Friday 16 June 2023

Reflection for the 11th Sunday in Ordinary Time (18-06-2023) By Br. Gilbert Fernandes



  सामान्य काळातील अकरावा रविवार



दिनांक: १८/०६/२०२३

पहिले वाचन: निर्गम १९:२-६

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ५:६-११

शुभवर्तमान: मत्तय ९:३६-१०:८

 

प्रस्तावना:

      आज आपण सामान्य काळातील अकरावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला परमेश्वर आपल्या जीवनात कशाप्रकारे कार्य करतो हे अनुभवण्यासाठी पाचारण करीत आहे. निर्गम पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात, परमेश्वर आपल्याला त्याच्या आज्ञांचे आणि कराराचे पालन करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. जर आपण त्याच्या आज्ञांचे आणि कराराचे पालन केले तर आपल्याला परमेश्वराचा भरघोस असा आशीर्वाद प्राप्त होईल, याविषयी परमेश्वर आपल्याला वचन देतो. आजच्या दुसऱ्या वाचनात आपण ऐकतो कि, येशू ख्रिस्ताने त्याच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे मानवतेचा परमेश्वराशी समेट केला आणि आणि आपल्याला अनंतकाळाचे जीवन प्राप्त करून दिले. तसेच येशू ख्रिस्तावरील विश्वासाने आपण पाप आणि मृत्युच्या छायेपासून वाचू शकतो. तर आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना इतरांची सेवा करण्यासाठी आणि स्वर्गीय राज्याची सुवार्ता घोषविण्यासाठी पाठवतो. येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना सांगतो कि तुम्हाला फुकट मिळाले आहे ते तुम्ही फुकट द्या आणि प्रेम व उदारतेने इतरांची सेवा करण्यास त्यांना प्रोत्साहित करतो. आज येशू ख्रिस्त आपल्यालासुद्धा प्रेमाने आणि उदारतेने इतरांची सेवा करण्यास आमंत्रित करीत आहे तर त्यासाठी लागणारी कृपा आपल्याला मिळावी म्हणून या मिस्साबलीदानात प्रार्थना करू या.

मनन-चिंतन:

     ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधुंनो आणि भगिनींनो, आज आपण सामान्य काळातील अकरावा रविवार साजरा करीत असताना, ख्रिस्तसभा आपल्याला परमेश्वराच्या हाकेची किंवा पाचारणाची आठवण करून देते. हे पाचारण आपण दोन प्रकारे समजू शकतो. सर्वप्रथम, परमेश्वराने इस्त्रायल लोकांशी केलेल्या कराराद्वारे. परमेश्वराने आपल्याला त्याचे पवित्र असे राष्ट्र व त्याची मुले होण्यासाठी निवडले आणि बोलावले आहे. दुसरं म्हणजे येशू ख्रिस्ताद्वारे केलेला नवीन करार. परमेश्वराने आपल्याला त्याचे शिष्य होण्यासाठी बोलाविले आहे. परमेश्वराने आपल्याला त्याची प्रजा बनविली आहे. परमेश्वराने आम्हा प्रत्येकाला, त्याच्यासाठी पवित्र केलेले लोकं होण्यासाठी नावाने बोलाविले आहे.

     आजच्या पहिल्या वाचनात, आपण आपल्या पहिल्या पाचारणाविषयी ऐकतो. हे वाचन आपल्याला जुन्या करारातील परमेश्वराने त्याच्या लोकांसोबत केलेल्या सर्वात प्रसिध्द सिनाई कराराबद्दल सांगते. ह्या कराराद्वारे परमेश्वराने इस्त्रायलला आपली प्रजा बनविली व सदैव त्यांच्याबरोबर राहिला.

     जर लोकं परमेश्वराच्या वचनाप्रमाणे वागतील तर ते कायमचे पवित्र व परमेश्वराच्या मालकीचे लोकं होतील. जर ते त्यांच्या मानवी स्वार्थामुळे परमेश्वरापासून दूर जातील तरीही परमेश्वर त्यांना सोडणार नाही तर त्यांचा शोध घेत राहील. हि परमेश्वराची वागण्याची पद्धत आहे. आपण परमेश्वरापासून कितीही दूर गेलो तरीही परमेश्वर आपल्याला सोडत नाही. म्हणून असं म्हणतात, चूक करणे हे मानवी आहे आणि क्षमा करणे हे दैवी आहे.

     मानव या नात्याने, आपण परमेश्वरासोबत केलेल्या आपल्या करारात नेहमी अपयशी ठरतो. आपणही त्या जुन्या करारातील इस्त्रायली लोकांप्रमाणे ‘परमेश्वराने सांगितलेले सर्व आम्ही करू.’ म्हणायला घाई करतो. आपण आपल्या करारावर विश्वासू राहू असे म्हणतो परंतु बहुतेक वेळा आपण अविश्वासू होतो किंवा परमेश्वरापासून दूर जातो. असे असूनही परमेश्वर आपल्याला कधीही सोडत नाही. तो त्याच्या कराराशी सतत विश्वासू राहतो.

     आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल, आपल्याला आपल्या तारणासाठी आपला एकलुता एक पुत्र, प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे परमेश्वर आपल्याशी कसा विश्वासू राहिला याची आठवण करून देतो. आपण पापी असूनही येशू ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. याद्वारे परमेश्वराने आपल्यावर केलेले प्रेम सिद्ध होते. ख्रिस्ताच्या बलीदानाद्वारे आपण सतत परमेश्वराशी समेट करतो. म्हणून, परमेश्वर आपल्याला कधीही सोडत नाही कारण त्याने आपल्याला त्याची मुले होण्यासाठी निवडिले आणि बोलाविले आहे.

     आपल्या पाचारणाचा दुसरा पैलू म्हणजे जीवनाचा अर्थ त्वरित गमावून बसलेल्या जगात येशू ख्रिस्ताचे शिष्य बनणे. ज्या ठिकाणी अनेकांना बेबंद, असहाय्य आणि निराश वाटते त्या ठिकाणी येशूचे शिष्य बनणे. हे पाचारण व मिशनकार्य, निराश आणि बेबंद जगासाठी दया आणि करुणेतून जन्माला आले आहे. म्हणून, आजचे शुभवर्तमान आपल्याला सांगते कि “लोकसमुदायांना पाहून येशूला त्यांचा कळवळा आला; कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे, कष्टी आणि पांगलेले होते.” ज्याप्रमाणे येशूने आपल्या बारा प्रेषितांना बोलाविले त्याप्रमाणे परमेश्वराने आम्हा प्रत्येकाला आपल्या बाप्तीस्म्याद्वारे, आपल्या नवीन नावाने निवडिले आणि बोलाविले आहे. आपल्या उदासीन जगाला उध्वस्त होण्यापासून वाचविण्यासाठी तो आपल्याला विशेष आवाहन आणि आमंत्रण देत आहे. आपल्याला एकमेकांचे विश्वासू मेंढपाळ होण्याचे आवाहन करीत आहे. जसा परमेश्वर आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपल्यावर दया व करुणा दाखवत आहे तसेच आपणही एकमेकांना दया व क्षमा दाखविली पाहिजे.

     आपल्या पाचारणाला अजून एक अनोखा उद्देश आणि संदेश आहे. आज येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना विशिष्ट सूचना देऊन पाठविले, “यहूदीतर लोकांमध्ये जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका. तर त्याऐवजी इस्राएलच्या हरवलेल्या मेंढरांकडे जा. तुम्ही जाल तेव्हा हा संदेश जाहीर करा. स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. रोग्यांना बरे करा, मृतांना उठवा. कुष्ठरोग्यांना शुद्ध करा. भुते काढा, तुम्हांला फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या.” याद्वारे ख्रिस्त भेदभाव करत आहे का? नाही. येशू ख्रिस्त जगाला वाचविण्यासाठी व त्यावर प्रेम करण्यासाठी आला होता. आपले पाचारण आणि मिशनकार्य कुठूनतरी सुरु झाले पाहिजे. या मिशनकार्याची सुरुवात आपण स्वतःपासून सुरु केली पाहिजे. त्याची सुरुवात आपण आपल्या घरांमध्ये, कुटुंबांमध्ये आणि समुदायांमध्ये झाली पाहिजे. आणि त्यानंतर ते इतरांपर्यंत पाहोचविले पाहिजे. परमेश्वराचे शिष्य बनण्यापूर्वी आपण प्रथम परमेश्वराची लेकरे बनणे खूप महत्वाचे आहे. अविलाच्या संत तेरेसा म्हणतात, “येशू ख्रिस्ताला शरीर नाही, तुम्ही त्याचे शरीर व्हा; येशू ख्रिस्ताला हात नाहीत, तुम्ही त्याचे हात व्हा; येशू ख्रिस्ताला पाय नाहीत, तुम्ही त्याचे पाय व्हा; येशू ख्रिस्ताला मस्तक नाही, तुम्ही त्याचे मस्तक व्हा.” येशू ख्रिस्ताचे कार्य पुढे नेण्यासाठी परमेश्वराने आपल्या प्रत्येकाची निर्मिती केली आहे.    

प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐकून घे.

१) हे प्रभो, देऊळमातेच्या सर्व सेवकांनी नम्र बनून प्रभूची सुवार्ता पुढे ठेवत असलेल्या आव्हानांचा स्वीकार करावा आणि प्रभूच्या सुवार्तेचे निष्ठावंत सेवक बनावे, म्हणून आम्ही आज प्रार्थना करतो.

२) हे प्रभो, दुःख, अन्याय, हिंसा आणि भ्रष्टाचाराने भरलेलं आमचं जग, या सर्व गुलामगिरीतून मुक्त व्हावं आणि आमच्या जगात तुझ्याकडून येणारी शांती प्रस्थापित व्हावी म्हणून आम्ही आज प्रार्थना करतो.

३) हे प्रभो, शारीरिक आणि मानसिक आजाराने ग्रासलेल्या आमच्या सर्व बंधू-भगिनींना तुझ्या कृपेचा गुणकारी स्पर्श व्हावा आणि त्यांना नवीन आरोग्य आणि जीवन लाभावे, म्हणून आम्ही प्रार्थना करतो.

४) हे प्रभो तुझ्यावरील विश्वासात जीवन जगून, हे जग सोडून गेलेल्या आमच्या बंधू-भगिनींना स्वर्गाचे सुख लाभावे म्हणून आम्ही आज प्रार्थना करतो.

) थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक गरजा प्रभूचरणी मांडूया.

No comments:

Post a Comment