Wednesday 21 September 2016



Reflection for the Homily of 26th Sunday in Ordinary Time (25-09-2016) By Glen Fernandes




सामान्य काळातील सव्विसावा रविवार

दिनांक: २५/०९/२०१६.
पहिले वाचन: आमोस ६:१,४-७.
दुसरे वाचन: तीमथी ६:११-१६.
शुभवर्तमान: लूक : १६ : १९ – ३१.





“देवदुताने त्याला आब्राहामाच्या उराशी नेऊन ठेवले”

 

प्रस्तावना:

आज आपण सामान्यकाळातील सव्विसावा रविवार साजरा करीत आहोत. जिथे न्याय, प्रीती, निती, व बंधुप्रेम आहे तिथे परमेश्वराची शांती नांदेल असा संदेश आपल्याला आज ख्रिस्तसभा देत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा आमोस समाजात गरिबांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवितो आणिश्रीमंतांची त्याबद्दल कानउघडणी करतो.दुसऱ्या वाचनात संत पौल आपला शिष्य तिमथी ह्यास सद्बोध करीत आहे कि,आपण प्रभू येशु पुन्हा येईपर्यंत निष्कलंक व निर्दोष रहावे. आजच्या शुभवर्तमानात आपणास श्रीमंत मनुष्य व दरिद्री लाजर ह्यांचा दाखला ऐकावयासमिळतो.
माणसाला विनाशाकडे नेण्याची क्षमता धनात आहे, म्हणून आपण सुज्ञतेने आपल्याला मिळालेल्या देणग्यांचा, धनाचा, कलांचा गरजुसाठी वापर केला, तर आपल्याला स्वर्गात अविनाशी धन (स्वर्ग) व वारसा प्राप्त होईल. त्यासाठी लागणारी कृपा आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून आपण ह्या पवित्र मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.

पहिले वाचन: आमोस ६:१,४-७.

इ.स.पूर्व आठव्या शतकात आमोससंदेष्ट्याने समाजातील अन्यायाविरुद्ध वाचा फोडली. श्रीमंत, विलासी व ढोंगी लोकांची दुर्दशा होण्याचे भाकीत आमोसनेकेले.इस्रायली समाज जसजसा संपन्न होत गेला तसतशी श्रीमंत आणि गरीब ह्यांच्यातील दरी रुंदावत गेली. गरिबांचे मोठ्या प्रमाणावर शोषण होऊ लागले. श्रीमंत गरिबांच्या जमीनी लुटू लागले. सावकारीने कळस गाठला. पायातील पायतनाच्या मोलाने गरिबांची विक्री होऊ लागली. त्यामुळे संदेष्टा आमोस ह्याने श्रीमंतांवर आसूड उगवला भ्रष्टाचाराला प्रोत्साहान देणाऱ्या आळशी बायकांना धारेवर धरण्यास त्याने सोडले नाही.
      संदेष्ट्याने देवाच्या नावाने हा संदेश दिला आहे हि बाब ध्यानात घेतली पाहिजे देवाला गरिबांवर केलेला अन्याय मुळीच खपत नाही हेच ह्यावरून अधोरेखित केले गेले आहे. त्यांनी देवाच्या नावाने धनावानांविरुद्ध आघाडी उभारली. दुर्बल घटकांचे शोषण होत असल्यामुळे परमेश्वराचा देशावर कोप होईल. परचक्राचेसंकट ओढवेल असा इशारा संदेष्ट्याने दिला.
      हिब्रू धर्माने दुर्बल घटकांच्या रक्षणाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली. परके, पोरके आणि विधवा ह्यांचे शोषण केले जाऊ नये असा दंडक धर्माने घातला. परमेश्वराने संदेष्ट्याद्वारे अन्याय करणाऱ्या धनावानांनी तंबी दिली कि, तुम्ही गोरगरीबांना छळले आणि त्यांनी माझ्याकडे तक्रार केली, तर मी त्यांना न्याय मिळवून देईन व तुम्हाला कठोर शासन करीन. स्वत: देव गोरगरिबांचा रक्षणकर्ता म्हणून उभा राहिला.

दुसरे वाचन: तीमथी ६:११-१६.

संत पौल तीमथीस आपले आचरण कसे असावे ह्याबद्दल मार्गदर्शन करत आहे. आपले पत्र लिहून झाल्यावर संत पौल शेवटचा मजकूर लिहिताना तीमथीस नितीमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता ह्यांच्या पाठीस लागण्याचे आवाहन करत आहे. विश्वासासंबंधीचे जे सुयुक्त ते कर, युगानुयूगाच्या जीवनाला बळकट धर अशी लाखमोलाची शिकवणूक संत पौल तीमथीस देत आहे. आध्यात्मिक जीवनातील जडणघडण करत असताना संत पौलाची आपल्या शिष्यांसंबंधीची तळमळ हि वाखाणण्यासारखी आहे. पौल क्रांतिकारक समाजसुधारक नव्हता तर आध्यात्मिक मार्गदर्शक होता.तीमथीला अधिकाराचे व जबाबदारीचे ओझे जाणवत होते. अनेक संकटाना सामोरे जात असताना पौल त्याला देवावर श्रद्धा ठेवून हिंमत बाळगण्याचा संदेश देत आहे.


शुभवर्तमान: लूक : १६ : १९ – ३१.

श्रीमंत मनुष्य व दरिद्री लाजरस ह्यांचा दाखला आज प्रभू येशु आपणासमोर ठेवत आहे. ह्या दाखल्याद्वारे भोजनाच्या निमित्ताने येशूने आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनासंबंधी महत्वाचे भाष्य केले. येशूला उपेक्षितांबद्द्ल विशेष महत्व होते. दरिद्री व्यक्तीस ‘लाजरस’ हे नाव तो स्पष्टपणे सांगतो परंतु श्रीमंत माणसाचे नावही तो घेत नाही. समाजात श्रीमंत व कंगाल यांच्यात भेदभाव केला जातो, हि गोष्ट त्याला आवडली नाही. म्हणून त्याने समतेचा आग्रह धरला.
श्रीमंती हा देवाचा आशीर्वाद असून दारिद्र्य हा शाप आहे अशी इस्रायली लोकांची धारणा होती. येशूने श्रीमंत मनुष्य व दरिद्री लाजरस ह्यांचा दृष्टांत सांगून सुखवस्तू, असंवेदनशील आणि चंगळवादी धनवानांच्या डोळ्यात अंजन घातले आहे. ‘लाजर’ या शब्दाचा अर्थ ‘देव मदत करतो’ (God is my help) असा आहे. श्रीमंत लोक आपल्या महालात एैशआरामात विलासी जीवन जगत होते. समाजातील गोरगरिबांबद्दल त्यांच्या मनात कळवळा नव्हता. त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल असा इशारा संत लूकने दिला आहे.
उपेक्षित, पिडीत, कंगाल, आंधळे-पांगळे यांना सामाजिक जीवनात स्थान नव्हते. त्यांची जागा तळागाळात होती. हेच लोक येशूचे आणि देवाचे लाडके होते. स्वर्गात ते आब्राहम आणि मोशे ह्यांच्या पंगतीत ते असतील असे भाकीत संत लूक करत आहे.

बोधकथा:

१. एकदा एक मनुष्य रस्त्याने जात असता त्याने अनेक लुळे, पांगळे, लोक रस्त्याच्या कडेला बसलेले पहिले. समाजातील गरिबी व असमानता पाहून तो मनुष्य अस्वस्थ झाला. मंदिरात येऊन त्याने देवाला प्रश्न केला की, ‘हे देवा तू दयाळू, ममताळू, व कनवाळू आहेस ही समाजातील स्थिती तू कशी पाहू शकतोस. काहीतरी करावे असे तुला नाही का वाटत’? त्यावर देव उत्तरला, ‘मी तुला निर्माण केले आहे.’
बोध: आपल्याला मिळालेली श्रीमंती, धनदौलत, देणगी, कलागुण हे आपल्यासाठी नसून त्याचा वापर इतरांसाठी व समाजाच्या उद्धारासाठी कसा होईल ह्याचा आपण विचार केला पाहिजे.
२. एकदा एक मनुष्य त्याच्या गुरूकडे धावत आला व म्हणाला गुरुजी, ‘मला स्वप्नात देवाने सांगितले की, तुमच्याकडे मौल्यवान खडा आहे व मला तो हवा आहे’. गुरूने झोळीतील हिरा बाहेर काढला. गुरूने स्मित हास्य करून तो खडा त्यास दिला. काही वेळ झाल्यावर तो व्यक्ती पुन्हा धावत आला व गुरूस म्हणाला ‘गुरुजी हा खडा तुम्ही घ्या; परंतु मला ती श्रीमंती द्या, ज्यामुळे तुम्ही हा हिरा मला देऊन स्मित हास्य केले’.
बोध: माझ्यासाठी श्रीमंती म्हणजे काय आहे? पैसा, धन, मानसिक स्वास्थ्य, कौटुंबिक जीवन, परमेश्वर? माणसाने सारे जग कमावले, परंतु स्वत:चा आत्मा गमावला तर त्यास काय लाभ?

मनन चिंतन:

पूर्वी देवाचे राज्य ही तथाकथित धार्मिकांची आणि धनवानांची मिरासदारी होती. येशूने देवराज्याचे दरवाजे गरिबांसाठी खुले केले. त्यांना त्या राज्याचे सन्मान्य नागरिकत्व बहाल केले.
आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो की, दरिद्री लाजरस मेला आणि देवदुतांनी त्याला आब्राहमाच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व तो अधोलोकात यातना भोगत होता. श्रीमंत व्यक्तीने लाजरसासाठी काहीही चांगले कृत्य केले नाही तसेच काही वाईटही केले नाही तरीही त्याला नरकात जावे लागले. खरे तर श्रीमंत माणसाने काहीही केलं नाही म्हणून त्याची अशी अवस्था झाली. समाजातील अन्याय, भ्रष्टाचार, पिळवणूक गरिबांची दुर्दशा ह्याविषयी काहीही न करणे सुद्धा पाप आहे अशी शिकवणूक संत लुक देत आहे.
      समाजात श्रीमंतांचा वर्ग वाढू लागल्यावर गोरगरीबांची परिस्थिती गंभीर होत जाते. अर्थशास्राच्या नियमाप्रमाणे धन झिरपत दुर्बल घटकापर्यंत गेले पाहिजे. परंतु मानवी चेहरा नसलेल्या भांडवलशाही आणि एकतंत्री राजेशाहीत तसे काही घडत नाही. त्या धनाची डबकी बनत जातात. भारतात एका बाजूला अब्जाधीशांची संख्या वाढत आहे तर दुसऱ्या बाजूला आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या फुगत आहे. गतकालात व आजही धर्माने धनवानांच्या हितसंबंधाचे रक्षण केले आहे. आणि धनवानांनी धर्मसंस्थाना भरपूर देणग्या देऊन आपले आश्रित केले आहे.येशुभोवती सामान्य लोकांचा नेहमी गराडा असे. त्यांच्यामध्ये बसून त्याने त्यांना प्रवचने दिली. समानतेच्या भूमिकेवरून त्याने त्यांच्याशी संवाद साधला. राजाच्या राजवाड्यात किंवा मंदिरात दुर्बलांना प्रवेश नव्हता ते प्रतिष्ठेच्या वर्तुळाबाहेर फेकले गेले होते; त्यांना येशूने कवेत घेतले.
      देवाच्या राज्यात बसण्याचा पहिला अधिकार आपलाच आहे असे श्रीमंतांनी व धार्मिक पुढाऱ्यांनी ग्राह्यधरले होते. येशूने त्यांचा नामनिर्देशही केला नाही. उलट गोरगरिबांच्या बाजूने दिला. येशूने देवाच्या राज्यात गरिबांना सामावून घेतले परंतु श्रीमंतांना वगळले नाही. मात्र श्रीमंतांच्या डोक्यावर धनदौलतीचे अवजड पेटारे असतात, धनामुळे त्यांच्यात एक आत्मसंतुष्टीपणा येतो. पैशांच्या बळावर ते न्याय विकत घेऊ शकतात. माणसांचा सौदा करू शकतात अनीती पचवू शकतात. आपण पैसा फेकून सर्वकाही करू शकतो आणि प्रसंगी देवालाही वेठीस धरू शकतो असा फसवा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होतो. त्यामुळे देवाच्या राज्यात धनवानांना प्रवेश करणे कठीण आहे असा गंभीर इशारा येशूने दिला आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, तुझ्या लेकरांची प्रार्थना ऐक.

१. आपले परमगुरु , महागुरू, सर्व धर्मगुरू व व्रतस्थांनी आपल्या श्रद्धेत दृढ होऊन आपल्याला प्रभूच्या राज्यात प्रवेश करण्यास मार्गदर्शन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. सर्व राजकीय नेत्यांनी प्रभू येशु ख्रिस्ताचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे जीवन लोकांच्या सेवेसाठी समर्पित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जेथे दहशतवाद, आतंकवाद व ताणतणाव निर्माण झाले आहेत अशा ठिकाणी परमेश्वराने त्याची शांती निर्माण करावी व राष्ट्रांमध्ये समेट घडवून आणण्यास ज्या संघटना कार्यरत आहेत त्यांच्या कार्याला यश प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे कोणी देवापासून दूर गेले आहेत त्यांनी मागे वळून परत एकदा येशुला आपला राजा म्हणून स्वीकारावे व आपले जीवन प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी समर्पित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपल्या लहान मुलामुलींनी ख्रिस्ताला स्वीकारून ख्रिस्ती जीवनाच्या मुल्यांवर त्यांनी जीवन जगावे व तोच ख्रिस्त इतरांच्या जीवनात आणण्यास सदैव मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक कौटुंबिकहेतूंसाठी प्रार्थना करूया.



No comments:

Post a Comment