Reflection for the 5th Sunday in Ordinary Time (09/02/2025) By Br. Jostin Pereira
सामान्य काळातील पाचवा
रविवार
दिनांक: ०९/०२/२०२५
पहिले वाचन: यशया ६:
१-२, ३-८.
दुसरे वाचन: १ करिंथ
१५: १-११.
प्रस्तावना
आज आपण सामान्य काळातील
पाचवा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला परमेश्वराचे सानिध्य, त्याचा अनुभव, त्याने केलेले पाचारण
आणि मानवाचा प्रतिसाद याविषयी बोध करत आहे. यशया संदेष्टा, संत पौल व प्रेषित
पेत्र प्रभूच्या सेवेसाठी स्वत:ला अपात्र समजतात. पण परमेश्वर त्यांना दयेने स्पर्श
करतो. देवदूत यशयाच्या ओठांना विस्तवाने स्पर्श करतो. पौलाच्या डोळ्यावरील झापड काढतो, तर येशू पेत्राला स्पर्श करतो. अशा प्रकारे देव
त्याच्या सेवेसाठी त्यांना पात्र करतो. त्यांना पाचारण करून प्रत्येकाला मिशन कार्य
देतो. देवाच्या द्राक्षमळ्यात कार्य करण्यासाठी देव प्रत्येकाला निवडत असतो त्याचे
माणसाच्या निकषांपेक्षा वेगळे असतात. माणसे बाह्य अंग बघतात तर देव अंत:करण बघत असतो.
प्रत्येक बाप्तिस्मा झालेल्या व्यक्तीला देव पाचारण करत असतो. येथे
उपस्थित असलेल्या प्रत्येकाला देवाने पाचारण केले आहे. प्रत्येकाने आपल्या योग्यतेनुसार
देवाला प्रतिसाद द्यायला हवा. स्वत:चे परिवर्तन करत देवाच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद
देण्यासाठी प्रयत्न करायला हवा. आज आ[पण स्वतःला प्रश्न विचारूया कि, मी देवाला योग्य
प्रतिसाद दिला आहे का? यावर आज मनन चिंतन करूया आणि परमेश्वराच्या
हाकेला प्रतिसाद देण्यासाठी कृपा मागू या.
मनन
चिंतन
आजची तिन्ही वाचणे
आपणास देवाचे पाचारण आणि परिपूर्ण जीवन जगण्यास बोलावीत आहे. आजच्या तिन्ही वाचनात
आपल्याला पहायला मिळते की यशया, पौल व पेत्र यांना देवाने निवडले. जरी ते देवाच्या सेवेस
अपात्र होते तरीसुद्धा देवाने त्यांना पात्र केले. देवासाठी काहीच अशक्य
नाही तर सर्व काही शक्य आहे.
आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा परमेश्वराच्या दैवी दर्शनाचा
अनुभव घेतो. तो परमेश्वराला सिंहासनावर बसलेला पाहतो, तेथे तेजस्वी आणि
पवित्र सराफिम त्याच्याभोवती असतात. स्वतःच्या पापी जीवनाने तो व्याकुळ
होतो आणि म्हणतो, “मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या
लोकात राहतो, तरीसुद्धा (तुम्ही) परमेश्वराने तुमचे कार्य करण्यासाठी आणि तुमचा
संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला पाचारण केले आहे.
आपल्याला सुद्धा देवाचे कार्य करण्यासाठी पाचारण केले आहे. आपण सुद्धा यशयाप्रमाणे
पापामध्ये बुडालेलो आहोत आणि आपण सुद्धा देवापासून दूर जात असतो. तसेच ज्याप्रमाणे
यशयाने देवाच्या शब्दाला प्राधान्य देऊन देवाची आज्ञा पाळली, त्याचप्रमाणे आपण सुद्धा
देवाच्या हाकेला प्रतिसाद दिला पाहिजे आणि देवाच्या इच्छेप्रमाणे वागलो पाहिजे.
दुसऱ्या वाचनात संत पौल १ करिंथ १५:१-११ मध्ये सांगतो की, त्याला देवाची दया
मिळाल्यामुळेच तो प्रेषित होऊ शकला. त्याने स्वतःला कमी लेखले, कारण त्याने
देवाच्या लोकांचा छळ केला होता, परंतु देवाच्या दयेने तो आपले
कार्य सुरू करू शकला. त्याने जितके काम केले, त्यामध्ये त्याचे स्वतःचे
प्रयत्न नाहीत, तर देवाची कृपा आणि मार्गदर्शन होते. तो सांगतो की, "मी जो आहे, ते देवाच्या
दयेनेच आहे." त्याच्या जीवनातील यश, काम, आणि प्रेषिताचे
कार्य देवाच्या कृपेनेच साधले गेले आहे.
संत पौल आपल्याला देवावरील विश्वास आणि येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान
याविषयी सांगत आहे. ख्रिस्त आपल्या पापांसाठी
मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला. प्रभूचे पुनरुत्थान
आपल्यासाठी केवळ एक ऐतिहासिक घटना नाही तर आपल्या संपूर्ण ख्रिस्ती जीवनाचा आधार आहे. येशूने मृत्यूवर
विजय मिळवला आणि आपल्याला आशेचे जीवन दिले आहे याचा अर्थ असा आहे की मृत्यू हा शेवट
नसून त्याद्वारे ख्रिस्तामध्ये आपल्याला नवे आणि अनंतकाळाचे जीवन मिळाले आहे.
संत पौल याच्या उदाहरणावरून आपल्याला शिकता येते की, आपल्याला देवाने
दिलेल्या दयेसोबतच आपले कार्य, सेवा आणि जीवन समर्पित करणे
आवश्यक आहे. देवाच्या मार्गदर्शनाशिवाय काहीही शक्य नाही, आणि त्याच्याशी जोडल्यानेच
व त्याच्या अधिक जवळ राहण्याने आपले
पाचारण ओळखू शकतो.
आजच्या शुभवर्तमानात आपण प्रेषित पेत्र ह्याच्या पाचारणाविषयी
ऐकतो. पेत्र हा अनुभवी कोळी होता. त्याला मासेमारीच्या जाळ्यांची, जागेची आणि वेळेची संपूर्ण
माहिती होती. परंतु एका संध्याकाळी तो आणि त्याचे साथीदार संपूर्ण रात्र
कष्ट करून सुद्धा त्यांना काहीच मासळी मिळाली नव्हती, त्यावेळी
येशु त्यांच्या होडीत बसतो आणि त्यांना पुन्हा जाळे टाकण्यास सांगतो. पेत्राने
येशूच्या शब्दावर विश्वास ठेऊन तो जाळी टाकतो. आणि पेत्राच्या येशुवरील
विश्वासामुळे त्यांची जाळी माशांनी इतके भरते की ते तुटायला लागते. हा एक चमत्कार पेत्राच्या
विश्वासामुळे साध्य होऊ शकला. शिमोन पेत्राने जेव्हा हे
पाहिले तेव्हा तो येशूच्या पाया पडला आणि म्हणाला, “प्रभु, माझ्यापासून दूर
जा कारण मी पापी मनुष्य आहे!” परंतु प्रभू येशूने शिमोनाला म्हणाला, “भिऊ नको. कारण येथून पुढे तू माणसे धरशील.” त्यांनी
त्यांच्या होड्या किनाऱ्याला आणल्या, नंतर त्यानी सर्व
काही सोडले आणि त्याच्यामागे गेले.
हा चमत्कार फक्त मासेमारीचा नव्हे, तर श्रद्धा आणि आज्ञाधारकपणाचा
आहे. पेत्राप्रमाणे आपल्यालाही येशूवर पूर्ण विश्वास ठेवण्यास आणि आपल्या योजना बाजूला
ठेवून देवाच्या मार्गावर चालण्यास पाचारण केले आहे. जेव्हा आपण स्वतःला
देवाच्या हाती देतो, तेव्हा तो आपले आयुष्य बदलतो आणि
आपल्याला महान कार्यांसाठी वापरतो.
ही सर्व वाचने आपल्याला विचार करायला लावतात की, देव आपल्याला कुठे
बोलावत आहे? आपण त्याच्या हाकेला होकार देतो का? आपण त्याच्या योजनेवर पूर्ण विश्वास
ठेवतो का?
चला, आपणही पेत्रासारखे बनुया, विश्वास ठेवूया, जाळे खोल पाण्यात टाकूया आणि देवाच्या
अद्भुत कृपेचा अनुभव घेऊया. तो आपले जीवन बदलून, आपले दुःख दूर करणार
व आपल्या अं:तकरणात प्रेमाची ज्योत
पेव्णार. अशाप्रकारे ख्रिस्ताचे खरे अनुयायी आपल्याला बनायचे असेल तर त्याचे
पाचारण स्वीकारुया व याच ख्रिस्ताचा शुभसंदेश सगळीकडे पसरूया!
विश्वासू
लोकांची प्रार्थना
प्रतिसाद: “हे प्रभो, तुझी सुवार्ता प्रकट
करण्यास आम्हाला कृपा दे.”
१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे पोप फ्रान्सीस, कार्डीनल्स, महागुरू, धर्मगुरू व सर्व व्रतस्थ या सर्वांनी त्यांच्या
कार्याद्वारे व शुभसंदेशाद्वारे येशु ख्रिस्ताची ओळख इतरांना पटवून द्यावी व देवाची
सुवार्ता इतरांपर्यंत पोहचवण्यास त्यांना शक्ती-सामर्थ्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना
करूया.
२. ‘पिक फार आहे
परंतु कामकरी थोडे आहेत’ म्हणून अनेक तरुण तरुणींनी प्रभूच्या मळ्यात कार्य
करण्यासाठी स्वखुशीने पुढे यावे, तसेच ज्या तरुण तरुणींनी
देवाच्या पाचारणाला होकार दिला आहे अशा सर्वांना ऐहिक मोहांपासून परमेश्वराने
अलिप्त ठेवावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे युवक युवती
देवापासून दूर गेलेले आहेत, त्यांना प्रभूचा स्पर्श
व्हावा व त्यांचे मनपरिवर्तन होऊन त्यांनी नैतिक मार्गावर चालावे म्हणून आपण
प्रार्थना करूया.
४. ह्या पवित्र
मंदिरामध्ये जमलेल्या आपल्या सर्वांना प्रभूने चांगले आरोग्य द्यावे व ख्रिस्ताचे
शिष्य खरे सेवक बनून देवाच्या इच्छेला प्राधान्य द्यावे म्हणून आपण प्रार्थना
करूया.
५. थोडा वेळ शांत
राहून आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment