Thursday, 26 January 2017

Reflection for the Homily of 4th Sunday in the ordinary Time (29-01-17) By Br Amit D’Britto




सामान्य काळातील चौथा रविवार

दिनांक: २९/०१/२०१७.
पहिले वाचन: सफन्या २:३,३:१२-१३.
दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १:२६-३१.
शुभवर्तमान: मत्तय ५:१-१२.


"जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे."



प्रस्तावना:

     आज देऊळमाता सामान्य काळातील चौथा रविवार साजरा करीत आहे. प्रत्येक मनुष्य हा सुख व आनंदाच्या शोधात असतो. प्रभू येशु ख्रिस्त आज शुभवर्तमानात आनंदी व सुख-समाधानी होण्यासाठी योग्य असा मार्ग दाखवत आहे.
     आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा सफन्या लोकांस चांगुलपणाचा मार्ग निवडण्यास विनवणी करतो. कारण त्यामुळेच त्यांचे देवाच्या रागापासून संरक्षण होईल. प्रभू येशु ख्रिस्तामध्ये आपल्याला नवीन अस्तित्व प्राप्त होते असे संत पौल करिंथकरांस दुसऱ्या वाचनात सांगतो.
ह्या मिसाबलिदानात सहभागी होत असताना आपण आत्म्याने नम्र व लीन होऊन स्वर्गाचे राज्य मिळवण्यासाठी प्रयत्न करुया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: सफन्या २:३,३:१२-१३

यिर्मया संदेष्टा येण्याच्या काही वर्षांपूर्वी संदेष्टा सफन्या ह्यांनी यरुशलेमेत उपदेश केला. प्रस्तुत उताऱ्याद्वारे संदेष्टा सफान्या लोकांना देवाने दाखवल्याप्रमाणे योग्य मार्गाचे आचारण करण्यास सांगत आहे. तसेच स्वत:ला शून्यवत करणारी नम्रतेची जीवनशैली स्वीकारण्यास आवाहन करतो. तो म्हणतो कि, ‘जे लोक आत्म्याने दिन आहेत व आज्ञा पालन करतात त्यांना कराराची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणखी एक संधी मिळेल. तसेच जे गरीब व दिन-दुबळे आहेत त्यांना देवामध्ये सामर्थ्य मिळेल’.

दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १:२६-३१

आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरांस सांगतो कि देवाने ज्ञानी व शहाणे ह्यांच्या तुलनेत साध्या व भोळ्या लोकांना निवडले आहे. तसेच शक्तिमान लोकांच्या तुलनेत त्याने दुर्बलांची निवड केली आहे. जगातील ऐहिक प्रतिष्ठेची तोरा कोणाला मिरवता येऊ नये याच उद्देशाने देवाने हे केले आहे. तसेच आपल्या सर्वांना ख्रिस्त येशु मध्येच राहणे योग्य आहे असे संत पौल सांगत आहे.



शुभवर्तमान: मत्तय ५:१-१२

मत्तयने नमूद केलेल्या महान प्रवचनापैकी हे पहिले प्रवचन होय. सामान्यतः हे ‘डोंगरावरील प्रवचन’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्याची रूपरेषा सर्वसाधारणपणे लूक ६:२०-४९ मध्ये दिलेल्या प्रवचनासारखी असली तरी हे प्रवचन खूपच दीर्घ आहे. ‘शिष्यपण’ किंवा ‘स्वर्गाच्या राज्यातील जीवन’ असा मध्यवर्ती मुद्दा घेऊन त्या भोवती संपूर्ण विषयाची मांडणी केली आहे. प्रवचनाच्या आरंभीच धन्यतेच्या आठ उदगारातून खऱ्या शिष्याचे अष्टपैलू-पूर्ण चित्रण केले आहे. ह्या सर्वांमुळे आपले जीवन चांगले होईल असे प्रभू येशू ख्रिस्त आपणास पटवून देत आहे. जीवनात अशा मार्गाने चालल्याने कोणाचीदेखील हानी होणार नाही असे ह्यातून स्पष्ट होते. “स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे” ह्या महत्वपूर्ण शब्दांनी या वाचन मालिकेचा आरंभ व शेवट झाला आहे. जे देवाला ‘राजा’ म्हणून मान्य करतात, त्यांच्या संदर्भात हे शब्द आहेत, आणि त्यांच्या जीवनात त्याचा हेतू परिपूर्ण व्हावा यासाठी ते निश्चयाने प्रतीक्षा करतात.

बोधकथा

एकदा एक श्रीमंत माणूस मदर तेरेजाच्या आश्रमाला भेट देण्यासाठी जातो. जेव्हा तो तेथे पोहचतो तेव्हा मदर तेरेजा ह्या एका अत्यंत आजारी व कुष्टरोगाने ग्रासलेल्या व्यक्तीच्या जखमा साफ करत होत्या. जेव्हा तो श्रीमंत व्यक्ती हे सर्व दृश्य पाहतो तेव्हा तो मदर तेरेजाला म्हणतो, “जर मला लाखो रुपये जरी मिळाले तरी सुद्धा मी हे काम करणार नाही.”  तेव्हा त्याला प्रतिउत्तर देत मदर तेरेजा म्हणाल्या, “मी सुद्धा हे काम कितीही पैसे मिळाले तरी करणार नाही, परंतु हे सर्व मी त्या व्यक्ती मध्ये दिसणाऱ्या प्रभूसाठी आणि त्याने दिलेल्या शिकवणुकीचे योग्य असे पालन करण्यासाठी करत आहे.” आज शुभवर्तमानात प्रभू येशु आपणास हाच मार्ग दाखवत आहे.


मनन चिंतन:

आज जगात सर्वजण सुखाच्या शोधात आहेत. प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानात आपल्याला आनंदाचा व सुखाचा मार्ग दाखवत आहे. आपण सुख हे पैसा, संपत्ती, अधिकार, व प्रतिष्ठा ह्या सारख्या गोष्टींमध्ये शोधत असतो. परंतु आपण खूप वेळा हरतो व फसतो. आपल्याला आवश्यक व समाधानकारक सुख मिळत नाही.
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू जो सुखाचा मार्ग दाखवत आहे तो ह्या सर्व मार्गापासून खूप वेगळा आहे. ह्या जगात जे सुख आपल्याला संपत्ती, अधिकार किंवा प्रतिष्ठेने मिळते ते क्षणिक असते, परंतु आपल्याला जर चिरकाळ आनंद हवा असेल तर आपण प्रभू येशूच्या शिकवणूकीचा मार्ग अवलंबला पाहिजे.
आपण सर्वांनी आत्म्याने ‘दीन’ झाले पाहिजे. आपण ‘सौम्य’ व्हायला हवे कारण आपणास पृथ्वीचे वतन भोगायला मिळेल. तसेच जर आपल्याला तृप्त व्हायचे असेल तर आपण नितीमत्वाचा मार्ग अवलंबला पाहिजे. आपण दयाळू होणे खूप गरजेचे आहे व आपले अंतःकरण शुद्ध ठेवणे गरजेचे आहे; त्यामुळे आपल्याला देवाला पहावयास मिळेल. तसेच आपण हिंसेचा अवलंब न करता शांतीचा मार्ग पत्करला पाहिजे. जर आपला नितीमत्वासाठी छळ झाला तर आपण त्यासाठी तयार असावे कारण स्वर्गाचे राज्य अशाच लोकांचे आहे असे येशु म्हणतो. जर आपणास प्रभूच्या नावाने निंदा किंवा छळ सहन करावा लागला तर तो आपण आनंदाने स्वीकारला पाहिजे कारण ह्याकरीता स्वर्गात आपले प्रतिफळ मोठे असणार आहे.
मोशे ‘सिनाय’ पर्वतावरून खाली येतो आणि लोकांना ‘दहा आज्ञा’ देतो. ह्या दहा आज्ञेद्वारे तो लोकांना योग्य असा मार्ग दाखवून देवाच्या अधिक जवळ आणत असे. आपला प्रभू येशु ख्रिस्त हा ‘नवीन मोशे’ आहे. कारण त्याने सुद्धा लोकांना नवीन आज्ञा दिल्या. आज शुभवर्तमानात आपणा पाहतो कि, ह्या नवीन आज्ञेद्वारे तो लोकांना सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी व देवाच्या अधिक जवळ येण्यासाठी लोकांना मार्ग दाखवत होता.
कदाचित आपल्याला असे वाटेल कि आज शुभवर्तमान येशु ख्रिस्त ज्या आज्ञा आपणास देत आहे त्या पाळण्यास खूप कठीण आहे. परंतु आपल्या असे लक्षात येते कि, प्रभू येशु ख्रिस्ताने प्रथम शिकवण्या अगोदर हे सर्व कृतीत उतरवले व त्यामुळेच त्याने आपणास योग्य असा आदर्श दिला आहे.
आज  शुभवर्तमानात प्रभू येशु ख्रिस्त ज्या काही पूर्वसूचना देत आहे त्याचे योग्य असे पालन केल्याने आपणास सुखाचा अनुभव ह्या भौतिक जगातच नव्हे तर चिरकाळचा आनंद लाभणार आहे. कदाचित त्यांचे पालन करणे हे कठीण असेल परंतु ते अशक्य नाही. कारण ह्या सर्व आज्ञा कृतीत उतरवणाऱ्या अनेक संतांचे सोदाहरण आपल्या डोळ्यांसमोर आहेत.
आज आपण जगावर जास्त परिणाम घडवणारे व्यक्ती येशु ख्रिस्त, गांधीजी, मदर तेरेजा व मार्टीन लुथर किंग ह्यांच्या जीवनात पाहिले तर असे लक्षात येते कि, हे सर्व व्यक्ती अतिशय लीन, नम्र व प्रेमळ होते. परंतु जे कोणी फार अभिमानी व गर्विष्ठ असतात त्यांचा द्वेष किंवा तिरस्कार केला जातो. प्रभू येशु ख्रिस्ताच्या शब्दात खूप सामर्थ्य आहे. तो म्हणाला, “आकाश व पृथ्वी नष्ट होतील परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत” (मार्क १३:३१). जर आपण प्रभूच्या शब्दाचा मान राखून त्याची वचने आपल्या आचरणात आणली तर नक्कीच आपल्याला स्वर्गीय सुखाचा अनुभव येईल.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे देवा आम्हाला तुझा आशीर्वाद दे.

१.आपले परमगुरु , महागुरू, सर्व धर्मगुरू व व्रतस्थांनी ख्रिस्ताच्या श्रद्धेत दृढ होऊन आपल्याला प्रभूच्या राज्यात प्रवेश करण्यास मार्गदर्शन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.जे निराश होऊन देवापासून दूर गेले आहेत, त्यांना प्रभूने स्पर्श करावा व त्यांच्या जीवनात परिवर्तन व्हावे; त्यांनी परत एकदा प्रभूने दाखवलेल्या मार्गावर चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.आपल्या समाजातील व धर्मग्रामातील जी कुटुंब दुरावलेली आहेत त्यांना प्रभू परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव यावा व त्यांनी परमेश्वराच्या कृपेने एकत्र येऊन पुन्हा आपल्या कुटुंबात प्रेमाने, एकजुटीने रहावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करुया.
४.ख्रिस्ताला स्वीकारण्यासाठी आपल्यामधील असलेला अहंकार, स्वार्थ व राग दूर  सारून एकजुटीने समाज बांधणीचे कार्य करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५.आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.


Thursday, 19 January 2017

   
Reflection for the Homily of Third Sunday in the ordinary Time  (22-01-17) by Br. Jameson Munis. 




सामान्य काळातील तिसरा रविवार

दिनांक: २२/०१/२०१७.
पहिले वाचन: यशया ९:१-४.
दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १:१०-१३.
शुभवर्तमान: मत्तय ४: १२-२३.



"मी तुम्हांला मासे धरणाऱ्यानां नव्हे तर माणसे धरणारा बनवतो"




प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील तिसरा रविवार साजरा करत आहोत. आजची उपासना आपणास ख्रिस्ताचे अनुसरण करण्यास बोलावत आहे.
यशया पुस्तकातून घेतलेले पहिले वाचन देवाच्या दिव्य प्रकाशाविषयी सांगत आहे. देवाचा प्रकाश अंध:काराला व्यापून टाकतो. दुसऱ्या वाचनात संत पौल ख्रिस्ती शिक्षकाची व्यक्तिपूजा केल्याने जी फुट पडते ह्यासंबंधी बोध करतो. तसेच प्रभूचे प्रभुत्व मानून सर्वांनी मिळून त्याच्याशी एकनिष्ठ राहून, त्याची एकमताने सेवा करा असा सल्ला देत आहे. मत्तयलिखित शुभवर्तमानात हेरोद राजा योहानाला अटक करतो आणि येशू आपल्या पहिल्या शिष्यांना म्हणजेच शिमोन, याकोब आणि योहान ह्यांना बोलावतो. मासे धरणाऱ्यानां तो माणसे धरणारा बनवतो आणि देवाच्या राज्यासाठी तसेच लोकांची सेवाकार्य करण्यासाठी पाचारण करतो.
आज आपण मिसाबालीदानात भाग घेत असताना आपली अंतःकरणे साफ करून आपण ख्रिस्ताचे अनुयायी बनण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करूया.

शुभवर्तमान:

प्रस्तुत उताऱ्यात योहान देवाच्या राज्याची घोषणा करीत होता. त्याला विरोध झाला. हेरोद हा यहुदिया व  गालील प्रांताचा राजा होता. त्याने अन्यायाने योहानाला अटकेत ठेवले. यानंतर गालील प्रांतात येशु ख्रिस्ताने आपले सेवाकार्य सुरु केले. जी घोषणा योहानाने केली तीच ख्रिस्तानेही केली. जे कोणी अंधारात होते ख्रिस्ताने त्यांची सुर्योद्याप्रमाणे सेवा केली.
     पेत्र व आंद्रिया यांना येशु ख्रिस्ताची ओळख यापूर्वीच झाली होती. ते काबाडकष्ट करून आपला व्यवसाय करीत. प्रभुने त्यांना नवीन कामासाठी बोलाविले. येशु ख्रिस्त जे काम करीत होता ते पुढे नेण्यासाठी, प्रभू येशूने त्यांना नवीन शिकवणूक दिली आणि ते लागलेच त्याला अनुसरले.
     नंतर या शिष्यांसह येशुख्रिस्त गालीलभर फिरला. त्यांनी सभास्थानात सुवार्ता सांगितली. रोग बरे केले. जे दुखणेकरी त्याच्याकडे आले त्या सर्वांना त्याने बरे केले. गालीलातील लोकांना खरोखरच प्रकाश दिसला आणि शिष्यांना जे पाचारण भेटले ते त्यांनी पुढे चालूच ठेवले आणि देवाच्या कार्याला होकार दिला.

बोधकथा:

    एकदा तीन माणसे रात्रीच्या वेळी घोड्यांवर बसून जंगलामधून प्रवास करत होते. जंगलाच्या मधोमध पोहचल्यावर त्यांनी “थांबा” असा आवाज ऐकला. ताबडतोब त्यांनी त्या आवाजाचे पालन केले आणि थांबले. त्यानंतर त्याच आवाजाने त्यांना घोड्यावरून खाली उतरून तिकडचे दगड उचलून त्यांच्या बरोबर त्यांच्या बॅगेत न्यायला सांगितले. जसे-जसे ते पुढे निघाले त्याच वेळी पुन्हा आवाजाने सांगितले, “तुम्ही माझ्या आज्ञेचे पालन केले आहे. परंतु उद्या सूर्याच्या उगवत्या किरणाद्वारे तुम्ही दुःखी किंवा आनंदित असाल.”
जेव्हा दिवस उगवला तेव्हा ते आनंदित झाले कारण त्या दगडाचे रुपांतर सोन्यात झाले होते. परंतु एक अति-आनंदित होता तर दोघे दुःखी होते. कारण त्यांनी कमी दगड आणले होते.

मनन चिंतन:

ह्या बोधकथेमधून आपल्याला बोध मिळतो कि, देवाच्या आज्ञेचे पालन करणे म्हणजे स्वर्गाचे सुख लाभण्यासारखे आहे. देवाचे पाचारण हि एक देणगी असून ती सर्व मालमत्ता व संपत्तीपेक्षा अनमोल आहे. जो देवाच्या हाकेला स्विकारतो आणि देवाचे कार्य करण्यास पुढे येतो तो सतत देवाच्या सानिध्यात राहतो.
बोधकथेत ऐकल्याप्रमाणे जो देवाच्या आज्ञेचे पालन करतो त्याला जास्त सोन्याचे दगड सापडतात व दुसरे निराश होतात. कारण त्यांना तो आवाज देवाचा होता असे नंतर समझले. आपल्या जीवनात सुद्धा अश्याच घटना घडत असतात. जेव्हा आपल्याला देवाची हाक येते तेव्हा आपण स्वार्थी मनाचा आवाज ऐकतो व देवाच्या आज्ञेचे दुर्लक्ष करतो. पण जेव्हा आपण देवाच्या आज्ञेचे पालन करतो तेव्हा जीवनात चांगली घटना घडते.
देवाचे पाचारण सर्वांना लाभलेले आहे परंतु आपले कार्य वेगळ्या प्रकारचे असून सर्वांचा हेतू एकच आहे. तो म्हणजे गोरगरीबांची सेवा. देवाचे कार्य मनापासून केल्यामुळे जीवन बदलून जाते. आपल्या जीवनाला प्रेरणा लाभते. तो आनंद आपण पैश्याने विकत घेऊ शकणार नाही. हाच उपदेश आजच्या तिन्ही वाचनात मिळतो. पहिल्या वाचनात ऐकले कि, देवाचा प्रकाश किती मौल्यवान आहे. हा प्रकाश म्हणजे देवाचे ज्ञान, प्रेम, प्रीती आणि सहनशीलता. जेव्हा आपण देवाला अनुसरतो तेव्हा आपल्या वागनुकीत बदल होतात. चांगले कृत्ये करण्यासाठी दैवी शक्ती लाभत असते.  

दुसऱ्या वाचनात आपण ऐकले कि, पौल हा मंडळीतील अव्यवस्था व दैहीकतेविषयी बोलत आहे. कारण येशु हा सर्वांचा प्रभू आहे. तो पौलचा किंवा पेत्राचा नव्हे तर सर्व युगाचा प्रभू आहे. परंतु खोटी शिक्षा देणारे खूप येतील आणि आपल्यात गट पाडतील, जातीभेद निर्माण करतील, श्रीमंतांना जवळ करतील आणि गरिबांना दूर करतील, परंतु आपण एकाच ख्रिस्ताचे अनुयायी आहोत. त्यामुळे आपण एकनिष्ठेने राहून प्रभूची आराधना केली पाहिजे.
तसेच आजच्या शुभवर्तमानात पहिल्या शिष्यांचे पाचारण आणि त्यांनी ताबडतोब प्रतिसाद दिला असे वैशिष्ट्य ऐकले आहे. म्हणून ख्रिस्त हा अदृष्य देवाचे  सदृश रूप आहे. त्याने मानवाला स्वत:च्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केले आहे. प्रथम मानवाने हि प्रतिमा विद्रूप केली. परंतु जगाचा उद्धारक आणि तारणारा असलेल्या ख्रिस्ताद्वारे पुन्हा एकदा मानवास पूर्वीचे सौंदर्य प्राप्त झाले आहे ते म्हणजे देवाद्वारे मानवाचे पाचारण. सार्वकालिक जीवनाचा आनंद हे देवाने मानवाला दिलेले एक अलौकिक वरदान आहे ते मिळवून देणारी देवाची कृपादेखील तितकीच अलौकिक आहे, म्हणून आजच्या मिस्साबलीदानात भाग घेताना आपली अंतःकरणे शुद्ध करून ह्या जगातील सर्व गोष्टींपेक्षा आपण देवावर अधिक प्रेम करावे आणि देवाच्या आज्ञेत राहून त्याचे कार्य यशस्वी रितीने पूर्ण करण्यासाठी आपण प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.
१. आपले पोप फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू व सर्व व्रतस्थ लोक ज्यांनी आपले आयुष्य प्रभूच्या कार्यासाठी त्यागलेले आहे अशा सर्व लोकांना चांगले आरोग्य लाभावे; त्यांच्या कार्यात यश यावे आणि त्यांच्या ज्या काही अडी अडचणी आहेत त्या त्यांच्यापासून दूर व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जे लोक देवावर श्रद्धा ठेवत नाहीत तसेच जे देवापासून दूर गेलेले आहेत अशा सर्व लोकांना देवाचे पाचारण व्हावे आणि त्या पाचारणाद्वारे त्यांचे परिवर्तन घडून यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे लोक त्यांच्या जीवनात निराशून गेलेले आहेत अशा सर्व लोकांना देवाचे धैर्य लाभावे जेणे करून जीवनाचा आनंद उपभोगतील म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे लोक गरीब आहेत व ज्यांना दोन वेळचे अन्न लाभत नाही अशा सर्व लोकांच्या शारिरीक व आत्मिक गरजा पूर्ण व्हाव्या तसेच त्यांचे सर्व दु:ख संकटे त्यांच्यापासून दूर जावीत म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.


Thursday, 12 January 2017

Reflection for the Homily of 2nd Sunday of Ordinary Time (15-01-17) by Br Sadrik Dapki



सामान्य काळातील दुसरा रविवार
दिनांक: १५-१-१७.
पहिले वाचन: यशया ४९:३,५-६.
दुसरे वाचन: १ करंथीकरास पत्र १:१-३.
शुभवर्तमान: योहान १:२९-३४.


“हे पहा, जगाचे पाप हरण करणारे देवाचे कोकरू”


प्रस्तावना:
आपण सामान्यकाळाला सुरवात केली आहे. आज आपण सामान्यकाळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणास सांगत आहे कि, येशु हा आपला देव आहे आणि तो आपल्यासाठी मरण पत्करून आपणास पापांतून मुक्त करील.
यशया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात यशया म्हणतो की, एक मसीहा येईल जो सर्वांना न्याय देवून एकत्रित आणणार आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल सुद्धा म्हणतो की, पवित्र शास्त्र हे आपणास देवाच्या आश्वासनाबद्दल माहिती देण्यासाठी आणि आपला विश्वास बळकट व्हावा म्हणून लिहिले गेले आहे. शुभवर्तमानात बाप्तिस्मा करणार योहान हा येशुबद्दलची साक्ष देतो आणि येशूला ‘देवाचे कोकरू’ असे संबोधतो.
‘परमेश्वराला शरण गेले म्हणजे त्याच्या प्राप्तीचे मार्ग खुले होतात’ असे म्हणतात. म्हणून ह्या मिस्साबलीत जीवित देवाच्या कोकारास शरण जाऊया आणि आपल्या पापांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन: यशया ४९:३,५-६

बाबेलच्या बंदिवासात असताना इस्रायली लोक देवाची प्रजा म्हणून असलेल्या आपल्या ओळखीबद्दल गोंधळून गेले होते. अशा वेळी यशया संदेष्टा इस्रायली लोकांना देवाने दिलेल्या सुवर्णसंधीचे खात्रीपूर्वक आश्वासन देतो कि, देव याकोबास परत आणून त्यास इस्रायली लोकांमध्ये जोडेल आणि हे सर्व प्रभूचा दास, तारणारा येशु ख्रिस्त ह्याच्या येण्याने परिपूर्ण होईल. आणि तो एका पवित्र कुमारीच्या गर्भात जन्म घेईल.

दुसरे वाचन: करिंथकरास  पहिले पत्र १:१-३

आजचे दुसरे वाचन आपणाला मंदिराविषयी स्पष्टीकरण देते. पौल म्हणतो, करिंथ येथील देवमंदिर हे करिंथचे नव्हे तयार देवाचे मंदिर आहे, आणि प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती हा देवमंदिराचा अविभाज्य घटक आहे. पौलाचे म्हणणे असे आहे कि, सर्व लोकांनी एकत्र यावे अशी देवाची दैवी इच्छा आहे, म्हणून आपण सर्वांनी प्रत्येक व्यक्तीला देवाकडे वळवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. जरी आपण येशूच्या बारा शिष्यांपैकी नसलो तरी पौलाच्या म्हणण्यानुसार बाप्तिस्मा घेतलेला प्रत्येक व्यक्ती हा संतगणात गणला गेलेला आहे. आणि म्हणून आपण त्याच्या आज्ञेप्रमाणे वागलो पाहिजे.   
शेवटी संत पौल म्हणतो कि देवाची कृपा व शांती तुम्हांस असो. कारण कृपा व शांती हि प्रत्येक विश्वासू माणसाला भेटली पाहिजे. कृपेची अभिव्यक्ती हि देवाचा दयाळूपणा व भलेपण प्रतिध्वनीत करतो आणि शांती हे देवाने येशुख्रिस्ताला दिलेले तारणाचे प्रतिक आहे. ह्या शांतीमध्ये पापांची क्षमा व देवाबरोबर समेट यांचा समावेश आहे.

शुभवर्तमान: योहान १:२९-३४.

आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो कि, योहानाने येशूकडे पाहून म्हटले “हे पहा, जगाचे पाप हरण करणारे देवाचे कोकरू” (योहान १:२९). ह्या वाक्याचे स्पष्टीकरण योहानाच्या इतर संदर्भावर आधारून करावयास हवे. येशु पापहरण करण्यासाठी प्रगट झाला (१योहन ३:५). तो आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील (१योहान १:४). तसेच तो आपल्या पापांचे नव्हे तर सर्व जगाच्या पापाबद्दल प्रायश्चित करेल (१योहान २:२९). या संदर्भावरून आपणास समजते कि, येशु हा जिवंत देवाचे कोकरू आहे; जो ह्या भूतलावर आपल्याला पापांपासून मुक्त करावयास आला.  
देवाचा मार्ग तयार करण्यासाठी येणाऱ्या संदेष्टयाचे भाकीत हे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानामध्ये पूर्णत्वास येते. हा योहान येशु ख्रिस्ताच्या सहा महिन्याअगोदर जन्मास आला होता. जेणेकरून तो इस्रायली लोकांस बाप्तिस्मा देऊन जगाचा तारणारा येण्याची पूर्व तयारी करेल. इस्रायली लोकांनी योहानाला महान संदेष्टा मानले होते परंतु तो त्याचा खरा-खुरा परिचय देतो आणि म्हणतो कि, ‘माझ्यापेक्षा महान जीवंत देवाचा पुत्र येणार आहे जो तुम्हाला अग्नीने आणि पाण्याने बाप्तिस्मा देईल. मी तर त्याच्या वाहणा सुद्धा उचलणाच्या लायकीचा नाही’. जेव्हा येशु ख्रिस्त त्याच्या समोर येतो तेव्हा तो म्हणतो “पहा हे देवाचे कोकरू, जगाचे पाप वाहून नेणारा”.
बायबलमध्ये कोकरू ह्या शब्दाला फार महत्व आहे. कोकरू हा शब्द तीन महत्वाच्या बाबीचे प्रतिक आहे : सौम्यता, यज्ञ आणि विजय.
1.  कोकरू सौम्यतेचे प्रतिक
कोकरू सौम्य व निरपराधी प्राणी आहे. येशुसुद्धा सौम्य व नम्र होता. मत्तयलिखित शुभवर्तमानात येशु म्हणतो ‘माझ्यापासून शिका कारण मी मनाने लीन व सौम्य आहे’ (मत्तय १९:२९)
2. कोकरू यज्ञपशूचे प्रतिक
जेव्हा योहानाने येशूला देवाचे कोकरू म्हणून संबोधले तेव्हा त्याला अर्पण केलेल्या यज्ञपशुची आठवण झाली. तसेच अब्राहामाला देवाने मुलाऐवजी मेंढरू दिले ह्याची आठवण झाली. येशु ख्रिस्त हा मानवाच्या तारणासाठी कोकरू बनला होता व कालवरी डोंगरावर त्याने स्वतःला अर्पण करून आपणास पापमुक्त केले.
3. कोकरू विजयाचे प्रतिक
यहूदा मक्काबिच्या काळात शिंग असलेले कोकरू विजयाचे प्रतिक बनले. शमुवेल, दावीद व शलमोनाप्रमाणे मक्काबीचे वर्णन शिंग असलेले कोकरू म्हणून केलेले आहे. येशु ‘देवाचे कोकरू’ ह्याने सैतानावर व पापावर विजय मिळवला. हे विजयी कोकरू देवाच्या प्रजेची पापापासून मुक्तता करते आणि त्यांना देवराज्यात घेऊन जाते. तेथे तो त्यांच्यावर सत्ता गाजवतो म्हणून कोकरू हे विजयाचे प्रतिक आहे.

बोधकथा:

एक व्यक्ती शोरूमच्या काचा साफ करत होता जेणेकरून शोरूमधील वस्तू बाहेरून स्पष्ट दिसतील. अशावेळी त्याला काचेवर एक डाग दिसला. तो व्यक्ती डाग साफ करण्यास सुरवात करतो परंतु डाग काही पुसत नव्हता. त्याने खूप साबण लावून प्रयत्न केले पण डाग काही गेला नाही. काही काळाने त्याच्या लक्षात आले कि, तो डाग बाहेरून नाही तर आतमधून आहे. तेव्हा त्या व्यक्तीने आतमधल्या व्यक्तीस तो डाग साफ करण्यास सांगितले व त्याने तो डाग साफ केला आणि काच स्वच्छ दिसू लागली व शोरूम मधील वस्तू स्पष्ट दिसू लागल्या.

मनन चिंतन:

आपण प्रत्येकजण पापी आहोत आणि त्या पापामुळे आपल्या सुद्धा काळजाला पापाचा डाग पडला आहे आणि ते आपण साफ केले पाहिजे. पण त्यासाठी आपल्यामध्ये प्रभू ख्रिस्त आला पाहिजे. केवळ देवच आपल्याला पापमुक्त करु शकतो. आणि म्हणूनच देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला कोकरू बनवून, मानवरूप धारण करून आपल्यामध्ये पाठवलं जेणेकरून आपल्या पापांची क्षमा होईल. योहानाने तोच ख्रिस्त आपणास दाखवला आणि म्हटले पहा, “जगाचे पाप दूर करणारे देवाचे कोकरू.” योहानाच्या म्हणण्याचा उद्देश असा आहे कि, तुम्ही पवित्र व्हा. तुमच्या हृदयाचे दार नीट ठेवा जेणेकरून येशु ख्रिस्त जगाचा तारणारा तुमच्यामध्ये येईल व तुम्हाला साफ करून तारण प्राप्त होईल.
ख्रिस्ताद्वारे देवाने मानवाबरोबर असलेले जिव्हाळ्याचे नाते पुन्हा प्रस्थापित केले. जेव्हा आपण पापाच्या दडपणाखाली असतो तेव्हा आपणास तीव्र वेदना होतात पण जेव्हा आपण येशुकडे मदतीसाठी धाव घेतो तेव्हा येशु आपल्या मदतीला धावून येतो. आपल्या पापांची क्षमा करून प्रेम, दया व शांतीने आपणास भरून टाकतो. ह्या कोकराचे रक्त आपणास पापमुक्त करते व पवित्र आत्म्याने भरून आपणास तारण मिळते.
आपण सर्व देवाची प्रेमळ लेकरे आहोत आणि तो आपणास कधीही अंतर देणार नाही व आपल्या प्रेमळ पुत्राद्वारे आपणास्तव पापांपासून सोडवेल. म्हणून आपण त्या जिवंत कोकराकडे प्रार्थना करूया जेणेकरून आपण त्याच्याद्वारे पापांपासून मुक्त होऊ व त्याचे तारण मिळवू.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे देवाच्या कोकरा आमची प्रार्थना ऐक.

१. आपले पोप महाशय सर्व कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू व धर्मभागिनी ह्यांनी अनुभवलेला ख्रिस्ताचा प्रकाश सर्व जगात पसरविण्यासाठी प्रयत्न करावे व योहानाप्रमाणे ख्रिस्ताची ओळख सर्वांना करून द्यावी म्हणून प्रार्थना करूया.
२. जे लोक देऊळ मातेपासून दुरावलेले आहेत त्यांनी जगाची पापे दूर करणाऱ्या देवाच्या कोकराला ओळखावे व ख्रिस्ताच्या प्रकाशात त्यांचे मनपरिवर्तन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. ख्रिस्ती ह्या नात्याने आपण सुद्धा योहानाप्रमाणे ख्रिस्ताची ओळख दुसऱ्यांना करून द्यावी म्हणून प्रार्थना करूया.
४. जे लोक दुःखी, कष्टी व आजारी आहेत त्यांना प्रभूच्या स्पर्शाने चांगले आरोग्य लाभावे व त्यांचे जीवन सुखी व समाधानी बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपण आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजांसाठी प्रार्थना करूया.

   



Thursday, 5 January 2017

Reflection for the Homily of Solemnity of Epiphany of the Lord (08-01-17) by Br Minin Wadkar 



प्रकटीकरणाचा सण

दिनांक ०८/०१/२०१७

पहिले वाचन: यशया ६०:१-६

दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र ३:२-३अ, ५-६

शुभवर्तमान: मत्तय २:१-१२




"आम्ही त्याला नमन करण्यास आलो आहोत.”





प्रस्तावना:

     आज ख्रिस्तसभा प्रभू येशूच्या प्रकटीकरणाचा म्हणजेच तीन राजांचा सण साजरा करीत आहे. ह्या तीन राजांनी प्रकाशाचा पाठलाग करून येशू राजाचे दर्शन घेतले व त्याला सोने, उध व गंधरस भेट वस्तू दिल्या व त्याच्या ठायी नतमस्तक झाले. म्हणूनच हा प्रकटीकरणाचा सण आपल्याला प्रकाशाचा शोध करण्यास आमंत्रित करीत आहे.
     पहिल्या वाचनात यशया संदेष्टा आपल्याला परमेश्वराच्या तेजाने प्रकाशमान होण्यास सांगत आहे. कारण हा प्रकाश अंधकाराचे जीवन नष्ट करून उजेडाचे म्हणजेच आनंदाचे जीवन प्राप्त करून देणार आहे.  संत पौल येशूच्या प्रेरणेद्वारे इफिसकारांस लिहिलेल्या पत्रात सांगतो कि देवाचे प्रकटीकरण हे सर्वाना असून ते जात, धर्म, संस्कृती ह्यांचा विचार करत नाही.
       संत मत्तय शुभवर्तमानत सांगतो कि तीन राजांनी ताऱ्याला पाहून येशूचा शोध घेतला व त्याला त्यांनी आणलेल्या भेट वस्तू अर्पण केल्या. ताऱ्याच्या प्रकाशामुळे त्यांना येशू बाळाचे दर्शन झाले. हा प्रकाशाचा तारा खुद्द येशू ख्रिस्त आहे जो जीवन फलदृपी करतो. आपले ख्रिस्ती जीवन ख्रिस्ताच्या तेजाने भरून जावे   म्हणून ह्या पवित्र मिस्साबलिदानात विशेष प्रार्थना करूया.   
       
सम्यक विवरण
पहिले वाचन: यशया ६०:१-६

     संदेष्टा यशया बंदिवासात अडकलेल्या लोकांना वैभवशाली नवीन येरुशलेमाच्या बांधणीचे भविष्य सांगून त्यांच्यावर परमेश्वराची कृपा येणार आहे असे सांगतो. निराश झालेल्या लोकांना पुन्हा एकदा प्रकाशाचे जीवन जगता येणार आहे असे यशया संदेष्टा भाकीत करतो. ज्या परप्रांतीय लोकांनी देवाचा तिरस्कार केला होता, ते लोक नवीन येरुशलेम पाहून देवाच्या आशीर्वादात सहभागी होणार आहेत व त्यांच्या राज्याचे परिवर्तन होऊन ते ह्या प्रकाशमय जीवनात सामील होणार आहेत. सर्व राष्ट्रे व इस्राएल येरुशलेमाच्या महिमेत सामील होणार आहेत. ते आपआपल्यापरीने मौल्यवान वस्तू व बक्षिसे घेऊन येणार आहेत आणि इस्रायेलच्या देवाला नतमस्तक होणार आहेत असे यशया संदेष्टा सांगत आहे.  

दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र ३:२-३ अ, ५-६

     संत पौल रोम येथील बंदिवासात असताना इफिसकरांस पत्र लिहितो. ह्या पत्रात तो म्हणतो की, परप्रांतीय लोकांचा मी प्रेषित आहे. त्यांना येशुची ओळख किंवा ख्रिस्ताविषयी माहिती देणे हि देवाची कृपा आहे (रोम १:५; १५:१५; गलेसिकरांस पत्र २:९). पौलचे मिशन कार्य हे त्याला येशूने दिमिष्काच्या वाटेवर असताना दिले होते (प्रेषितांची कृत्ये ९:१५; २२:२१).
     जुन्या करारामध्ये असे आढळते कि मसीहा फक्त हा यहुदी लोकांचाच आहे आणि हे त्यांचे ठाम मत होते. परंतु मसीहा हा परप्रांतीय व यहुदियांसाठी येणार आहे हयाची कल्पना प्रेषितांना व संदेष्टांना होती. प्रेषितांना येशूने आज्ञा केली कि, “ तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा ( मत्तय २८:१९; व मार्क १६:१५; २४:४७).  पौल सांगतो कि परप्रांतीय लोक व यहुदी ह्यांच्यामध्ये कोणतेही मतभेद नाही. सर्व येशुसमोर समान आहेत.

शुभवर्तमान: मत्तय २:१-१२

     ज्ञानी लोक हे विज्ञानामध्ये बुद्धिमान व हुशार होते. तसेच ते पर्शियामध्ये धर्म उपदेशक होते.  देवाने त्यांना प्रकट केले होते की यहुदियांचा राजा जन्माला येणार आहे. म्हणून ते पूर्वेकडून येरुशलेमला आले होते. मागी लोक फलज्योतिष होते. त्यांचे मत असे होते  कि प्रत्येक मनुष्याचा एक तारा असतो जो त्याचे भविष्य सांगतो. हे कदाचित खरे किंवा खोटे ठरू शकते. परंतु परमेश्वराने त्यांच्या ह्या अंधश्रद्धेचा वापर करून त्यांना खरे काय आहे ते समजवण्याचा प्रयत्न केला. असेच काही विलक्षण आकाशामध्ये घडले जेथे त्यांना तारा दिसला.
     हेरोद राजा हा विधर्मीय होता. जेव्हा त्याला जुन्या करारामधील भाकीत केलेला अपेक्षित मसीहा ( यहुदियांचा राजा ) येण्याची माहिती मिळाली तेव्हा तो भयभीत झाला होता. म्हणून त्याने मुख्य याजक व परुशी ह्यांना बोलावून घेतले. याजक व परुशी ह्यांना बायबल ज्ञान खूप होते. मिखा प्रवाद्याने जे भाकीत केले होते ते त्यांच्या ध्यानात आले. म्हणून त्यांनी हेरोद राजाला सांगितले कि मसीहा हा बेथलेह्म गावी जन्माला येणार आहे. हेरोद राजाने आधीच त्या बालकाला ठार मारण्याचा कट रचला होता.  सर्व येरुशलेम व हेरोद राजा घाबरले होते. म्हणून त्याने बेथलेहेमात व आसपासच्या सर्व प्रदेशात जे दोन वर्षाचे व त्याहून कमी वयाचे बाळक होत त्या सर्वाना त्याने माणसे पाठवून जीवे मारले. मागी लोक ताऱ्याच्या दिशेने चालू लागले व जेव्हा तारा एका ठिकाणी थांबला तेव्हा त्यांनी बाळकाला मारिया त्याच्या आईबरोबर पहिले. योसेफचा येथे उल्लेख करण्यात आलेला नाही कारण कदाचित तो कामा निम्मित बेथेलेह्मला गेला असेल. संत मत्तयचे शुभवर्तमान  ( १:१८-२५ ) आपल्याला सांगते कि येशूचा जन्म हा पवित्र आत्म्याच्या सहाय्याने झाला. तर योसेफची ओळख येथे पालक-वडील म्हणून करण्यात आली आहे .
     तीन राजांनी येशू बाळकाला पाहून नतमस्तक झाले. कारण त्यांनी ह्या   बाळकाला देव नाही तर मोठ्या राजाचे स्वरूप दिले होते. तीन राजांनी आपल्यासोबत आणलेले सोने, उध व गंधरस अपर्ण केले.  हेरोद राजाने ज्ञानी लोकांना परत येऊन त्याला भेटायला सांगितले होते. परंतु देवाची इच्छा वेगळी होती. देवाच्या आज्ञेनुसार ते येरुशलेमला न जाता दुसऱ्या वाटेने निघून गेले. नंतर योसेफ व मरीयेने येशू बाळकाला सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेविले जेणेकरून हेरोद राजा त्याला ठार मारणार नाही.

मनन चिंतन

‘गाईच्या गोठ्यात ख्रिस्त जन्मला, पूर्वेच्या चांदण्यात तारा उगवला.’
सूर्य, चंद्र, तारा सर्व जगाला प्रकाश देतात आणि काळोखाचे साम्राज्य नष्ट करतात. ह्या ग्रहांपासून प्रकाश मिळतो तो मानवाला नवीन वाट व दिशा दाखवितो. जीवनाला नवीन कलाटणी मिळते. ह्या प्रकाशाची तुलना आपण परमेश्वराशी केल्यास कोणताही व्यत्यय येणार नाही. तसेच जीवनात असे घडून येते कि प्रकाशाने मनुष्याची शारीरिक व आध्यात्मिक विकास होत असतो. म्हणूनच असे म्हणतात कि, ‘सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना. तिमिरातूनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना.’ देव प्रकाश होऊन मानवाचे तारण करत असतो.
बायबलमधील संदर्भ:
१. मोशेला झालेले पाचारण (निर्गम ३:२): ‘परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्नी-ज्वालेने मोशेला दर्शन दिले. येथे देवाची मोशेला ओळख होते व त्याला देव मिसर देशात कार्य करण्यासाठी प्रेरित करतो.
२. तुझे वचन माझ्या पावलांकारिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे (स्तोत्रसंहिता ११९:१०५).
३. मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील (योहान ८:१२).
परमेश्वराच्या मार्गावर सदैव प्रकाश असतो. आणि हा प्रकाश शोधण्यासाठी मनुष्य धडपडत असतो.
     आज देऊळमता प्रकटीकरणाचा सण साजरा करीत आहे म्हणजेच तीन राजांचा सण. तीन मागी लोक ज्योतिष होते. त्यांना आकाशात पूर्वे दिशेस तारा दिसला.  हा तारा शोधात ते बेथलेहेमला पोहचले जेथे त्यांना येशू बाळाचे दर्शन झाले. ताऱ्याच्या विलक्षण प्रकाशामुळे त्यांना एका मोठ्या राजाचे दर्शन घडून आले. ह्या तीन राजांनी आपल्याबरोबर सोने, धूप, गंधरस येशू राजाला अर्पण करण्यासाठी आणले होते. त्या तीन दानांचा अर्थ खालीलप्रमाणे होतो. सोने म्हणजे राजाचा सुवर्ण मुकुट. येशू हा राजांचा राजा आहे म्हणून सोने हे येशूचे राजेपण दर्शवितो. धूप म्हणजे येशूचे देवपण जरी देवशब्द मनुष्य झाला तरी तो देवाचा पुत्र होता. आणि गंधरस म्हणजे येशुचे दु:खसहन जे त्याला मानवाच्या कल्याणासाठी आणि तारणासाठी क्रुसावर मरेपर्यंत सोसावे लागणार होते.
     हेरोद राजाला येशू बाळाला ठार मारायचे होते. हे ओळखून तीन राजे हेरोदाच्या आज्ञेनुसार न चालता, देवाला शरण गेले. त्यांनी आपले सर्वस येशू राजाला बहाल केले.
     यशया संदेष्टा पहिल्या वाचनात आपल्याला परमेश्वराच्या तेजाने प्रकाशमान होण्यास सांगत आहे. संत पौल येशूच्या प्रेरणेनेद्वारे इफिसकरांस लिहिलेल्या पत्रात सांगतो कि देवाचे प्रकटीकरण हे सर्वाना आहे. म्हणजेच परमेश्वर देव हा सर्वांचा आहे. यहुदी व परराष्ट्रीय ह्यांच्यामध्ये कोणताही भेदभाव नसून ते सर्व ख्रिस्तामध्ये एक आहेत.
     देव सर्वांवर सारखीच प्रीती करतो. कोणालाही उच्च किंवा कमी लेखत नाही. येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश होऊन ह्या भूतलावर आला. ज्याप्रमाणे तीन राजांनी प्रकाशाचा शोध केला तसाच आपण सुद्धा करण्याची फार गरज आहे. ख्रिस्ती लोक ह्या नावाने आपली ओळख आहे. म्हणूनच एक चांगले ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी प्रेरणेची गरज आहे. ती प्रेरणा आपल्याला आजच्या प्रकटीकरणाच्या सणाद्वारे प्राप्त होते. कारण तीन ज्ञानी लोक आपले सर्वस येशू चरणी अर्पण करतात. आणि आपले अध्यात्मिक जीवन प्रकाशाने भरून टाकतात. जो येशू बाळ गाईच्या गोठ्यात जन्मलेला आहे, त्या बाळाला आपण सर्वस अर्पण करूया आणि अंधारातून तेजाकडे वाटचाल करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना :-
प्रतिसाद : हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

 १. ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करीत असलेले आपले पोप फ्रान्सीस, सर्व कार्डीन्ल्स, बिशप्स, धर्मबंधू-धर्मभगिनी व सर्व प्रापंचिक यांना ख्रिस्ताचे योग्य मार्गदर्शन लाभावे व त्यांनी त्यांच्या जीवनाद्वारे ख्रिस्ताचा प्रकाश इतरांपर्यंत पोहचवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपण सर्वांनी देवाच्या प्रेरणेने ख्रिस्ताचा शोध खऱ्या मनाने व हृदयाने करावा व आपल्याला जीवनात ख्रिस्ताची शांती व प्रेम मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे पापी लोक ख्रिस्ताच्या प्रकाशापासून दुरावलेले आहेत व पापाच्या अंधारात अजूनही भटकत आहेत अशांना प्रभूचा स्पर्श व्हावा व त्यांच्या जीवनात आशेचा व ख्रिस्ताच्या प्रेमाचा किरण प्रकाशित व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. देव हा सर्वाचा देव आहे. हि भावना अखिल मानव-जातीच्या मनात रुजावी व सर्वांनी एक जुटीने, आनंदित, प्रेमान जगावं म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतू प्रभूचरणी मांडूया.