Friday 16 August 2024

 Reflection for the 20th Sunday in Ordinary Time (18/08/2024) By Br. Rackson Dinis

सामान्य काळातील विसावा रविवार

दिनांक : १८/०८/२०२४

पहिले वाचन – नितीसुत्रे ९:१-६

दुसरे वाचन – इफिसकरांस पत्र ५:१५-२०

शुभवर्तमान – योहान ६:५१-५८




प्रस्तावना

    ख्रिस्ता ठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भंगिनीनो आजची उपासना आपल्याला “दैवी ज्ञानाविषयी” सांगत आहे. जीवनामध्ये जसा आपण पैशाचा, मोत्याचा,व शुद्ध सोन्याचा शोध घेतो तसाच शोध आपण ज्ञानाचा घेतला पाहिजे. कारण ज्ञान हे पैशाहून, मोत्याहून आणि शुद्ध सोन्याहून अधिक मौल्यवान आहे. परमेश्वराने पृथ्वीचा पाया हा ज्ञानाने घातला आहे. त्याने बुद्धीने आकाश निर्माण केले, आणि त्याचा ज्ञानबलाने जलाशय बाहेर आणले आहे, कारण परमेश्वर ज्ञान आहे. म्हणून आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर म्हणतो “अहो भोंळ्यानो, तुमचे भोळेपण कोठवर आवडणार. जो कोणी भोळा आहे तो देवाकडे वळो व देवाच्या शब्दापासुन ज्ञान प्राप्त करून घेवो. कारण भोळ्याचे भलतीकडे वळणे त्याच्या नाशास कारण होईल. म्हणून प्रभू म्हणतो, माझ्या मुला, आपला कान देवाच्या ज्ञानाच्या वचनाकडे लाव. कारण, जेव्हा तू चालशील तेव्हा ज्ञान तुला मार्ग दाखवील, तू निजशील तेव्हा तुझे ज्ञान रक्षण करील, आणि जेव्हा तू जागा होशील, तेव्हा ज्ञान तुझ्याशी बोलेल, कारण ज्ञानाने दिलेली आज्ञा ही आपल्या जीवनासाठी दिवा, आणि पावूलाकरिता प्रकाश आहे. आणि जो कोणी देवाचे वचन पाळतो, म्हणजेच देवाचे ज्ञान ऐकतो, आणि त्या प्रमाणे वागतो, त्याला दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी व कल्याण प्राप्त होइल. जो कोणी ज्ञानास धरून राहतोत्याचे जीवन हे एका वृक्ष रोपासारखे आहे. जीवनात चालत असताना त्याच्या पायास कधी ठोकर लागणार नाही, व तो सुरक्षित राहील, जो कोणी हे ज्ञान राखून ठेवतो, तो धन्य होय.

मनन चिंतन

आजचे पहिले वाचन “दैवी ज्ञान” घेण्यासाठी आमंत्रित करीत आहे. “ये माझी भाकर खा, आणि मी मिसळलेला द्राक्षरस पी” हे आमंत्रण म्हणजे, ज्ञान आणि समजूतपणा यात सहभागी होण्याचे आवाहन आहे.

तर आजचे शुभवर्तमानसुद्धा पहिल्या वाचनाप्रमाणे संदेश देत आहे. प्रभू म्हणतो, मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्ही मनुष्याचा पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. याचा अर्थ म्हणजेच देवाचे वचन हे देवाचे ज्ञान आहे. जर का ह्या वचनाला किंवा प्रभूच्या शब्दाला आपल्या जीवनात प्रवेश दिला नाही तर आपल्यामध्ये जीवन नाही.

बायबलमध्ये अनेक अशा ज्ञानवत लोकाचा उलेल्ख केला गेला आहे ज्यांनी ज्ञानाचे आमंत्रण स्वीकारले किंवा नाकारले.

शलमोन राजा हा सर्वात प्रसिद्ध राजा होता, त्याने जीवनात शहाणपणाचा शोध घेतला. जेव्हा देवाने शलमोनाला स्वप्नात दर्शन दिले आणि त्याला जे काही हवे आहे ते देण्यास राजी झाला, तेव्हा शलमोनाने देवाच्या लोकांवर शासन करण्यासाठी बुद्धी मागितली (1 राजे 3:5-12). शलमोनच्या विनंतीवर देव खूश झाला आणि त्याने त्याला संपत्ती आणि सन्मानासह अतुलनीय बुद्धी दिली. शलमोनाची बुद्धी केवळ त्याच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण इस्राएल राष्ट्रासाठी एक आशीर्वाद होता. तथापि, शलमोनाची नंतरची वर्षे बुद्धीपासून दूर जाण्याचे धोके दाखवतात. म्हणूनच शहाणपण ही एक-वेळची देणगी नाही परंतु आपण आयुष्यभर त्याचा शोध करणे व आपल्या जीवनात त्याचा वापर करणे आवश्यक आहे.

अनेकदा येशू लोकांना दाखल्यांचे उदाहरण देत असे  व म्हणत, ज्याला कान आहेत तो ऐको. तसेच आपण नितीसुत्राच्या पुस्तकातसुद्धा वाचतो, प्रभू म्हणतो माझ्या मुला, तू माझ्या वाणीने ज्ञान जपुन ठेव, माझ्या सुज्ञतेच्या बोधाकडे कान दे. असाच एक  दृष्टान्त शहाणा आणि मूर्ख बांधकाम करणाऱ्यांच्या बोधकथेत (मत्तय ७:२४-२७), सांगितला गेला आहे. अशाच एका ज्ञानी माणसानी आपले घर खडकावर बांधले. आयुष्याची वादळं आली तेव्हासुद्धा हे घर खंबीरपणे उभे राहिले. ही बोधकथा नीतिसूत्रे अध्याय ९:१ ऐकायला मिळते, ती म्हणजे, ज्ञानाने आपले घर भक्कम पायावर बांधिले आहे, त्याने आपले सात खांब तयार केले आहेत.

दुसरीकडे, आपल्याला पाहायला मिळते की, जे लोक त्याच्या शिकवणी ऐकतात पण ते लागू करत नाहीत, ते त्या मूर्ख माणसासारखे आहेत, ज्याने आपले घर वाळूवर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला,व त्या घरास लागला, तेव्हा ते घर पडले, अगदी कोसळून पडले. हे ज्ञानाचे  आमंत्रण नाकारणारे आणि मूर्खपणाचा मार्ग निवडण्याचे परिणाम स्पष्ट करते.

म्हणून आजच्या ह्या मिस्साबलिदानात भाग घेत असताना, आपण परमेश्वराकडे, दैवी ज्ञान प्राप्त करण्यासाठी व आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा वापर करण्यासाठी आशीर्वाद मागुया.

विश्वासू लोकांची प्रार्थना

आपला प्रतिसाद :-  हे प्रेमळ परमेश्वरा, आमची प्रार्थना एकून घे.

१) आमचे पोप महाशय, सर्व बिशप, धर्मगुरू, धर्म-बंधू-भगिनी यांनी त्यांच्या आचार-विचारातून लोकांसमोर चांगला आदर्श ठेवावा तसेच त्यांच्या सुवार्ताकार्यात प्रभूचा वरदस्त त्यांना सतत लाभावा व त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या ख्रिस्ती धर्माची प्रगती होत राहावी म्हणून आपण प्रभू कडे प्रार्थना करुया.

२) आजच्या उपासनेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांनी त्यांची अंतकरणे उघडवून येशू स्वःता जीवनाची भाकर आहे, यावर खऱ्या श्रद्धेने व विश्वासाने येशूच्या शरीराचे व रक्ताचे सेवन करावे व त्याच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.

३) आपल्या देशातील राज्यकर्त्ये व विविध अधिकारी ह्यांनी देशाच्या व लोकांच्या प्रगतीसाठी योग्य ते श्रम करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) ज्या कुटुंबामध्ये विविध कारणांमुळे जी भांडणे व वाद चालू आहेत, अशा सर्व कुटुंबात शांती व प्रेम नांदावे व परमेश्वराचा आशीर्वाद राहावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) आता आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक हेतुसाठी प्रार्थना करूया.







No comments:

Post a Comment