Friday, 18 July 2025

Reflection for the 16th Sunday in Ordinary Time by Br. Oliver Munis


सामान्य काळातील सोळावा रविवार

दिनांक :  २०/०७/२०२५

पहिले वाचन: उत्पत्ती: १८: १-१६

दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र  १:२४-२८

शुभवर्तमान: लुक १०:३८-४२

प्रस्तावना

सुमने होऊनी गळुनी पडावे प्रभूच्या पदकमळाशी, देह झिजावा अखंडित हा ख्रिस्त प्रभू सेवेशी

आज आपली पवित्र ख्रिस्तसभा सामान्य काळातील सोळावा रविवार साजरा करीत आहे. तर आजची उपासना आपणास एका खूप साध्या पण अत्यंत महत्वाच्या मुल्यांवर लक्ष वेधण्यास सांगते आणि ती मूल्य म्हणजे प्रार्थना व सेवा. तसेच प्रार्थना व सेवा आपण आपल्या जवळच्या व्यक्तीसाठीच नाही, तर आपल्या देवासाठी, आपल्याला देवाने दिलेल्या या पृथ्वीसाठी आणि शेजाऱ्यांसाठीसुद्धा करण्यास पाचारण देत आहे.

आज आपल्या अवती-भोवती कितीतरी चिंता आहेत. जसे लोक देवापासून दूर चालले आहेत, पर्यावरणाच्या समस्या वाढत चालल्या आहेत. अनेक घरांमध्ये ताण-तणाव निर्माण होत आहे. गैरसमज झाले की नाती तुटत चालली आहेत.

तर या सर्व त्रासदायक समस्यात आपल्याला देऊळमाता दोन मुल्ये अकस्मात करण्यास आमंत्रण करत आहे. जेणेकरून आपण आपल्या प्रार्थना व सेवेद्वारे ह्या समस्यावर मात करून देवाचा प्रचार, पृथ्वीची काळजी आणि एकेमेकाबरोबर सुख व सलोख्याने राहू. तर आजच्या मिस्साबालीदानात आपण अब्राहमसारखं प्रेम करण्यासाठी. मरियासारखे देवाच्या जवळ राहण्यासाठी आणि मार्थेसारखं मनापासून सेवा करण्यासाठी कृपादान व शक्ती मांगुया 

मनन-चिंतन

       माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो,  आज आपली देऊळमाता सामान्य काळातील सोळावा रविवार साजरा करत आहे आणि आपल्याला सुंदर आणि साध्या गोष्टीवर मनन-चिंतन करायला बोलावलं जात आहे त्या म्हणजे  प्रार्थना व सेवा.

       आपल्याला अनेक प्रकारच्या चिंता आहेत. कितीतरी तरुण मेहनत घेतात, अभ्यास करतात, पण त्यांना चांगली नोकरी मिळत नाही. अनेक घरांमध्ये ताण असतो, गैरसमज झाले की नाती तुटतात. शहरांमध्ये अनेक लोक एकटे राहतात. कुणीतरी आपली काळजी घ्यावी, अशी आशा ठेवतात. भ्रष्टाचार वाढत चालला आहे व गरीब लोकांची फसवणूकसुद्धा वाढत चाललेली असताना आपल्याला दिसून येत आहे. शेतकऱ्यांना पावसाची चिंता वाटते. जमिनीला, पाण्याला हानी होत आहे. आणि काही दिवसाअगोदर घडलेल्या घटना: ऑपरेशन सिंदूर व अहमदनगरची विमान दुर्घटना लोकांना घाबरवून टाकत आहेत. पण आज येशू आपल्याला दोन मूल्यांचे महत्व सांगून सुवर्तिक संदेश देत आहे.

       एकदा काही अविवाहित तरुण बायबलचा अभ्यास करत होते. ते विचार करत होते, तर त्यांनी आपापसात एक प्रश्न विचारला. कोण चांगली पत्नी होऊ शकेल: मार्था की मरिया? तर त्यातील एकजण म्हणाला, “माझ्या मते मार्था चांगली पत्नी होऊ शकते कारण ती कामात गुंतलेली असते. ती चांगला स्वयंपाक करते. दुसरा म्हणाला, “माझ्या मते मरिया चांगली पत्नी होईल. ती शांत, प्रेमळ आणि काळजी घेणारी होती. अशा बाईबरोबर लग्न केलं तर मी खूप सुखी होणार!” शेवटी एकजण म्हणाला, “मला दोघींसोबतच लग्न करायला आवडेल. जेवणाआधी मार्थाचं मदत करणं हवं आणि जेवणानंतर मरियाचा शांत स्वभाव!” आजची सुवार्ता आपल्याला सांगते की आपल्या ख्रिस्ती जीवनात मरियेचे ऐकणे आणि मार्थासारखी सेवा करणे, हे दोन्ही महत्त्वाचे आहे.

       येशू जेव्हा मार्था आणि मरियेच्या घरी गेला, तेव्हा त्याने मार्थाला सांगितले. मरियेने चांगला भाग निवडला आहे. त्याला मार्थाची सेवा वाईट वाटली नाही. पण सेवा सुरू करण्याआधी देवाचे ऐकणे, देवाजवळ राहणे महत्त्वाचं आहे, हे त्याने तिथे दाखवले.

सुमने होऊनी गळुनी पडावे प्रभूच्या पदकमळाशी, देह झिजावा अखंडित हा ख्रिस्त प्रभू सेवेशी 

       संत आगुस्तीन म्हणतो. चर्चला मजबूत किंवा चांगले ठेवायचे असेल, तर आपल्याला दोन्ही मुल्ये जोपासायला हवी ती म्हणजे मरियासारखी प्रार्थना करणारे आणि मार्थासारखी सेवा करणारे. मरिया म्हणजे प्रार्थना व विचार. तर मार्था म्हणजे कृती व सेवा. जर मार्थाने चर्च उघडले नाही, तर मरिया प्रार्थना कुठे करणार? जर शिक्षकांनी संडेस्कूलची तयारी केली नाही तर लहान मुलांना शिकवणार कोण? जर कुणी पवित्र वेदी स्वच्छ ठेवली नाही तर मिस्सा सुंदर कशी होणार?

       आपण देवळात बघत असतो, काहीजण गप्प बसून प्रार्थना करतात, तर काहीजण पुढे जाऊन सेवा किंवा काम करतात. पण सेवा किंवा काम सुरू करण्याआधी, आपल्याला येशूच्या पायाशी बसायला हवं. मदर तेरेसा जी आपल्या देशात गरीबांसाठी झटली, त्या रोज शांतपणे येशूसमोर बसायच्या. संत बेनेडिक्ट यांनी एक सुंदर असा बोध जगासमोर ठेवला आहे तो म्हणजे प्रार्थना आणि सेवा. (Ora et Labora) जर प्रार्थना न करता सेवा केली, तर ती थोडी अधुरी वाटू शकते; आणि फक्त प्रार्थना केली, पण सेवा केली नाही, तर ती फक्त शब्दांपुरती मर्यादित राहते. कुठलीतरी गोष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. कारण सेवा आणि काम करण्यसाठी प्रार्थना स्फूर्ती व प्रेरणा देते आणि सेवा विश्वासाचे जिवंत रूप ठरते.  

       पहिल्या वाचनात, अब्राहमने तीन अनोळखी लोकांना आपल्याकडे बोलावले. त्यांना जेवण दिले, विश्रांती करण्यास सांगितली आणि त्याला समजलच नाही की तो देवाचच स्वागत करत होता. अशा ह्या सेवाकार्यामुळे त्याला नवीन आयुष्याचं वचन मिळाले: सारा वृद्ध असतानाही तिला मुलगा झाला. खरी सेवा आश्चर्यकारक आशीर्वाद देत असते.

       दुसऱ्या वाचनात, पौल ख्रिस्ताच्या दु:ख व क्लेशात सहभागी होतो, मंडळीसाठी प्रार्थना करतो. प्रार्थनेतून ख्रिस्ताचे रहस्य समजून घेतो आणि ते रहस्य सर्वांना शिकवतो आणि सेवेद्वारे तो ख्रिस्ताची आशा परराष्ट्रीयांपर्यंत पोहोचवतो. त्याच्या प्रार्थनेने आणि सेवेने मंडळी परिपूर्ण होते, आणि ख्रिस्ताच्या गौरवासाठी सर्वांना तो बळकट करतो.  

मग आपल्यासाठी आज याचा अर्थ काय? (बोध)

       एक गोष्ट सांगतो. काही वर्षांपूर्वी तामिळनाडूच्या एका खेड्यात अरुण नावाचा एक मुलगा राहत होता. वय फक्त १४. लॉकडाऊनमध्ये त्याच्या वडिलांची नोकरी गेली. पण तो घरी बसला नाही. झोपडीमागे थोडी मोकळी जागा होती. त्याने भाजीपाला लावला. ती भाजी त्याने गरजू शेजाऱ्यांना दिली. तो आपल्या आईला म्हणाला, मी दुसऱ्यांना मदत करतो, तेव्हा मला वाटते येशू माझ्यासोबत आहे.” एका छोट्या कृतीतून त्याने देवाला आणि माणसांनाही आनंद दिला.

       बंधूंनो आणि भगिनींनो, आपण दर रविवारी इथे एकत्र येतो. आपल्यामुळे देवाला काही फायदा नाही, उलट तो आपल्याला लाभ देतो. आपल्याला आपले शब्द, आपले शरीर देतो. आपल्याला शक्ती देतो, जेणेकरून आपण बाहेर जाऊन दुसऱ्यांनाही प्रेम दाखवू शकू.

       तर आज देवळाच्या बाहेर जाता जाता, अब्राहमसारखं प्रेम करा, मरियासारखे देवाच्या जवळ रहा आणि मार्थेसारखं मनापासून सेवा करण्याचा प्रयत्न करा.

       आज आपण पाहतो की भौतिक गोष्टींमुळे श्रद्धा कमी होत आहे, प्रदूषणामुळे निसर्गाची हानी होत आहे आणि द्वेषामुळे लोकांमध्ये दुरावा वाढत आहे. या गोष्टी बदलण्यासाठी आपण रोज प्रार्थना करूया, गरजूंना मदत करूया, निसर्ग जपूया आणि एकमेकांवर प्रेम करूया. मरियेसारखी प्रार्थना आणि मार्थासारखी सेवा आपल्याला योग्य मार्ग दाखवेल. आपले छोटे प्रयत्न मोठा बदल करू शकतात. आपण आता एकत्र येऊन आपली देवावरील श्रद्धा टिकवूया, निसर्गाची काळजी घेवूया आणि आपापसात प्रेमात व शांततेत वावरूया!

विश्वासू लोकांची प्रार्थना

धर्मगुरू: माझ्या प्रिय बंधूभगिनींनो, आमच्या तारणाराचे रहस्य साजरे करण्यसाठी ख्रिस्ताठायी आम्ही येथे एकत्र जमलो आहोत. जीवन आणि आशीर्वादाचा हा झरा अखिल जगाला खुला करण्यासाठी आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे याचना करूया.   

प्रतिसाद :- हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक.

१. ख्रिस्त सभेची धुरा वाहणारेपोप महाशयबिशप्सकार्डीनल्ससर्व धर्मगुरु व व्रतस्त जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्यरत आहेतह्या सर्वाना परमेश्वराचा आशीर्वाद लाभावा व त्यांनी देवाचे कार्य अखंडित चालू ठेऊन एक उत्तम जीवनाचा धडा लोकांपर्यंत पोहचवावा म्हणून आपण प्रार्थना करुया.

२. हे प्रभु, जे उपाशी आहेत, बेघर आहेत, एकटे आहेत त्यांच्यावर दया कर. आम्हाला त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करता यावा. त्यांना आधार, अन्न आणि माया मिळू दे. तुझ्या प्रेमाची अनुभूती त्यांना आमच्यातून मिळू दे. म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. उत्तम ख्रिस्ती ह्या नात्याने आपणास एक दुसऱ्यांची सेवा करण्यास व देवाच्या नावाने दुसऱ्यांचा स्वीकार करण्यास शक्ती व कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. यंदाच्या वर्षी परमेश्वराने आपल्यावर चांगली पर्जन्यवृष्टी केली आहेत्याबद्ल आपण परमेश्वराचे आभार मानत असताजेथे वाजवीपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी होऊन पुराचे वातावरण निर्माण झाले आहेअशा ठिकाणच्या लोकांचे परमेश्वराने संरक्षण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. जे तरुण मेहनत करत आहेत, अभ्यास करत आहेत त्यांना यश दे. ज्यांना नोकरी नाही, दिशा नाही, त्यांना योग्य मार्ग दाखव. त्यांच्या आयुष्यात तुझी शांती नांदू दे. त्यांनी समाजासाठी चांगली उदाहरणे बनावित, त्याच्यासाठी त्यांना प्रेरणा दे. म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. हे प्रभू, आम्हाला मरियेसारखं तुझ्या पायाशी बसून ऐकता यावे आणि मार्थेसारखं मनापासून सेवा करता यावी. प्रार्थना आणि सेवा ह्यात संतुलन राखायला आम्हाला शिकव. तुझं राज्य आमच्या कृतीतून प्रकट होऊ दे. म्हणून प्रार्थना करूया.

७. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.

धर्मगुरू: हे सर्वसमर्थ पित्या. तुझ्या लोकांच्या प्रार्थना ऐक, आमच्या श्रध्येमधील उणीवा तुझ्या प्रेमाने भरून काढ. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभूख्रिस्ताद्वारे करतो. आमेन


No comments:

Post a Comment