Reflection for the Fourth Sunday of Easter (11/05/2025) By Br. Criston B. Marvi
पुनरुत्थान काळातील चौथा रविवार
दिनांक: ११/०५/२०२५
पहिले वाचन: प्रेषित. १३: १४, ४३-५२
दुसरे वाचन: प्रकटीकरण ७:९, १४ब-१७
शुभवर्तमान: योहान १०:२७-३०
प्रस्तावना
ख्रिस्ताठीयी
जमलेल्या प्रिय भाविकांनो आज आपण पुनरुत्थान काळातील चौथा रविवार साजरा करत आहोत.
आजचा रविवार हा उत्तम मेंढपाळ रविवार म्हणून ओळखला जातो. आजच्या सर्व वाचनात आपण वाचतो
की, येशुख्रिस्त हा उत्तम मेंढपाळ आहे, जो त्याच्या प्रजेला त्याच्या कळपात ठेवतो.
येशुख्रिस्त हा उत्तम मेंढपाळ आहे, जो त्याच्या मेंढरांना ओळखतो व त्याची मेंढरे त्याची
वाणी ऐकतात.
आजच्या रविवारी पवित्र ख्रिस्तसभा
आपल्याला पाचारणासाठी प्रार्थना करण्यास बोलावत आहे. आपणा प्रत्येकाला देवाच्या हाकेवर
किंवा पाचारणावर मनन चिंतन करण्यास सांगत आहे. कुटुंब हेच पाचारणाचे पेरणी शेत
आहे. जिकडे पाचारणारुपी बियांना पालवी फुटते.
म्हणून आज या ख्रिस्तयागात
सहभागी होत असताना पाचाराणासाठी विशेष प्रार्थना करूया.
बोधकथा
एक माणूस होता. त्याच्याजवळ
भरपूर मेंढरे होती. हि मेंढरे चारायला त्यांने नोकर ठेवले होते. जेव्हा-जेव्हा
त्याचे नोकर संध्याकाळी मेंढरे घेऊन घरी येत असत तेव्हा एक - दोन मेंढरे हरवलेली
असत. हे असं दर-दिवस व्हायला लागलं. जेव्हा मालक त्याच्या नोकरांना हरवलेली मेंढरे
आणायला सांगायचा तेव्हा ते नोकर जात नसत. कारण ते जंगली प्राण्यांना घाबरत असत.
परंतु तो मालक त्याच्या मेंढरावर भरपूर प्रेम करत असे. मग त्यांने एके दिवशी विचार
केला की, जर का मी मेंढरांना आणायला गेलो तर ते मला ओळखणार नाही. कारण त्यांनी मला
कधीच पाहिले नाही. परंतु ते माझ्या नोकरांना ओळखतील. पण नोकर जायला तयार नाही. तर
मी एक युक्ती करणार. मी त्यांच्यासारखा एक होणार. मग त्यांनी मेंढीची लोकर
त्याच्या अंगावर चढवली आणि त्या मेंढरांमध्ये प्रवेश केला. त्या मेंढरांना वाटले
की, हे आपल्यासारखाच एक मेंढरू आहे. मग ती सर्व मेंढरे त्याच्या मागे गेली. आणि
अशा रीतीने त्यांने त्या सर्व मेंढरांना वाचवले.
तो मालक मेंढी नव्हता तर एक
माणूस होता. परंतु त्या हरवलेल्या मेंढरांना शोधण्यासाठी त्याने मेंढरांचे रूप
धारण केले. येशू ख्रिस्त हा देव आहे परंतु मानवाला वाचवण्यासाठी त्याने मानव रूप
धारण केले.
मनन
चिंतन
आजची वाचणे आपल्याला देवाची वाणी
ऐकण्याविषयी सांगत आहेत. पहिल्या वाचनात आपण ऐकले की "शब्बाथ दिवशी बहुतेक
सर्व नगर देवाचे वचन ऐकायला जमले". दुसऱ्या वाचनात आपण पाहिले की "मोठा
लोकसमुदाय राजस्थानासमोर उभा राहिलेला दृष्टीस पडला". आणि शुभ वर्तमानात आपण
पाहिले की, "मेंढरे देवाचे वाणी ऐकतात".
प्रिय भाविकांनो ऐकणे हे देवाचे एक दान आहे. व ही ऐकणे कला सुद्धा आहे.
आपल्यामध्ये काहीजण ऐकू शकत नाही. कारण त्यांना ते दान प्राप्त झाले नाही. आणि
काहीजण ऐकूण आत्मसात करू शकत नाही. कारण त्यांच्या अंगात ती कला नाही. म्हणून आपण
म्हणू शकतो की, ऐकणे हे एक देवाचे दान आहे व हि एक कला सुद्धा आहे.
आपण आपल्या आजूबाजूला पाहतो
की, वेगवेगळ्या
प्रकारचे आवाज आपल्याला ऐकू येतात. उदाहरणार्थ कुटुंबामध्ये नवरा – बायकोचा, मुलांचा
- आई-वडिलांचा आवाज, तदनंतर आकाशवाणीचा आवाज, व टीव्हीचा आवाज, नोकरीला जाणाऱ्यानां
त्यांच्या मॅनेजरचा आवाज. ह्या सर्व आवाजामध्ये आपण एखाद्याचा आवाज बरोबर ओळखून
सांगतो की, कोणता आवाज आपल्या चांगल्यासाठी व वाईटासाठी आहे.
मेंढरे सहजतेने मेंढपाळाचा
आवाज ओळखतात आणि त्याच्या मागे जातात. मेंढपाळाला त्याची मेंढरे ठाऊक असतात व तो
त्यांना चांगलाच ओळखतो. म्हणूनच आपले स्वर्गीय पोप फ्रान्सिस यांनी उद्गारलेले
शब्द आहेत: "मेंढपाळाला मेंढरांचा वास आला पाहिजे".
येशू हा उत्तम मेंढपाळ आहे.
मेंढपाळ आपल्या मेंढरांची जीवापाड काळजी घेतो. कारण त्यांची सुरक्षा व्हावी. जे
त्याच्यावर विश्वास ठेवतात त्या सर्व मेंढरांना सर्वकालिक जीवनाचे आणि त्यांच्या
सुरक्षेचे वचन येशू ख्रिस्त आज आपल्याला देतो. जेणेकरून ह्या जगातील कोणतीच शक्ती
त्यांच्यावर राज करणार नाही. पुनरुत्थान काळात आपण येशूचा मरणावर विजय साजरा करतो.
येशू ख्रिस्ताकडे मरणावर विजय मिळवण्याची शक्ती असल्यामुळे ह्या जगातील कोणतीच
शक्ती त्याच्या मेंढरांना त्याच्यापासून दूर करू शकत नाही.
परंतु येशू ख्रिस्त हा आपल्याला
मेंढराची उपमा कशासाठी देतो? मेंढरू हा एक शांत व नंम्र प्राणी आहे. आपण सर्वजण
येशूची मेंढरे आहोत आणि येशू ख्रिस्त हा आपला उत्तम मेंढपाळ आहे, जो आपल्यासाठी
देव असून मानव झाला. जेणेकरून आपण सर्वांनी त्याची वाणी एकूण आपणा सर्वांचे तारण
व्हावे. उत्तम मेंढपाळ हा सर्व मेंढरांच्या पुढे असतो. तो मागे राहत नाही.
जेणेकरून जेव्हा तो आवाज देणार तेव्हा त्याची मेंढरे त्याचा आवाज ऐकणार आणि
त्याप्रमाणे चालणार. येशू ख्रिस्त तो मेंढपाळ आहे जो त्या मेंढरांच्या कल्पात
राहतो, त्यांच्यासोबत चालतो आणि प्रत्येक मेंढराला ओळखतो. ह्या मेंढपाळाला बरोबर
माहित आहे की कोणते मेंढरू त्याच्यापासून दूर जाऊ शकते. म्हणून तो अशा प्रकारच्या
मेंढरांवर जास्त लक्ष ठेवतो.
प्रिय भाविकांनो आजच्या ह्या
पवित्र ख्रिस्तयागात सहभागी होत असताना आपण विचारूया की, माझ्याकडे ऐकण्याचे दान
आहे का? आणि जर असेल तर जे मे ऐकतो, ते आत्मसाद करण्याची कला माझ्यात आहे का? मी देवाचे वचन
ऐकतो का? आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो का? देव आपल्याला
नेहमी बोलावत असतो परंतु आपण देवाची वाणी न ऐकता आपले स्वतःचं ऐकून जे नाही करायचं
तेच करत असतो. म्हणून आजच्या दिवसात आपण विशेष प्रार्थना करूया की, येशू ख्रिस्त
हाच माझा उत्तम मेंढपाळ आहे आणि त्याचा आवाज मी नेहमी ऐकण्याचा प्रयत्न करणार आणि
त्याप्रमाणे वागण्याचे वचन देऊ या.
विश्वासू
लोकांची प्रार्थना
प्रतिसाद: “हे प्रभो, तुझ्या
मेंढरांना तुझे साहाय्य दे.”
१. ख्रिस्तसभेचे
अधिकारी पोप महाशय, महागुरू, धर्मगुरू, धर्म-भगिनी व
सर्व प्रापंचिक ह्या सर्वांना चांगले आरोग्य लाभावे व त्यांच्या कार्यावर प्रभूचा
आशिर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जो ख्रिस्त
आपल्या सर्व मानवजातीच्या पापांसाठी मरण पावला व जिवंत होऊन सर्वाना नवजीवन दिले
तो ख्रिस्त मेंढपाळ आपणाला अधिक पवित्र बनवण्यास धैर्य व शक्ती देवो म्हणून आपण
प्रभूकडे प्रार्थना करुया.
३. जी मेंढरे
मेंढपाळाची वाणी ऐकत नाही आणि जी माणसे मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे बहकलेले
आहेत. अशांना परमेश्वराच्या मदतीने सन्मार्गावर चालण्यास कृपा व शक्ती मिळावी
म्हणून आपण प्रार्थना करुया.
४. जी कुटूंबे वेगळी
झाली आहेत. जेथे प्रेम, शांती व दया नाही अशा
कुटुंबात प्रेम, शांती व दया प्रस्थापित व्हावे म्हणून आपण प्रार्थना
करूया.
५. हे प्रभू येशू, तूच उत्तम
मेंढपाळ आहेस. आज आपण इथे एकत्रीत जमलो असताना आपण स्वत:साठी न जगता इतरांसाठी
जगावे व आपले जीवन कृपेने भरलेले असावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. आता आपण थोडावेळ
शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment