस्थापित व्हावी म्हणून आपण पवित्र त्रैक्याकडे विशेष प्रार्थना करूया.


मनन चिंतन:

आज आपण पवित्र त्रैक्याचा सण साजरा करीत आहोत. पवित्र त्रैक्य हे खऱ्या अर्थाने श्रद्धेचे रहस्य आहे. हे असे रहस्य आहे, की ते देवाने प्रकट केल्याशिवाय आपणास उलगडणार नाही. त्रैक्य एक आहे. आपण तीन देव म्हणत नाही, तर तीन व्यक्ती मिळून एकच देव आहे असे म्हणतो. हे त्रैक्य म्हणजे एकच स्वभाव असलेला देव! ह्या दैवी व्यक्तीत देव विभागलेला नाही तर प्रत्येक व्यक्ती पूर्ण देव आहे. पिता जसा आहे तसा पुत्र आहे आणि पुत्र जसा आहे तसा पिता आहे आणि पिता पुत्र जसा आहे तसा पवित्र आत्मा आहे. तिघे मिळून एकच देव आहे. त्रैक्यातील तिन्ही व्यक्ती एकमेकांपासून वेगळ्या आहेत. परमेश्वर एक आहे परंतु एकटा नाही.

 आपण पाहतो इस्रायल लोक परमेश्वराची आराधना करण्या ऐवजी त्यांनी सोन्याच्या वासराची मूर्ती पूजा केली; तेव्हा परमेश्वर क्रोधाने न भडकता त्यांनी इस्रायल लोकाची मन:स्थिती समजावून घेतली आणि त्या अविश्वासू प्रजेमध्ये परमेश्वराने  वास्तव्य करण्याचे मान्य केले. अशाप्रकारे त्यांनी त्याच्या प्रेमाचे दर्शन घडविले. म्हणूनच प्रभू म्हणाला मी दयाधन व कृपा निधी परमेश्वर, मंदक्रोध सत्वशील, सत्यशील असा आहे. परमेश्वराने इजरायल लोकाची,  प्रेमाची तुलना पित्याच्या पुत्रावरील प्रेमाशी केली आहे. परमेश्वराने त्याच्या लाडक्या प्रजेवरील प्रेम हे एखाद्या आईचे आपल्या मुलावरील असलेल्या प्रेमापेक्षा महान आहे असे दर्शविते तसेच  प्रियकराचे प्रेयसीवर असलेल्या प्रेमापेक्षा परमेश्वराचे त्याच्या प्रजेवर अधिक प्रेम आहे असे आपल्याला दाखवून देते. म्हणूनच पित्याने आपला एकुलता एक पुत्र जगास देणगीदाखल अर्पण केला कारण तो दयासागर परमेश्वर आहे. आपणास पापांपासून मुक्त करण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणारा येशू, हा खरोखर दैवी नावाला पात्र ठरला आहे.

देवाचे प्रेम "चीरस्थायी" आहे. पर्वत कुठल्या कुठे नाहीसे होतील आणि टेकड्या हादरून जातील असेही कदाचित घडेल, परंतु परमेश्वराचे आपल्यावरील  प्रेम कधीच कमी होणार नाही. यिर्मया संदेश्ट्याद्वारे  जाहीर केले आहे. मी तुमच्यावर चिरकाल  टिकणारे प्रेम केले आहे. म्हणूनच  मी तुम्हाला जवळ केले आहे.

परंतु संत योहान मात्र आणखीन पुढे जाऊन म्हणतो, " परमेश्वर प्रेम आहे". प्रेम हा त्याचा गुणधर्म आहे. कालाची पूर्णता होताच त्यांनी त्याचा एकुलता एक पुत्र आणि प्रेमाचा आत्मा पाठवून त्याचे निकटचे सत्य प्रकट केले. परमेश्वर हा पिता पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यातील  परस्पर प्रेम आहे. त्या प्रेमात त्यांनी आपणास सहभागी करून घेतले आहे.

आपल्या ख्रिस्ती जीवनात आपण कुठलीही प्रार्थना कुठलीही उपासना ही पवित्र त्रैक्याच्या नावाने सुरू करतो. हे पवित्र त्रैक्य आपल्या जीवनाचा गाभा आहे. कारण ख्रिस्तीसभेत प्रवेश हा  मात्र पिता पुत्र व पवित्र आत्म्याच्या नावाने दिला जातो. तो म्हणजेच स्नानसंस्कार. पवित्र त्रैक्याचे रहस्य हे ख्रिस्ती श्रद्धेचे आणि जीवनाचे मूलभूत रहस्य आहे. ते देवाचे स्वतःमधील रहस्य आहे. हे श्रद्धेच्या इतर सर्व रहस्याचे उगमस्थान आहे. इतरांना प्रकाश देणारा हा प्रकाश आहे. ख्रिस्त सभेची ही सर्वात मुलभूत अशी शिकवण आहे. श्रद्धेच्या सर्व सत्याचा हा केंद्रबिंदू आहे


विश्वासू लोकांच्या प्रार्थंना:

प्रतिसाद: “हे पवित्र त्रैक्या आम्हांला आमच्या कुटुंबातील व समाजातील एकरूपता वाढविण्यास मदत कर.”

१. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशयसर्व बिशपधर्मगुरू व व्रतस्त बंधू भगिनी जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्यरत आहेतत्यांची त्रैक्यावरील श्रद्धा बळकट असावी व इतरांनाही त्याच श्रद्धेत दृढ असण्यास त्यांनी योग्य ते मार्गदर्शन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आज पवित्र त्रैक्याचा सण साजरा करत असताना त्यांच्यातील समन्वयातून आपण प्रेरणा घेऊन आपल्या कुटुंबातधर्मग्रामात व समाजात समन्वय राखून सुखा-समाधानाने आपल्याला जगता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

ख्रिस्ती ह्या नात्याने जी श्रद्धा आम्हाला मिळाली आहे ती श्रद्धा अधिक दृढ करण्यास आम्हाला कृपा मिळावी व हीच श्रद्धा आम्हाला दुसऱ्यांना देता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

लवकरच मुले नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात करणार आहेत. ह्या नवीन वर्षात अधिक जोमाने अभ्यास करून त्यांना त्यांचा सर्वांगीन विकास करता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक कौटुंबिक व सामाजिक गरजा प्रभूचरणी मांडूया.


No comments:

Post a Comment