Wednesday, 15 January 2014



Reflections for Homily by:- Cajeten Pereira









सामान्य काळातील दुसरा रविवार
दिनांक :- १९/०१/२०१४
पहिले वाचन: यशया; ४९:३, ५-६.
दुसरे वाचन: १करिथीकरास पत्र; १:१-३.
शुभवर्तमान:योहान १: २९-३४.

''पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा !''

प्रस्तावना:

आजची उपासना बाप्तिस्मा स्विकारलेल्या प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीची दैनंदिन जीवनातील भूमिकेविषयी स्पष्टीकरण देते. ख्रिस्ताठायी बाप्तिस्मा स्विकारलेल्या प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने आपल्या शब्दाने व वृत्तीने ख्रिस्ताचा प्रकाश जगात पसरविला पाहिजे. संपूर्ण राष्टांचा प्रकाश होऊन, परमेश्वराकडून होणारे तारण दिगंतापर्यत नेण्यासाठी परमेश्वराने इस्त्राएली लोकांना कसे पाचारण दिले हे आपण आजच्या पहिल्या वाचनात पाहतो तर आजच्या दुस-या वाचनात संत पौल, येशूचे नाव जगजाहीर करण्याच्या आपल्या कार्याचे प्रकटीकरण करतो.
आजच्या शुभवर्तमानात आपण दोन प्रकारचे बाप्तिस्मा पाहतो. योहानाने पाण्याने दिलेला बाप्तिस्मा आपल्याला मुळ पापापासून शुध्द करतो, तर येशूने पवित्र आत्माद्‌वारे दिलेला बाप्तिस्मा आपल्याला नव-जीवन देतो. पापाच्या अंधकारातून सार्वकालिक प्रकाशात आणण्यासाठी येशू स्वत: जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरू बनला.
आपल्याला लाभलेल्या ख्रिस्ताचा सार्वकालिक प्रकाश इतरांपर्यंत पोहचविता यावा म्हणून परमेश्वराकडे सामर्थ्य व कृपा मागूया.

पहिले वाचन:

बाबेलच्या बंदिवासात असताना इस्त्राएली लोक देवाची निवडलेली प्रजा म्हणून असलेल्या आपल्या ओळखीबद्‌दल गोधंळून गेले. अशावेळी यशया संदेष्टा इस्त्राएली लोकांना देवाने दिलेल्या सुवर्णसंधीचे खात्रीपूर्वक आश्वासन देतो. देव आपल्या निवडलेल्या प्रजेमध्ये रमताना, त्याच्याकडून अशी अपेक्षा बाळगतो की, परराष्टीयासमोर त्यांनी प्रकाश व्हावे.

दुसरे वाचन:

आजचे दुसरे वाचन आपणाला मंदिराविषयी स्पष्टीकरण देते. पौल म्हणतो, करिंथ येथील देवमंदिर; ते करिंथचे मंदिर नव्हते तर देवाचे मंदिर होते. तसेच प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती देवमंदिराचा अविभाजक घटक होता. ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानाने ख्रिस्ती व्यक्तीला पवित्र व अभिषिक्त बनविले. येशू ख्रिस्त संपूर्ण मानवजातीच्या तारणासाठी भूतलावर आला म्हणून ख्रिस्त सर्वांचा आहे व सर्वंजण ख्रिस्ताचे आहेत. त्यामुळे येशू ख्रिस्ताचे नाव जगाच्या  अंतापर्यंत पसरविले पाहिजे.

सम्यक विवरण:

योहानाने येशूकडे पाहून म्हटले, ''हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!''(योहान; १:२९). ह्या वाक्याचे स्पष्टीकरण योहानाच्या इतर संदर्भावर आधारून करावयास हवे. येशू ''पापे हरण करण्यासाठी प्रगट झाला''(१योहान; ३:५). तो, ''आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनीतीपासून शुध्द करील''(१योहान; १:९). तो केवळ आपल्याच पापाबद्‌दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापाबद्‌दल प्रायश्चित करेल(१योहान; २:२९). येशूचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शूध्द करिते (१योहान; १:७). तसेच जुन्या करारात यशया संदेष्टाच्या पुस्तकात दु:खभोग सेवकाची प्रतिमा बघावयास मिळते. अर्पणास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणा-यापुढे गप्प राहणा-या मेंढराप्रमाणे, तो गप्प राहिला... त्याच्या जिवाचे दोषार्पण केले... कारण त्याने बहुताचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली(योहान; १३:७,१०,१२). तसेच इस्त्राएलचा (मिसर देशातील) गुलामगिरीतून मुक्तता करणारा वल्हाडणाचा यज्ञपशू म्हणूनही प्रतिक आहे (निर्गम 12:46, गणना.9:12, १करिथीकरास पत्र;5:7-8).

शुभवर्तमानामध्ये कोकरू तीन महत्त्वाच्या बाबीचे प्रतिक आहे. सौम्यता, यज्ञ व विजय.

अ. कोकरू सौम्यतेचे प्रतिक:
कोकरू सौम्य व निरपराध प्राणी आहे. तो इतका निष्पाप आहे की कसाईचा हात जो त्याला मरण्यासाठी उठतो तोसुध्दा चाटतो. येशू सुध्दा नम्र व सौम्य माणूस आहे. मत्तयलिखित शुभवर्तमानात येशू म्हणतो, ''माझ्यापासून शिका कारण मी मनाने लीन व सौम्य आहे''(मत्तय; १९:२९). येशू यिर्मया संदेष्टाच्या वधावयास नेलेल्या सौम्य कोकरासारखा आहे(यिर्मया; ११:१९), तो आपल्या मारेकरांसाठीसुध्दा मरण पावला.

ब. कोकरू यज्ञपशूचे  प्रतिक:
जेव्हा योहानाने येशूला देवाचा कोकरा म्हणून संबोधिले, तेव्हा त्याचे मन जुन्या करारातील वल्हांडणाच्या यज्ञपशूच्या प्रतिमेने भरले. त्याला दररोज सकाळ-संध्याकाळी अर्पण केलेला यज्ञपशूची आठवण झाली, तसेच त्याला आब्राहामाला यज्ञासाठी मुलाऐवजी देवाने दिलेल्या  कोकराप्रमाणे (मेंढराप्रमाणे)(उत्पत्ती; २२:८) येशू हा सुध्दा देवाने आपल्यासाठी दिलेला परिपूर्ण कोकरू असलेल्याची आठवण झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वल्हांडणाचा कोकरू इस्त्राएलला मिसर देशातून मिळालेल्या मुक्ततेचे, पापक्षमेचे प्रतिक होते. येशूचा यज्ञ सर्व प्रकारच्या प्राचीन यज्ञाचा पूर्तता होता.

क. कोकरू विजयाचे प्रतिक:
यहुदा मक्काबीच्या काळात शिंग असलेले कोकरू विजयाचे प्रतिक बनले. शमुवेल, दावीद व शलमोनाप्रमाणे मक्काबीचे वर्णन शिंग असलेला कोकरा म्हणून केलेले आहे. जेव्हा येशूला देवाचा कोकरा म्हणून संबोधिले तेव्हा तो सैतानावर व पापावर विजय मिळविलेला शिंग असलेला कोकरू बनला.  हा विजयी कोकरू देवाच्या प्रजेची दुष्ट शत्रूपासून मुक्तता करतो व त्यांना देवराज्यात घेऊन जातो. जेथे तो त्याच्यांवर सत्ता गाजवितो. येशू देवाचा कोकरू सौम्य, आधारात्मक व विजयी आहे. तो त्याच्या पवित्र रक्ताने आपणाला शुध्द करतो व त्याचा विजय आपणाबरोबर वाटतो.

बोध कथा:

१. बालपणापासून आनंदीमय प्रेमळ वातावरणात वाढलेले दोघे भाऊ सॅम व जॉय एकमेकावर अतोनात प्रेम करायचे, परंतू संपत्ती व जमीन वाटपावरून दोघात राग, द्वेष व भांडण सुरू झाले. प्रेमाने राहणारे सॅम व जॉय आता एकमेकांचे तोंड बघण्यास तयार नव्हते. दोघातील वैर इतक्या विकोपाला पोहचले की असह्य त्रासाला वैतागून सॅम आपल्या सासरवाडी राहावयास निघून गेला परंतू मानसिक त्रासापासून सॅम दूर पळू शकला नाही. शेवटी पत्नीच्या सल्ल्यानूसार काही काळ प्रार्थनेत व शिबिरात घालविल्यानतंर सॅमला कळून चुकले की, निष्पाप असूनही ख्रिस्त आपल्याला पापमूक्त करण्यासाठी वधस्तंभी मरण पावला व जर आपण दुस-याकडू आपल्या पापाची व चूकेची क्षमा मागितली तर  आजही ख्रिस्त आपल्याला आपल्या पापाची क्षमा करण्यास उत्सूक आहे. आनंदाने सॅम मिठाईची पेटी घेऊन जॉयच्या घरी गेला व मिठाईची पेटी जॉयला भेट दिली व त्याच्याकडून क्षमा मागितली.
जॉयने सॅमकडे एक तिरस्काराची दृष्टी टाकली व ती पेटी त्याच्या तोडांवर फेकून दिली. दुस-या व तिस-या दिवशी सुध्दा हाच प्रकार घडला चौथ्या दिवशी मात्र जॉयने सॅमला आपल्याकडे हसत मुखाने येताना पाहिले तेव्हा जॉयचे हृदय हळहळले, डोळ्यातून अश्रूची धारा वाहू लागली. धावत जाऊन त्याने सॅमला  मिठी मारली व क्षमा मागितली. सॅमलाही आपले अश्रू आवरता आले नाही. दोघांनीही एकमेकाची क्षमा मागितली व क्षमा केली. दोघांनाही जगाची पापे दूर करणारा कोकरू एकमेकांत दिसला होता.

२. एक व्यक्ती शोरूमच्या काचा साफ करत होता जेणेकरून शोरूममधील वस्तू बाहेरील व्यक्तीला स्पष्ट दिसाव्यात. तो व्यक्ती काळजीपूर्वकपणे काच स्वच्छ करीत होता, तरीही एक डाग कितीही साबण व पाणी लावला तरी निघत नव्हता. खूप प्रयत्न केल्यानंतर त्या व्यक्तीच्या लक्षात आले की, तो डाग आतमधून होता. त्याने आतमधील व्यक्तीला इशारा करून तो डाग काढण्यास सांगितला. आत्म्याला लागलेला पापाचा डाग आतमधून म्हणजेच येशूचा पवित्र रक्ताने व ख-या मनपरिवर्तनानेच काढता येतो, बाहयकृतीने नव्हे.

मनन-चिंतन:

१:    केवळ देवच आपल्याला पापमुक्त करू शकतो; आपल्या पापाची क्षमा करू शकतो. म्हणूनच देवाने स्वत:च्या पुत्राला, कोकराला मानवाची पापे पदरी घेण्यास भूतलावर पाठविले. वधस्तंभी आपल्या प्राणाची आहूती देऊन निश्चितच ख्रिस्ताने आपल्याला पापमुक्त केले व जुन्या करारातील कोकराचा यज्ञबळी बदलून उंचाविला अश्याप्रकारे देवाने क्षमेची पूर्णता फक्त इस्त्राएली लोकांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला बहाल केली.  म्हणूनच मिस्साबलिदानात आपण म्हणतो, ''जगाचे पापे दूर करणा-या देवाच्या कोकरा...''.
ख्रिस्ताद्‌वारे देवाने मानवाबरोबर असलेले जिव्हाळ्याचे व ऐक्याचे नाते पुन्हा प्रस्थापित केले. जेव्हा आपण पापाच्या दडपणाखाली चिरडून जात आहोत; देवापासून,  इतरांपासून व स्वत:पासून अलिप्त होत आहोत व आपण तीव्र वेदना अनुभवतो तेव्हा जर आपण कळकळीने येशूकडे मदतीसाठी ओरडलो तर येशू आपल्या मदतीला धावून येतो. आपल्याला पापाची क्षमा करून प्रेम, दया, शांतीने भरून काढतो. येशूचे रक्त आपणाला पापमुक्त करते म्हणून ते पवित्र आहे असे नव्हे तर येशूचे रक्त पवित्र आहे म्हणून ते आपणाला पापमुक्त करते. संत पेत्र आपणाला ह्याची जाणीव करून देतो, ''वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून, 'सोने रूपे' अशा नाशवंत वस्तूनी नव्हे, तर निष्कलंक व निदौष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहा'' (१पेत्र; १:१८-१९).

.         आज जगात पुष्कळ सामुदायिक सुप्रसिद्ध संस्था, तसेच ख्यातनाम व्यक्ती चांगल्या जनसंपर्क अधिका-यांच्या शोधात आहेत कारण चांगला जनसंपर्क अधिकारी संकटसमयी आणीबाणीच्या वेळी संस्थेची प्रतिमा जनतेपुढे चांगल्या अवस्थेत ठेवण्यास मदत करतो.
बाप्तिस्मा करणारा योहान येशूचा उत्तम जनसंपर्क अधिकारी होता. तो येशूच्या खऱ्या व्यक्तीमत्वाविषयी बोलण्यास भयभित झाला नाही.  त्याने येशूकडे पाहून म्हटले ,"हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा, देवाचा कोकरा !" (जॉन :२९) अश्याप्रकारे योहान इतरांना येशूचा परिचय करून देतो. तसेच योहान साक्ष देतो की, येशु आपणा अगोदर अस्तित्वात होता देवाचा आत्मा त्याच्याठायी आहे येशु इतरांना आत्म्याने बाप्तिस्मा देईल .
आपले जीवनसुद्धा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानासारखे असले पाहिजे. येशूचे उत्तम जनसंपर्क अधिकारी बनून आपणसुद्धा भिता येशूविषयी इतरांना सांगितले पाहिजे  कारण ख्रिस्ताच्या रक्ताने आपल्याला पापमुक्त केले आहे आपणाला अभिषिक्त केले आहे म्हणूनच ख्रिस्त आपल्या जीवनाचा ध्येय उद्धिष्ट असला पाहिजे.  

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद : हे येशू आम्हाला प्रकाशमय बनव .
. आपले पोप महाशय, सर्व कार्डीनल्स, बिशप, धर्मगुरू धर्मभगिनि ह्यांनी अनुभवलेल्या ख्रिस्ताचा प्रकाश सर्व जगात पसरविण्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
. संत योहानाप्रमाणे आपण सर्वांनी येशूची खरी  ओळख जगाला आपल्या कृतीने शब्दाने प्रकट करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
. जे लोक देऊळ मातेपासून दुरावलेले आहेत त्यांनी जगाची पापे दूर करणाऱ्या देवाच्या कोकराला ओळखावे ख्रिस्ताच्या प्रकाशात त्यांचे मनपरिवर्तन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करू या .
. जे लोक दु:खी-कष्टी, आजारी आहेत त्यांना प्रभूच्या स्पर्शाने चांगले आरोग्य लाभावे त्यांचे जीवन सुखी समाधानी बनावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
. आता थोडावेळ शांत राहून आपण आपल्या वयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करू या .   

Tuesday, 7 January 2014

Reflections for Homily By: John Mendonca





येशूच्या स्नानसंस्काराचा सण



दिनांक: १२/०१/२०14
पहिले वाचन: यशया ४२:१-४,६-७
दुसरे वाचन: प्रेषितांची कृत्ये १०:३४-३८
शुभवर्तमान: मत्तय ३:१३-१७

"हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे"

प्रस्तावना :

आज विश्वव्यापी ख्रिस्त सभा प्रभू येशूच्या बाप्तीस्माचा सोहळा साजरा करीत आहे. प्रभू येशूने योहानाच्या हस्ते यार्देन नदीत बाप्तिस्मा घेऊन आपल्या दैवी कार्याला शुभारंभ केला. आजच्या पहिल्या वाचनाद्वारे यशया संदेष्टाने केलेल्या भविष्यवाणीची परिपुर्णता आजच्या शुभवर्तमानात आपणास ख्रिस्ताद्वारे झालेली दिसून येते व ह्याच भविष्यवाणीला सत्याचा दुजोरा देत आजच्या दुस-या वाचनाद्वारे संत पौल म्हणतो, "नासोरी येशूला देवाने पवित्र आत्माचा व सामर्थ्याचा अभिषेक केला; तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला; कारण देव त्याच्याबरोबर होता".आजच्या ह्या पवित्र सोहळ्यात सहभागी होत असताना येशूच्या बाप्तिस्मा बरोबर आपण आपल्या सुद्धा बाप्तीस्मावर मननचिंतन करू या, जेणेकरून आपल्याला आपल्या खिस्ती जीवनाच्या जबाबदारीची जाणीव होईल.

पहिले वाचन:

यशया संदेष्टा, देवाचा सेवक कशाप्रकारे व कोणत्या व्यक्तिमत्वाचा असेल हे जाहीर करताना आपणास सांगतो कि तो नम्र व लीन अशा प्रकारचा असेल व त्याच्याठायी देवाचा आत्मा वास्तव्य करील, जेणेकरून तो सत्याने न्यायाची प्रवृत्ती करील, राष्टांना प्रकाश देईल, आंधळ्याचे डोळे उघडील आणि बंदिशाळेतून बंदिवानांस मुक्त करील.

दुसरे वाचन:

 'देव पक्षपाती नाही' असे पौल कनैल्यास ठामपणे सांगून स्पष्टीकरण करतो की ज्याची कृत्ये नैतिक आचाराणाशी सहमत आहेत त्याच्याठायी प्रभू वास्तव्य करतो, ज्याप्रमाणे देवाने नासोरी येशूबरोबर वास्तव्य करून नासोरी येशूवर पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला त्याचप्रमाणे जर का आपली कृत्ये नैतिक आचारणाशी सहमत असतील तर देव आपणावर पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा वर्षाव करील.

सम्यक विवरण:

 योहानाने लोकांना पश्चाताप करायला सांगितले आणि बाप्तीस्माची प्रथा सुरु केली. बाप्तिस्मा हे नाव "बैप्टांयझेन" या ग्रीक शब्दावरून आले आहे त्याचा अर्थ डुबणे, डुबविणे अथवा बुडवून काढणे असा होतो: जणु ते ख्रिस्ताच्या मृत्युत पुरले जात आणि नवीन निर्मिती म्हणून त्याच्या पुनरुस्थानात सहभागी होत. संत पौल कलैस्सेकारांस सांगतो की तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्या बरोबर पुरले गेला आणि ज्याने त्याला मेलेल्यांतून उठविले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्या बरोबर उठविले गेला"(कलैस्सेकारांस २:१२).येशू ख्रिस्त म्हणतो,  "पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही"(योहान ३:५). ह्याच ख्रिस्त वचनानुसार बाप्तीस्मा संस्काराला "पवित्र आत्म्याठायी नवजीवन" असे सुद्धा म्हटले जाते. योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरिता "येशू गाली लाहुन यार्देनवर त्याच्याकडे आला"(मत्तय ३:१३).येशुने संत योहान बाप्तीस्ता ह्याच्या हस्ते बाप्तिस्मा स्वीकारून मगच आपल्या प्रेषितीय कार्यास सुरवात केली. आपल्या पुनरुस्थानानंतर येशूने आपल्या प्रेषितांनाही ह्याच प्रेषितकार्याची दीक्षा दिली "तुम्ही जाऊन सर्व राष्टातील लोकांस शिष्य करा,  त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा दया, जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा"(मत्तय २८:१९-२०).
जेव्हा संत योहानाने लोकांस पश्चाताप करण्याचे आवाहन केले तेव्हा येरुशलेम, सर्व यहूदिया व यार्देनच्या आसपासचा अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला व त्यांनी आपआपली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेतला"(मत्तय ३:५). योहान येशुविषयी म्हणतो,  "मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्च्यातापासाठी करतो खरा; परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहाणा उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही; तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे"(मत्तय ३:११).
     प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकामध्ये पेत्र लोकांस सांगतो,  "पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा मिळावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्माचे दान मिळेल"(प्रेषितांची कृत्ये २:३८). येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आणि योहानापेक्षा श्रेष्ठ असूनसुद्धा येशूने योहानाकडून बाप्तिस्मा का घ्यावा? ह्याचे उत्तर आपणास मत्तय अध्याय ३ ओवी १५ वरून आपणास स्पष्ठ होते की प्रभू येशूने केवळ पाप्यांसाठी असलेला बाप्तिस्मा स्वेच्छेने स्वीकारला तो फक्त धर्माचरण परिपूर्ण व्हावे म्हणूनच. जेव्हा येशूने बाप्तिस्मा स्विकारला तेव्हा जो पवित्र आत्मा जगाच्या प्रारंभी जलाशयावर तळपत होता, तो आत्मा ख्रिस्तावर पाठवून देवाने नवनिर्मितीच्या कार्याला शुभारंभ करून घोषित केले की,"हा माझा पुत्र मला परम प्रिय आहे, त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे"(मत्तय ३:१७).
नव्या करारात आपण अनेक ठिकाणी पाहतो की अनेक लोकांनी बाप्तिस्मा स्व इच्छेने व विश्वासाने स्वीकारलेला आहे. उदा."फिलिप्प देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव ह्याविषयीची सुवार्ता सांगत असता लोकांचा विश्वास बसला आणि पुरुष व स्त्रीया ह्याचा बाप्तिस्मा झाला स्व:ता शिमोनानेही विश्वास धरला व बाप्तिस्मा घेऊन तो फिलीप्पाच्या सहवासात राहील"(प्रेषितांची कृत्ये ८:१२-१३),  तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला; आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसाची भर पडली" (प्रेषितांची कृत्ये १६:१५).

बोधकथा:

१.       एका खेड्यात धर्मगुरूना चर्च बांधायचे होते. चर्च बांधण्यासाठी येणारा अवास्तव्य खर्च पाहून धर्मगुरूनी लोकांना उदार हस्ते मदत करण्याचे आवाहन केले. लोकांनी उदार हस्ते मदत करून सुध्दा अवास्तव्य खर्चामुळे चर्चचे काम अपूर्ण राहिले. त्याच गावातील एका बाईची आर्थिक परिस्थिती फार बिकट होती तिच्याजवळ राहण्यासाठी व्यवस्थित ना घर ना दार, अशा बिकट परिस्थितीत ही बाई धर्मगुरूना १०० रूपयाची देणगी चर्च बांधण्यासाठी देण्यास तयार होते. परंतु धर्मगुरूना ह्या बाईच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असल्यामुळे धर्मगुरू ती देणगी घेण्यास नकार देतात व त्या बाईस म्हणतात, ''हे कसे शक्य आहे की मी तुमच्याकडून चर्च बांधणीसाठी देणगी स्विकारावी, खरे तर मी तुम्हाला मदत करायला पाहिजे.'' ह्यावर त्या बाईने धर्मगुरूना सांगितले, ''मी तुमच्या मताशी सहमत आहे, परंतु बाप्तिस्माद्‌वारे मी एक ख्रिस्ती व्यक्ती व देवाची लेक आहे.तुम्ही माझ्या परिस्थितीची चिंता करू नका. देवाने ह्या क्षणापर्यत माझी चांगली देखभाल केलेली आहे व ह्यापुढेही तो करणार.बाप्तिस्माद्‌वारे त्याने माझा त्याच्या राज्यात परिपुर्ण स्विकार केलेला आहे तर मग त्याच्या राज्याची घोषणा करण्यासाठी ह्या आपल्या चर्चसाठी मी माझ्यापरीने मदत का करू नये?''(बाप्तिस्माद्‌वारे आपण देवाची प्रिय मुले होतो).

२.      गेनेसीयस हा अधर्मी, हास्य-विनोदी रोमी अभिनेता होता. एके दिवशी त्याची नेमणुक रोमन राजा डायसोल्टेन ह्याच्यासमोर अभिनय करण्यासाठी केली गेली. राजा डायसोल्टेन हा ख्रिस्ती लोकांचा तिरस्कार करत असे.ह्याच कारणास्तव राजा डायसोल्टेनला आपल्या अभिनयाद्‌वारे अधिक प्रसन्न करण्यासाठी गेनेसीयसने ख्रिस्ती स्नानसंस्काराच्या धार्मिक विधीवर अभिनय करण्याचा निश्चय केला. अभिनय करण्यासाठी गेनेसीयसने ख्रिस्ती धार्मिक शिक्षकाद्‌वारे, स्नानसंस्काराच्या विधीचे रीतीरिवाज जाणून घेतले.
ठराविक दिवशी राजा डायसोल्टेनसमोर गेनेसीयस हास्य-विनोदी अभिनय करण्यासाठी हजर झाला.तो रंगमंचावर अभिनय करत असताना तो आजारी असल्याचे त्याने सोगं केले(अभिनय केला) व जोरजोराने ओरडू लागला, ''मला स्नानसंस्कार हवा. मला स्नानसंस्कार हवा.'' त्याचक्षणी त्याचा आवाज ऐकूण एक नकली धर्मगुरू रंगमंचावर येतो व स्नानसंस्काराच्या विधीला सुरूवात करतो. जेव्हा गेनेसीयसच्या डोक्यावर तीन वेळा पाणी ओतले जाते तेव्हा त्याच्यामध्ये आश्चर्यकरीत्या बदल होतो. त्याच घटकेपासून तो रंगमंचावर एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून अभिनय करण्यास सुरूवात करतो परंतु त्याच्या ह्या अभिनयावर कोणाचाच विश्वास नव्हता, राजा डायसोल्टेनला त्याचा हा अभिनय अजूनपर्यत एक प्रकारचा हास्य-विनोदच वाटत होता.परंतु गेनेसीयसने ठामपणे सांगितले की खरोखरच ह्या क्षणीच त्याने ख्रिस्ताचा स्विकार करून, ख्रिस्ती धर्माचा स्विकार केलेला आहे. सरते शेवटी राजा डायसोल्टेनला ह्या गोष्टीची खात्री पटली व त्याने गेनेसीयसचा शिरच्छेद करण्याची आज्ञा केली. अशाप्रकारे गेनेसीयस हा स्नानसंस्काराद्‌वारे ख्रिस्ती श्रध्देस्तव रक्तसाक्षी झाला.

मनन-चिंतन:

आज येशू ख्रिस्तचा बाप्तिस्मा आपणा सर्वांना आपल्या बाप्तीस्मावर मनन-चिंतन करण्यास आमत्रण करीत आहे.आपणा सर्वांना आपल्या जन्माचा दिवस, लग्नाचा दिवस अशा इत्यादी महत्त्वपुर्ण सभारंभाची आपणास अचूकपणे आठवण असते परंतु आपल्या बाप्तीस्माचा दिवस आपल्या साहजिकच ध्यानात नसतो.ख्रिस्ती ह्या नात्याने वास्तवता आपला खरा वाढदिवस म्हणजे आपल्या बाप्तीस्माचा दिवस कारण ह्या दिवसाद्वारे आपण ख्रिस्त सभेचे सभासद म्हणून घोषित केले जातो.लुमेन जेन्सुम नुसार बाप्तिस्मा हे ख्रिस्ती धर्माचे प्रमुख प्रवेशदार आहे, ज्याद्वारे आपण इतर संस्कार स्विकारू शकतो(लुमेन जेन्सुम क्र.११)
     बाप्तिस्माद्वारे ख्रिस्तसभा आपणास धर्मकायदयानुसार खालीलप्रकारे अधिकार बहाल करते-
१. पवित्रतेचे जीवन जगण्याचा अधिकार (धर्मकायदा क्र.२१०),
२. शुभवार्ता घोषित करण्याचा अधिकार (धर्मकायदा क्र.२११),
३. इतर ख्रिस्ती संस्कार स्वीकारण्याचा अधिकार (धर्मकायदा क्र.२१३),
४. प्रेषितीय कार्य करण्याचा अधिकार (धर्मकायदा क्र. २१६),
५. ख्रिस्ती शिक्षण घेण्याचा अधिकार (धर्मकायदा क्र.२१७).
नाझियाझुसचे संत ग्रेगरीच्या मतानुसार स्नान संस्कार हे देवाने मानवाला दिलेले सुंदर वरदान आहे, स्नान संस्काराला आपण धन म्हणतो कारण तो आपण स्व सामार्थाने मिळवू शकत नाही. स्नान संस्काराला आपण कृपा म्हणतो कारण देव तो दीनांस अन सज्जनांस सारख्याच प्रेमभावनेने देतो. स्नानसंस्कार हा स्नानसंस्कार आहे कारण आपले पाप त्याद्वारे पाण्यामध्ये डुबविले जाते, स्नानसंस्कार हा अभिषेक आहे कारण तो आपल्या सामान्य याजकपणाचे चिन्ह-स्त्रोत्र आहे. स्नानसंस्कार हा ज्ञानप्राप्ती आहे कारण तो व्यक्तीला प्रकाशमय करतो. स्नानसंस्कार हा कृपावस्त्र आहे कारण तो आपली लाज झाकवतो आपल्याला धुऊन  शुद्ध करतो.स्नानसंस्कार हा शिक्का आहे कारण तो आपले रक्षण करतो आणि देवाचे आपल्यावरील स्वामित्वाचे ते चिन्न आहे.
स्नानसंस्काराचा सबंध श्रध्देशी आहे. प्रेषितांची कृत्यांत आपण पाहतो की, पौल फिलिप्पि येथे बंदिखान्यात असताना तुरूंगाचे पाये हादरले व दरवाजे खडाखड उघडले म्हणून घाबरून गेलेल्या तुरूंग अधिका-याला संत पौलाने म्हटले, ''प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल.'' आणि तेव्हाच त्या अधिका-यानी तात्काळ आपल्या कुटूंबियासह बाप्तिस्मा घेतला (प्रेषितांची कृत्ये १६:३१-३३).
येशूच्या स्नानसंस्काराचा हा सोहळा आपल्या प्रत्येकाला पापमुक्तीदायक, तारणदायक आणि पवित्र आत्म्याचे वरदान देणारा आहे. ख्रिस्तसभेने स्नानसंस्काराच्या दिवशी, पवित्र तेलाने आपणा सर्वांस पवित्र आत्म्याने अभिषिक्त करून ख्रिस्ताचे याजक, संदेष्टा व राजा ह्या भुमिकांमध्ये आपणांस समाविष्ट केले आहे. ह्याचप्रमाणे स्नानसंस्काराच्या शुभ्र वस्त्राद्‌वारे आपण ख्रिस्त परिधान केलेला आहे व आपल्या स्नानसंस्काराच्या मेणबत्तीद्‌वारे ख्रिस्तसभेने आपणास तेजमय करून आपणही ख्रिस्तासारखेच ह्या जगाचा प्रकाश आहोत म्हणून घोषित केले आहे.
आजच्या ह्या पवित्र दिवशी ख्रिस्तसभेने स्नानसंस्काराद्‌वारे, आपणावर ज्या विविध जबाबदा-या सोपवलेल्या आहेत, त्या जबाबदा-यांचा आज आपण फेरविचार करून पाठपुरावा करू या व आपल्या स्नानसंस्काराच्या वचनाशी सदैव एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करू या.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

आपला प्रतिसाद: हे प्रभो तुझ्या लेकरांची प्रार्थना ऎकुण घे

.आपल्या ख्रिस्तसभेच्या धार्मिक अधिकारा-यांना देवराज्यांची सुवार्ता जगजाहीर करण्यासाठी दैवी कृपा लाभावी  म्हणून आपण प्रार्थना करू या.
२.आपल्या देशातील अन्याय, अत्याचार आणि भेदभाव दूर होऊन सर्वत्र शांततेचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
३.जे तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना योग्य अशी नोकरी मिळावी व आपल्या प्रत्येकाच्या कामधंदयावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
४.स्नानसंस्काराद्वारे आपल्यावर असलेल्या ख्रिस्ती जबाबदारीची आपणांस जाणीव व्हावी व स्नानसंस्काराच्या वचनाशी आपण सदैव एकनिष्ठ राहावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

५.ज्या व्यक्ती आजारी, निराशीत आणि दु:खी कष्टी आहेत अश्या सर्वांना प्रभू प्रेमाचा स्पर्श व्हावा व त्यांचे जीवन प्रभू प्रेमाने प्रफुल्लीत व्हावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

Wednesday, 1 January 2014




Reflections for Homily By:- Suresh Alphonso.




प्रकटीकरणाचा सण

दिनांक: ०५/०१/२०१४
पहिले वाचन : यशया ६०:१-६
दुसरे वाचन : इफिसकरांस पत्र ३:२-३
शुभवर्तमान : मत्तय २:१-१२

"आम्ही त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो"

प्रस्तावना :

ख्रिस्तसभा आज प्रकटीकरणाचा सण म्हणजेच तीन राजांचा सण साजरा करीत आहे.हे तीन राजे येशूला नमन करण्यासाठी दुरून आले होते कारण त्यांना जगाचा तारणारा, प्रकाशमान तारा: ख्रिस्त बाळ सापडला होता आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा आपणास प्रकाशमान होण्यास सांगत आहे.तर दुस-या वाचनात संत पौल आपल्याला सांगतो कि प्रकटीकरणाच्याद्वारे मला रहस्य कळले व ते रहस्य ख्रिस्त येशूच्या ठायी आम्हास कळविण्यात आले.ज्या प्रकारे तीन ज्ञानी लोकांनी देवाने देलेल्या ता-याचे चिन्ह ओळखून येशू बाळाचा शोध केला त्याच प्रकारे आपण सुद्धा आपल्या जीवनात देवाने दिलेल्या चिन्हाला ओळखून प्रभूचा मागोवा घेण्यास आपणाला कृपा शक्ती मिळावी म्हणून आजच्या मिस्साबलिदानात प्रार्थना करुया.

सम्यक विवरण:

आजच्या शुभवर्तमानाद्वारे आपण दोन व्यक्तिमत्वाचा अनुभव घेतो प्रथम म्हणजे ते तीन ज्ञानी लोक जे बाळ येशूला भेटायला आले होते व दुसरे म्हणजे धूर्त हेरोद राजा ज्याने  येशूला ठार मारण्याचा प्रयत्न केला त्याचा धूर्तपणा आपणास त्याच्या मनातील कपटीपणामुळे आढळतो जेव्हा त्या तीन राजांनी त्याच्याकडे येऊन विचारपूस करू लागले  की,  येहुद्यांचा राजा जन्माला आला आहे तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहोत (मत्तय २:२).असे ऐकता बरोबर हेरोदाचे धाबे दणाणले, त्याचे पित्त खवळले व तो चलबिचल झाला अश्यासाठी कि माझ्याशिवाय व माझ्यापेक्ष्या श्रेष्ठ असा दुसरा राजा जन्माला कसा येऊ शकतो?
हेरोदाबरोबर सर्व येरुशलेम घाबरून गेले आणि त्याने प्रजेचे सर्व मुख्य याजक व शास्री ह्यांना जमवून विचारले कि ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हायचा आहे? ते त्याला म्हणाले,'यहुदियातील बेथलेहेमात' (मत्तय २:४-५)  हे सर्व ऐकून हेरोद घाबरला म्हणून त्याने धूर्तपणाने योजना आखली व त्या तीन राजांना मुद्दाम बोलावून त्यांच्याकडून तारा दिसू लागल्याची वेळ निट विचारून घेतली व त्यास म्हणाला,'तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने विचारपूस करा व तुम्हाला शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मीहि येउन याला नमन करीन (मत्तय २:७-८).हि सर्व धूर्त योजना आखून सुद्धा हेरोद येशूचा नाश करू शकला नाही व देवाची कोणतीही योजना असफल करू शकला नाही कारण देवाची योजना वेगळी होती म्हणूनच देवाने त्या तीन राजांचा त्याच्या गौरवासाठी व जगाच्या तारणासाठी उपयोग करून घेतला.

बोधकथा:

गिअन कार्लोस मेनोती ह्याने एकदा एक अंकी नाटक सादर केले होते व त्या नाटकाचे नाव 'अमेल आणि नाईट विझीटर्स' होते. त्या नाटकात असे दाखवले आहे की:तीन ज्ञानी लोक बाळ येशूला भेटण्यासाठी येरुशलेमाकडे निघाले होते ह्या नाटकात अमेल नावाचा मुलगा अपंग असून चालण्यासाठी कुबड्यांचा वापर करतो.जेव्हा अमेलला समजते की हे तीन ज्ञानी लोक बाळ येशूला भेटण्यासाठी येरुशलेमाकडे निघाले तेव्हा त्याने गुप्तपणे त्यांचा पाठलाग करण्यास सुरवात केली.जेव्हा त्या तीन राजांना येशु बाळ सापडते तेव्हा ते त्याच्यासमोर नतमस्तक होवून त्यांनी आणलेल्या भेटवस्तू बाळाच्या चरणाशी अर्पण करतात हे पाहून अमेललासुद्धा वाटते की आपणदेखील काहीतरी अर्पण करावे परंतु त्याच्याजवळ अर्पण करण्यासारखे काहीच नव्हते म्हणून तो आपल्या जवळ असलेल्या कुबड्या येशुबालाच्या चरणाशी अर्पण करतो.त्याने त्या कुबड्या अर्पण करताच त्याचा अपंगपणा दूर होतो.(जेव्हा आपण निस्वार्थीपणे आपले सर्वस्व प्रभूला समर्पित करतो तेव्हा प्रभू आपल्यावर अनेक वरदानांचा वर्षाव करतो).

मनन -चिंतन:

प्रकटीकरणाचा सण हा तारणाचा, प्रकाशाचा, व आशेचा सण आहे. जो तीन राजांनी तारा पहिला तो तारा पाहणे फार महत्वाचे आहे. परमेश्वर आम्हाला कधीही अंधारात ठेवत नाही जे घडणार आहे त्याची तो आम्हाला पूर्व सूचना देतो. प्रत्येक व्यक्तीद्वारे, घटनेद्वारे परमेश्वर आम्हाला काय घडणार आहे ह्याची पूर्व सूचना देत असतो परंतु ज्याप्रमाणे तीन राजांनी तारा पाहण्याची तयारी दर्शविली त्याचप्रमाणे आमचीसुद्धा दैवी पूर्वसूचना पाहण्याची आणि ऐकण्याची तयारी असली पाहिजे.
प्रकटीकरण आपणाला दोन गोष्टी शिकविते त्या म्हणजे:१.परमेश्वराने त्या तीन राजांचा ज्या प्रमाणे प्रभूच्या तारणाचा आणि प्रकाशाचा संदेश त्यांच्या देशापर्यंत आणि नंतर त्याहूनही पलीकडे नेण्यासाठी वापर केला , त्याप्रमाणे परमेश्वराला आपल्याद्वारे देखील इतरांची सेवा करायला आवडेल जसे आपले गुण, हुशारी, कौशल्य, वेळ, ताकद आणि इतर अनेक साधने व जे काही आपल्यामध्ये दडलेले आहे त्याद्वारे आपण प्रभूचा संदेश इतरापर्यंत पोहोचवू शकतो किवा पसरवू शकतो.ज्याप्रमाणे देवाने क्यास्पर , मल्खिओर व बल्ताझार ह्यांना हेरोदाकडून येणा-या अडचणीवर मात करण्यास मदत केली, त्याचप्रमाणे देव आपल्यालादेखील प्रत्येक वेळी मदत करत असतो. २.तीन राजांनी आणलेले सोने, उध व गंधरस प्रभूला अर्पण करण्याबरोबरच त्यांनी स्वतःला नम्र बनवून आपला गर्विष्टपणा देखील प्रभूचरणाशी समर्पित केला आणि हे कृत्य करून ते तीन राजे त्यांच्याबरोबर भरपूर काही घेऊन गेले. त्यांनी येशुबाळ कोठे जन्माला होता ह्या माहितीबरोबरच त्यांना तारा कसा दिसला व त्याची आई मारिया कश्याप्रकारे त्यांच्या बरोबर वागली हेच घेऊन गेले नाहीत तर प्रभूघोषणेची मोठी जबाबदारी ते त्यांच्या खांद्यावर घेऊन गेले.वास्तविकच ते एक प्रकारचे ओझे म्हणून नव्हे तर ते एक प्रकारचे तेज किंवा चमक त्यांनी जी बाळ येशुकडून मिळविली होती ती इतरांना देण्यास घेऊन गेले.अश्या प्रकारे ते एक प्रकारचे सुवार्तीकच बनले.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद : हे बाळ येशु तुझ्या शांतीचे राज्य येवो

१. ख्रिस्तसभेत कार्य करणारे आपले पोप, कार्डीनल्स, बिशप्स, फादर्स, सिस्टर्स व इतर प्रापचिंक लोकांना कार्य करण्यास बाळ येशुकडून प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. ख्रिस्ती मिशनरी जगाच्या कानाकोप-यात बाळ येशूची सुवार्ता पसरवीत आहेत.त्यांना होणारा त्रास व त्यांच्यावर होणारे हल्ले थांबावेत व त्यांनी इतरांची सेवा धैर्याने करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या देशाचा कारभार सांभाळणारे आपले सर्व राज्यकर्ते ह्यांनी त्यांचा स्वार्थ, हेवा व मत्सर बाजूला ठेवून निस्वार्थीपणाने सेवा करावी व आपला देश सुजलाम सुफलाम करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. हेरोद राजाने बाळ येशूचा अंत करण्याचा बेत केला होता, आज समाजात असे खूप हेरोद आहेत जे बालकांचाच नव्हे तर संपूर्ण समाजाचा नाश करण्याचा प्रयत्न करत आहेत. अश्या सर्वांना बाळ येशू कडून सदबुद्धी मिळावी व सर्वांचे तारण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. समाजात जे आजारी, दुखी-कष्टी आहेत अश्या सर्वांवर बाळ येशूचा वरदस्त असावा म्हणून आपण प्रार्थना करूया.