Reflection for the 15th Sunday in Ordinary Time by Dn. Roshan Nato
सामान्य काळातील पंधरावा
रविवार
दिनांक : १३/०७/२०२५
पहिले वाचन: अनुवाद
३०:१०-१४
दुसरे वाचन: कलस्सेकरांस
पत्र १:१५-२०
शुभवर्तमान: लुक १०:२५-३७
प्रस्तावना
ख्रिस्तात माझ्या
प्रिय भाविकांनो आज देऊळ माता सामान्य काळातील पंधरावा रविवार साजरा करीत आहे. आजची
उपासना आपणाला परमेश्वरावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण शक्तीने, व संपूर्ण
बुद्धीने प्रीती करण्यास आव्हान करीत आहे. जशी प्रीती आपण स्वतःवर करतो, तशी प्रीती
शेजाऱ्यांवर केली पाहिजे. चांगल्या शमोरोणीप्रमाणे गरजा आकांताच्या वेळात दया
दाखवून, मदत करने हाच खरा
शेजारधर्म आहे.
अनुवाद
पुस्तकातून घेतलेले आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर पित्याची आज्ञा, जी आपल्या मुखात
व अंतःकरणात आहे ती पाळून त्याप्रमाणे वागण्यास व संपूर्ण मनाने व जिवाने परमेश्वराकडे
वळण्यास सांगत आहे. संत पौलाने कलस्सैकरांस पाठवलेल्या पत्रातून घेतलेले
दुसरे वाचन, आपणास प्रभू येशू ख्रिस्ताचे स्वरूप व त्याच्या कार्यबद्दल
थोडक्यात सांगते कि, सर्व काही त्याच्याद्वारे व
त्याच्यासाठी निर्माण झाले असून, तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही
अस्तित्वात आहे. तो शरीराचे म्हणजे मंडळींचे मस्तक असून, वधस्तंभावरील त्याच्या
रक्ताद्वारे शांती प्रस्थापित करून सर्व गोष्टींचा स्वतःबरोबर समेट केला आहे. त्याचप्रमाणे
लुकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन आपणास, येशू ख्रिस्ताची परीक्षा
पाहण्याकरिता, शाश्वत जीवन प्राप्ती कशी करून घ्यावी ह्या कोणी एका
शास्त्र्याने विचारलेल्या प्रश्नाबद्दल व चांगल्या शोमरोनाच्या द्रूष्टांताबद्दल
सांगत असता आपल्या देवावर व स्वतःप्रमाणे
आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करण्यास पाचारण करत आहे.
मनन-चिंतन
प्रिय भाविकांनो, देवावर प्रीती
करणे म्हणजे, त्याने आपल्या मानवजातीला दिलेल्या आज्ञा पाळणे, त्याच्या
प्रत्येक वचनावर विश्वास ठेवणे, त्याने दिलेल्या सर्व आशीर्वादाबद्दल
त्याचे आभार मानणे. तसेच त्याच्या सौंदर्य, पवित्रता आणि महानता ह्याचे प्रार्थनेद्वारे
अनुभव घेणे आहे. ह्यातच खरा आनंद दडला आहे. जेव्हा आपण देवात असा आंनद घेतो तेव्हा
आपल बाकीचं सर्व वर्तन म्हणजेच आज्ञापालन, विश्वास, कृतज्ञता, हे सर्व अगदी खऱ्या
रीतीने त्याच्या गौरवासाठी करत असतो. म्हणून स्तोत्रसंहिता (६३:१-२) मध्ये स्तोत्रकार
आपणास त्याच्या देव प्रीतीबद्दल अगदी थोडक्यात सांगतो कि "हे देवा, तू माझा देव आहेस, मी आशेने तुझा
शोध करिन; शुष्क, रुक्ष व निर्जीव
प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे माझ्या देशालाही तुझी उत्कंठा
लागली आहे. अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्रस्थानी, मी तुझ्याकडे
दृष्ठी लावली आहे."
त्याचप्रमाणे शेजऱ्यावर
प्रेम करणे म्हणजे, इतरांविषयी संवेदना बाळगणे, त्यांना मदत करणे, त्यांच्या
भल्यासाठी विचार करणे आणि त्यांच्याशी आदर, सहकार्य, व दयाळूपणाने
वागणे होय.
प्रिय भाविकांनो
पवित्र शास्रामध्ये आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करणे, ही संकल्पना एक
मध्यवर्ती व महत्वाचा विषय आहे. जुन्या करारातच नाही तर नवीन
करारातसुद्धा अधोरेखित करण्यात आलेला आहे. याचा थेट आणि वारंवार उल्लेक (लेवीय १९:१८)
मध्ये आढळतो, जेथे देव इस्राएली लोकांस आज्ञा देतो कि, “सूड उगवू नको, किंवा आपल्या
भावबंधांपैकी कोणाचा दावा धरू नको तर तू आपल्या शेजाऱ्यावर स्वाथासारखी प्रीती कर, मी परमेश्वर आहे.”
त्याचप्रमाणे नव्याकरारातील, योहानलिखीत पहिल्या पत्रामध्ये
(४:२०-२१) आपणास कळते कि, कशाप्रकारे आपले देवावर असलेले प्रेम,आपल्याला शेजाऱ्यांवर प्रेम करण्यास प्रवृत्त
करून आपणास इतरांशी जोडण्यास प्रोत्साहन करताना सांगते कि “मी देवावर प्रीती करतो, असे म्हणून जर
कोणी आपल्या बंधूंचा द्वेष करील तर तो लब्बाड आहे. कारण डोळ्यांपुढे असलेल्या
आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करीत येणे
शक्य नाही तर जो देवावर प्रीती करतो, त्याने आपल्या बंधूवरही
प्रीती करावी, हि त्याची आपल्याला आज्ञा आहे.”
प्रिय भाविकांनो, चांगल्या शमोरोनीचा
दृष्टांत जो आपण कितीतरी वेळेला आपल्या बायबल वाचनात वाचलेला आहे व ऎकलेला सुद्धा
आहे. हा दृष्टांत आपणा सर्वांना खरे ख्रिस्ती प्रेम म्हणजे काय व शेजाऱ्यावर प्रेम
कसे करावे, किंवा शेजाऱ्यावर प्रेम करणे म्हणजे नेमके काय हे समजून
घेऊन ते आपल्या कृतीत उतरविण्यास प्रोत्साहन देत आहे आणि ह्याच शेजार प्रेमाचं
उदहारण आपण एका छोट्याश्या गोष्टीद्वारे समजून घेऊया.
कलकत्याच्या संत
मदर तेरेसा एकदा एका गावात गेल्या होत्या. तेथे एका झोपडीत शिरली असता, कुटुंबियांनी
पाहून तिला त्यांचा कळवळा आला. ते कुटुंब चार दिवसापासून भुकेलेले होते. मायेच्या
ममतेने मदरांनी आपल्या सोबत आणलेले धान्य त्या कुटुंबाला देऊ केल. त्या कुटुंबातील
आईने धान्याचे लगेच दोन भाग केले व एक भाग घेऊन ती शेजारच्या घरी गेली. त्या बाईने
असे का केले विचारले असता, ती बाई म्हणाली, “जसे आम्ही भुकेलेले आहोत, तसेच ते
कुटुंबशुद्धा भुकेलेल व उपाशी आहे. त्यांनासुद्धा धान्याची गरज होती आणि म्हणून मी
अर्धा भाग त्यांना दिला.” आपल्या गरजेत दुसऱ्यांच्या गराजांची आठवण ठेवणे व
त्यांना मदत करणे हे पाहून मदर तेरेसासुद्धा भारावून गेल्या. ह्यालाच म्हणतात खरी
शेजार प्रीती.
प्रिय भाविकांनो, आज आपल्या धर्मग्रामाला व गावपरिवाराला चांगल्या शोमरोनीची गरज आहे. अनेक लोक वेगवेगळ्या कारणाने त्रस्त आहेत आणि मदतीची आस धरून आहेत. आपण चांगले शोमरोनी आहोत का? किंवा बनू शकतो का? आपला शेजारी कोण हे शोधण्यापेक्षा गरजवंतांना मदत करून आपण त्यांचे शेजारी बनतो का? ह्या प्रश्नांवर मनन-चिंतन करून, आपल्या देव प्रीतीचे रूपांतर आपल्या शेजार प्रीतीमध्ये करून, आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करून, मदत करून व शेजारधर्म जोपासण्यास परमेश्वराची कृपा व शक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करूया.
विश्वासू
लोकांची प्रार्थना
प्रतिसाद :- ‘हे प्रभू आम्हांला प्रेम करण्यास प्रेरणा दे’.
१. ख्रिस्ताची सुवार्ता पसरविणारे आपले पोप, बिशप्स धर्मगुरू
व धर्मभगिनी ह्या सर्वांना देवाचे कार्य करण्यासाठी शक्ती व प्रेरणा मिळावी म्हणून
आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या समाजातील
व शेजोळातील सर्व लोकांनी एकमेकांवर प्रेम करावे व चांगले आनंदी जीवन जगावे म्हणून
आपण प्रार्थना करूया.
३. ह्या वर्षी
संपूर्ण भारत देशात योग्य प्रमाणात पर्जन्यवृष्टी व्हावी व सर्वत्र हिरवळ पसरून
देशाचा विकास व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. संपूर्ण जगभरात
ज्या लोकांवर अन्याय व अत्याचार होत आहे त्यांना प्रभूची शांती व सामर्थ्य लाभावे
म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडावेळ शांत
राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक गरजा
साठी म्हणून आपण प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment