Tuesday 14 May 2024

 Reflection for the PENTECOST SUNDAY (19/05/2024) Fr. Suhas Pereira

पेंटेकॉस्ट रविवार: पवित्र आत्म्याच्या येण्याचा सण



दिनांक: १९/०५/२०२४

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:१-११

दुसरे वाचन: १ करिंथकरास पत्र १२:३ब-७१२-१३

शुभवर्तमान: योहान २०:१९-२३

 

प्रस्तावना:

आज आपण पवित्र देऊळमातेचा जन्मदिन साजरा करत आहोत. पुनरुत्थित ख्रिस्ताने आपल्या शिष्यांवर पवित्र आत्मा पाठवला आणि त्या पवित्र आत्म्याद्वारेच ख्रिस्तसभेला जीवनाचे दान लाभले. क्रुसावर खिळलेला आणि मरणावर विजय मिळवून पुनरुत्थित झालेला ख्रिस्त हा देवाने पाठवलेला मसीहा आहे अशी सुवार्ता पसरवण्याचं धाडस शिष्यांनी दाखवलं. प्रभू येशुच्या स्वर्गरोहणानंतर त्याच्या अनुयायांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेद्वारे ऐक्याने आणि बंधूप्रितीने परिपूर्ण जीवन जगण्यास सुरुवात केली. त्यांनी पुनरुत्थित ख्रिस्तावरील त्यांचा विश्वास त्यांच्या जीवनात आणि कार्यात उतरवला आणि त्याद्वारे हजारो बंधू-भगिनींना ख्रिस्ताकडे आणि ख्रिस्तसभेकडे आकर्षित करून घेतले. त्या श्रद्धावान लोकांसारखेच आपणसुद्धा आपलं जीवन पुनरुत्थित ख्रिस्तावरील श्रद्धेमध्ये जगावे आणि आपल्या जीवनाद्वारे ख्रिस्ती मूल्ये आपल्या समाजात पसरावीत म्हणून पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आजच्या मिस्साबलीत मागू या.

मनन -चिंतन

           आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकलं: "ते सर्व पवित्र आत्म्याने भरुन गेले आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले. हे करण्यासाठी पवित्र आत्मा त्यांना सामर्थ्य देत होता. प्रेषित बोलत होते आणि प्रत्येक मनुष्याला त्याची स्वत:ची भाषा ऐकायला मिळाली. यामुळे यहूदी लोक अचंबित झाले" (, ;-). प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक पुढे वाचले तर आपल्याला अजून बरीचशी माहिती मिळते. उदा. एका साक्षात्काराद्वारे पेत्राला कळून चुकलं कि पवित्र आत्याच्या सामर्थ्याद्वारे ख्रिस्तसभा वेगवेगळ्या मार्गानी नाविन्याचा अनुभव घेऊ शकते. किंव्हा शिष्य सभेसाठी एकत्र जमले असता त्यांनी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आणि त्याच्या उपस्थितीमध्येच वेगवेगळे निर्णय घेतले. किंव्हा संत पौल ह्याला त्याच्या मिशनरी कार्यात सदैव पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आणि मार्गदर्शन लाभले. हे सर्व वाचल्यानंतर आपल्याला कदाचित शिष्यांचा आणि पहिल्या शतकातील श्रद्धावान मंडळींचा हेवा वाटेल आणि प्रश्न पडेल कि पवित्र आत्मा त्यांच्या जीवनामध्ये किती प्रचंडपणे कार्यरत होता? पण आज? पवित्र आत्मा आज आपल्या जीवनातसुद्धा तसाच कार्यरत आहे का? कि देवाचा आत्मा आपल्या जीवनातून निघून गेलेला आहे? विझलेला आहे? कि देवाचा आत्मा ख्रिस्तसभेच्या सुरुवातीपेक्षा आजच्या काळात आपल्या जगात, आपल्या जीवनात अधिक कार्यशील आहे? प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक आपल्याला ख्रिस्तसभेच्या सुरुवातीचा इतिहास सांगताना, कबुल करते कि त्या काळातसुद्धा ख्रिस्तसभेमध्ये अनेक प्रकारच्या समस्या होत्या, ताण-तणाव होते, मानवी दुर्बलता होती, हेवे-दावे होते. त्यामुळे त्या काळातसुद्धा पवित्र आत्म्याला भाविकांच्या जीवनात आणि हृदयात जागा मिळणे कठीण झाले असेल. उदा. अधर्मी, अख्रिस्ती लोकंसुद्धा श्रद्धावान ख्रिस्तसभेचा भाग होऊ शकतात हे पेत्राला पटवून देणे हा पवित्र आत्म्यासाठी नक्कीच एक लांब आणि खडतर मार्ग बनला असेल. किंव्हा संत पौल अनेक वेळा आपल्या पत्रांमध्ये लिहितो कि पवित्र आत्म्याने त्याला वेगवेगळ्या गोष्टी करण्यापासून परावृत्त केलं, त्याला मना केलं. याचा अर्थ असा कि पौल त्याच्या स्वतःच्या सर्व योजना-इच्छा पूर्ण करू शकला नाही. त्याला पाहिजे तेच आणि तसंच तो सर्व काही करू शकला नाही. "पवित्र आत्म्याने त्याला मना केलं." त्याद्वारे आपल्याला कळून चुकते कि पवित्र आत्मा अशा मार्गानेसुद्धा देवाच्या योजनांची पूर्तता करू शकतो.

       आज आपल्या जीवनात सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी आणि जीवनात पुढे जाण्यासाठी आपण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यावर आणि सहाय्यावर भरवसा ठेवू शकतो, परंतु पवित्र आत्मासुद्धा आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा करतो. आपण आपलं जीवन, आपलं हृदय उघडून त्याला सहकार्य दिलं पाहिजे. पवित्र आत्मा चांगलं जीवन जगण्याच्या आपल्या उद्देशाला विरोध करत नाही, तर तो आपले हेतू आणि उद्देश शुद्ध करत असतो. उदा. रोममधील ख्रिस्ती भाविकांना पाठवलेल्या पत्रात संत पौल आपल्याला सांगतो: "जेव्हा आपण कण्हतो तेव्हा आत्माही आपल्या अशक्तपणात आपणांस मदत करतो. कारण कशासाठी आपण प्रार्थना करावी, हे आपणांस माहीतसुद्धा नसते. परंतु आत्मा स्वत: आपणांसाठी शब्दांनी जे व्यक्त करता येत नाही, अशा कण्हण्याने मध्यस्थी करतो" (, २२-२७). आपल्या प्रार्थनेत आपण कितीही दुर्बल असले तरीसुद्धा पवित्र आत्मा आपल्याला खऱ्या रीतीने प्रार्थना करावयास आणि प्रार्थनेत योग्य आणि अचूक शब्द वापरण्यास मदत करतो. त्याचा अर्थ आपल्याला जे काही हवं आहे ते देवाकडून मिळेल असा नाही, तर त्याचा अर्थ आहे कि देवाच्या इच्छेप्रमाणे जे आपल्यासाठी आणि आपल्या तारणासाठी योग्य आहे तेच आपल्याला प्रार्थनेद्वारे मिळेल. पवित्र आत्मा आपल्या प्रार्थनेतसुद्धा आपल्याला साहाय्य करतो हे आपल्यासाठी या जगातील मोठं सांत्वन आहे. म्हणून आपण आपल्या सर्व प्रार्थना पवित्र आत्म्याद्वारे देवाला अर्पण करू शकतो.

        हा पवित्र मिस्साबली साजरा करत असताना पवित्र आत्म्यासाठी आपण आपलं हृदय उघडावं आणि त्याच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेऊन त्याच्या साहाय्याने आपलं जीवन जगावं म्हणून खास प्रार्थना करू या.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे परमेश्वरा आमची प्रार्थना ऐक

) आपल्या देऊळमातेच्या सर्व सेवकनेत्यांनी पवित्र आत्म्याठायी नवजीवनाचा अनुभव घ्यावा आणि ख्रिस्तसभेचे नूतनीकरण करून तिला पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाद्वारे तरुणाचा मार्ग दाखवावा म्हणून आपण प्रार्थना करू या.

) आपल्या राजकीय पुढार्यांना पवित्र आत्म्याचे सहायय लाभावे आणि त्याद्वारे आपल्या समाजाच्या आणि लोकांच्या हितासाठी कार्य करून आपल्या देशाच्या आणि प्रत्येक नागरिकांच्या भल्यासाठी त्यांचं जीवन अर्पण करावं म्हणून आपण प्रार्थना करू या.

) ज्या लोकांनी युद्धांमुळे आपलं सर्वकाही गमावलेला आहे आणि ज्यांना उपासमार, हिंसाचार आणि लाचारी सहन करावी लागत आहे अशा सर्वांना परमेश्वरी औदार्य, करून आणि प्रेमाचा अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

) आपल्या धर्मग्रामारील कुटुंबातील आणि आपल्या ओळखीतल्या ज्या व्यक्ती आजारी आहेत त्यांना त्यांच्या दुर्बलतेमध्ये पवित्र आत्म्याच्या कृपा आणि शक्तीद्वारे सबळ होण्याचा अनुभव यावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक, व वैयक्तिक गरजा प्रभूकडे मांडू या.


No comments:

Post a Comment