Reflection for the 6th Sunday in Ordinary Time (16/02/2025) By Br. Reon Andrades
सामान्य काळातील सहावा
रविवार
दिनांक: १६/०२/२०२५
पहिले वाचन - यिर्मया १७: ५ - ८
दूसरे वाचन - १ करिथ १५: १२, १६ - २०
शुभवर्तमान - लूक ६: १७, २० – २६
प्रस्तावना
आपण सामान्य
काळातील सहाव्या रविवारात पदार्पण करत आहोत. आजची उपासना आपणास देवावर विश्वास/
भरवसा ठेवण्यास आमंत्रण करत आहे. आजच्या पहिल्या वाचनात आपणास कळून येते की, जो देवावर व
त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतो तो मनुष्य जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा
हिरवागार व फलद्रूप होईल. तर दुसऱ्या वाचनात संत पौल आपणास संदेश देतो की, येशूचे
पुनरुत्थान झाले आहे, हेच सार्वकालिक सत्य आहे आणि
त्यावरती आपला विश्वास उभारलेला आहे.
आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त धन्यवाद व दुःख उद्गार आपल्या समोर मांडत आहे. जे दिन, भुकेलेले, रडणारे व येशू खातीर छळलेले ते धन्य कारण देवाचे राज्य त्यांचे आहे. परंतु जे धनवान आहेत, जे तृप्त आहेत , जे आज हसत व ज्यांची आज वाहवा होत आहे यांच्याविरुद्ध प्रभू येशू ख्रिस्त दुःख उद्गार काढत आहे. आपण देखील प्रभूच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवावा व आपण देखील आपल्या शेजाऱ्यांना सहानुभूती व गरजवंतांना मदत करण्याची प्रवृत्ती आपणामध्ये रुजावी म्हणून ह्या मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.
मनन
चिंतन
मनुष्याला आपली स्तुती
करायला आवडते. दुसऱ्यावरती वर्चस्व गाजवायला त्याला आनंद वाटतो. तो कमजोर आहे हे मानण्यास
किंवा इतरांना आपली कमजोरी दाखवण्यास त्याला हेवा वाटतो. ह्या कारणास्तव तो आपल्या
ताकदीचे प्रदर्शन करत असतो व त्याच्यामध्ये आनंद व गर्व करत असतो. आजच्या पहिल्या
वाचनामध्ये आपणासमोर यिर्मया या संदेष्टाने दोन प्रकारची माणसे ठेवली आहेत.
पहिल्या प्रकारची माणसे म्हणजेच जे मनुष्यबळावर भिस्त धरतात. ती
अशी माणसे मनुष्याच्या बळावर विश्वास ठेवतात व स्वतःच्या बळाने विजय मिळवण्याचा
प्रयत्न करतात. अशा माणसांची अंतःकरणे परमेश्वरापासून दूर असतात. ह्यास्तव त्यांची
परिस्थिती वैराण्यातल्या झुडूपासारखी होईल.
आपल्या समाजात अशा प्रकारची अनेक माणसे आहेत. अनेक देश स्वतःला
श्रेष्ठ मानतात व कमजोर देशाला दाबण्याचा प्रयत्न करतात. आज आंतरराष्ट्रीय
राजनीतीत आपणास (Geo Politics) पहावयास मिळतो. एक राष्ट्र आपल्या विरोधी
राष्ट्राला चारी बाजूंनी आपल्या सैन्याने घेरा घालतात, जेणेकरून युद्धाच्या
वेळी चारीबाजूने त्या राष्ट्रावर वार करता येईल.
दुसऱ्या प्रकारची माणसे म्हणजेच देवावर व त्याच्या सामर्थ्यावर
विश्वास ठेवणारी. मानवी बळ व योजना परमेश्वरी सामर्थ्यासमोर काहीही नाहीत.
परमेश्वर अशा लोकांचे स्वतः रक्षण करतो व त्यांना गरजेचे ते पुरवतो. म्हणून आपण
वाचतो की, ही माणसे
जलाशयाजवळ लावलेल्या झाडाप्रमाणे बहरतील. ही माणसे सदैव फळे देतील. त्यांना
परमेश्वर असताना चिंता करण्याची गरज भासणार नाही.
अनेक वेळेस आपण आपल्या शक्तीवर विश्वास ठेवून आपली व आपल्या
भविष्याची काळजी करत असतो. आपण आपल्या जीवनाचा ताबा परमेश्वराच्या हाती देत नाही.
दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल आपल्याला ख्रिस्तामध्ये असलेल्या आपला
विश्वास किती अचूक व खरा हे त्याच्या पुनरुत्थानाद्वारे हे सिद्ध झाले आहे. ह्याची
साक्ष आपणास मिळते. तो म्हणतो, जर का ख्रिस्त मरणातून उठला
नसता, तर आपला विश्वास
व्यर्थ असता. पण आता त्याचे खरोखर पुनरुत्थान झाल्याने आपला विश्वास ख्रिस्तामध्ये
निशंकोच व १००% खरा आहे. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाने आपल्या विश्वासाला शिक्कामोहर्त्तक
केला आहे.
आजच्या शुभवर्तमानात प्रभु येशू गरिबांना, भुकेल्यांना व दु:खी
लोकांना उंचावित आहे, तर श्रीमंत व तृप्त लोकांचा
तिरस्कार करत आहे/सावध करत आहे. लुक शुभवर्तमानकार परराष्ट्रीय लोकांसाठी प्रभुची सुवार्ता
लिहित आहे. आजच्या वाचनात आपण पाहिलं, तर आपणास कळून चुकेल की, १० व्या ओवीत आपण
वाचतो की, येशू
त्यांच्याबरोबर खाली उतरला. ह्याचा अर्थ असा की, इस्रायेली लोक
स्वतःला उंच मानायचे कारण ते देवाची निवडलेली प्रजा होती. परंतु शुभवर्तमानकार आपणास
सांगतो आहे की, येशू खाली उतरला, म्हणजेच परराष्ट्रीय
लोकांमध्ये उतरला. येशू इस्रायेली लोकांसाठी नव्हे, तर सर्वांसाठी
आला आहे. त्याचे राज्य सर्वांसाठी खुले आहे.
पुढे आपण वाचतो की, “येशू आपल्या शिष्यांकडे
दृष्टी लावून म्हणतो,” म्हणजेच खालील उपदेश येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना देत
आहे. आपणही आज त्याचे शिष्य आहोत. हा उपदेश/उद्गार आपणा सर्वांना लागू पडत आहे.
प्रभु म्हणतो, "जे दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे
राज्य त्यांचे आहे." दीन म्हणजे जे आर्थिक व आध्यात्मिकदृष्ट्या गरीब आहेत, जे स्वतःला नम्र
मानतात, ते दीन.
आज प्रभु येशू ख्रिस्त भुकेलेले व दुःखी लोक धन्य घोषित करत आहे.
त्यांना आशीर्वाद देत आहे, त्यांचे सांत्वन करत आहे व
त्यांना जीवनाची आशा देत आहे. त्यांना स्वर्गराज्यात प्रवेश देत आहे.
ज्यांचा छळ होत आहे, येशूच्या नावाने ज्यांची
चेष्टा उडवली जात आहे, ते धन्य, कारण ख्रिस्ताला
प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य त्यांचे आहे. आज आपल्या समाजात अशा लोकांची संख्या वाढत
आहे. आज श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब अधिक गरीब होत चालले आहेत. आपण
ख्रिस्ती लोकांचे कर्तव्य आहे की, आपण ह्या सर्व गोष्टीविषयी
संवेदनशील असणे गरजेचे आहे. आपण दीन असल्यास, भुकेलेले असल्यास व दुःखी असता
आशावादी जीवन जगले पाहिजे. परंतु जर आपण श्रीमंत, आनंदी व तृप्त असल्यास, आपली श्रीमंती
दुसऱ्यांसोबत वाटप करून, गरिबांना मदत करून एक संवेदनशील जीवन जगले पाहिजे.
आपली श्रीमंती, अहंकार व स्वार्थ आपल्याला देव व त्याची प्रजा ह्यांच्यापासून दूर नेता कामा नये. जर का श्रीमंतीमुळे आपल्याला देवापासून दूर जावे लागत असेल, तर आपण आपली मर्यादा ओळखली पाहिजे.
विश्वासू
लोकांची प्रार्थना
प्रतिसाद: हे परमेश्वरा, तुझ्या लोकांची
प्रार्थना ऐक.
१) आपले पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू व
व्रतस्थ ह्यांना देवाच्या वचनानुसार जीवन जगण्यास व प्रापंचिकांना मार्गदर्शन
करण्यास परमेश्वराने विवेकबुध्दी द्यावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२) प्रत्येक ख्रिस्ती
कुटुंबात शांती नांदावी, घरातील वातावरण खेळीमेळीचे
राहून, प्रार्थनेला अधिक
महत्त्व द्यावे, जेणेकरून ख्रिस्त हाच आपल्या कुटुंबाचा केंद्रबिंदू
होईल, ह्यासाठी आपण
प्रभू चरणी प्रार्थना करूया.
३) मादक पेये व मद्य यांच्या
आहारी गेलेल्या तरुण पिढीने व कुटुंबाच्या प्रमुखाने केवळ क्षणिक सुखाचा विचार करू
नये, तर आपल्या
जीवनाला नवे वळण लावण्याचा विचार करावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
४) सुखी जीवनाचा महामंत्र
परमेश्वराने आपणा सर्वांना आज दिला आहे. त्याने दिलेल्या वचनांवर आपले जीवन
विसंबून ठेवावे आणि जीवनांत आनंद उपभोगावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
५) आपल्या धर्मग्रामातील जे
कोणी शारीरिक व मानसिक आजाराने त्रस्त झाले आहेत, त्यांनी प्रार्थनेबरोबर
औषधोपचार व मानसोपचारही करावेत, म्हणून आपण प्रार्थना करूया.
६) आता आपल्या वैयक्तिक व
सामुहिक गरजांसाठी शांतपणे प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment