Thursday, 14 October 2021

                                            

        Reflection for 29th Sunday in Ordinary Time (17/10/2021) By Fr. Suhas Pereira

सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार

 

दिनांक: १७/१०/२०२१

पहिले वाचन : यशया ५३: १०-११

दुसरे वाचन : इब्री. ४: १४-१६

शुभवर्तमान : मार्क १०: ३५-४५

 

"सेवेसाठी अधिकार "



प्रस्तावना

        प्रिय बंधू-भगिनींनो, आज आपण सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार साजरा करतो. आजच्या उपासनेची वाचने खऱ्या नेतृत्वाचा सार सांगताना म्हणतात कि, खरा नेता हा सत्तेचा हव्यास धरत नाही, इतरांवर सत्ता किंव्हा हुकूमत गाजवत नाही तर आपल्या सत्तेचा/ अधिकाराचा उपयोग इतरांची सेवा करण्यासाठी करत असतो. खरं श्रेष्ठत्व हे सेवेमध्येच असतं. आजची उपासना प्रभू येशू ख्रिस्ताच जीवन आपल्यापुढे उदाहरण म्हणून ठेवते. प्रभू येशू हा देवपुत्र असूनसुद्धा तो सेवक बनला त्याने जनसेवेला स्वतःला वाहून घेतले. जो प्रभू येशूप्रमाणे सेवा आणि समर्पणाचा ध्यास घेतो आणि त्याप्रमाणे जगतो, तोच  ख्रिस्ताच्या राज्यात उच्च आणि श्रेष्ठ बनू शकतो. यशया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात आपण परमेश्वराच्या सेवकाबद्दल वाचतो. हा सेवक परमेश्वराकडे लोकांसाठी मध्यस्थी करतो त्यांच्या पापांचे ओझे स्वतःच्या खांद्यावर घेतो आणि त्यांच्या पापांबद्दल स्वतःच्या प्राणाने  भरपाई देतो. परमेश्वराचा सेवक इतरांच्या पापासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देतो. हि भविष्यवाणी प्रभू ख्रिस्ताबद्दलची भविष्यवाणी होती. प्रभू येशू इतरांसाठी जगला आणि मेला.

        दुसऱ्या वाचनात आपण ऐकतो कि, प्रभू येशू हा लोकांसाठी स्वर्गाकडे मध्यस्थी करणारा परमेश्वराचा महान असा मुख्य याजक होता. प्रभू येशू असा महान याजक आहे "जो आमच्यासारखाच सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून गेला. तरीही तो पूर्णपणे निष्पाप राहिला. म्हणून आपण त्याच्या कृपेच्या सिंहासनाजवळ ठाम निर्धाराने जाऊ या. यासाठी की, आमच्या गरजेच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून आम्हाला दया व कृपा प्राप्त व्हावी." आजचं शुभवर्तमान आपल्याला प्रभू येशूने देवाचा व्यथित सेवक बनून  आणि आपल्या शिष्यांना सेवेद्वारे श्रेष्ठ होण्याचा कानमंत्र देऊन आपलं तारणकार्य कसं सिद्धीस नेलं त्याबद्दल सांगते.

        “तुम्हांपैकी जो कोणी श्रेष्ठ बनू पाहतो, त्याने स्वतःला नम्र बनवले पाहिजे आणि इतरांची सेवा-चाकरी केली पाहिजे.” खरा श्रेष्ठपणा हा आपल्याकडे किती आणि काय आहे किंव्हा आपल्याला इतरांकडून काय मिळू शकते ह्यात नाही, तर खरा श्रेष्ठपणा आपण इतरांना काय देऊ शकतो ह्यात आहे.

 

मनन -चिंतन

        प्रिय बंधु-भगिनींनो, कलकत्त्याची संत मदर तेरेसा हि एक लहान आणि साधी स्त्री होती. आपल्या इतर व्रतस्थ भगिनींना बरोबर घेऊन समाजातील गोरगरीब, आजारी आणि उपेक्षितांची सेवा करून त्यांची योग्य काळजी घेणारी हि गटाराची संत देवप्रिती आणि शेजारप्रितीने ओतप्रोत भरलेल्या हृदयाची व्यक्ती होती. गोरगरिबांना आणि इतरांनी टाकून दिलेल्या लोकांना निवारा मिळावा, त्यांना प्रेम मिळावं, त्यांना कमीतकमी चांगलं आणि मानवी प्रतिष्ठेला साजेसं असं मरण यावं आणि त्यांच्या देवावरील विश्वासाद्वारे त्यांना स्वर्गाचे सुख लाभण्यासाठी त्यांच्या जीवनाची तयारी करावी या महत्वाच्या हेतुने मदर तेरेसांनी गरिबांच्या आणि आजाऱ्यांच्या सेवेचे हे व्रत घेतलेले होते.

        आपण जेव्हा मदर तेरेसा ह्यांच्या जीवनाकडे पाहतो आणि आजच्या शुभवर्तमानात शिष्यांकडे पाहतो तेव्हा आपल्याला त्यांच्यामध्ये प्रचंड फरक आणि विरोधाभास  आढळून येतो. मदर तेरेसा इतरांना देवाच्या स्वर्गराज्यात आणण्यासाठी, त्यांना स्वर्गात स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होत्या. तर प्रभू येशूचे शिष्य मात्र येशूच्या राज्यात स्वतःसाठी मानाची जागा, उच्च पद मिळवण्यासाठी टपून बसलेले आणि एकमेकांशी झगडत होते. प्रभू येशू हा खरोखरच एक उत्तम गुरु होता. मात्र त्याचे शिष्य हे वेगळे होते. शिष्यांमध्ये काही मदर तेरेसांसारखे होते, तर काही अतिमहत्वकांक्षी होते. आपण लक्षात घेतलं पाहिजे, कि आजच्या शुभवर्तमानात नावानिशी उल्लेख केलेल्या याकोब आणि योहान हे नंतर प्रभू येशूकडून खूप काही शिकले आणि प्रभू येशूच्या सानिध्यात राहून त्यांचं पूर्णपणे जीवन आणि हृदयपरिवर्तनसुद्धा झालं. याकोब हा ख्रिस्तासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शिष्यांपैकी पहिला रक्तसाक्षी झाला आणि योहान हा ख्रिस्ताचा प्रिय शिष्य बनून त्यानेसुद्धा पुढे रक्तसाक्ष्याचं मरण पत्करलं. या सर्अवागोदर शिष्यांना एक सत्य समजलं नव्हत आणि त्यांच्या कल्पनेपलीकडेसुद्धा जात होतं, ते म्हणजे: प्रभूच्या राज्यात मानाचे स्थान मिळविण्याचं जे स्वप्न ते बघत होते, ते स्वप्न केवळ परिपूर्ण समर्पणाद्वारेच पूर्ण होणे शक्य होईल.

         मध्यंतरीच्या वेळात शिष्य जाणून चुकले होते, कि सत्ताधाऱ्यांप्रमाणे भविष्याची आणि कारकिर्दीची चिंता आणि त्यांचा विचार हे पूर्णपणे प्रभू येशूच्या शिकवणुकीविरुद्ध आहेत. "तुम्ही सत्ताधाऱ्यांप्रमाणे नाहीत", प्रभू येशूने त्यांना सांगितलं होतं, “तर तुमच्यातील जो कोणी मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे. आणि जो कोणी पाहिला होऊ इच्छितो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे” (मार्क १०, ४३-४४). प्रभू येशूच्या राज्यात श्रेष्ठ मनुष्य तो नाही ज्याच्याकडे सत्ता, ताकद आहे. प्रभूच्या राज्यात श्रेष्ठ आणि उच्च मनुष्य तोच ज्याला सत्तेचा गर्व आणि सत्तेची हाव नाही तर जो नम्र आणि सत्ता असूनसुद्धा  नम्र बनतो, सेवाभावी  बनतो.

        प्रभूने त्यांना विचारलं, “मी जो प्याला पिणार आहे, तो तुमच्याने पिणे शक्य आहे काय?. म्हणजेच, माझ्याबरोबर आणि माझ्यासारखं दुःख सहन करणे तुम्हाला शक्य आहे का? प्रभू येशूने एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली, ती म्हणजे, त्याच्या उजवीकडे किंवा डावीकडे बसण्याचा अधिकार मिळविण्यासाठी शिष्यांना दुहेरी समर्पणासाठी तयार असणे गरजेचे आहे. हे दुहेरी समर्पण आहे: निस्वार्थी सेवा करण्याची आणि सेवा करताना दुःख आणि प्रसंगी मरणसुद्धा स्वीकारण्याची तयारी. आणि या शिकवणुकीचा अवलंब येशूने प्रथम स्वतःच्या जीवनाद्वारे केला. त्याचं जीवन हे अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी निस्वार्थी सेवेमध्ये व्यतीत केलेलं जीवन होतं. आपल्या शिष्यांबरोबर शेवटचे भोजन घेत असताना येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुण्याचा प्रसंग आपल्याला सेवेचा खरा अर्थ सांगतो. सेवा करणे म्हणजे, दुसऱ्यांसमोर  स्वतःला नम्र बनवणे, वाकणे, कि जेणेकरून इतरांना अपमानाला सामोरे न जाता, मानाचे आणि प्रतिष्ठेचे जीवन जगता येईल. दुःख सहनाची तयारी म्हणजे, प्रभू येशूप्रमाणे समाजाने नाकारलेल्या आणि वाळीत टाकलेल्या लोकांप्रती सहानुभूती दाखविणे, समाजातील तळागाळातील लोकांना आधार देणे. प्रभू ख्रिस्त स्वतः अशा लोकांच्या बाजूने होता, त्यांच्या जीवनात आणि दुःखात तो सहभागी झाला; अशा लोकांबरोबर असलेल्या त्याच्या जवळीकतेमुळे त्याला समाजाची निंदा-नालस्ती, थट्टा-मस्करी, शिव्या-शाप सहन करावे लागले, क्रुसावरील मरण स्वीकारावं लागलं. हाच तो दुःखाचा प्याला आहे जो प्रभू येशूने प्राशन केला.

        सेवाकार्य करण्याची तयारी आणि दुःख सहन करण्याची तयारी:  गोरगरीब आणि गरजवंत लोकांकडे दुर्लक्ष न करता त्यांची सेवा करण्यास आजचं शुभवर्तमान आपल्याला बोलावत आहे. एक ख्रिस्ती या नात्याने आपण ख्रिस्ताप्रमाणे सेवामय जीवन जगण्यास तयार आहोत का? कि आपलं जीवन फक्त आपण, आपलं  कुटुंब, आपलं काम, आपलं भविष्य यापुरताच मर्यादित आहे? आपल्या जीवनात इतरांसाठी वेळ आणि जागा आहे का? आपल्या स्वतःच्या जीवनाचा क्रूस वाहने आणि त्याचबरोबर इतरांच्या जीवनाचा क्रूस वाहण्यास त्यांना साहाय्य करणे हे खूप कठीण, मेहनतीचं, जोखमीचं  आणि कष्टाचं काम असू शकतं. परंतु हे सगळं त्याच प्याल्याचा भाग आहे, जो प्याला पिण्यासाठी प्रभू येशू आपल्याला आव्हान आणि आमंत्रण देत आहे.

        सेवाकार्य फक्त तेव्हाच घडत नाही, जेव्हा एखादी व्यक्ती मदर तेरेसांसारखं जीवन जगते. सेवाकार्याला वेगवेगळ्या बाजू, वेगवेगळे पैलू आहेत. परंतु या सर्व बाजूंचा आणि पैलूंचा एकच सामाईक हेतू आहे: दुसऱ्याचं बरेपण, दुसऱ्यांचा आनंद, त्यांचं अध्यात्मिक आणि शारीरिक बरेपण आणि त्यांचं सार्वकालिक तारण. सेवा करणे म्हणजे इतरांना परमेश्वराचं प्रेम, त्याची दया आणि त्याच्या  चांगुलपणाचा अनुभव देणे.

        आजची उपासना आपल्याला नम्र होऊन सेवाभावी जीवन जगण्यास आमंत्रण देत आहे आणि ख्रिस्ताचा आदर्श आपल्यापुढे ठेवत आहे. ख्रिस्त हा देवाचा पुत्र असूनसुद्धा नम्र मानव झाला. तो सेवा करून घेण्यासाठी नव्हे तर सेवा करण्यासाठी या जगतामध्ये आला; तो या पृथ्वीचा न्याय करण्यासाठी नव्हे तर आपल्याला स्वर्गीय पित्याकडून सार्वकालिक जीवन देण्यासाठी या पृथवीवर आला. त्याच्या या सेवाकार्यात त्याने देवपुत्र असूनसुद्धा स्वतःला इतके नम्र आणि लीन केले, कि त्याने क्रुसावर एखाद्या गुन्हेगाराचे, एका दासाचे मरण स्वीकारले. प्रभू ख्रिस्ताप्रमाणे आपणसुद्धा नम्र होऊया आणि सेवेचं व्रत घेऊ या कारण नम्र होऊन सेवा करण्यातच खरं  श्रेष्ठत्व आहे.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

हे परमेश्वरा तू कृपेचा सागर आहेस. आज आम्ही आमच्या सर्व विनंत्या आणि गरजा घेऊन श्रद्धेने आणि मोठ्या आत्मविश्वासाने तुजकडे येत आहोत.

आपला प्रतिसाद: हे परमेश्वरा आमची प्रार्थना ऐक.

१) हे परमेश्वरा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू हा या जगात सेवा करून घेण्यासाठी नव्हे, तर सेवा करण्यासाठी आला होता. या जगातील तुझ्या कुटुंबाला, तुझ्या ख्रिस्तसभेला  ख्रिस्तासारखे बनण्यास आणि जगण्यास उत्कट इच्छा आणि तुझी कृपा प्रदान कर.

२) जे लोक स्वतःचा जीव धोक्यात घालून, स्वतःची पर्वा न करता इतरांच्या मदतीला धावून जातात अशांसाठी आम्ही प्रार्थना करतो. अन्याय आणि दडपशाहीविरुद्ध आवाज उठवताना तूच त्यांचा मार्गदर्शक आणि साथीदार हो.

३) आमच्या देशाच्या सर्व राजकीय नेत्यांनी ख्रिस्ताच्या आदर्शाप्रमाणे त्यांना सोपवलेल्या अधिकाराचा आणि सत्तेचा वापर लोकांच्या भल्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी करावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.

४) आमचे परमगुरु फ्रान्सिस, सर्व महागुरू, धर्मगुरू आणि ख्रिस्तसभेच्या सर्व पुढाऱ्यांनी प्रभू ख्रिस्ताप्रमाणे सेवेचा ध्यास घ्यावा आणि त्यांच्या सेवेद्वारे देवाचे प्रेम समाजाला अर्पावे, म्हणून प्रार्थना करू या. 

५) थोडा वेळ शांत राहून आपल्या सर्व वैयक्तिक गरजांसाठी आणि त्याचबरोबर आपल्या परमगुरु स्वामींच्या हेतूंसाठी खास प्रार्थना करू या.

Friday, 8 October 2021

         Reflection for 28th Sunday in Ordinary Time (10/10/2021) By  Fr. Benher Patil
सामान्य काळातील अठ्ठावीसावा रविवार

दिनांक १०-१०-२०२१

पहिले वाचन :- ज्ञानग्रंथ :- ७:७-११

दुसरे वाचन :- इब्री लोकांस पत्र :- ४:१२-१३

शुभवर्तमान :- मार्क १०:१७—३०


जगातील संपत्तीच्या मागे जाऊन स्वर्गातील संपत्ती गमावू नका


प्रस्तावना

आजची उपासना आपणास देवाने दिलेल्या विवेकबुद्धीचा वापर करून ऐहिक आणि क्षणभंगुर गोष्टींना प्राधान्य न देता, खरे शहाणपण शोधण्याचा किंवा मिळवण्याचा सल्ला देत आहे. शलमोन राजाने सर्व भौतिक गोष्टींपेक्षा विवेकबुद्धी आणि समजशक्ती निवडली. जेव्हा त्याने शहाणपण स्वीकारले, तेव्हा त्याला सर्वकाही मिळाले. येशू ज्ञानाचा अवतार असल्याने, जेव्हा आपण येशूच्या मागे जातो, त्याच्या प्रभावी वचनाचा स्वीकार करतो, तेव्हा आपल्याला येशूसह सर्व काही प्राप्त होते. आजच्या ह्या पवित्र बलिदानाला सहभागी होत असताना, आपल्या जीवनात देवाने योग्य निर्णय आणि निवड करण्यास आपणास शिकवावे, म्हणून विशेष प्रार्थना करू या.

मनन चिंतन

खरा श्रीमंत किंवा धनवान कोण? आपल्याला वाटते की ज्याच्याकडे अमाप संपत्ती पैसा किंवा सोनी आहे, तोच खरा श्रीमंत. ज्याच्याकडे बंगला, गाडी, नोकर-चाकर आहेत तोच शेठमाणूस आहे. पण बायबल मधील वचन आपणास असा उद्देश देतो की, समाजशक्ती आणि विवेकशक्ती ज्याच्याकडे असते, तेच खरे धनवान असतात. शलमोनाने क्षणभंगुर संपत्ती, सत्ता, वैभव यांना प्राधान्य दिले नाही, तर शहाणपणाला आपली सर्वात मोठी मालमत्ता म्हणून ओळखली. ज्ञानाच्या, विवेकाच्या जोरावर तो खरा ज्ञानी, श्रीमंत व यशस्वी राजा बनला. खरे शहाणपण हे देवा कडून येते (बेनसिरा १:१). खरे शहाणपण आपल्याला देव ज्या गोष्टी पाहतो, त्याप्रमाणे पाहण्याची व देव समजतो, त्याप्रमाणे समजून घेण्याची क्षमता देते. केवळ दैवी शहाणपण आपल्याला जीवनात शहाणपणाने व यशस्वीपणे कसे जगायचे हे शिकवू शकते.

येशू सर्व समंजसपणाचा आणि ज्ञानाचा उगम आहे. त्याची वचने आणि आपल्याला यशाचा, महानतेचा तसेच खऱ्या श्रीमंतीच्या मार्ग शिकवतात. आजच्या शुभवर्तमानात एक श्रीमंत तरुणाच्या उदाहरणाद्वारे येशू आपल्याल त्याची सत्यता पटवून देण्याचा प्रयत्न करतो. श्रीमंत तरुण हा धार्मिक होता.तो सर्व आज्ञाचा काटेकोरपणे पाळन करत होता. त्याने कोणावर जुलूम किंवा अत्याचार केला नाही.  पण त्याची शोकांतिका अशी होती कि, त्याला लोकांपेक्षा गोष्टी जास्त आवडतात होत्या. आपली मालमत्ता स्वतःकडे ठेऊन, स्वतःसाठी वापरून आपण देवाची दया मिळवू शकतो,  ह्या  चुकीच्या कल्पनेत अडकलेला होता. त्याच्याकडे अमाप संपत्ती असून सुद्धा तो असमाधानी, बेचेन, अपुरा होता. अशा परिस्थितीत तो येशूला प्रश्न विचारतो, “उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यासाठी मी काय केले पाहिजे?” तेव्हा येशू त्याला म्हणतो, “तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे, तुझे असेल- नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल, माझ्यामागे ये”. वचन सांगतं की, ते शब्द ऐकून त्याचे तोंड उघडले,आणि कष्टी होऊन तो निघून गेला कारण तो फार श्रीमंत होतो.

दुर्दैवाने धन किंवा संपत्ती आपल्याला देवाकडे किंवा शाश्वत जीवनाकडे घेऊन जाण्यास असमर्थ ठरतात. श्रीमंत तरुण येशूची कल्पना, आव्हान स्वीकारण्यास अपुरा पडतो. कारण त्याच्या संपत्तीने स्वतःच्या व देवाच्या दरम्यान एक भिंत बांधली होती. त्याच्या मालमत्तेने त्याला ताब्यात घेतले होते. जणू काही तो भौतिक गोष्टी आणि पैशाच्या आसक्तीने बांधला घेला होता. जरी श्रीमंत तरुणाने कधीही कुणाला मारले नाही, चोरी केली नाही, व्यभिचार केला नाही तरीही तो मूर्तीपूजेला मनाई करणारी आज्ञा आणि शेजाऱ्यावर प्रेम करणारी आज्ञा मोडत होता. त्याने आपल्या संपत्तीची देवा पेक्षा जास्त पूजा केली आणि तिला प्राधान्य दिलं. जीवनात परिपूर्ण व्हायचं असेल तर आज्ञा पाळणे पुरेसे नाही. येशू त्याला आव्हान देतो की, त्याने आपली संपत्ती गरिबांना वाटून द्यावी.

संपत्ती श्रीमंती माणसाला देवापर्यंत पोहोचण्यापासून रोखते? प्रथम: संपत्ती स्वातंत्र्याच्या चुकीच्या भावनेला प्रोत्साहन देते. सर्वसामान्यपणे श्रीमंतांना वाटते की, ते त्यांच्या आनंदाचा मार्ग विकत घेऊ शकतात, किंवा दुःखातून मार्ग काढू शकतात आणि म्हणूनच त्यांना देवाची गरज भासत नाही. दुसरे म्हणजे, संपत्ती माणसाला या पृथ्वीवर बांधून ठेवते. एखादा मनुष्य जर पृथ्वीशी व पृथ्वीवरील भौतिक व ऐहिक गोष्टींशी संबंधित असेल, तर तो कधीही परलोकांचा विचार करत नाही. शिवाय श्रीमंती माणसाला स्वार्थी, गर्विष्ठ आणि लोभी बनवते. पैशाचा लोभ मूर्तिपूजा असण्याबरोबर दुःखाचा स्त्रोत देखील आहे.

परंतु येशू किंवा त्याची शिकवण श्रीमंतांच्या विरोधात नाही. येशुने स्वतः संपत्ती किंवा ऐहिक वस्तूंचा कधीही निषेध केला नाही. तो ज्या गोष्टींचा निषेध करतो ती म्हणजे पैशाची आणि मालमत्तेची आसक्ती किंवा लोभ. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे, येशु संपत्ती बद्दलच्या आपल्या गोष्टीबद्दल बोलत आहे.

जगामध्ये सुदैवाने असे अनेक श्रीमंत आहेत, ज्यांनी आपली संपत्ती प्रामाणिकपणे आणि न्यायपणे मिळवली आहे, आणि जे त्यांच्या संपत्तीचा बराचसा भाग सामाजिक कारणासाठी खर्च करतात. त्यांची संपत्ती त्यांना स्वर्ग गाठण्यास त्यांना कधीच अडथळा आणणार नाही. बायबल असं म्हणत नाही की, पैसा हे सर्व वाईटाचे मूळ आहे, तर ते म्हणते कि, पैशाचे प्रेम व लोभ हे सर्व वाईटाचे मूळ आहे. भौतिक संपत्ती ही देवाच्या आशीर्वादाची चिन्हे आहेत, तर दारिद्र हे त्याच्या नाराजीचे लक्षणं आहेत; ह्या विषयी येशू यहुदी विचारवंतांना आव्हान देतो. येशू येथे अशा मूल्य प्रणालीचा निषेध करतो, जो लोकांपेक्षा अधिक महत्त्व किंवा स्थान ऐहिक गोष्टींना देतो. शेवटी येशू असे प्रतिपादन करतो की, ज्यांनी देवाच्या राज्याला प्राधान्य दिले आहे, त्यांना या जीवनात आशीर्वाद आणि पुढील आयुष्यात सार्वकालिक जीवनासह दोन्हीचे भरपाई दिली जाईल.

मी माझ्या जीवनात कोणाला जास्त प्राधान्य देतो, देवाला की संपत्तीला? माझ्यासाठी संपत्ती वरदान आहे की शाप आहे? देवाने दिलेल्या आशिर्वादाचा किंवा  संपत्तीचा मी सदुपयोगासाठी की दुरुपयोगासाठी वापरतो?

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक.

. चर्चच्या सर्व पुढाऱ्यांनी आपल्या जीवनात ऐहिक संपत्तीचे गुलाम न बनता, गरिबांचा व सर्वसंघपरीत्यागाचा उत्तम कित्ता दुसऱ्यांसमोर ठेवावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.

. या जगातील श्रीमंत राजकीय पुढाऱ्यांनी स्वतःच्या हिताचा विचार न करता, निस्वार्थीपणे व उदारपणे देशाच्या विकासासाठी व गरीब व गरजवंतांच्या कल्याणासाठी सर्व राष्ट्रीय संपत्तीचा सदुपयोग करावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.

. कोरोना महामारीमुळे ज्यांनी नोकऱ्या गमावलेल्या आहेत, आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे, दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत; अशा सामाजिक दुर्बळ घटकांना श्रीमंत लोकांनी योग्य व हवी ती मदत पुरवावी आणि गरिबी हटवण्यासाठी हातभार लावावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.

. ख्रिस्ती लोकांनी जात-पात किंवा देश आणि वेश अशा चौकटीच्या पलीकडे जाऊन, ख्रिस्ती प्रेमाने व  करुणेने प्रेरित होऊन, रंजल्या-गांजल्यांची सेवा करण्यासाठी, दुःखितांची तिमिर दूर करण्यासाठी परमेश्वरी कृपा मिळावी, म्हणून आपण प्रार्थना करू या.

   

Sunday, 3 October 2021

 Reflection for the Feast of St Francis of Assisi (04/10/2021) By Bro. Rockson Dinis              

संत फ्रान्सिस असिसिकर ह्यांचा सण

दिनांक: ०४ /१० /२०२१

पहिले वाचन: बेनसिरा ५०: १,३-४,६-७

दुसरे वाचन: गलतीकारास पत्र -६:१४-१८

शुभवर्तमान: मत्तय ११:२५-३०

अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन”. 


 

प्रस्तावना

आज अखिल ख्रिस्त सभा संत फ्रान्सिस असिसी ह्या महान संताचा सण साजरा करीत आहे. संत फ्रान्सिस हे १२ व्या शतकातले असून हा काळ नैतिक, आध्यात्मिक, राजकीय व सामाजिक अस्थिरतेचा होता. श्रीमंत व गरीब ह्यात फार मोठी दरी होती. श्रीमंत हे फार श्रीमंत होत जात होते तर गरीब लोक गरीबींनी त्रासलेले, अन्यायाला बळी पडलेले व आजाराला मुकलेले होते. असिसिकर संत फ्रान्सिसने ह्या सर्व लोकांची सेवा करून त्यांना देवाकडे आणण्याचा प्रयत्न केला. संत फ्रान्सिसने ख्रिस्तासारखे पवित्र जीवन जगले. ह्यामुळे ख्रिस्तासारखे त्याच्या शरीरावर पाच घाव आले व ते मरेपर्यंत त्याच्या अंगावर राहिले. म्हणून ह्या महान संताला आपण दुसरा ख्रिस्त मानतो. तसेच संत फ्रान्सीस हे पर्यावरणाचे आश्रयदाते आहेत. आपणही संत फ्रान्सिसप्रमाणे सुंदर व पवित्र जीवन जगावे म्हणून ह्या मिस्साबलिदानात विशेष प्रार्थना करूया.

मनन चिंतन

ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधुनो, आज संपूर्ण ख्रिस्तसभा जलोषाने व आनंदाने संत फ्रान्सिस असिसिकर ह्यांचा  सण साजरा करत आहे. आपल्या सर्वांना संत फ्रान्सिस असिसिकर हा कोण आहे, व त्याचे जीवन कसे होते, हे ठाऊकच आहे. संत फ्रान्सीस हा निसर्ग प्रेमी, म्हणजे ते पर्यावरणीय संत म्हणून ओळखला जातात. तसेच त्याला येशू ख्रिस्ताचे दुसरे रूप, असेही संबोधले जाते.

            आजच्या पहिल्या वाचनात, बेनसिराची बोधवचने आपल्याला सांगतात की, ओनियसचा पुत्र सिमोन हा पुरोहित होता. त्याने आपल्या हयातीत मंदिरे दुरुस्ती केली. तसे पहिले तर संत फ्रान्सिस असिसिकर ह्यांना सुद्धा क्रूसातील दैवी वाणीत येशूने मंदिर बांधायला सांगितले. त्या नंतर जेव्हा ख्रिस्तसभा कोसळायला  लागली तेव्हा, फ्रान्सीस ने आपल्या पूर्ण शरीराने व संपूर्ण दैवी शक्तीने चर्चला आपल्या कार्याची मजबुती दिली.

आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल  म्हणतो, आपला प्रभू येशूख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे, माझ्या हातून न होवो. म्हणून, वंदन व अभिनंदन फक्त  त्या वधस्तंभाला, कारण आता त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभापेक्षा अधिक काही करण्याची गरज राहिली नाही. “मी ख्रिस्ताचा गुलाम आहे, हे जगाने ओळखावे हीच माझी इच्छा आहे”. संत फ्रान्सीस ने सुद्धा पैसा, त्याचे कपडे व  जे काही होते ते सर्व त्याच्या वडिलांना दिले व म्हंटले, आजपासून माझे वडील पीटर बर्नडोने नाही तर, स्वर्गीय पिता माझे वडील आहेत. आजपासून त्यालाच मी वंदन व अभिनंदन करणार.

            आजच्या शुभवर्तमानात आपन ऐकतो, की प्रभूं येशू ख्रिस्ताला  विचारवंत, ज्ञानी व त्या काळचे शिकलेले  धर्मपुढारी  ह्यांनी  ओळखले नाही. तर साध्या व नम्र  लोकांनी ख्रिस्ताला ओळखले. म्हणून येशू म्हणतो, ज्यांनी मला ओळखले आहे त्यांनी देव पित्याला सुद्धा ओळखले आहे. संत फ्रान्सीस ने  येशूला म्हणजेच त्या  महान विश्वाच्या निर्माण कर्त्याला निसर्गाद्वारे, पशु-पक्ष्याच्याद्वारे ओळखले व ह्या रचलेल्या वसुंधरेला, सृष्टीला, माझा भाऊ, माझी बहीण असे म्हटले आहे. सूर्य माझा भाऊ आहे, चंद्र माझी बहीण, पृथ्वी ही माझी आई आहे, आणि वारा हा माझा भाऊ आहे . असे म्हणणारा अनेक संतांमध्ये आगळावेगळा संत, जणूकाही दुसराच प्रभू येशूख्रिस्त ज्याने निसर्गाकडे पाहून आपल्याला जीवनाचे धडे शिकविले.

अशाप्रकारे निसर्गाबरोबर नातं जोडून त्याने एदेन बागेचा अनुभव घेतलेला दिसून येत आहे. ह्याच कारणामुळे संत फ्रान्सिस असिसिकर निसर्गप्रेमी किंवा पर्यावरणीय संत म्हणून ओळखला जातात.

            आपण शुभवर्तमानात ऐकतो, प्रभू येशू ख्रिस्ताला अनेक प्रकारची उपमा दिलीली आहे, त्याच्यातील एक म्हणजेच  उत्तम मेंढपाळाचीउपमा, कारण मानवीभाषेतून  प्रभूविषयी सांगणे, हे मानवा पलिकडचे आहे. त्याच प्रकारे  संत फ्रान्सिसला  आज मी मोहरीच्या दानाची उपमा देऊ इच्छितो. आपल्या सर्वाना ठाऊकच आहे, मोहरीचा दाना हा भरपूर लहान असतो. असं म्हणतात, लहान हे महान होऊ शकते. जर त्यामध्ये दैवत्व लपलेलं असेल. मग ते बाळ असो किंवा मोहरीचा दाणा. संत फ्रान्सिस हा सुद्धा एका छोट्याश्या मोहरीच्या दान्यासारखाच आहे. असे म्हणतात, दाना जमिनीत पडून मेला नाही, तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो(योहान १२:२४). म्हणूनच जो दाणा फुटतो, तोच दाणा रुजतो. नाहीतर तो कुजतो. संत फ्रान्सिस असिसिकर हा सुद्धा त्याच्या जीवनात त्या मोहरीच्या दाण्याप्रमाणे फुटतो. म्हणजेच जगाचा संवाद सोडून, तो येशूच्या संवादात राहून त्याला आलिंगन देतो. तो आता जगाच्या नाही, तर देवाचा झाला आहे. जगाच्या आज्ञेत चालणार नाही, तर देवाच्या आज्ञा चालणारा झाला आहे. ह्यालाच म्हणतात देवासाठी आपला जीव देणे व फुटून जाणे. जोपर्यत  आपन फुटत नाही तो पर्यत आपण रुजू शकत नाही. संत फ्रान्सिस त्या मोहरीच्या दाण्याप्रमाणे फुटला आणि रुजला, व त्या छोट्याशा बियानिचे सर्वात मोठे झाड होवून या वंसुधरेत, तो फळा, फुलांनी भरून गेला. म्हणजेच, अनेक अशा संस्थानी, संतानी आज फ्रान्सिसकन संस्था भरून गेलेली दिसून येत आहे. खरोखरच  फ्रांसिसचे नाव संपूर्ण जगामध्ये गाजलेले  आहे. आपल्या पोप साहेबांनी संत फ्रान्सीस चे नाव स्वीकारून त्याच्यासारखे जीवन जगायला सुरुवात केली आहे. ह्याच्यापेक्षा अधिक काही सांगायची गरज मला भासत नाही.

            निसर्ग हा तुमच्या-माझ्यासाठी भरपूर महत्त्वाचा भाग आहे. अशी शिकवण प्रभू येशूख्रिस्ताने व संत फ्रान्सिस ह्यांनी आपल्याला दिलेली आहे. प्रभू येशू हा  पूर्णपणे निसर्गाचा होता. डोंगर नद्या व समुद्राच्या सान्निध्यात राहूनच त्यांनी उपदेश केला. तो निसर्गाचा होता, म्हणून निसर्ग त्याच्या मृत्यूवर शोक करितो, भूमी थरथर कापते, खडक फुटतात, आणि सूर्य प्रकाश नाहीसा होतो.

            आज पाहिले तर देव स्वर्गाचा, तर मनुष्य पृथ्वीचा राजा आहे. त्यामुळे वातावरण  प्रदूषित होण्याअगोदर, मनुष्याचे मन प्रदूषित झाले आहे, मनुष्य तो तोडफोड करू लागला आहे व आज  निसर्ग ही एक सुंदर अशी बाग न राहता, त्याचे गोदाम झालेले दिसून येते. येशूने आकाशातल्या पक्षांकडे व शेतातल्या फुलांकडे पाहून जीवनाचे धडे शिकविले. परंतु आज मनुष्याला, आपल्या स्व:ताच्या  मुलांना पाहण्यास वेळ नाही, तर फुलांकडे कधी पाहणार. आज मनुष्य जगामध्ये तीर्थयात्री प्रमाणे वागत आहे. तीर्थयात्री रस्त्यात तंबू ठोकतो, व रात्र भरली की पुढे निघून जातो. पण मागे मात्र कचरा व घाण सोडून जातो. असे दृश्य पाहिल्यावर असं वाटतं की, जणू काही जगाचा आत्माच हरवला आहे.

             होय माझ्या प्रिय बंधुंनो, देवाने सुंदर असे जग म्हणजेच घर, हे आपल्याला दिलेले आहे व आज त्या पृथ्वीला (जगाला) वाचवण्यासाठी संत फ्रान्सिस व येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीप्रमाणे वागणे अत्यंत गरजेचे आहे; कारण  हे एकच  जग आपल्याकडे आहे. ह्या जगाला  दुर्बिणीतून पाहिले तर चंद्र एका दगडासारखा दिसतो. परंतु आत्म्याच्या नजरेतून पाहिले तर तो  चंद्र देवाच्या चेहरयासारखा दिसतो.  माणसा विसरून जावू नकोस, आज आपण जीवन जगतो, कारण आपल्या अगोदरच्या पिढीने निसर्गावर प्रेम केले. तसेच आज आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी निसर्गावर प्रेम  करून त्याची काळजी  घेऊया

निसर्गाची काळजी घ्या निसर्ग तुमची धाम दुपटीने काळजी घेईल.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद:  हे प्रभू, तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१) ख्रिस्तसभेचा कारभार पाहणारे पोप, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू- धर्मभगिनी व व्रतस्त लोकांना पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी व ख्रिस्तासारखे जीवना जगून त्यांनी जगाला ख्रिस्ताकडे आणावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२) सर्व फ्रान्सिसकन बंधू भगिनींनी देवाच्या कार्यासाठी व त्याच्या गौरवासाठी अविरत झटत राहावे, असिसीकर संत फ्रान्सिसद्वारे त्यांनी जगाला प्रेमाचा, शांतीचा व बंधुत्वाचा संदेश द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

३) पर्यावारण व मानव ह्यात नात अतूट आहे परंतु स्वार्थासाठी पर्यावरणाची ऱ्हास होत आहे. ह्या पर्यावरणाची जोपासना करण्यासाठी व तिचे रक्षण करण्यासाठी अधिकाधिक लोकांनी व नेत्यांनी पुढाकार घ्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) जे लोक आजारी आहेत थकलेले, उदासीन आहेत अशाना परमेश्वराने सत्कार्य लाभावे व पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने ते लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) शेतकरी व मासेमारी बंधू-भांगिनीसाठी त्यांच्या ह्या काळात परमेश्वराने रक्षण करावे व त्यांना त्याच्या कामात भरपूर यश मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

६) थोडा वेळ शांत राहून आपल्या व्यक्तिक गरजासाठी प्रार्थना करूया.


Friday, 1 October 2021

                                         
                                 


 Reflection for 27th Sunday in Ordinary Time (03/10/2021) By Bro. Justin Dhavade





सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार

दिनांक – ०३/१०/२०२१

पहिले वाचन:  उत्पत्ती : २:१८-२४

दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र २:९-११

शुभवर्तमान: मार्क १०:२-१६

“जे देवाने जोडले आहे, ते मनुष्याने तोडू नये.”



प्रस्तावना

        आज आपण सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची वाचणे आपल्याला देवाने जे पवित्र, पावन व मंगल केले होते ते मानवाने स्वतःच्या स्वार्थापायी, ते पवित्र बंधन त्याने पायळी तुडविले आहे. देवाला प्राधान्य न देता, सैतानाला स्वतःच्या जीवनात प्रथम स्थान दिले; आणि ह्याच कारणास्तव आपण स्वतःच्या जीवनाची राखरांगोळी करून घेतली.

     आजच्या पहिल्या वाचनात आपल्याला असे दिसून येते की, परमेश्वराने सर्व काही चांगले ते निर्माण केले व त्यांना नाव ध्यावे ह्याकरिता मनुष्याला त्यांच्यावर परिपूर्ण अधिकार गाजवायला दिला. तसेच आदाम व ऐवेला निर्माण करून परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केले, जेणे करून ते फलद्रूप होतील. दुसऱ्या वाचनामध्ये आपल्याला पाहायला मिळते की, येशूने मरण सोसल्यामुळे त्याला गौरव व थोरवी प्राप्त झाली. जो पवित्र करणारा आणि ज्यांना पवित्र करण्यात येत आहे, ते सर्व एकापासूनच आहेत; हे इब्रीलोकांस पाठवलेल्या पत्रात आपल्याला सांगण्यात येते. आजच्या मार्क लिखित शुभवर्तमानामध्ये परमेश्वर एक अतूट बंधनाविषयी आपल्याला सूचित करत आहे. “जे देवाने जोडले आहे, ते मनुष्याने तोडू नेये.”

     देवाने आपल्याला नर व नारी म्हणून निर्माण करून संपूर्ण जग आपल्या हवाली केले. आपल्याला परीपूर्ण असा आशीर्वाद दिला. जेणे करून आपण देवाच्या सानिध्यात राहू व जगू. जर आपण देवाच्या सानिध्यात राहण्यास व जगण्यास कमी पडलो असले तर परमेश्वराकडे क्षमेची याचना करूया.

मनन चिंतन

ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधूनो. अनेकदा आपल्या मनामध्ये विचार येत असतील की, लग्न म्हणजे काय? लग्न हा शब्द नेमका आला तरी कुठून? लग्नानंतर आपल्याला काय मिळते? एकदा एक मुलगा आणि एक मुलगी चांगले मित्र होते. ते एकाच शाळेमध्ये असल्याकारणाने एकमेकांची खूप मदत करायचे. शाळेत एकत्र जाणे, एकत्र अभ्यास करणे, एकमेकांना गृहपाठ करण्यासाठी मदत करणे इतकेच नाही तर परीक्षेच्या वेळी एकमेकांकडून नक्कल करणे, अशा गोष्टींमुळे त्यांची मैत्री ही शाळेमध्ये प्रसिद्ध होती. शाळेनंतर पुढे कॉलेज ही त्यांनी एकत्रच निवडली. त्यांना एकमेकांविषयी खूप आदर आणि जिव्हाळा होता. त्यांची ही मैत्री आता हळू-हळू प्रेमामध्ये बदलत चालली होती. दोघांच्याही मनात एकमेकांविषयी भावना होत्या. पण दोघेही एकमेकांना सांगायला घाबरत होते. एके दिवशी दोघांनीही वेलंकनी येथे मरियामातेच्या नेव्हेनाला जाण्याचा निर्णय केला. वेलंकनीला गेल्यावर लोकांच्या प्रचंड गर्दीमुळे दोघेही एकमेकांपासून हरवून गेले. दोघांना एकमेकांशिवाय राहायची सवय नसल्याकारणाने दोघेही एकदम अस्वस्थ झाले. दोघांचाही जीव एकदम कासाविस झाला. दोघांच्याही डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. मुलीने जागेवर गुडघे घालून मरियामातेकडे विनंती करण्यास सुरुवात केली. इतक्यात मागून कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती मागे वळून पाहताच तिला तिचे अश्रू अनावर झाले. कारण तिच्या खांद्यावर हात ठेवणारी व्यक्ती हा तिचा हरवलेला मित्रच होता. लागलीच त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि आपल्या मनातील भावना एकमेकांसमोर व्यक्त केल्या. कालांतराने दोघांचे लग्न झाले आणि त्यांनी नवीन जीवनाला सुरवात केली.

वरील गोष्टीमध्ये त्या दोघांचे एकमेकांवर किती प्रेम होते हे लक्षात येते. त्या प्रेमाद्वारेच ते भल्यामोठ्या गर्दीमध्ये हरवून सुद्धा एकत्र झाले. परंतु आज आपण समाजामध्ये पाहिले तर, विवाहित जोडपी ही स्वतःच्या घरांमध्येच हरवलेली दिसतात. एकमेकांविषयी प्रेम, आदर भावना ह्या गोष्टी ते हरवून बसलेली आहेत. आज प्रभू येशूख्रिस्त हा आपल्याला पती आणि पत्नी ह्या पवित्र नात्याविषयी बोध देत असताना म्हणत आहे की, पती-पत्नी हे नाते एक पवित्र नाते आहे. लग्न संस्काराद्वारे पती-पत्नी हे दोघे नसून एकात्म झालेली असतात. त्यामुळेच पती आणि पत्नी हे दोघेही एकमेकांसाठी एक जबाबदारी बनत असतात. आजची तिन्ही वाचणे ही महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार विनिमय करण्यासाठी आमंत्रण करत आहेत. १) मानवाची निर्मिती, २) दुःख आणि मरण, आणि ३) दोन देह आणि एक जीव.

. मानवाची निर्मिती: आपण उत्पत्तीचे पुस्तकांमध्ये वाचतो की, देवाने पहिल्यांदा जगाची निर्मिती केली आणि सर्वात शेवटी मानवाला उत्पन्न केले. मानवाला इतर प्राणीमात्रांवर अधिकार गाजविण्यासाठी नव्हे, तर इतर जीवांची काळजी घेण्यासाठी उत्पन्न केले, याचा अर्थ माणूस हा सर्व प्राणीमात्रांचा रक्षणकर्ता आहे. माणसाच्या निर्मितीनंतर देवाने माणसाच्या फासळीपासून स्त्रीची निर्मिती केली; जेणेकरून ते दोघे एक म्हणून सुखी समाधानी जीवन जगतील.

. दुःख आणि मरण: दुःख आणि मरण, हे आपल्या जीवनातील महत्त्वाचे पैलू आहेत. ह्या  विश्वातील प्रत्येक जीव हा एक ना एक दिवस मरणाला सामोरे जात असतो. हेच जीवनाचे सत्य आहे. प्रभू येशूख्रिस्त हा मरण पावला. परंतु आपल्या मरणाने त्याने मरणावर विजय मिळवला. कारण तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. आपणही आपल्या मरणाद्वारे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये उठले जाणार आहोत. त्यामुळे मरणाला न भिता आपण आनंदाने त्याचा स्वीकार करायला हवा.

. दोन देह एक जीव: लग्न संस्कार हे मानवासाठी एक मोठी जबाबदारी असते. लग्न संस्काराद्वारे पती आणि पत्नी जन्मभरासाठी एक होत असतात. जर एखाद्या वेळी पती-पत्नीमध्ये काही कारणास्तव गैरसमज किंवा भांडण झाले असेल, तर त्याचा निर्णय किंवा निकाल पर्याय हा घटस्फोट नसतो. कुठलीही समस्या ही पती-पत्नीने एकजुटीने समजून घेतल्यास सहजपणे पार पाडता येते. यामुळे कुटुंबामध्ये प्रार्थना ही नेहमी महत्त्वाची असते.

आज आपण देवाची मुले म्हणून नेहमी त्याच्या नियमाप्रमाणे चालावे व त्यासाठी देवाची भरपूर अशी कृपा शक्ती आपणा सर्वांना नेहमी मिळावी म्हणून प्रार्थना करूया.

श्रद्धावंतांच्या प्रार्थना

प्रतिसाद – हे प्रभो, आम्हा सर्वाना सदैव तुझ्या कृपेच्या छायेत राहू दे.

१) परमेश्वराने पवित्र, मंगल नर-नारी बनवली. पण आम्ही आमच्या स्वार्थासाठी, आमच्या स्वतःच्या ‘मी’ पणासाठी हे पवित्र बंधन जे देवाने निर्माण केलेले आहे ते तोडत आहोत. जे देवाने जोडले आहे ते मनुष्याने स्वतःच्या स्वार्थापाही तोडू नये म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

२) येशू ख्रिस्ताने आम्हा सर्वाना प्रकाशाची लेकरे बनवली आहेत. पण आम्ही खोट्या सुखाच्या मोहाला बळी पडून परमेश्वरापासून दुरावले आहोत. त्यामुळे कुटुंबात शांतता नाही. कुटुंबामध्ये संशय व अहंकार भरलेला आहे. तर या पवित्र बलीदानाद्वारे देवाचा व आम्हा सर्वाचा पुन्हा एकदा नव्याने समेत व्हावा म्हणून प्रार्थान करूया.

३) आजच्या युगामध्ये लग्न हा एक प्रकारचा व्यवहार व खेळ झाला आहे. लोक आपसात करार करून स्वतःच्या स्वार्थापही एकत्र राहून पवित्र संस्काराला व देव निर्मितीला जुमानत नाही. त्यामुळे कुटुंबाना व चरण घरपण राहिले नाही. परमेश्वराने त्याच्या कृपेचा वर्षाव आम्हा सर्वांवर करावा जेणे करून आम्ही ख्रिस्ती आहोत याची जाणीव  आम्हला व्हावी म्हणून परमेश्वराकडे याचन करूया.

४) प्रत्येक कुटुंबाचे ख्रिस्तामध्ये नुतनीकरण व्हावे. लेकरांना, आई-वडिलांच्या कष्टाची  जाणीव व्हावी. व त्यांनी आई-वडिलांच्या म्हातारपणात त्यांनी त्यांचा आधार बनावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

५) आम्ही सर्वजण देवाची मुले आहोत; म्हणून आमच्या समाजामध्ये स्त्री-पुरुष भेदाभेद न होता, प्रेमाने, प्रीतीने प्रार्थानामय जीवन, पवित्र शास्त्राच्या वचनाद्वारे जीवनाचा कायापालट व्हावा, समाजामधील प्रत्येक कुटुंबाने देंवाचा गौरव करावा, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.