Wednesday, 30 July 2025

 Reflection for the 18th Sunday in Ordinary Time (03/08/2025) By Br. Vinan Souz


सामान्यकाळातील अठरावा रविवार

दिनांक: ०३/०८/२०२५   

पहिले वाचन: उपदेशक: १:२२:२२-२३

दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र ३:१-५९-११.

शुभवर्तमान: लुक १२:१३-२१


प्रस्तावना

आज आपण सामान्य काळातील अठरावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणाला सांगते की माणसाने कितीही मालमत्ता साठवली, तरी त्याचे आयुष्य अनिश्चित आहे. म्हणून या जागतिक गोष्टींमध्ये गुंतून न राहता, आजची उपासना आपले हृदय देवाकडे वळवायला शिकवते. लोभ, आत्मकेंद्रितता आणि भौतिक सुख यांच्या मागे न धावता, आपल्याला नम्रता, दानशीलता आणि विश्वासाने जगायला पाचारण करते.

आजच्या पहिल्या वचनात आपण ऐकतो की, मानवी प्रयत्न, श्रम आणि जगाच्या श्रीमंतीमागे धावणे ह्या सर्व गोष्टी शेवटी व्यर्थ आणि निराशाजनक वाटू शकतात. आजच्या दुसऱ्या वाचनात, संत पौल आपल्याला आठवण करून देतो की, जर आपण ख्रिस्तामध्ये नव्याने जन्मलो आहोत, तर आपली दृष्टी आणि मन आध्यात्मिक गोष्टींवर असायला हवे. आजच्या शुभवर्तमानात येशु श्रीमंत मूर्ख मनुष्याचा दृष्टांत सांगतो. जो आपल्या संपत्तीवर गर्व करतो, पण देवाला विसरतो. देव त्याला सांगतो, "अरे मूर्खा, आजच तुझा जीव घेण्यात येईल, मग या सगळ्याचा उपयोग कोणाला?"

आज आपल्या सभोवतालच्या जगात खूप लोक हेच करतात  संपत्तीच्या, यशाच्या, प्रसिद्धीच्या मागे धावतात. पण त्यातून खरा आनंद, खरी शांती मिळते का? आपल्या जीवनात खरा आनंद आणि खरी शांती देणारा फक्त आपला प्रभू आहे तर  या मिस्साबलिदानात सहभाग घेताना प्रभू येशूकडे हीच विनंती करूया कि आम्हाला तुझ्या सानीध्यात राहण्यासाठी आध्यात्मिक गोष्टीवर भर देण्यास मदत कर.

मनन चिंतन

    एक वृद्ध मनुष्याला समुद्रकिनारी फिरत असताना एक जादूचा दिवा सापडला. त्याने तो उचलला आणि अचानक त्यातून एक जिन बाहेर आला. जिन म्हणाला, “तू मला मुक्त केलेस, म्हणून मी तुझी एक इच्छा पूर्ण करून देईन.” वृद्ध माणसाने क्षणभर विचार केला आणि म्हणाला, “मी आणि माझा भाऊ तीस वर्षांपूर्वी भांडलो होतो, आणि तेव्हापासून त्याने माझ्याशी बोलणे सोडले आहे. मी अशी इच्छा करतो की तो मला माफ करेल."

    आकाशात एक मोठा गडगडाट झाला आणि जिन म्हणाला, “तुझी इच्छा पूर्ण झाली.” "पण," जिन पुढे म्हणाला, “बहुतेक लोक अशी संधी मिळाल्यावर धनदौलत किंवा प्रसिद्धी मागतात. पण तू फक्त भावाचं प्रेम मागितलेस. असं का? तू म्हातारा झालास म्हणून? आता मृत्यू जवळ आला आहे म्हणून?" “अरे, नाही रे!” वृद्ध म्हणाला, "मी नाही, पण माझा भाऊ नक्कीच मरणाच्या उंबरठ्यावर आहे आणि त्याची संपत्ती साठ दशलक्ष डॉलर्स आहे!"

कधी कधी माफ करणे हे प्रेमासाठी नसून फायद्यासाठीही असू शकते, प्रत्येक इच्छेमागे खरा हेतू समजून घेणे गरजेचे आहे.

    शुभवर्तमानात एक माणूस येशूकडे येतो आणि सांगतो, “गुरुजी, माझ्या भावाला सांगा की मला माझा हिस्सा दे.” यहूदी संस्कृतीत वाद मिटवण्यासाठी कोणाला मध्यस्थ म्हणून निवडणे हे सन्मानाचे समजले जाते. पण येशू यामध्ये सहभागी होण्यास नकार देतो. येशू म्हणतो, “सावध रहा! लोभापासून स्वतःचा बचाव करा. कारण माणसाचे जीवन त्याच्या संपत्तीवर अवलंबून नसते.”

    आजही अनेक कुटुंबांमध्ये मालमत्तेच्या वादावरून भांडणे, खटले, कधी कधी हिंसक घटना घडताना दिसतात. लोभ म्हणजे अशी इच्छा की माणसाला कितीही मिळाले तरी तो समाधानी राहत नाही. त्याला नेहमीच आणखी हवे असते. हीच इच्छा अनेकदा माणसाला चुकीच्या मार्गावर नेते. बायबलमध्ये म्हटले आहे की लोभ करणे म्हणजे देवाऐवजी पैशाची पूजा करणे. कारण लोभी माणसाला पैसा, जमीन, मालमत्ता हेच सर्व काही त्याला देव वाटू लागतो. त्यामुळे तो प्रेम, नातेसंबंध, विश्वास या जीवनाच्या खर्‍या मूल्यांकडे दुर्लक्ष करतो.

    याचा परिणाम असा होतो की अनेक घरांमध्ये संपत्तीच्या वाटणीवरून वाद निर्माण होतात. आईवडील - मुले, भाऊ-बहिणी, पती-पत्नी, आणि इतर नातेवाईक यांच्यात भांडणे होतात. हे वाद कोर्टापर्यंत जातात, आणि कधी कधी खूपच गंभीर होतात, इतके की हिंसा होते आणि नातेसंबंध तुटून जातात. येशू या प्रसंगात आपल्याला एक मूलभूत सत्य समजावून देतात की माणसाचे खरे जीवन त्याच्या जमा केलेल्या संपत्तीवर अवलंबून नसते. खरे समाधान, आनंद आणि शांती ही भौतिक वस्तूंमध्ये नसून ती परमेश्वराशी असलेल्या नात्यात आणि इतर माणसांबरोबरच्या प्रेमभावनेत आहे.

    संपत्ती ही क्षणिक आहे, ती येते आणि जाते, पण आत्म्याचे मूल्य हे शाश्वत आहे. येशू अनेक वेळा सांगतो  की आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील, पण परमेश्वराचे वचन कायम राहील. माणूस कितीही भौतिक संपत्ती जमवो, मृत्यूनंतर ती सर्व इथेच मागे राहून जाते. म्हणूनच खऱ्या अर्थाने धनवान तोच आहे जो परमेश्वराच्या राज्यातील धन जमा करतो. प्रेम, दया, सेवा, सत्य, न्याय यांसारखी शाश्वत मूल्ये तो जपतो.

    पोप फ्रान्सिस म्हणतात की, आपले संपूर्ण आयुष्य केवळ पैसे आणि वस्तू साठवण्यात आयुष्य घालवू नये. पैसा आणि मालमत्ता आयुष्याची खरी सुरक्षा देत नाहीत. आपल्याला देवाच्या मार्गावर चालत, दुसऱ्यांची मदत करत, आणि आपले हृदय दयाळूपणाने भरून जगायला हवे. जो माणूस फक्त स्वतःसाठी साठवतो, तो देवाच्या दृष्टीने गरीब असतो. पण जो दुसऱ्यांसाठी जगतो आणि इतरांना मदत करतो, तो` खरा श्रीमंत माणूस असतो. 

    आज आपले संपूर्ण लक्ष ख्रिस्तावर ठेवूया जेणेकरून आपण आपल्या जीवनात खरा आनंद आणि खरी शांती धन-दौलत मिळवण्यात नव्हे तर ख्रिस्ताच्या शिकवणुकीप्रमाणे जगून इतरांचं भलं साधने व चांगुलपणाने जगून सर्वांशी प्रेमाचे नाते जोडण्यात आहे.

    ज्याप्रमाणे असिसीकर संत फ्रान्सिस याने जागतिक आनंद व सुखाचा धिक्कार केला व आध्यात्मिक आनंद व सुख मिळवण्यासाठी ख्रिस्ताचा स्वीकार केला त्याप्रमाणे आम्हीही तात्पुरत्या श्रीमंतीकडे आमची दृष्टी न ठेवता, जीवनात कायमचा आनंद व सुख-शांती मिळवण्यासाठी ख्रिस्ताशी एकरूप व्हावे म्हणून या मिस्साबलिदानात विशेष प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांची प्रार्थना

आपला प्रतिसाद :- “हे प्रभू दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.”  

१. आपले पोपकार्डीनलबिशप्सधर्मगुरू व सर्व व्रतस्थ ज्यांनी आपले आयुष्य प्रभूकार्यासाठी अर्पण केले आहेअशांना पवित्र आत्म्याच्या कृपेने तारण मिळावे व त्यांना प्रभूपरमेश्वराचे प्रेमकृपा व आंनद मिळावा तसेच प्रभूची सुवार्ता जोमाने पसरावी, म्हणून आपण प्रार्थना करू या.

२. जे लोक तसेच युवक चांगल्या नोकरीच्या शोधात आहेतया सर्वाना परमेश्वराच्या कृपेने चांगली नोकरी मिळावी, म्हणून आपण प्रार्थाना करूया.

३. जे लोक देवावर श्रद्धा ठेवत नाहीत तसेच पैशाच्या किंवा जगातील आर्थिक गोष्टीवर लक्ष देत आहेत अशा सर्व लोकांना चांगले मार्गदर्शन मिळून देवाच्या अधिका-अधिक जवळ यावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. आज कितीतरी लोक आजारीदुःखात व एकटेपणाचे जीवन जगत आहेत. अशा लोकांना देवाची साथ मिळावी व सर्व अडचणीत मुक्त व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.

५. जगामध्ये कितीतरी अन्नाची नाशदूष केली जाते. गरीब लोकांना एक वेळेचे अन्न मिळत नाही. जे लोक अन्नाची नासाडी करतात अशाना बुद्धी मिळून तेच अन्न वाया न घालवून गरिबांना द्यावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिककौटुंबिक व वैयक्तिक गरजासाठी प्रार्थना करूया.

Friday, 25 July 2025

 Reflection for the 17th Sunday in Ordinary Time (27/07/2025) By Br. Saurav Patil

सामान्य काळातील सतरावा रविवार

दिनांक २७--२०२५

पहिले वाचन: उत्पत्ती १८:२०-३२.

दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र २:१२-१४.

शुभवर्तमान: लुक ११:१-१३

प्रस्तावना

       आज संपूर्ण  ख्रिस्तसभा सामान्यकाळातील सतरावा रविवार साजरा करित आहे. आजची उपासना आपणास प्रार्थनेचे खरे महत्व पटवून देत आहे. त्याचप्रमाणे खरी प्रार्थना काय आहे व ती कशी केली पाहिजे ह्या विषयी आपणास सांगत आहे. देवाने आपल्याला त्याची चांगली लोकं म्हणूण बनवले आहे. परंतु पापांमुळे आपण चांगल्या मार्गापासून वाईट मार्गाकडे वाटचाल करतो. परंतु देवाने आपल्या पुत्राद्वारे व त्याच्या क्रूसावरील बलिदानाद्वारे आपणा सर्वांना पुन्हा एकदा त्याच्या पुत्राचे स्थान दिले आहे. येशू ख्रिस्ताच्या जीवनाद्वारे व त्यांने शिकवलेल्या प्रार्थनेद्वारेच आपल्याला कळून येते कि, आपण खरोखर देवाची लेकरे आहोत व देव आपला प्रेमळ व दयाळू बाप आहे.

     ज्या प्रमाणे प्रार्थनेद्वारे आपण आपल्या देवाबरोबर एक बाप आणि मुलाचे नाते असे ओळखून घेतो, त्याच प्रमाणे आपण इतरांना सुद्धा हे नाते दाखून द्यावे अशी आपली जबाबदारी आहे. इतरांनी केलेल्या वाईट गोष्टींवर किंवा त्यांच्या पापी वृत्तींवर लक्ष न देता, त्यांचा न्याय न करता आपण आपल्या प्रार्थनेद्वारे त्यांना सुद्धा देवा जवळ नेले पाहिजे. म्हणून  आज आपण ह्या पवित्र मिस्साबलीदानात सहभागी होत असता, परमेश्वराकडे प्रार्थना करूया कि, परमेश्वराने आपणास दुसऱ्यांना समजून घेऊन त्यांच्यावर प्रेम करण्यास कृपा व शक्ती द्यावी.

 मनन चिंतन

एक लहान मुलगा रोज सकाळी एका झाडाजवळ जाऊन देवाकडे विचारायचा, “देवा, माझं मन शांत कर.” काही दिवस त्याला काहीच वाटत नव्हतं. पण तो थांबला नाही. काही आठवड्यांनी त्याला जाणवू लागलं की त्याचं मन खरंच शांत होतंय, आणि त्या शांततेत देवाचा स्पर्श आहे.

आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्या शिष्यांना एक फारच मोलाचं शिक्षण देतात: ते म्हणजे प्रार्थना कशी करावी. शिष्यांनी येशूला विचारलं, “प्रभु, आम्हाला प्रार्थना शिकव.” त्यांनी हे विचारलं कारण त्यांनी येशूला नेहमी एकांतात, शांततेत, आपल्या पित्याशी प्रेमाने बोलताना पाहिलं होतं. त्यांच्या मनात ही ओढ निर्माण झाली की आम्हालाही असा देवाशी जवळचा संबंध हवा आहे.

येशू प्रार्थना शिकवताना म्हणतात: “स्वर्गीय पिता” ही सुरुवातच खूप खोल आहे. येशू देवाला एखाद्या दंडनात्मक राजासारखा किंवा फक्त नियम देणारा परमेश्वर म्हणत नाहीत, तर आपल्या प्रेमळ पित्याप्रमाणे संबोधतात. यामुळे आपल्याला कळतं की प्रार्थना ही केवळ काही शब्दांची पाठ नसून, देवाबरोबरचा एक गहिरा आणि जिव्हाळ्याचा संबंध आहे. जसं आपण आपल्या जवळच्या मित्राशी मोकळेपणाने, आनंदाने बोलतो, तसंच देवाशी प्रामाणिकपणे, आपलं सर्व काही सांगणं ही खरी प्रार्थना आहे.

यानंतर येशू एक गोष्ट सांगतात: एक व्यक्ती मध्यरात्री आपल्या मित्राच्या दारावर जाऊन म्हणतो, “मला थोडं पाव दे.” सुरुवातीला तो मित्र म्हणतो, “आता त्रास देऊ नको,” पण तो सतत मागत राहतो, आणि शेवटी तो उठून देतो. यामधून येशू आपल्याला शिकवतात की प्रार्थनेमध्ये चिकाटी हवी. आपण कधी कधी एकदाच प्रार्थना करून थांबतो आणि म्हणतो, “देव ऐकत नाही.” पण येशू म्हणतात: “मागा, तुम्हाला मिळेल. शोधा, तुम्हाला सापडेल. दार ठोठावा, ते उघडेल.” म्हणजेच, देव नेहमी आपल्या प्रार्थना ऐकतो, पण कधीकधी आपल्या हृदयाला तयार करत असतो योग्य वेळेस योग्य गोष्ट देण्यासाठी.

या गोष्टींचे मूळ आपण जुन्या करारात पाहतो : उत्पत्ति १८:२६:३२ मध्ये अब्राहम प्रार्थनेद्वारे प्रभूशी विनवणी करतो. "जर पन्नास चांगले लोक सापडले, तर तू संपूर्ण शहर वाचवशील का?" अशी विचारणा करतो आणि प्रभू त्याच्या प्रार्थनेला उत्तर देतो. ही मध्यस्थीची प्रार्थना आपल्याला शिकवते की देव आपल्या सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक प्रार्थनेला प्रतिसाद देतो. अब्राहमची प्रार्थना ही संवादात्मक आहे – मागणे, तडजोड करणे आणि विश्वासाने पुढे जाणे.

आज अनेक लोक वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राकडे व प्रार्थना सभेकडे आकर्षिले जात आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थनेद्वारे देवाला प्रसन्न करण्याचा किंवा कुर्पेचा वर्षाव करण्याचा प्रयत्न करतात. पण ह्या सर्व धडपडीमध्ये येशूने शिकवलेली साधी पण सखोल प्रार्थना विसरतात.

आपण येशूच्या या शिकवणुकीला आज आपल्या आयुष्यात कसं जगू शकतो? दररोज थोडा वेळ देवाशी संवाद साधा: केवळ दोन मिनिटं असली तरी चालेल, पण ती मनापासून असली पाहिजे. प्रत्येक दिवशी थोडावेळ शांततेत बसा, देवाची उपस्थिती अनुभवायला शिका. आपल्या गरजा, भावना, शंका: सगळं देवाला सांगा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, देवाकडून गोष्टी मागताना फक्त वस्तू नकोत, देव स्वतः मागा:पवित्र आत्मा मागा, कारण तोच आपल्याला योग्य निर्णय, शांती आणि विश्वास देतो.

नवा करार आपल्याला दाखवतो की येशू स्वतः आपल्या जीवनात प्रार्थनेला केंद्रस्थानी ठेवतो – उपवास, पर्वतावरचा वेळ, गेथसेमेनीतील  संघर्ष – सर्व ठिकाणी प्रार्थना आहे. आणि कलस्सेकरांस पत्रा २:१२:१४ मध्ये आपण पाहतो की आपण बाप्तीस्मामुळे तुम्हाला ख्रिस्ताबरोबर पुरण्यात आले आणि तुम्ही त्यांच्याबरोबर मनातून उठला, कारण देवाने आपल्या सामर्थ्याने त्यांना मृतातून उठविले यावर तुम्ही श्रद्धा ठेवली.  ही कृपा आपण प्रार्थनेत अनुभवतो – क्षमा, नवजीवन आणि विजयाची अनुभूती.

म्हणून आज आपण सगळे मिळून, मनापासून म्हणूया: “प्रभु, आम्हाला प्रार्थना शिकव.” अशी शिकवण जी केवळ शब्दात नाही, तर आपल्या जीवनात प्रकट होईल. आपली प्रार्थना ही एक गाणं असो, एक स्तोत्र असो, एक शांत हुंकार असो:पण ती देवाशी नातं जोडणारी असावी, कारण अशाच प्रार्थनेतून आपलं हृदय आणि आयुष्य बदललं जातं.

विश्वासू लोकांची प्रार्थना

प्रतिसाद: हे परमेश्वरा, आमची ओंजळ तू प्रेमाने भर

. ख्रिस्तसभेचे पुढारी पोप तसेच बिशप्स व इतर सर्व सहकारी वर्ग, ह्यांनी देव प्रीतीचा संदेश संपूर्ण जगाला आपल्या कार्याद्वारे द्यावा, व असे करण्यासाठी त्यांना परमेश्वराचे योगदान लाभावे, म्हणून आपण प्रार्थना करू या.

. हे परमेश्वरा, सृष्टीतील वस्तूवर व व्यक्तींवर अवलंबून न राहता, तुझ्यावर विसंबून राहण्यास शिकव व आमचा विश्वास वाढव, म्हणून आपण प्रार्थना करू या.

. समाजात जास्तीत जास्त देण्याची प्रवृत्ती निर्माण होऊन जे गोर- गरीब आहेत, जे गरजवंत आहेत; अशा सर्वांना त्याचा लाभ व्हावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.

. आजही आपल्या देशात अनेक लोकांना एक वेळचे पुरेसे अन्न मिळत नाही, अशा लोकांची तू भूक भागवण्यासाठी उदार नागरिकांना पुढे पाठव, म्हणून आपण प्रार्थना करू या.

. आपण आपल्या वैक्तिक, कौटुंबिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थाना करू या.