Tuesday 4 February 2014

Reflections for Homily By: Chris Bandya.










सामान्य काळातील पाचवा रविवार

''तुम्ही पृथ्वीचे मीठ आणि जगाचा प्रकाश आहात.''








९ फेब्रुवारी २०१४.

पहिले वाचन:यशया; ५८:७-१०.
दुसरे वाचन:करिंथकरांस पत्र; २:१-५.
शुभवर्तमान:मत्तय; ५:१३-१६.

प्रस्तावना:

आजच्या उपासनेत प्रभू येशूख्रिस्ताकडून आपल्याला दोन महत्त्वाच्या उपमेबद्ल ऐकावयास मिळते. ह्या दोन्ही उपमांचा आपल्या दैनदिन जीवनामध्ये वापर होतो. ह्या दोन उपमा म्हणजे: 'मीठ' आणि 'प्रकाश'. मिठामुळे अन्न रूचकर व प्रकाशामुळे अधंकार नाहीसा होतो.
 आजच्या पहिल्या वाचनात प्रवक्ता यशया चागंले जीवन कसे जगायला पाहिजे ह्याबद्ल बोध करत आहे. उपवासाचे योग्य पालन म्हणून अन्न भुकेल्यांस वाटायला हवे; लाचारास व निराश्रितांस घरी न्यायला हवे आणि ह्या कृर्त्याद्वारे जीवनातील ख्रिस्ताचा प्रकाश अधंकारात झळकेल. दुस-या वाचनात संत पौल वधस्तंभावरील ख्रिस्ताबद्ल सांगतो तसेच आपला विश्वास मनुष्याच्या बुध्दिमत्तेवर नव्हे तर देवाच्या सामर्थ्यावर उभारण्यास सागंतो.
दु:खी, कष्टी व गरीबांच्या जीवनात मीठ व प्रकाश बनण्यासाठी आपण सज्ज असायला हवे तरच त्यांच्या जीवनात आनंद, शांती, प्रीती व समाधानाचे प्रतिक बनू शकू. चागंल्या कृर्त्या व कर्माद्वारे आपण स्वर्गीय पित्याच्या नावाला गौरव आणतो व आपले जीवनसुध्दा ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे बनवतो. ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून आपण परमेश्वराचा आदर्श गरजवंतासमोर ठेवावा म्हणून आपण ह्या ख्रिस्तयागात प्रार्थना करू या.

पहिले वाचन (यशया;५८:७-१०):

 आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा यशया उपवासाबद्ल प्रबोधन करत आहे. यशया संदेष्टा सागंतो जर आपण प्रभूच्या वचनाप्रमाणे आपले जीवन जगलो तर आपल्या दैनंदिन जीवनाचा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल, आपल्या जखमा लवकर भरतील, आपली धार्मिकता आपल्यापुढे चालेल व परमेश्वराचा गौरव आपला पाठीराखा होईल(यशया; ५८:८). ह्या शब्दांतून आपणास येशू ख्रिस्ताच्या प्रकाशाची जाणीव यशया करून देत आहे.

दुसरे वाचन (करिथंकरास पत्र; २:१-५):

संत पौल नम्रतेचा आदर्श करिंथकरांस त्याच्या शब्दांनी सर्वांसमोर पत्राद्वारे व्यक्त करतो. संत पौल लोकांसमोर नम्र होऊन सागंतो, मी तर तुमच्याकडे आलो तो वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने आलेलो नाही. तसेच संत पौल नम्रतेचे महान उदाहरण म्हणून वधस्तंभावर खिळलेल्या येशू ख्रिस्ताबद्ल लोकांस मार्गदर्शन करतो व त्यांचा विश्वास देवाच्या वचनावर तसेच देवाच्या सामर्थ्यावर उभारण्यास सागंतो.

शुभवर्तमान (मत्तय; ५:१३-१६):

 आजच्या शुभवर्तमानात दोन महत्त्वाच्या उपमा आढळून येतात - मीठ आणि प्रकाश. मत्तयलिखित शुभवर्तमानात येशू ख्रिस्त ह्या दोन्ही उपमांचा वापर करून सागंतो, ''तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा; पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल?''(मत्तय; ५:१३). पुढे ख्रिस्त म्हणतो, ''तुम्ही जगाचा प्रकाश आहा; डोगंरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवीत नसतात, दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरांतल्या सर्वाना प्रकाश देतो''(मत्तय; ५:१४-१५).

तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा:
जेव्हा येशूने हे शब्द उच्चारले, तेव्हा येशूने त्या लोकांस उच्च स्थरीय स्थान पृथ्वीवर दिले कारण जेव्हा आपण कोणाला मान-सन्मान व त्यांच्या महत्त्वाबद्ल बोलतो तेव्हा सहजच आपण, ''तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा.'' असे म्हणतो.
पूर्वीच्या काळात मीठाला खूप महत्त्व होते. ग्रीक लोक मीठाला दैविक वस्तू म्हणून मानत. रोमन लोक म्हणायचे, ''जगात सुर्य आणि मीठा शिवाय काहीच अधिक उपयोगी नाही.'' (Nil utilius sole et sale). येशू ख्रिस्ताच्या काळात लोकांच्या मनात मीठ हे तीन विशेष गुणाबरोबर जोडलेले होते.
ü  मीठ आणि शुध्दता
ü  मीठ आणि जतन
ü  मीठ आणि रूची

१. मीठ आणि शुध्दता:
रोमन लोकांसाठी मीठ हे सर्वात शुध्द म्हणून वस्तू होती कारण मीठाचा उगम सुर्य आणि समुद्रापासून होतो. प्राचीन काळातील लोक मीठ एक महत्त्वाचे अर्पण म्हणून देवास अर्पण करत, तसेच यहूदीसुध्दा अर्पणाच्या वेळेस मीठाचा वापर करीत असत आणि जर खरोखरच कोणा एकाला पृथ्वीचे मीठ म्हणून ओळखले जावे असे वाटत असेल तर त्याला शुध्दतेचे, पावित्र्याचे प्रतिक बनावे लागे.

२. मीठ आणि जतन:
प्राचीन काळात वस्तू जतन करण्यासाठी मीठाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असे. मीठ वस्तू खराब न व्हाव्यात म्हणून वापरले जात असे. मीठाचा वापर मृत शरीरे खराब होऊन त्यांना दुर्गंध न यावा म्हणून सुध्दा केला जात असे म्हणूनच जर ख्रिस्ती लोकांना पृथ्वीचे मीठ व्हायचे असेल तर त्यांना सुध्दा मीठासारखे व्हायला लागेल जेणेकरून त्यांच्या जीवनापासून दुस-यांच्या जीवनात बदल होतील व ते नाशापासून वंचित राहतील.

३. मीठ आणि रूची:
जरी मीठाचे अनेक असे गुणधर्म असले तरी सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे वस्तूस रूची आणणे त्याला एक चव देऊन ते दुस-यांच्या आवडीचे बनवणे. कोणीही मीठाशिवाय जेवणाचा विचार करू शकत नाही. ज्याप्रमाणे मीठ अन्नाला रूचकर बनवते त्याचप्रमाणे ख्रिस्तीपणा दुस-यांच्या जीवनाला रूची आणणारा असायला हवा. मत्तयच्या ५:१३ मध्ये येशू म्हणतो, ''जर मीठाचा खारटपणा गेला तर त्याचा काहीही वापर नाही, पुढे ते बाहेर फेकले जाईल व प्रवाश्याच्या पायाखाली ते तुडविले जाईल'' म्हणूनच मीठाला प्राचीन काळात महत्त्वाचे स्थान होते. संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये ब-याच ठिकाणी मीठाचा उल्लेख केलेला आपल्याला सापडतो. जर आपण बारकाईने पाहिले तर आपणास कळून चुकेल की मीठाचे स्थान त्याच्या गुणधर्मामूळे होते.

पवित्र शास्त्रात मीठाचा उल्लेख:
* मीठ- अर्पण:
लेवीय; २:१३.
गणना; १८:१९.
एज्रा; ६:९.
यहेज्केल; ४३:२४.
* शुभवर्तमानात मीठाचा उल्लेख:
मत्तय; ५:१३.
मार्क; ९:४९.
मार्क; ९:५०.
लूक; १४:३४.
* मीठाची दरी:
२ शमुवेल; ८:१३.
२ राजे; १४:७.
* क्षारसमुद्र:
उत्पत्ति; १४:३.
गणना; ३४:१२.
यहोशवा; ३:१६.
यहोशवा; १२:३.
यहोशवा; १५:२.
* मीठाचा करार:
२ इतिहास; १३:५.
* मीठाचे शहर:
यहशोवा; १५:६२.
* अन्यता मीठाचा उल्लेख:
२ राजे; २:२१.
२ राजे; २:२०.
२ राजे; २:२२.
उत्पत्ति; १९:२६.
यहेज्केल; १६:४.
ईयोब; ६:६.
सफन्या; २:९.
कलस्सैकर; ४:६.

 तुम्ही जगाचा प्रकाश आहा.  मत्तय; ५:१४,१५.

स्वत: येशूकडून आपली प्रशंसा 'जगाचा प्रकाश' म्हणून होते हीच एक सर्वात महत्त्वाची बाब प्रत्येक ख्रिस्ती भाविकांना त्यांच्या जीवनात अनुभवयास मिळते कारण ख्रिस्त स्वत: योहान लिखित शुभवर्तमानात सागंतो, ''मी जगात आहे, तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे'' (योहान; ९:५). आणि जेव्हा येशू आपणास 'तुम्ही जगाचा प्रकाश आहा!' हे शब्द उच्चारतो तेव्हा आपण त्याच्याप्रमाणे आपले जीवन बनावे ह्याच्याहून दुसरी येशू ख्रिस्ताची अपेक्षा नसेल.
जेव्हा येशू ख्रिस्ताने हे शब्द उच्चारले तेव्हा येशू ख्रिस्ताने स्वत: यहुदयाचे हावभाव वापरले कारण यहुदी लोक जेव्हा स्वत:बद्ल सागंत तेव्हा ते 'येरूशलेम-परराष्ट्रीयांस' प्रकाश आणि रब्बी (गुरूजी) हा 'इस्त्रायलाचा कोकरू' असे दुस-यांस सतत सागंत असत. येशू ख्रिस्ताचे शब्द समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण तुम्ही जगाचा प्रकाश आहा असे सागूंन येशू ख्रिस्त आपणास आपल्या स्वत:कडून प्रकाश उत्पन्न करण्यास सागंत नाही. ख्रिस्ती लोकांच्या जीवनातून जी चमक, तेज व चकाकी येते ती आपल्याला येशू ख्रिस्ताच्या सान्निध्यात राहून मिळते.
जेव्हा ख्रिस्ताने आपल्याला जगाचा प्रकाश बनण्यास सागितंले तेव्हा येशूच्या आपल्याकडून काय अपेक्षा होत्या.

१. Palestine पेलेस्टाईन रहिवाशाच्या घरात जास्तीत जास्त अधंकार असायचा कारण घराच्या खिडक्या उंची व रूंदीने छोट्या होत्या. तसेच पणतीतील ज्योत सुध्दा छोटी असे आणि पणत्या दिवठणीवर ठेवल्यामुळे पुरेसा प्रकाश नसे परंतू जेव्हा घरा बाहेर पडायचे तेव्हा ते दुस-या दिव्याचा वापर करत असत म्हणूनच प्रकाशाचे वैशिष्ट अधंकारात झळकण्यास होते.

२. प्रकाश अधंकारात वाट दाखवतो. प्रकाशात आपणास भिती सुध्दा वाटत नाही कारण आपला मार्ग चालण्यास सोपा पडतो.

३. प्रकाश हा प्रत्येकांस 'ताकीद प्रकाश' म्हणून आहे. प्रकाशामूळे आपण सावध राहू शकतो व पुढच्या मार्गावर वाटचाल करावी की नाही ह्याबद्ल आपणास मार्गदर्शन मिळते व जीवनात पुढचे पाऊल टाकण्यास मदत होते.

देवासाठी प्रकाशीत होणे:
मत्तय; ५:१६: ''त्याप्रमाणे तुमचा प्रकाश..... गौरव करावे''.
ह्या १६ व्या ओवी मध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला समजून येतात.
१. दुस-यांनी आपला चांगुलपणा पहायला हवा. ग्रीक भाषेत 'चांगला' ह्यासाठी दोन शब्द आहेत.
अ. Agathos: ह्याचा अर्थ असा की वस्तूचा चांगुलपणा, गुणांनी भरलेला चांगुलपणा.
ब. Kalos: ह्याचा अर्थ असा की वस्तू फक्त चांगलीच नव्हे तर ती अप्रतिम आणि आजच्या शुभवर्तमानात दुस-या अर्थाचा वापर केलेला आहे.
२. आपल्या चागंल्या कृत्यांनी दुस-यांचे लक्ष वेधले गेले पाहिजे, आणि ह्याचा गर्व आपण न ठेवता, हा मिळणारा गौरव आपण परमेश्वराला दयायला हवा.

* पवित्र शास्त्रातील प्रकाशाचे महत्व कळवून देणा-या काही ठराविक ओवी:
२शमुवेल; २२:२९.
नेहम्या; ९:११-१३.
ईयोब; ३३:२८.
स्तोत्रसंहिता; ४:६.
      ''         ; १८:२८.
      ''         ; ३६:९.
      ''         ; ४३:३.
      ''         ; ५६:१२-१३.
      ''         ; ८९:१५.
      ''         ; ९७:११.
      ''         ; १०४:१-३.
      ''         ; ११९:१०५.
      ''         ; १११:१३०.
यशया; ४२:५-७.
   ''    ; ४२:१६.
   ''    ; ५०:१०.
   ''    ; ६०:१९.
मिखा; ७:९.
रोमकरांस पत्र; १३:१२.
मत्तय; ५:१४-१६.
मत्तय; ६:२२.
लूक; ८:१६.
लूक; ११:३३-३५.
योहान; १:३-५.
योहान; ३:१८-२०.
योहान; ९:५.

बोध कथा:

एक दिवस वयस्कर राज्याला त्याच्या तिन्ही मुलांपैकी ऐकाला राज्याचा वारसदार बनवायचे होते म्हणून तो तिन्ही मुलांना बोलावून, 'कोण मला सर्वात जास्त प्रेम करतो' असा प्रश्न करतो.''जगाच्या संपत्तीहून अधिक!'' उच्चारला मोठा मुलगा. तोच दुसरा म्हणाला, ''जगातील सर्व ज्ञानापेक्षा अधिक!'' व लहान मुलगा म्हणाला, ''जसे मीठ प्रिय आहे तसे.'' अतिशय संतापून राजा लहान मुलाला हद्‌दपार करतो व मोठ्या मुलाला त्याच्या राज्याचा वारसदार बनवतो. हद्‌दपार केलेला लहान मुलगा दुस-या राष्ट्रात जाऊन मेहनतीने तिकडच्या राज्याचा राज्याधिकारी बनतो. परंतू त्याच्या जीवनात वडिलांची अनुपस्थिती त्याला सतत जाणवत असे म्हणून तो एक दिवस आपल्या राजवाड्यात वडिलांस मेजवाणीस बोलावतो व वडिलांसाठी स्वादिष्ट आणि रूचकर जेवण बनवतो, परंतू त्यात मीठ टाकत नाही. जेव्हा त्याचे वडील मेजवाणीस येतात व सुगंधी आणि सुवासिक जेवण बघून अतिशय आनंदी होतात. लहान मुलगा काही तरी कारण सागूंन जेवणास येत नाही, परंतू दासांना व नोकरांना सागूंन त्याच्या वडिलांना जेवणास सुरवात करायला सागंतात. जेव्हा वडील जेवण चाखतात तेव्हा विस्मित होतात व ह्या केलेल्या अपमानाचे स्पष्टीकरण विचारतात. तेव्हा त्याचा मुलगा जो आता राजा असतो तो विशिष्ट प्रकारचा पोशाख, मुकूट व राजदंड परिधान करून त्याच्या पुढे उभा राहतो. तेव्हा वयस्कर राजा आपल्या मुलाला ओळखतो व कसलाही विचार न करता केलेल्या कृतीची त्याला जाण होते.

मनन चितंन:

आपण धन्य आहात तरच 'मीठ' 'प्रकाश' आहात. आजची उपासना आपणा सर्वांस ख्रिस्ताचे अनुयायी होऊन पृथ्वीचे मीठ आणि जगाचा प्रकाश होण्यास निमंत्रण करत आहे. दोन्ही गोष्टी आपल्याला दररोजच्या जीवनात महत्वाच्या आहेत त्याप्रमाणे ह्या गोष्टींचे आपल्या जीवनातील स्थान सुध्दा महत्वाचे आहे. ज्याप्रमाणे मीठ आणि प्रकाश उपयोगी वस्तू आहेत त्याप्रमाणे आपले जीवन सुध्दा मीठ व प्रकाशाप्रमाणे उपयोगी ठरले पाहिजे. जर आपण, मीठाचा खारटपणा घालवून दिला तर आपण निरूपयोगी ठरू व आपला प्रकाश सर्व लोकांसमोर पडत नसेल तर आपले जीवन निरूपयोगी ठरेल. कदाचित हे सर्व करताना निंदा होईल, तरीही हे खरे ख्रिस्ती जीवन व्यर्थ ठरणार नाही कारण आपल्या त्यागामूळे लोकांच्या जीवनात रूची, चव किंवा लज्जत येईल व अनेकांना ख्रिस्ती जीवनाचा प्रकाश अनुभवायला मिळेल ह्याचा आपण आपल्या दैनदिंन जीवनात विचार करायला हवा. प्रत्येक मनुष्याला दुस-यांच्या जीवनात प्रकाश, रूची किंवा चव आणण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. जिथे दु:ख आहे तिथे आनंद, ज्यांच्या जीवनात निबिड अधंकार आहे तिथे प्रकाशाचा दीप व गरिबांच्या जीवनात रूचकरपणा टिकवून ठेवण्यासाठी ह्या पाचारणाचा उपयोग करायला हवा. येशूचे ठाम अनुयायी म्हणून जीवनात मीठ व प्रकाश बनायला हवे.
शुभवर्तमानाद्वारे येशू ख्रिस्त आपणास जगाचा प्रकाश व पृथ्वीचे मीठ होण्यास सागंतो कारण येशू ख्रिस्त स्वत: पृथ्वीचे मीठ व जगाचा प्रकाश आहे. मीठ हा मानवी जीवनातील महत्वाचा घटक आहे. पहिल्या शतकात मीठ हा मानवी जीवनाचा मध्यवर्ती किंवा त्यांच्या जीवनातील गाभा होता. आजच्या युगात आपण मीठाचा वापर फक्त अन्न चविष्ट बनविण्यासाठी नव्हे तर आईस्क्रिम बनविण्यासाठी, बर्फ वितळवीण्यासाठी, पाणी शुध्दीकरणासाठी आणि बरेच असे अनेक वापर मीठाचे होत आहेत. समुद्रातील मासे सुध्दा सुकवून त्यांचा साठा करण्यासाठी मीठाचा मोठ्याप्रमाणात उपयोग होतो. म्हणूनच येशू ख्रिस्त मीठाची उपमा लोकांस व त्याच्या अनुयायांसाठी वापरतो.
येशू ख्रिस्त त्याच्या प्रकाशात आम्हा सर्वांना एकत्र करून घेतो ह्याद्वारे तो आपणास प्रति ख्रिस्त होण्यास पाचारण करतो. आपल्या व दुस-यांच्या जीवनातील अधंकार नाहीसा करण्यासाठी सत्कृत्ये आपल्याला करावी लागतील तरच ख्रिस्ताप्रमाणे आपण सुध्दा जगाचे प्रकाश होऊ. येशू ख्रिस्ताच्या अनुयायांनी दुस-यांच्या जीवनातील अधंकार नाहीसा करण्याअगोदर स्वत:तील अधंकार दूर करण्यास प्रयत्न केला पाहिजे. कदाचित आपणास फार मोठा प्रकाश होणे शक्य नाही पण मिणमिणता प्रकाश सर्वांनाच होता येते म्हणूनच जीवनातील ख्रिस्ताचा प्रकाश विझवण्याचा प्रयत्न आपण न करता; आपल्या छोट्याशा प्रकाशाने इतरांना साथ देऊन त्यांच्या जीवनात तेजमय व आनंदमय प्रकाश झळकवण्यास मदत करावी व हीच गरज आजच्या जगाची व समाज्याची आहे हे आपण समजून घेऊया.
जीवनात सदैव सत्कर्मे करून दुस-यांच्या चेह-यावर हास्य कायम ठेवण्यास आपण देवाचे प्रवक्ते व्हायला हवे. ज्याप्रमाणे मीठाने अन्नाला चव किंवा रूची येते व प्रकाशामूळे अधंकार नाहीसा होतो, त्याप्रमाणे आपण सुध्दा दुस-यांच्या जीवनात प्रकाश व मीठ होऊन त्यांच्या जीवनात आनंद आणायला हवा. आजच्या दिवशी येशूकडे विशेष प्रार्थना करूया की आपण पृथ्वीचे मीठ व जगाचे प्रकाश ठरू.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो आम्हाला जगाचा प्रकाश बनव.

१. आपले परमगुरूस्वामी, महागुरूस्वामी, सर्व धर्मगुरू, धर्मबंधू, धर्मभगिनी ह्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदा-या त्यांनी पार पाड्याव्यात तसेच त्यांच्या कळपास त्यांनी पृथ्वीचे मीठ व जगाचा प्रकाश बनून त्यांची जीवने रूचकर व प्रकाशित करावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. आमच्या धर्मग्रामातील सर्व लोकांनी पदोपदी, क्षणोक्षणी त्यांच्या जीवनातील तुझे अस्तित्व ओळखावे तसेच येशूचे जगाचा प्रकाश व मीठ हे गुण अंगीकारावे व आपले जीवन त्याच्या प्रकाशात जगावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. हे प्रभो दु:ख, कष्ट, आजारपण, कठीण कसोटीच्या प्रसंगांनी ग्रस्त झालेल्या लोकांना त्यांचे दु:ख सहन करण्यासाठी धैर्य आणि सहनशक्ती दे व तुझ्या इच्छेप्रमाणे त्यांना त्यांच्या त्या आजारातून मुक्त कर व जीवनातील अधंकार तुझ्या प्रकाशाने नाहीसा कर म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. युवक व युवती ज्यांना जीवन नकोसे झाले आहे तसेच जे तुझ्या पासून दुरावलेले आहेत त्यांना तुझ्या प्रेमाने स्पर्ष कर व तुझ्या प्रकाशाची ज्योत त्यांच्या जीवनात जळत ठेव व तुझ्या प्रेमाची रूची त्यांच्या दैनदिंन जीवनात पेरू दे जेणेकरून ते नविन जीवनाला प्रेमाने सुरवात करतील म्हणून आपण प्रार्थना करू या.

५. आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करू या.

6 comments: