Wednesday 12 February 2014


Reflections for homily By:Leon D'Britto.





सामान्य काळातील सहावा रविवार

दिनांक :१६/०२/२०१४
पहिले वाचन :- बेनसिरा १५:१६-२१
दुसरे वाचन :- १ करिंथकरांस :२:६-१०
शुभवर्तमान :- मत्तय ५:१७-३७

"शास्त्री परुशी ह्यांच्यापेक्षा तुमचे नितिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यांत तुमचा प्रवेश होणार नाही.”

प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील सहावा रविवार साजरा करत आहोत. आजची उपासना आपल्याला नीतीमान जीवन जगण्यास निमंत्रण देत आहे. पहिल्या वाचनात आपण देवाने आपल्याला बहाल केलेल्या स्वातंत्र्याविषयी ऐकतो तर दुस-या वाचनात आपण देवाच्या ज्ञानाविषयी ऐकतो; जे गुप्त आहे व पवित्र आत्म्याद्वारे प्रगट केले जाते.
शुभवर्तमानात आपल्याला देवाच्या राज्यात प्रवेश मिळवण्यासाठी नीतिमान होण्याच्या गरजेविषयी सांगण्यात आले आहे. येशू आपल्याला खरोखर नीतीमान बनून देवाच्या राज्यात प्रवेश मिळवण्यासाठी आज्ञा पालानाबद्दल अस्तित्वात असलेली शिकवण सोडून देऊन त्या आज्ञांचा मतितार्थ समजून घेऊन त्याप्रमाणे एक नातीमान, नितळ जीवन जगण्यास आवाहन करतो.
आजच्या मिस्सा बलिदानात सहभागी होत असताना आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा वापर आपण प्रभू येशूची शिकवण अनुसरून आपले जीवन नीतिमान बनवण्यास वापरावे म्हणून प्रभू येशूकडे शक्ती व कृपा मागूया.

पहिले वाचन :- बेनसिरा १५:१६-२१

आजचे वाचन बेनसिराच्या पुस्तकातील मानवी स्वातंत्र्य व जबाबदारी ह्या विभागातील आहे. देव आपल्याला जगण्याचे स्वातंत्र्य देतो, तसेच जीवनात योग्य ती निवड करण्यास प्रवृत्त करतो. आपल्यासमोर अग्नी व पाणी, जीवन व मरण, चांगले व वाईट ठेवलेले आहे ह्यातील आपण काय निवडावे ह्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे. आपल्याला हे स्वातंत्र्य बहाल करून देव आपल्याला दुष्कृत्य करण्याची आज्ञा देत नाही, व तो पाप करण्याचा परवानाही देत नाही. तो फक्त आपल्याला पूर्णपणे जीवन जगण्याचे स्वातंत्र्य देतो, कोणती बाजू निवडायची हे आपल्या हातात आहे.

दुसरे वाचन :- १ करिंथकरांस :२:६-१०

पौल हा करिंथ मध्ये सुरु असलेल्या अंतर्गत वादास कंटाळलेला होता व लोकांना इतर शुल्लक गोष्टीत लक्ष घालण्याऐवजी देवाचे ज्ञान समजून घेण्यात मग्न होण्यास आवाहन करीत आहे. देवाचे ज्ञान हे गूढ, गुप्त व सहजासहजी न समजणारे आहे. हे ज्ञान युगाच्या सुरवातीपासून अस्तित्वात आहे परंतु आपल्याला ते फक्त पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रगट केले जाते.

शुभवर्तमान :- मत्तय ५:१७-३७

आजचे शुभवर्तमान हे येशूच्या डोंगरावरील प्रवचनाचा भाग आहे. येशूने वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या शिकवणुकीसाठी उच्चारलेले वाक्य मत्तयने येथे एक शिकवण म्हणून एकत्र केलेले आहेत. ह्याद्वारे मत्तय आपल्या वाचकांना (बहुतेक जन यहुदी होते व त्यांनी येशूला अंगिकारले होते) येशूची एक नवीन शिकवण प्रस्तुत करीत आहे.
शुभवर्तमानाच्या पहिल्या भागात येशू एक महत्वाचा मुद्दा स्पष्ट करतो; तो म्हणजे शिष्यांचे जीवन शास्त्री व परुश्यांच्या जीवनापेक्षा नीतिमान असले पाहीजे. नितीमत्वाविषयी बोलत असताना येशूचा भर आपण नीतिमान कसे बनावे ह्यावर नसून नीतिमान बनणे म्हणजे काय ह्यावर आहे कारण त्या वेळेला शास्त्री व परुशींच्या मते जे कोणी यहुदी समाजात त्यांच्या रूढी परंपरेनुसार प्रत्येक आज्ञा तंतोतंत पाळतात तेच नीतिमान होऊ शकत होते.
नीतिमान होण्याबाबत बोलत असताना येशू सुरवातीलाच आपल्याला पटवून देतो कि त्याचा उद्देश हा नियमशास्र रद्द करण्याच्या नव्हे तर नियमशास्त्राचा उद्देश पटवून देण्याचा व तो नियमशास्त्र पूर्ण करण्याचा आहे. हे तो विविध सहा विषयावर त्याचा विचार मांडून सिद्ध करतो. शिष्यांनी नियमशास्त्र व्यवस्थित समजावे व त्याचा मूळ उद्देश जाणावा ह्याकडे येशूचे लक्ष होते कारण तोच नियमशास्त्राचा खरा महत्वाचा भाग होता आणि शास्त्री व परुश्यांनी ह्या महत्वाच्या भागावर दुर्लक्ष केले होते.
आजच्या शुभवर्तमानाच्या पहिल्याच ओवीत येशू म्हणतो की , "तो नियमशास्त्र पूर्ण करावयास आला आहे"(हा त्याच्या कार्याचा महत्वाचा भाग होता). परंतू ह्या वचनाने येशूला नक्की काय सांगायचे आहे? पूर्ण करणे ह्याचा अर्थ 'सगळे', 'भरलेले', 'शेवटास गेलेले'’ असा होतो. तो नियम शास्त्र पूर्ण करावयास आला आहे ह्याची आपल्याला खात्री करून देण्यासाठी तो पुढे म्हणतो "आकाश व पृथ्वीही नाहिशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियम शास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही"(मत्तय५:१९). "शास्त्री परुशी ह्यांच्यापेक्षा तुमचे नितिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यांत तुमचा प्रवेश होणारच नाही.” (मत्तय५:२०) तर ह्या सर्व भाष्याचा कळस गाठतो. हे वाक्य पुढील सहा विविध विषयावरील शिकवणुकीसाठी महत्वाचे आहे. त्याच्या म्हणण्यानुसार शास्त्री व परुशी ह्यांनी नीतिमान होण्यासाठी ठरवून दिलेली पात्रता स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळविण्यासाठी पुरेशी नाही. शास्त्री व परुशी हे सुद्धा नीतिमान होते परंतु स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळविण्यासाठी लागणा-या पातळीत ते कमी पडत होते. जरी नीतिमान हा शब्द मत्तयच्या शुभवर्तमानात जास्त वेळा सापडत नसला तरी मत्तयच्या शुभवर्तमानाची विचारधारणा ही 'नीतिमान होण्यावर' आहे. नीतिमान होणे म्हणजे देवावर व देवाच्या इच्छेबरोबर चांगले नाते असणे, चांगली सदाचारी वागणूक वर्तन होणे होय.
Ø            'असे लोकांना सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे '(मत्तय :२१ब ) हे वाक्य वारंवार उदगारण्यात आले आहे. अश्या प्रकारची वाक्य, शब्द एखादा रब्बी नितीशास्त्राविषयी सांगताना किंवा त्याचे स्पष्टीकरण करताना वापरत असत. त्यांच्या प्रथेत 'असे लोकांना सांगण्यात आले होते, हे तुम्ही ऐकले आहे' हे सांगून जे अगोदरच्या रब्बीने सांगितले होते त्यांच्या विचारला सहमत होण्यासाठी किंवा त्यावर टिप्पणी करण्यासाठी उच्चारात असत. येशुसुद्धा हा शब्दप्रयोग रब्बीच्या शिकवणुकीवर टिप्पणी करण्यासाठी वापरतो, व हे करत असताना त्याच्या टिप्पणीला व स्पष्टीकरणाला तो नीतिशास्त्राचा दुजोरा देतो. त्याचे मत, स्पष्टीकरण हे पूर्णपणे नितीशास्त्रावर आधारित होते आणि त्यामुळे ह्या डोंगरावरच्या प्रवचनाच्या शेवटी "लोक त्याच्या शिकवणुकीने थक्क झाले. कारण तो त्यांना त्यांच्या शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकार वाणीने शिकवीत होता"(मत्तय ७:२८-२९).

१. येशूची राग व खूनाविषयी (प्राण घेण्याविषयी) शिकवण
येशूच्या मताप्रमाणे रब्बीची शिकवण "कुणाचा प्राण घेऊ नकोस, आणि जो कोणी दुस-यांचा प्राण घेईल अथवा खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल'.(मत्तय५:२१) ही "खून करू नको." (निर्गम २०:१३, अनुवाद ५:१७) ह्या सहाव्या आज्ञेनुसार जात नाही. न्यायसभेच्या दंडास पात्र होणे म्हणजे  कोणत्या शिक्षेस पात्र होणे ह्याची आपल्याला पूर्ण कल्पना नाही परंतु ही शिक्षा यहुदी सानाद्रीन मध्ये दिली जात. येशू व मत्तय हे यहुदी लोकांबरोबर वार्तालाप करीत आहेत त्यामुळे येशूची शिकवण यहुदी प्रथा व परंपरेच्या पार्श्वभूमीतून समजण्याची गरज आहे. त्यावेळची यहुदी न्यायव्यवस्था आताच्या आपल्या न्यायव्यवस्थेसारखीच होती. यहुदी न्यायव्यवस्थेत पहिली (लोकल) सानाद्रीन होती, त्यात २३ सदस्य असायचे व त्यानंतर येरुसलेमची सनाद्रीन; त्यात ७१ सदस्य असत. एखादा खटला हा (लोकल) सानाद्रीन मधून येरुसलेमच्या सानाद्रीन मध्ये जात.
Ø            'नरकाग्नी' ह्या शब्दाचा उपयोग आपल्याला शेवटच्या न्यायाविषयी सांगते. हा शब्दप्रयोग हीब्रू भाषेतील आहे; त्याचा सर्वसाधारण अर्थ हिनोमची दरी असा होतो. ही दरी येरुसलेम शहराच्या दक्षिणेस आहे, ह्या दरीतून खूप दुर्गंधी येत असे, तसेच पुरातन काळात येथे मानवी बळी अर्पण केला जाई व त्यामुळे त्याची समानता शेवटच्या दिवशी होणा-या न्यायाबरोबर केली आहे.
येशू ह्या सहाव्या आज्ञेचा मतितार्थ समजावून सांगतो. एखादा राग मोठे रूप घेऊन त्याची सांगता एखाद्याचा बळी घेण्यामध्ये होते. आज्ञा तंतोतंत पाळणे चांगले आहे परंतु त्या अज्ञेचा खरा उद्देश त्यातून पूर्ण होत नाही. मत्तयच्या शुभवर्तमानात २२:३-४० मध्ये आपणाला आपल्या देवावर व शेजा-वर प्रीती करण्याची आज्ञा दिली गेली आहे तर मत्तय १९:१६-२१ मध्ये आपण पाहतो कि येशू त्या श्रीमंत माणसाला सांगतो; फक्त दहा आज्ञा पाळणे हे देवाच्या राज्यात प्रवेश मिळविण्यासाठी पुरेसे नाही. ह्याद्वारे सहाव्या आज्ञाचा शेवट कुणाचा प्राण घेऊ नकोस इथवर होत नाही. तर त्यापुढे आपल्याला ५:२३-२६ मध्ये आपली बंधुबरोबर कृती सुधारण्याबद्दल सांगण्यात आले आहे. देवाला आपल्या अर्पणापेक्षा व यज्ञापेक्षा आपल्याकडून प्रीती, दया व नीतिमान जीवनाची अपेक्षा आहे. येशू हे समजावत असताना आज्ञा तंतोतंत पाळण्याचे महत्व कमी करीत नाही तर त्याचा खरा अर्थ समजावून देत आहे.

येशूची व्याभिचाराविषायची शिकवण  मत्तय ५ :२७-३०
      'व्यभिचार करू नको' हे वाक्य सातव्या आज्ञेतुन घेतलेले आहे; (निर्गम २०:१४, अनुवाद ५:१८).सर्वसाधारणपणे लग्न बाह्य शाररीक सबंध ठेवणे अथवा लग्न समयी केलेल्या एकमेकांशी एकनिष्ट राहण्याचा करार लग्न बाह्य शाररीक सबंध ठेऊन मोडणे म्हणजे व्यभिचार होय अशी समजूत आहे. येशूच्या अगोदरच्या प्राण घेण्याविषयीच्या शिकवनुकीप्रमाणे येथे देखील येशू आज्ञेच्या गाभाऱ्यात प्रकाश टाकतो. येशूच्या मते फक्त व्यभिचाराची कृती व क्रिया करणे म्हणजे पाप नव्हे तर तसा विचार विचार करणे, त्यात रमणे हे सुद्धा पाप, व्यभिचार आहे. प्रत्यक्ष क्रियेपेक्षा त्याच्या विचारात रमणे हे मोठे पाप आहे कारण ते विचार माणसाची विचारसरणी बदलतात व प्रत्यक्ष कृत्याकडे नेतात.
आपल्याला पाप करण्यास भाग पाडणारे अवयव काढून टाकावेत (मत्तय :२९, ३०)असाही इशारा येशू आपणास देतो. पाप करण्यास भाग पाडणारा 'उजवा डोळा वा उजवा हात काढून टाकणे' हा हिब्रू भाषेतील वाक्यप्रचार आहे. हा वाक्यप्रचार आपण केलेल्या एखाद्या कृत्याचा गंभीरपणा समजावून देते. येशूची हीच व्याभिचाराविषायची शिकवण आपल्याला पुढच्या घटस्पोटाविषयीच्या शिकवणुकीकडे नेतो.

येशूची सूटपत्र  देण्याविषयी विषयी शिकवण मत्तय५:३१-३२.
वरील दोन शिकवणुकीप्रमाणे ही शिकवण एखाद्या आज्ञेवर आधारित नाही; तर व्याभिचाराविषायची असलेल्या शिकवणुकीचाच भाग आहे. मत्तय १९:३-१२ मध्ये सुद्धा आपण येशूला सूटपत्र  देण्याविषयी विषयी बोलताना पाहतो तेथे शास्त्री व परुशी येशूची अनुवाद २४ मध्ये जे सांगितलेले आहे त्यावर परीक्षा घेताना दिसतात.
त्यावेळच्या शिकवणुकीनुसार एखाद्या पुरुषाला मोशेने अनुवाद २४ मध्ये दिलेल्या आज्ञेप्रमाणे आपल्या स्रीला अथवा पत्नीला घटस्पोटाचे परिपत्रक द्यावे लागे येशूच्या सूटपत्राविषयी शिकवणुकीला ह्या प्रथेची पार्श्वभूमी आहे. येशूच्या वेळेला दोन रब्बीचे सूटपत्राविषयी वेगवेगळी मते होती. रब्बी हीलेलच्या मते एखादा पती आपल्या पत्नीला कोणत्याही कारणाने सोडचिठ्ठी अथवा सूटपत्र  देऊ शकत होता तर रब्बी शहामीच्या मते पत्नीचे विवाह बाह्य शाररीक सबंध असतील तरच पती आपल्या पत्नीला सोडचिठ्ठी देऊ शकतो. येशूचे सूटपत्राविषयीचे मत रब्बी शहामीच्या मतासारखे होते.

येशूची शपथ घेण्याविषयी शिकवण (मत्तय ५:३३-३७)
नीतीशास्त्रात वेगवेगळ्या ठिकाणी शपथ घेण्याविषयी उल्लेख आहे: "माझ्या नावही खोटी शपथ वाहून आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नये." (लेवीय १९:१२), "एखाद्या पुरुषाने परमेश्वराला नवस केला अथवा आपण व्रतबद्ध होण्याची शपथ वाही ली तर त्याने आपली शपथ सोडू नये" (गणना ३०:२). शपथ आपण सत्य बोलत आहोत याची ग्वाही देण्यासाठी तर कधी आपले कृत्य हे सत्य आहे ह्याचा भरवसा देण्यासाठी घेतली जात. शपथ वेगवेगळ्या नावाने घेतली जात; स्वर्गाच्या नावाने, येरुसलेमच्या मंदिराच्या नावाने, अथवा डोक्याची शपथ. येशू शपथ घेण्याविरोधात नव्हता तर काही लोक ज्या गोष्टीला जास्त मुल्य नाही अथवा ज्या शपथा बंधनकारक नाहीत त्याची शपथ घेत होते हे येशूला मान्य नव्हते. बायबलमध्ये आपण काही ठिकाणी पाहतो की येशू स्वतः शपथ वाही न्याविषयी बोलतो: (मत्तय २६:६३-६६), "म्हणजे जी शपथ आपला पूर्वज अब्राहम ह्याच्याशी त्यांनी वाहिली, ती स्मरावी. (लुक १:७३), " देव शपथ वाहून त्याला म्हणाला, तुझ्या संतानातील एकाला तुझ्या राजासनावर बसवीन." (प्रेषितांचे कृत्ये २:३०), "माणसे आपणापेक्षा मोठ्याची शपथ वाहतात; आणि आपल्या म्हणण्याचे समर्थन करण्यासाठी त्यांच्यामध्ये शपथ सर्व वादाचा शेवट आहे. म्हणून आपल्या संकल्पानाची अचलता अभिवाचनाच्या वतनदारांणा विशेष दाखवावी ह्या इच्छेने देव शपथेच्या द्वारे मध्ये पडला."  (हिब्रू ६:१६-१८).

बोध कथा

फ़िअरेलो ला गर्दिया ह्या माणसाची एक गोष्ट सांगितली जाते. तो दुस-या महायुद्धावेळी न्यूयॉर्क शहराचा मेयर होता. तो खूप मजेशीर व चांगला माणूस असल्यामुळे त्याचे शहरात खूप चाहते होते. जानेवारी महिन्यात कडाक्याची थंडी असताना तो रात्री सुरु असलेल्या न्यायालयात आला. त्या रात्री त्याने न्यायधीशाला घरी जाऊन विश्रांती घेण्यास सांगितले व स्वतः न्यायधीश बनला.
थोड्या वेळात एक गरीब वृद्ध बाईला न्यालालयात आणले गेले; तिच्यावर एक पाव (bread) चोरी केल्याचा आरोप होता. मेयर साहेबांनी त्या बाईला तिच्या त्या कृत्याबद्दल जाब विचारला असता ति म्हणाली की तिची विधवा मुलगी आजारी आहे, घरात खायला काहिही नव्हते व तिच्या दोन्ही नातवंडांना खूप भूक लागली होती म्हणून तिने नातवंडांची भूक भागवण्यासाठी पाव चोरी केला. हे ऐकून ज्या बेकरीतून तिने पाव चोरला होता तो दुकानदार तावा-तावाने मेयर साहेबांना म्हणाला की, 'ही अश्या लोकांची रोजची नाटकं आहेत आज ह्या बाईला शिक्षा झालीच पाही जे जेणेकरून इतरांना सुद्धा धडा मिळेल'. मेयर त्या बाईला म्हणाले, 'तू चूक केली आहेस व कायद्यानुसार तुला शिक्षा भोगावी लागणारच. तुम्हाला दहा डॉलर दंड भरावा लागेल अथवा दहा दिवस तुरुंगात राहावे लागेल.' शिक्षा सुनावत असताना त्याचा हाथ त्याच्या खिश्यामध्ये गेला व त्यांनी दहा डॉलर ची नोट काढत म्हटले, 'हे घ्या दहा डॉलर, मी तुमच्या दंड भरतो.' पुढे तो न्यायालयात हजर असलेल्या प्रत्येक जनांस म्हणाला , 'इथे उपस्थिथ असलेल्या प्रत्येक जनास मी प्रत्येकी ५० सेंट दंड करत आहे कारण ज्या शहरात तुम्ही राहता त्या शहरात एका म्हाता-या बाईला तिच्या नातवंडांची भूक भागवण्यासाठी चोरी करावी लागते."
दुस-या दिवशी वर्तमान पत्रात बातमी होती की ४७.५० डॉलर न्यायालयात उपस्थित लोकांकडून दंड म्हणून गोळा करून ज्या बाईने चोरी केली होती तिला दिले गेले. (येथे मेयरने कायद्यांचे पूर्णपणे पालन केले होते, व कायद्यांचे पालन करत असताना ते कायदे समजून घेऊन त्याद्वारे दुस-यावर दया सुद्धा  दाखवली.)

मनन- चिंतन

येशूच्यावेळी यहुदी लोकांना दहा आज्ञांचे चांगलेच ज्ञान होते, परंतु ह्या दहा आज्ञांची समज त्यांना त्यांच्या रब्बीने दिल्याप्रमाणे होती. रब्बी अथवा शास्त्री व परुशी ह्या आज्ञांचे बाह्य अवलोकन करण्यावर जास्त भर देत असत, परंतु आजच्या शुभवर्तमानाद्वारे आपली ह्या दहा आज्ञांची समज शास्त्री व परुशीपेक्षा कशीप्रकारे वेगळी असली पाहिजे हे सांगण्यात येते. तसेच आपले नितिमत्व हे शास्त्री व परुश्याच्या नितीमत्वापेक्षा श्रेष्ठ असण्याच्या गरजेबाबत सुद्धा सांगण्यात आले आहे. असे म्हणण्याने येशु ह्या दहा आज्ञांचे महत्व कमी करित नाही अथवा त्या मोडीत काढीत नाही तर त्यांचा खरा मतीतार्थ आपल्याला समजावून सांगून त्या आज्ञांना एक नवीन अर्थ देत आहे.
आपल्याला चांगले ख्रिस्ती होण्यासाठी एखाद्याचा प्राण घेण्याचा टाळणे हे पुरेसे नाही तर कुणाचा प्राण घेण्याची अथवा कुणाला इजा पोहचविण्याची भावना सुद्धा मनातून काढून टाकणे गरजेचे आहे, इतकेच नव्हे तर कोणाला इजा होणार असेल तर त्यांचा त्यापासून बचाव करणे हे आपले आद्यकर्तव्य बनते. व्याभिचार न करणे हे पुरेसे नव्हे तर तसे विचारही मनातून काढून आपले हृदय सदा नितळ व निर्मळ ठेवण्यास आजचे शुभवर्तमान आपणास आवाहन देत आहे. अश्याप्रकारे ह्या आज्ञांचा येशूने समजावून सांगितलेला नवीन अर्थ समजून घेऊन त्याच्या आधारावर आपले जीवन उभारून आपण देवाने आपल्याला बहाल केलेल्या स्वातंत्र्याचा चांगला उपयोग करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

आपला प्रतिसाद:- हे देवा , नीतिमान बनण्यास आम्हाला मदत कर.

१)  आपल्या सर्व धार्मिक नेत्यांना पवित्र आत्म्याद्वारे प्रगट झालेले ज्ञान त्यांनी जगाच्या कानाकोप-यापर्यंत पोहोचविण्यास त्यांना शक्ती व कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
२) आपल्या धर्मग्रामातील प्रत्येक व्यक्तीवर प्रभूचा आशीर्वाद असावा, सर्वांना चांगले  मानसिक व शारीरिक आरोग्य मिळावे व आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात शांती नांदावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
३) ह्या शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या सत्रात सर्व विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अभ्यास करता यावा व त्यांना कोणत्याही अडचणीविना चांगल्यारीतिने परीक्षा देता यावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
४) जे निस्वार्थीपणे समजाची व देशाची सेवा करतात त्यांच्या सेवेची योग्य ती दखल घेतली जावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

५) आपण आता आपल्या सर्व वयक्तिक गरजा प्रभू चरणाशी ठेऊ या. 

3 comments: