Friday 23 August 2024

 Reflection for the 21st Sunday in Ordinary Time (25/08/2024) By Fr. Cajeten Pereira


सामान्य काळातील एकविसावा रविवार

दिनांक : २५/०८/२०२४

पहिले वाचन – यहोशवा २४:१-२, १५-१८.

दुसरे वाचन – इफिस ५: २१-३२.

शुभवर्तमान – योहान ६:६०-६९


 
प्रस्तावना

आजची उपासना आपणाला विश्वास, जबाबदारी आणि ऐक्य या मूल्यावर मनन करण्यास बोलवित आहे. आपणाला दैनंदिन जीवन जगण्यास परमेश्वराची गरज आहे. देवाच्या मागे चालून त्याच्या शिकवणुकीवर जीवन उभारणे महत्वाचे आहे.

आजच्या पहिल्या वाचनात जोशवा इस्रायली लोकांना देव त्यांच्याशी किती निष्ठावंत, सुखकारक आणि दयाळू होता ह्याचे स्मरण करून देत आहे. तो लोकांना आव्हान करीत विचारतो, “या परमेश्वराची सेवा करणे तुमच्या मनात नसेल. तर ती निवड आजच करा. कोणाची उपासना करायची ते ठरवा.”(२४:१५). त्यावर सर्वजण सकारात्मकतेने उत्तर देतात, “हाच आमचा परमेश्वर त्याच्या सेवेत खंड पडणार नाही आम्ही इतर दैवतांची पूजा करण्यासाठी आपल्या परमेश्वराला सोडणार नाही” (२४:१६). दुसऱ्या वाचनात, ख्रिस्ताचे त्याच्या शिष्यांसोबतच्या नातेसंबंधाचे स्पष्टीकरण आणि स्मरण करून देण्यासाठी पौल विवाहाच्या समानतेचा वापर करतो. आणि अनेक रहस्यमय अर्थाने हे नातेसंबंध वर्णवितो. हे नाते एकमेकांवरील परस्पर प्रेमावर आधारित आहे.

आजच्या शुभवर्तमानात जीवनाच्या भाकरीवरील प्रवचनानंतर अनेक शिष्य निराश होतात. त्यांनी जी शिकवण ख्रिस्ताकडून ऐकली ती ऐकण्याची अपेक्षा केली नव्हती. कारण ही शिकवण खूपच कठीण होती, जी अंगीकारणे शक्य नव्हते. त्यामुळे पुष्कळजण येशूला सोडून जातात. तेव्हा येशू आपल्या शिष्यांना विचारतो, “तुम्हांलासुद्धा मला सोडून जावेसे वाटते काय?” (६:६७). हा प्रश्न जोशवाने विचारलेल्या प्रश्नासारखाच आहे. जीवनातील आव्हानात्मक क्षणी आपण ख्रिस्तासमवेत राहणार की त्याला सोडून जाणार, निर्णय आपल्या हाती आहे. बहुतांशवेळा आपल्या गरजा पूर्ण होत नाहीत तेव्हा आपण ख्रिस्ताचा आणि ख्रिस्तसभेचा धिक्कार करतो. आज आपण स्वतःला विचारूया, माझे ख्रिस्ताशी नातेसंबंध कसे आहेत.

सम्यक-विवरण

पहिले वाचन: यहोशवा २४:१-२, १५-१८.

यहोशवा इस्रायली लोकांना शेकेमच्या पर्वतावरती परमेश्वर की अन्य दैवत्व, कोणाचे अधिपत्य मान्य आहे ते निवडण्याचे आव्हान दिले. परमेश्वराने केलेल्या सुटकाचे आणि संरक्षणाचे स्मरण करून त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याची वचनबद्धता दर्शवितात. 

दुसरे वाचन: इफिस ५: २१-३२.

ख्रिस्ताचे प्रेम वैवाहिक जीवनाचे मार्गदर्शन करते. चर्च ख्रिस्ताचा आदर करते म्हणून पत्नी पतींचा आदर करतात. चर्च ख्रिस्ताला शरण जाते, ख्रिस्ताचा आदर करते तसेच पत्नीने आपल्या पतीच्या अधीन जाऊन आदर करावा. आणि ख्रिस्त जसा चर्चवरती प्रेम करतो, तस प्रेम पतीने आपल्या पत्नीवर कराव. हेच खरे एकतेचे आणि पवित्रतेचे प्रतीक आहे.

शुभवर्तमान: योहान ६:६०-६९    

प्रभू येशू जेव्हा आपल्या ‘जीवनाची भाकर’ ह्या विषयावरील प्रवचनाची शेवट करत असतात तेव्हा पुष्कळ शिष्यांना त्याची शिकवण कठीण वाटते. म्हणून ते येशूला सोडून जात असतात. परंतु शुभवर्तमानाच्या शेवटी असे लक्षात येते कि, पेत्र आणि इतर सर्व प्रेषित हे येशू बरोबर राहण्याचे व आपले जीवन व्यतीत करण्यास ठरवितात.

मनन चिंतन

येशूचे जीवनाच्या भाकरीवरील दीर्घ प्रवचनाचा शेवटचा भाग आपण शुभवर्तमानामध्ये ऐकला, ज्याद्वारे असे सिद्ध होते की, सुवार्तेवर विश्वास ठेवण्याची अडचण केवळ अख्रिस्ती लोकांपुरतीच मर्यादित नाही (जसे परुशी आणि शास्त्री जे त्याचे उघड शत्रू होते), परंतु ख्रिस्ती लोकांमध्येही (शिष्य) तितकीच संदिग्धता आणि अविश्वास आहे. येशूचे शिष्यत्व मिळविण्यासाठी, त्याला निःस्वार्थपणे स्वीकारण्यास तयार असले पाहिजे, हे पेत्राच्या विश्वासाने भरलेल्या आणि मुक्त-मनापासून केलेल्या घोषणेत दिसून येते “प्रभुजी आम्ही कोठे जाणार? अनंतकाळाच्या जीवनाची वचने तर तुमच्याजवळ आहेत.” (६:६८).

जेव्हा एखाद्या मुलाचा बाप्तिस्मा होतो, तेव्हा पालक मुलाच्या वतीने बोलतात की ज्या विश्वासाने मुलाला बाप्तिस्मा घ्यायचा आहे. पालक आपल्या मुलाला हा विश्वास शिकवण्याचे वचन देतात जेणेकरून ते एक दिवस हा विश्वास स्वतःचा म्हणून स्वीकारतील आणि पेत्राप्रमाणे प्रकट करतील. कौटुंबिक प्रार्थनेदवारे मुले विश्वासात परिपक्व होतात, त्यांना शिकविले पाहिजे की केवळ येशूकडेच सार्वकालिक जीवनाचे शब्द आहेत आणि त्यांनी ख्रिस्ती शिष्यत्वाचा मार्ग निवडावा.

स्वामी विवेकानंद हे दूरदृष्टीचे भारतीय तत्वज्ञानी होते, त्यांची एक कथा सांगितली जाते. एकदा, स्वामी विवेकानंद एका विद्यापीठात व्याख्यान देणार होते, तेव्हा एक नास्तिक विद्यार्थी वेळेच्या आधी गेला आणि फळ्यावर लिहिले, “God is Nowhere/देव कुठेही नाही.” विवेकानंद सभागृहात आले तेव्हा त्यांनी हे वाक्य पाहिले. ते फळ्याकडे गेले आणि त्याने फक्त NOW” आणिHEREहे शब्द NOWHERE” शब्दापासून वेगळे केले आणि God is Now Here/देव आता येथे आहे” असे लिहिले. त्याच्या बुद्धीने रोमांचित झालेल्या संपूर्ण सभेतून टाळ्यांचा कडकडाट झाला.

देव आता इथे उपस्थित आहे यावर आपण खरोखर विश्वास ठेवतो का? तो येथे आणि आता आहे!

दररोज, बरेच लोक विश्वास गमावत आहेत आणि अधिकाधिक अधार्मिक वाढत आहेत कारण बहुधा त्यांचा ख्रिस्तावरील विश्वास आणि ख्रिस्ती शिकवणुकीचे आचारण सध्याच्या अनुभवापेक्षा वेगळा असेल. ख्रिस्ताचा संदेश त्यांच्या विचारसरणीत बसत नसेल आणि आपल्या आचारणानुसार बदलण्याचा निष्फळ प्रयत्न केला असणार. सुवार्तेचा एकमेव संदेश म्हणजे ख्रिस्ताच्या शिकवणींशी स्वतःला जुळवून घेणे आणि ख्रिस्ताच्या शिकवणींना आपल्या जीवनशैलीनुसार अनुकूल न करणे.

भौतिक आणि अहिक गोष्टी ख्रिस्ती तत्वानुसार बदलत नाहीत आणि त्यांची सांगड आध्यात्मिकतेशी करता येत नाही. असे मिश्रण शिष्यत्वाला विरोधाभास आणि संघर्षाची स्थिती निर्माण करते. रिक्त आश्वासनांच्या मोहात पडून, क्षणभंगुर सुखाच्या मागे जाणे म्हणजे विनाशाकडे वाटचाल करणे आहे. आज आपला ख्रिस्ती विश्वास दृढ करणे काळाची गरज आहे, कारण केवळ ख्रिस्तच आपणाला अनंतकाळाच्या जीवनाकडे घेऊन जाऊ शकतो. बदलत्या जगात विश्वासाचा कोमल आवाज आपल्या कानी पडू दे, “काहीही झाले तरी त्याला सोडू नका कारण त्याच्याकडे शाश्वत जीवनाचे शब्द आहेत.”

विश्वासू लोकांची प्रार्थना

आपला प्रतिसाद :-  हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१. आपले परमगुरुस्वामी पोप फ्रान्सिस, सर्व कार्डीनल्स, बिशप, धर्मगुरू, धर्मभगिनी आणि प्रापंचिक ह्यांनी ख्रिस्ताची सुवार्ता सर्व जगात पसरावी व ती आपल्या आचरणात आणावी, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

२. प्रत्येक व्यक्तीने एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन एकमेकांस सहाय्य करावे व प्रभू ख्रिस्ताचा प्रेमाचा, दयेचा आणि क्षमेचा संदेश आपल्या आचरणात आणावा, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

३. आपल्या अवती-भौती असलेल्या आजारी माणसांना चांगले आरोग्य मिळावे, बेरोजगारांना रोजगार मिळावा आणि दुःख-संकटात सापडलेल्यांना प्रभूचे धैर्य लाभावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.  

४. ख्रिस्ती श्रद्धेमुळे ज्या लोकांवर अन्याय होत आहेत, अशा लोकांना ख्रिस्ती श्रद्धेशी एकनिष्ठ राहण्यासाठी प्रभू परमेश्वराचे सामर्थ्य व धैर्य लाभावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

५. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.

No comments:

Post a Comment