Wednesday 7 September 2016

  Reflection for the Homily of 24th Sunday in Ordinary Time (11-09-2016) By Ashley D’monty.




सामान्यकाळातील चोविसावा रविवार

दिनांक: ११/०९/२०१६.
पहिले वाचन: निर्गम ३२: ७-११, १३-१४.
दुसरे वाचन:  १तिमथी १: १२-१७.
शुभवर्तमान: लूक १५: १-३२.



क्षमा व नवजीवनची आशा




प्रस्तावना

आज आपण सामान्यकाळातील चोविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणास क्षमा व नवजीवनाची आशा याविषयी सांगत आहे.
परमेश्वर हा दयेचा सागर आहे व तो आपल्या लोकांस त्यांच्या अपराधांची क्षमा करतो. तो त्यांस नवजीवनाची आशा प्रदान करतो; हिच शिकवणूक आजच्या तिन्ही वाचनांत आपणास पहावयास मिळते. निर्गम ह्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो कि इस्त्रायली जनतेने देवाच्या पहिल्या म्हणजेच ‘एकाच देवाची पूजा कर मूर्ती पूजा करू नको’ ह्या आज्ञेचा भंग केला तरीही देवाने त्यांना करुणामयी अंतःकरणाने क्षमा केली.
दुसऱ्या वाचनात संत पौल ‘मी ख्रिस्ताचा आणि ख्रिस्तीजनांचा जरी छळ केला तरीही परमेश्वराने मला क्षमा केली व त्याची सुवार्ताप्रचार करण्यास पात्र केले अशी साक्ष देतो. तर लुकलिखीत शुभवर्तमानात येशु करुणामयी परमेश्वराच्या दयेचा आरसा आहे हे तीन दाखल्यांद्वारे स्पष्ट होते.
परमेश्वर केवळ आपल्या चुकांची क्षमा करीत नाही तर तो सर्व पापी लोकांस जे त्याच्यापासून बहकले आहेत अशांना त्याच्या जवळ येण्यास आमंत्रण देत आहे. आपण दैवी करुणेचे वर्ष साजरे करीत असताना परमेश्वराची दया, करुणा, आपल्या जीवनात अनुभवावी व तिच दया, करुणा इतरांपर्यंत पोहचवावी म्हणून ह्या मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: निर्गम – ३२: ७-११, १३-१४.

परमेश्वर इस्रायली प्रजेस मोशेद्वारे फारोच्या गुलामगिरीतून मुक्त करतो. अरण्याची खडतर वाटचाल करीत असताना तो त्यांचे पोषणही करतो. रात्रं–दिवस तो त्यांचा सांभाळ करतो. सिनाय पर्वतावर परमेश्वर मोशेला नियमावली देत असता पर्वताच्या पायथ्याशी इस्रायली जनता एका सोन्याच्या वासराची पूजा अर्चना करु लागते. ज्या देवाने त्यांना मिसर देशातून बाहेर आणिले, त्या देवाचा त्यांस विसर पडतो. म्हणून परमेश्वर मोशेला म्हणतो, ज्या मार्गाने त्यांनी जावे असे मी त्यांना आज्ञापिले होते तो मार्ग इतक्यातच सोडून ते बहकले आहेत. परमेश्वराला आपली प्रजा खऱ्या देवाची भक्ती करणारी हवी होती.
इतर लोक हे वेगवेगळ्या मुर्तीपुजेत मग्न होते. त्यांना खऱ्या परमेश्वराची जाणीव नव्हती, इस्रायली जनतेला खऱ्या देवाची जाणीव परमेश्वराने त्यांची सुटका करून  दिली होती. परंतु, आता मात्र त्यांना त्या देवाचा विसर पडला होता. ह्यावेळी परमेश्वराचा क्रोध उफाळून येतो कारण परमेश्वर जरी दयाळू, करुनाशील असला तरीही तो न्यायी व नीतिमान आहे. मोशे आपल्या लोकांकरिता परमेश्वरापाशी विनंती करतो व परमेश्वराचा क्रोध शांत होतो. परमेश्वर आपल्या प्रजेस क्षमा करतो व त्यांचे जीवन सुधारण्यास नवीन संधी देतो.

दुसरे वाचन: १तिमथी – १: १२-१७

संत पौल तिमथीला पहिल्या पत्रात आपल्याला लाभलेल्या परमेश्वरी कृपेबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आहे. शौलाचा पौल हा केवळ ईश्वरी कृपेमुळेच झाला. शौल हा ख्रिस्ताला अज्ञात होता, त्यामुळे तो ख्रिस्ती जनांचा छळ करीत असे. शौल ख्रिस्ती विश्वासात रमला नव्हता; शौल परमेश्वरापासून जरी दूर असला तरीही परमेश्वराने त्याचा पाठलाग सोडला नाही. परमेश्वराने त्याला आपली दया दाखविली व ख्रिस्तीलोकांचा छळ करणाऱ्या शौलाचे परिवर्तन ख्रिस्ती श्रद्धेचा प्रसार करणाऱ्या पौलमध्ये झाले. त्यामुळे पौल म्हणतो, ‘आपल्याला प्रभूची कृपा विपुल झाली’. पौल पापी असूनही परमेश्वराचा पाठलाग करणारा झाला व ख्रिस्त ह्या पापी लोकांसाठी ह्या जगात आला हि बाब परमेश्वराला आपल्या प्रजेस पटवून द्यावयाची होती म्हणून त्याने पौलाची निवड केली. जेणेकरून जे ख्रिस्तापासून दूर गेले आहेत ते त्याच्या अधिकाधिक जवळ यावेत. परमेश्वर अशा लोकांचा शोध करीत असतो, जे आपल्या अज्ञातपणात ख्रिस्ती विश्वाच्या विरुद्ध वागतात, इतरांचा छळ करतात, परमेश्वर त्यांचा पाठलाग अशासाठी करतो कि त्यांना त्याची दया कळावी व त्यांनी परमेश्वराकडे परत यावे.

शुभवर्तमान: लूक : १५: १-३२.

लूकच्या शुभवर्तमानातील अध्याय १५ हा परमेश्वराच्या दयेच्या दाखल्यांनी भरलेला आहे. येशू आपल्या शिकवणुकीत ३ दाखले देतो:  ‘हरवलेल्या कोकराचा’ दाखला, ‘हरवलेल्या नाण्याचा’ दाखला व ‘उधळ्या पुत्राचा’ दाखला.  ख्रिस्त आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घडामोडींचा वापर करून संदेश देतो.
१.)              धनगर हा ख्रिस्ताच्या काळात पापी लोकांत गणण्यात येई. कारण तो आपला कळप दुसऱ्यांच्या शेतात चरवून आपले हित साधत असे. त्यामुळे त्यास समाजात स्थान नव्हते. हि बाब लक्षात घेऊन ख्रिस्त त्यांचा दाखला देतो. धनगराला आपली सर्व मेंढरे प्रिय असतात. त्यामुळे एकही मेंढरू हरवल्यास तो बैचेन होतो, हे सर्वज्ञात होते. त्याचप्रमाणे परमेश्वर, आपल्या आत्म्याचा मेंढपाळ, नेहमी हरवलेल्या आत्म्याच्या शोधात असतो व त्याचा परतीवर आनंदित होतो.
२.)              त्याकाळी स्त्रियांनां यहुदी समाजात दुय्यम स्थान होते. सामाजिक जीवनात त्यांना सहभाग नव्हता. त्या केवळ आपल्या पतीची मालमत्ता होती. अशा परिस्थितीत केवळ चूल व मूल ह्या दोनच गोष्टी स्त्रीयांना ठाऊक होत्या. संसारासाठी प्रत्येक नाण्याची किंमत प्रत्येक स्री जाणून  होती. त्यामुळेच ख्रिस्त स्त्री व नाणे ह्यांचा सुलभ मेळ घालतो. परमेश्वरसुद्धा हरवलेल्या नाण्याप्रमाणे हरवलेल्या भक्तगणाच्या शोधात असतो. कारण प्रत्येक भक्तगण हा परमेश्वराला प्रिय असतो. त्या प्रत्येकाद्वारे तो आपले कार्य पुढे नेत असतो.
३.)              उधळ्या पुत्राचा दाखला हे परमेश्वराच्या दयेचे व क्षमेचे उत्तम उदाहरण आहे. हा दाखला म्हणजे प्रत्येक समाजात कुटुंबात घडणारी एक ज्वलंत समस्या आहे. ह्या दाखल्यात धाकटा मुलगा स्व-विचारात गुंग होऊन पापांत पडतो. आपल्या पापांत तो देवापासून दूर जातो. तो स्वार्थात गुरफटतो; पण वेळेतच स्वार्थाचा डोंगर कोसळतो. तो आपली प्रतिमा हरवून बसतो. स्वार्थाची आता त्याला लाज वाटते व शेवटी आपल्या बापाजवळ तो परत येतो, त्यास पश्चाताप होतो. बाप त्याचा गेलेल्या लेकरांची आतुरतेने वाट पाहत असतो व त्याच्या परतीवर आनंदित होतो. धनगर व स्त्रिया ह्यांना समाजाने जरी तुच्छ लेखले असले तरी येशू आपल्या दाखल्यात त्यांना परमेश्वराच्या तुलनेत मांडतो. कारण परमेश्वराने आपले प्रेम समाजातील वाळीत टाकलेल्या लोकांस प्रकट केले आहे. अशा लोकांबरोबर परमेश्वर सदैव राहतो.

बोधकथा:

     संपत्ती आणि जमीन ह्याच्या वाटपावरून दोन श्रीमंत ख्रिस्ती भावामध्येवैर व सुडाची भावना वाढीस लागली. लहान भावाची घराशेजारी सुंदर फुलबाग होती. एक दिवस मोठ्या भावाच्या मुलगी त्या बागेतील फुले तोडण्यास बागेत शिरली. तिच्या मागे एकाने आपला कुत्रा सोडला. त्या कुत्र्याचे ते भुंकणे ऐकून व त्याने तोडलेला तिच्या पायाचा मांसाचा तुकडा बघून ती धसका घेऊन तिथेच गतप्राण झाली. मोठा भाऊ काहीच तक्रार करु शकला नाही, कारण चुकी त्याच्या मुलीची होती. परंतु तो बदला घेण्याची संधी पाहू लागला. दोन्ही भावांनी पाउस पडल्यावर शेकडो एकर जमिनीत बियाणं पेरलं पावसाने मध्येच दांडी मारल्याने रुजलेले बियाण फुकट गेलं. मोठ्या भावाकडे पुन्हा पेरण्यासाठी भरपूर बियाणं होते परंतु छोट्या भावाकडे मात्र काहीच शिल्लक नव्हते. छोट्या भावाला बियाणं उसने घेण्याकरीता तोंड नव्हते. दोघे भाऊ एकमेकांचे मरणशत्रू झाले होते. माझ्या भावाचे बियाणं नसल्यामुळे काही लाखांचे नुकसान होणार ह्यापेक्षा मोठा सूड कोणता असू शकतो असे मोठ्या भावाला वाटले.
     परंतु ह्या त्याच्या हट्टी स्वभावामुळे मोठ्या भावाला रात्रीची झोप येत नव्हती आणि जेवणही गोड लागत नव्हते. मध्यरात्रीपर्यंत झोप न आल्यामुळे त्याने लाईट लावली तर त्याची नजर भिंतीवरील क्रूसजडीत ख्रिस्तावर गेली. तेथे लिहिलेले शब्द त्याच्या हृदयात शिरले, ‘हे पित्या त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात हे त्यांना माहित नाही’. तो सर्व सुडबुधी विसरला. आपल्या दोन नोकरांना त्याने उठवले. बियाणांची वीस मोठी पोती भरलेली घेऊन तो आपल्या भावाच्या घराजवळ गेला. दार उघडताच जोराने त्याने भावाला मिठी मारली व म्हणाला, ‘क्रूसावरील ख्रिस्ताने मला तुला क्षमा करायला पाठवले आहे व तुझ्या शंभर एकर शेतजमिनीत पेरण्याकरिता मी वीस पोती बियाणं घेऊन आलो आहे’. ती समेटाची व समंजसपणाची कृती पाहून अपराधी भावाने गहिवरलेल्या शब्दांमध्ये माफी मागितली आणि भावाचे आभार मानले.

मनन चिंतन:

देव केवळ आपल्या पापांची क्षमाच करीत नाही तर सर्व पापी लोकांना तो आपणाकडे आमंत्रित करतो, त्यांना क्षमा करतो, फक्त आपण सर्वांनी दु:खी अंतःकरणाने त्याच्यापाशी गेले पाहिजे. हाच आपला ख्रिस्ती विश्वासाचा आकर्षित करणारा गाभा आहे. परमेश्वर आपल्या सर्व अपराधांची आपणास क्षमा करतो. जे लोक अंधकारात गुरफटलेले आहेत एकमेकांविरुद्ध पाप करत आहेत. परमेश्वर अशा लोकांच्या मदतीस सर्वप्रथम धावून येतो. त्यास पश्चाताप करण्यास पुकारीतो व पापक्षमा मिळवून देतो. त्यामुळेच येशू सर्व जकातदार व पापी मनुष्यांबरोबर जेवावयास बसतो. कारण जेवणास एकत्र बसणे म्हणजे, बसलेल्या लोकांशी संलग्न होणे, त्यांस आपले मानून घेणे. येशू हा पाप्याच्या तारणासाठी ह्या भूतलावर आला होता. त्यामुळे शास्त्री व परुशी येशूवर आक्षेप घेतात. ते फक्त कायद्याचे पालक होते. त्यांच्या ठायी दया, करुणा नव्हती. येशू मात्र परमेश्वराची दया, करुणा सर्व लोकांपर्यंत पोहचवत होता, विशेषतः पापी व समाज बहिष्कृत जनांपर्यंत. ख्रिस्त हा पापी लोकांसाठी एक आशेचे किरण होता. व तो आजही आपणा सर्वांसाठी आशास्थान आहे. ही आशा कशाची आहे तर ती आहे सार्वकालिक जीवनाची. आपण आपल्या विश्वासाद्वारे केवळ परमेश्वर त्याच्याविषयी प्रकट करत असलेल्या  गोष्टींचाच स्वीकार करीत नाही तर त्याने आपणासाठी राखून ठेवलेल्या प्रत्येक गोष्टींचा आपण स्वीकार करतो. आपली आशा, विश्वास आपणास परमेश्वराने वचनबद्ध केलेल्या गोष्टींची पूर्तता करण्यास मदत करते. आपण पापांत कितीही खितपत पडलो असलो तरीही परमेश्वर त्याची दया दाखवून आपणास नवजीवनाची आशा देत असतो. त्या उधळ्या पुत्राप्रमाणे आपणास पुन्हा एकदा त्याची लेकरे बनवतो. म्हणूनच म्हटले जाते, प्रत्येक संताला भूतकाळ आहे व प्रत्येक पाप्याला भविष्यकाळ आहे’. परमेश्वर आपल्याला सदैव सुधारण्यात त्याच्याजवळ येण्यास व त्याचा प्रेमाचा अनुभव घेण्यास संधी उपलब्ध करीत असतो. पण कित्येकदा आपण ह्या जागतिक मोहमायेत एवढे गुरफटून जातो की, आपणास परमेश्वराची वाणी ऐकुच येत नाही त्यामुळेच पोप जॉन पौल दुसरे म्हणतात की, ‘आज सर्वात मोठे पाप म्हणजे मानवाच्या मनात अपराधीपणाची भावनाच शिल्लक राहिली नाही, त्यास पाप ही भावनाच नकोशी वाटते व त्याने पाप केलेच नाही असे वाटते’.
     आपण सर्व दैवी दयेचे वर्ष साजरे करीत आहोत. ह्या दैवी दयेच्या वर्षात आपण पित्याप्रमाणे दयाळू असावे व ती दया आपण इतरांना दाखवावी. परमेश्वर मला क्षमा करतो पण मी इतरांना क्षमा करतो का? म्हणूनच आपण प्रार्थनेत म्हणतो, ‘जशी आम्ही इतरांना त्यांच्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर’. केवळ क्षमा केल्याने क्षमा मिळते व जेव्हा दोन्हीही बाजूने क्षमा केली जाते तेव्हा नवजीवनाचा मार्ग मोकळा होतो. ह्या नवजीवनात सहभागी होण्यासाठी परमेश्वर सदैव आपणास पुकारीत असतो व हीच आपली आशा आहे. आपण सर्वकाळ प्रभूच्या सानिध्यात रहावे व त्याची स्तुतीसुमने गावीत म्हणून प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१. परमगुरुस्वामी, महागुरूस्वामी, धर्मगुरू व सर्व व्रतस्थ ह्यांनी परमेश्वराच्या महान व दैवी दयेचा व करुणेचा आदर्श ठेवून त्याच दयेचा व करुणेचा प्रचार सर्वत्र करावा म्हणून प्रार्थना करूया.
२. जे लोक परमेश्वरापासून दूर गेले आहेत वाईट मार्गाला लागले आहेत, वर्षानुवर्षे पापांत खितपत पडलेले आहे अशांना परमेश्वराचा अनुभव यावा, त्यांनी कुमार्गांना सोडून परमेश्वरापाशी ते परत यावेत म्हणून प्रार्थना करूया.
३. जगात आज शांती पसरावी, हिंसा, भ्रष्टाचार, द्वेष यांचा विनाश व्हावा म्हणून प्रार्थना करूया.
४. जी कुटुंब दुभंगलेली आहेत अशा कुटुंबात सलोखा निर्माण व्हावा आपापसातील मतभेद बाजूला सारून एकमेकांना क्षमा करावी व ख्रिस्ती जीवनाचा आदर्श व्हावेत म्हणून प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजांसाठी प्रार्थना करूया.





No comments:

Post a Comment