Wednesday, 12 March 2025

Reflection for the Second Sunday of Lent (16/03/2025) By Fr. Glen M. Fernandes

प्रायश्चित काळातील दुसरा रविवार

दिनांक:१/०३/२०२५

पहिले वाचन: उत्पत्ती १५:५-१२, १७-१८.

दुसरे वाचन: फिलीपकरांस पत्र ३:१७-४:१.

शुभवर्तमान: लूक ९:२८-३६.



प्रस्तावना

      आज आपण प्रायश्चित काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत. आजची पवित्र वाचने आपल्याला पवित्र आत्म्याच्या कार्याला प्रतिसाद देऊन आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणावे आमंत्रित करीत आहे, जेणेकरून ते आपल्या आत्म्याने भरलेल्या जीवनाद्वारे आपल्या सभोवतालच्या सर्वांवर रूपांतरित परमेश्वराचा गौरव आणि कृपा पसरवतील.

उत्पत्तीच्या पुस्तकातील पहिले वाचन आपल्याला सांगते की, देवाने आब्राहामची कशी परीक्षा घेतली देवाने आब्राहामला बोलावले आणि त्याला त्याच्या प्रिय पुत्र इसहाकला घेऊन जाण्याची आणि मोरियाच्या देशात त्याला दाखविल्या जाणाऱ्या डोंगरावर होमार्पण म्हणून अर्पण करण्याची आज्ञा दिली. परंतु अब्राहमचा विश्वास इतका दृढ होता की त्याने न घाबरता देवाची आज्ञा पाळली.

आजच्या दुस-या वाचनात, संत पौल आपल्या धर्माप्रती चिकाटी आणि निष्ठा यांबद्दल बोलतो. आपल्या जिवंत विश्वासाबरोबरच देऊळमातेच्या सुरुवातीच्या काळात खूप छळ झाला आणि अनेक धर्मांतरितांना आपला जीव गमावण्याची भीती होती. संत पौल श्रद्धेत टिकून राहण्याचे आवाहन करीत आहे.

आजच्या पवित्र शुभवर्तमानात आपण ऐकतो की कशाप्रकारे येशूचे रूपांतर झाले. प्रभू येशूच्या रूपांतराच्या घटनेचा एक प्राथमिक उद्देश म्हणजे, प्रभू येशूची दैवी ओळख त्याच्या शिष्याना प्रकट करणे.

आजची उपासना आपल्याला जीवनात जेव्हा संकटे किंव्हा त्रास होईल तेव्हा प्रभूवर अढळ श्रद्धा ठेवण्यास आमंत्रित करीत आहे.

मनन चिंतन

      आजचे पहिले वाचन आब्रामच्या परिवर्तनाचे वर्णन करते. आपण अब्राहमला, एका देवावर विश्वास ठेवणारा, विश्वासाचा पिता असे म्हणतो. आपण पवित्र बायबलमध्ये ऐकतो की कशाप्रकारे देवाने अब्रामचे नाव आब्राहममध्ये "रूपांतरित" केले. अब्राहमच्या विश्वासाचे आणि देवाच्या आज्ञापालनाचे बक्षीस म्हणून अब्राहमच्या कुटुंबासह देवाचा पहिला करार केला.  उत्पत्तीच्या पुस्तकातील आजचे पहिले वाचन आपल्याला सांगते की देवाने अब्राहामची कशी परीक्षा घेतली. देवाने अब्राहामला बोलावले आणि त्याला त्याच्या प्रिय पुत्र इसहाकला घेऊन जाण्याची आणि मोरियाच्या देशात त्याला दाखविल्या जाणाऱ्या डोंगरावर होमार्पण म्हणून अर्पण करण्याची आज्ञा दिली. परंतु आपण पाहतो की अब्राहमचा विश्वास इतका दृढ होता की त्याने न घाबरता देवाची आज्ञा पाळली आणि पहाटे तो डोंगराकडे निघाला. त्याने होमार्पणाचे लाकूड घेतले आणि त्याचा मुलगा इसहाक याच्यावर ठेवले. ते डोंगरावर चढत असताना, देवाने दाखविलेल्या ठिकाणी अब्राहाम आला तेव्हा त्याने तेथे एक वेदी बांधली आणि लाकूड व्यवस्थित ठेवले. मग त्याने आपला मुलगा इसहाक याला बांधून वेदीवर लाकडावर ठेवले. जेव्हा अब्राहाम आपल्या मुलाचा बळी देण्याच्या तयारीत होता, तेव्हा परमेश्वराच्या देवदूताने त्याला स्वर्गातून बोलावले आणि त्याला सांगितले की त्या मुलावर हात ठेवू नकोस  किंवा त्याचे कोणतेही नुकसान करू नको. अब्राहामाच्या विश्वासाची कसोटी घेण्यात आली होती आणि देवाला त्याच्या कृतींवरून कळले होते की त्याच्याकडे प्रामाणिक, आज्ञाधारक हृदय आहे. अब्राहामाने शेवटपर्यंत देवाची आज्ञा पाळली. प्रभूच्या देवदूताने अब्राहामाला त्याच्या मुलाचा बळी देण्यापासून थांबवल्यानंतर, अब्राहामाला एक मेंढा झाडात अडकलेला दिसला. त्याने ते प्राणी घेतले आणि त्याच्या मुलाऐवजी होमार्पण म्हणून अर्पण केले. त्याच्या आज्ञाधारकतेच्या प्रत्युत्तरात देवाने अब्राहामला वचन दिले की त्याने आपल्या एकुलत्या एक मुलाला रोखले नाही म्हणून त्याला आशीर्वादित केले जाईल, त्याचे वंश आकाशातील ताऱ्यांसारखे आणि समुद्रकिनाऱ्यावरील वाळूसारखे असंख्य होईल आणि सर्व राष्ट्रांना त्याच्या कुटुंबात आशीर्वाद मिळेल.

       आजच्या दुस-या वाचनात, संत पौल आपल्या धर्माप्रती चिकाटी आणि निष्ठा यांबद्दल बोलतो. देऊळामातेच्या सुरुवातीच्या काळात अनेक अशा संकटाना ख्रिस्ती भाविकांना सामोरे जावे लागले. अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेकजणांना समाजातून बहिष्कृत करण्यात आले. त्यामुळे अनेक भाविक आपल्या श्रद्धेत डळमळत होते. या समस्येला संबोधित करताना, संत पौलने पवित्र लोकांना सांगितले की जर देव आपल्यासाठी असेल तर कोणीही आपल्या विरोधात राहू शकत नाही. हे स्पष्ट आहे की देव ख्रिश्चनांच्या बाजूने होता आणि इतर पाखंडी व क्रूर लोकांना घाबरण्यासारखे काहीही काम नाही.संत पौल ख्रिश्चनांना सांगतो की देवाने त्याच्या एकुलत्या एक प्रिय पुत्राचे अंतिम बलिदान आपल्या फायद्यासाठी दिले. म्हणूनच देव त्याच्या पुत्रावर खूप प्रसन्न आहे, कारण आपल्यावर देवाचे प्रचंड प्रेम दाखवण्यासाठी येशूने आपले जीवन मुक्तपणे अर्पण केले. आता पवित्र देवपिता येशूसोबत ख्रिश्चनांना त्यांच्या सर्व गरजा पुरवेल. आपल्या बाजूला येशू असल्यामुळे कोणीही आपल्याला ख्रिस्ताच्या प्रेमापासून वेगळे करणार नाही. येशूने आपल्या पापांसाठी परिपूर्ण यज्ञ केले व आपला बळी दिला. ख्रिस्त येशू आपल्यासाठी मरण पावला आणि मेलेल्यांतून उठवला गेला. तो आपल्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी देव पित्याच्या उजवीकडे आहे. त्यामुळे आम्हाला घाबरण्याचे कारण नाही.  जे लोक त्यांच्या जिवंत विश्वासात टिकून राहतात त्यांच्यासाठी, स्वर्गीय पित्यासमोर त्यांचे नीतिमत्व सुरक्षित करण्यासाठी येशूने देवाच्या कोकऱ्याप्रमाणे प्रायश्चित केले. यासह त्रास, संकट, छळ, दुष्काळ, किंवा नग्नता,ह्यांना ख्रिस्ती मनुष्य भिऊ शकत नाही, कारण ख्रिस्ताचे प्रेम चिरंतन आहे. जरी आपण या भौतिक जीवनात तात्पुरते दुःख भोगू शकतो, परंतु ख्रिस्तामध्ये आपली जिवंत आशा आपल्याला अनंत काळाच्या जीवनासाठी मार्ग दर्शविते.

       आजच्या पवित्र शुभवर्तमानात आपण ऐकतो की कशाप्रकारे प्रभू येशूचे रूपांतर झाले. हे प्रभू येशूचे रूपांतर का झाले? त्याचा उद्देश काय होता? प्रभूने फक्त तीनच शिष्य का घेतले होते? मोशे व एलीया हे का प्रकट झाले? असे अनेक प्रश्न आपल्याला पडू शकतात. प्रभू येशूच्या पर्वतावरील रूपांतराच्या घटनेचा एक प्राथमिक उद्देश हा होता की, शिष्याना प्रभू येशूची दैवी ओळख प्रकट करणे. हे येशूने शिष्यांना सांगितल्यानंतर लगेच घडते की त्यांच्या राजकीय आणि धार्मिक नेत्यांकडून त्याला नाकारले जाईल आणि तिसऱ्या दिवशी उठण्यापूर्वी त्याला दुःख भोगावे लागेल आणि मरावे लागेल. हे स्पष्ट आहे की शिष्यांना हा एक भयानक धक्का होता. मसिहाबद्दलची त्यांची जी समजूत होती की तो इस्राएलच्या सर्व शत्रूंना पराभूत करणाऱ्या गौरवशाली राजाची होती. मसिहाला नाकारले जाईल व स्वतःच्या लोकांच्या हातून दु:ख सोसून तो मरेल अशी कल्पनाही त्यांना करता येत नव्हती. म्हणून प्रभूचे रूपांतर हा ऐक विशेष अनुभव आहे, जेणेकरून प्रभूची खरी ओळख शिष्याना पटेल. आपला प्रभू कोण आहे हे त्यांना भविष्यात समजेल. प्रभुने आपल्या रूपांतरासाठी व शिष्याच्या अनुभवासाठी फक्त तिघांना निवडले. ह्यावरून असे दिसते की या तीन शिष्यांना, पेत्र, याकोब व योहान  यांना खऱ्या येशूची झलक त्यांना पुढील अवघड दिवसांतून मदत करण्यासाठी दिली आहे. खरे तर हे तिन्ही शिष्य त्यांच्या सेवाकार्यातील प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी उपस्थित होते. हे प्रभूचे रूपांतर डोंगरावर झाले  हे योग्य आहे, कारण हे एक पारंपारिक स्थान आहे जिथे देवाची उपस्थिती विविध मार्गांनी प्रकट होते. येशूने शिष्यांना एका निर्जन डोंगरावर आणले. परंपरेने त्या पवित्र डोंगराला ताबोर म्हणून ओळखले जाते. पर्वत हे पारंपारिकपणे देवाचे स्थान आहे. मोशेने सीनाय पर्वताच्या शिखरावरून देवाचे नियम आपल्या लोकांना दिले. येशू, ज्याला नवीन मोशे संबोधले जाते त्याने नवीन नियमशास्त्र डोंगरावरून दिले. येशूचे रूपांतर झाले होते आणि त्याचे कपडे  चमकदार पांढरे झाले.

       संत योहान त्याच्या शुभवर्तमानात लिहितो की त्यांनी देवाच्या एकुलत्या एक पुत्राचा गौरव पाहिला होता. त्यांच्यासाठी हा प्रभू येशूच्या देवत्वाचा आणि मसिहाच्या भूमिकेचा पुरावा होता. त्यांच्या गुरूच्या वैभवाने पूर्णपणे प्रभावित झालेल्या तीन शिष्यांना हे सर्वकाळ चालू राहावे अशी इच्छा होता. त्यांच्यासाठी हा सर्व शब्दांपलीकडचा अनुभव होता. त्यांच्यासाठी रूपांतर हे केवळ बाह्य बदलापेक्षा जास्त होते. कायदा आणि संदेष्ट्यांची उपस्थिती येशूला जुन्या कराराची पूर्तता करते. त्यांच्यासाठी हे समजणे सोपे नव्हते आणि प्रभूच्या पुनरुत्थानानंतरच ते रहस्य पूर्णपणे समजून घेण्यास सक्षम बनले. एलीया आणि मोशे प्रभूचे रूपांतर झाले तेव्हा ते उपस्थित होते आणि येशूशी संभाषण करत होते. ते एकत्रितपणे देवाच्या लोकांच्या संपूर्ण परंपरेचे प्रतिनिधित्व करतात. अशा परिस्थितीत येशू येथे दैवी प्रकटीकरणाची परिपूर्णता म्हणून प्रकट झाला होता.

       पवित्र मिस्सामधील "रूपांतर" हे आपल्या सामर्थ्याचे स्त्रोत आहे. प्रत्येक पवित्र मिस्सामध्ये, आपण वेदीवर दिलेली भाकर आणि द्राक्षारस वधस्तंभावर खिळलेल्या, उठलेल्या आणि गौरवलेल्या येशूच्या जिवंत शरीरात आणि रक्तामध्ये "रूपांतरित" होतात. ज्याप्रमाणे येशूच्या रूपांतराने प्रेषितांना त्यांच्या परीक्षेच्या वेळी बळकटी दिली, त्याचप्रमाणे प्रत्येक पवित्र मिस्सामध्ये आपले नूतनीकरण व्हायला हवे. प्रत्येक वेळी जेव्हा आपण एक पवित्र संस्कार प्राप्त करतो तेव्हा आपले रूपांतर होते: उदाहरणार्थ, बाप्तिस्मा आपल्याला देवाचे पुत्र आणि कन्या आणि स्वर्गाचे वारस बनवते . दृढीकरण आपल्याला पवित्र आत्म्याचे मंदिर आणि देवाचे योद्धे बनवते. कुमसार या संस्काराने, देव पाप्याला पवित्रतेच्या मार्गावर परत आणतो. प्रभूचे रूपांतर आपल्याला प्रोत्साहन करते आणि आशेचा संदेश देते. संशयाच्या क्षणी आणि निराशेच्या  गडद क्षणांमध्ये, स्वर्गातील आपल्या रूपांतराचा विचार आपल्याला देवापर्यंत पोहोचण्यास आणि त्याचे सांत्वन करणारे शब्द ऐकण्यास मदत करतात की : "हा माझा प्रिय पुत्र आहे." त्याचा वधस्तंभ वाहून नेण्यात आपण पवित्र प्रायश्चित काळात सहभागी होऊया जेणेकरून आपण त्याच्या रूपांतराच्या वैभवात सहभागी होऊ शकू. आम्हाला आमच्या जीवनात "पर्वतावरील अनुभवांची" गरज आहे.  जेव्हा आम्ही ह्या पवित्र काळात  प्रार्थनेसाठी जास्त वेळ घालवतो तेव्हा आम्ही पेत्र , याकोब व योहान ह्यांच्याप्रमाणे प्रभूच्या पर्वत-माथ्यावरील अनुभवात सहभागी होतो.


विश्वासू लोकांची प्रार्थना

प्रतिसाद: ‘हे प्रभू तुझ्या पवित्र लोकांची प्रार्थना ऐक ’.

१. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, सर्व महागुरू, धर्मगुरू व व्रतस्थ बंधूभगिनी जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करतात, त्यांची श्रद्धा बळकट व्हावी व इतरांची श्रद्धा त्यांनी बळकट करावी म्हणून आपणा प्रार्थना करूया.

२. जे तरुण-तरुणी देवापासून दूर जाऊन अंधारात भरकटत आहेत, त्यांना प्रभूच्या प्रकाशात मार्गक्रमण करावे व जागतिक मोह सोडून प्रभूच्या प्रेमाकडे वळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. आपल्या देशातील सर्व नेत्यांवर व अधिका-यांवर परमेश्वराचा आशिर्वाद असावा, त्यांना सत्याने आणि न्यायाने राज्यकारभार करण्यास परमेश्वराने मदत करावी तसेच सर्व वाईट वृत्तींपासून  त्यांना दूर ठेवून चांगल्या मार्गावर चालण्यास सहकार्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. आपल्या धर्मग्रामात जे दु:खीत, पिडीत आहेत, तसेच जे असाध्य आजाराने पछाडलेले आहेत त्यांना परमेश्वरी कृपेचा अनुभव यावा व नवजीवनाची वात त्यांना दिसावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजा प्रभूचरणी मांडूया.

No comments:

Post a Comment