Tuesday 13 September 2016


Reflection for the Homily of 25th Sunday in Ordinary Time (18-09-2016) By Baritan Nigrel.





सामान्य काळातील पंचविसावा रविवार

दिनांक: १८/०९/२०१६. 
पहिले वाचन: आमोस ८:४-७.  
दुसरे वाचन: १तीमथी २:१-८.
शुभवर्तमान: लूक १६:१-१३.







कोणत्याही नोकराला दोन मालकांची सेवा करता येत नाही







प्रस्तावना:

प्रभू येशू ख्रिस्त दयेचा, प्रेमाचा, चांगुलपणाचा आणि कृपेचा महासागर आहे. आपणास खरा आनंद त्याच्यामध्येच मिळत असतो म्हणून आजची उपासना आपणास देवाच्या प्रेमाचा व सेवेचा मार्ग निवडण्यास आमंत्रित करीत आहे.
आजच्या शुभवर्तमानात, प्रभू येशू ख्रिस्त अन्यायी कारभाऱ्याविषयी दृष्टांत सांगत असताना, माणसाने देवाचीच सेवा करावी कारण देवाची व धनाची अशी द्विधा सेवा आपण करू शकत नाही, असा संदेश प्रभू आज आपणास देत आहे.
परमेश्वर पिता आपला धनी आहे व आपण त्याचे कारभारी आहोत. आपला पिता उदार आहे, तो आपल्याला सढळ हाताने जे हवे असते, ते देत असतो. आजच्या या मिस्साबलीदानात आपण प्रार्थना करू या की, आपणही परमेश्वरासारखे उदार बनावे व सढळ हाताने इतरांना मदत करावी, तसेच आपण सर्वांनी देवाच्या प्रेमाचा, दयेचा व सेवेचा मार्ग निवडून देवाची सेवा-चाकरी करावी म्हणून देवाची कृपा व शक्ती मागूया.

पहिले वाचन: आमोस ८:४-७.

पहिल्या वाचनात आमोस लोकांना सांगत आहे की, पापी लोकांचा ‘अंतसमय’ जवळ आला आहे. त्यांची वेळ भरली आहे. ह्या शेवटच्या दिवसाचा उल्लेख आमोसने अगदी थोडक्या, कठोर, मर्मभेदक शब्दांनी वर्णिला आहे. उदा. लाभाच्या लोभाने त्यांनी व्यापारातील प्रामाणिकपणाला केव्हाच सोडचिठ्ठी दिली होती (५), जास्त पैसा घेऊन कमी विकणे, मापात हातचलाखी करून नफा वाढवणे हेच त्यांचे ध्येय होते. मानवता, दुसऱ्यांविषयी कळवळा हे सर्वच त्यांना परके व पारखे होते. म्हणून आमोस त्यांना सांगत आहे की, त्यांच्या या पापी वृत्तीमुळे त्यांचा ‘अंतसमय’ जवळ आला आहे आणि देव त्यांचा दिव्य न्याय करील.
सहाव्या ओवीमध्ये आमोस – ‘रूपे देऊन’, ‘जोडा देऊन’ व ‘भूस विकून’ असे तीन शब्द वापरतो. याचा अर्थ – ‘रूपे देऊन’ म्हणजे बहुधा गरिबाला दिलेले कर्ज आणि ‘जोडा’ म्हणजे त्याने उधारीवर घेतलेल्या वस्तू. हे सर्व देण्यामध्ये सावकाराच्या मनात एकच हेतू असतो की, हा माणूस कर्ज फेडू शकणार नाही. त्याची उधारी वसूल होणार नाही, मग त्याला दास करून घेऊ (२राजे ४:१). तसेच ‘भूस विकून टाकू’ म्हणजेच नाकारलेल्या वाईट-साईट मातीमोलाच्या वस्तू विकून नफा मिळवायचा असा त्याचा अर्थ होतो.

दुसरे वाचन: १तीमथी २:१-८

पौलाने इथे ‘सार्वजनिक प्रार्थना’ यावर विशेष भर दिला आहे. ‘सर्वांसाठी प्रार्थना’ यावर पौलाचा कटाक्ष आहे आणि अधिकार चालवणाऱ्यांकडे त्याने विशेष लक्ष दिले आहे. १ तीमथीच्या अध्याय २ च्या संदर्भात सांगायचे तर वंश, जात, कुळ, दर्जा अगर परिस्थिती हे काहीही असले तरी देवाची करुणा सर्वांना सारखीच आहे यावर पौलाला येथे भर द्यायचा आहे असे लक्षात येते. कारण ओवी ४ आपल्याला सांगते की, ‘देवाची इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे म्हणून देवाचा पुत्र येशू ख्रिस्त देवाची करुणा आपल्यामध्ये घेऊन आला’ - म्हणून संत पौल सांगतो – ‘येशू ख्रिस्त हा देव व मानव ह्यांमधील एकच दुवा बनला’.

शुभवर्तमान: लूक १६:१-१३

हा ‘अन्यायी कारभाऱ्याचा दाखला’ प्रभू येशूने तेथे जमलेल्या धनलोभी परुश्यांना सांगितला (१४). एका श्रीमंत माणसाने आपल्या जमीन जुमल्याची व्यवस्था पाहण्यास आणि हिशोब ठेवण्यास एक कारभारी नेमला होता. पण त्याने कारभारात बेईमानीचे वर्तन केले असे मालकाच्या लक्षात आले. त्याला कामावरून काढण्यापूर्वी त्याच्या धन्याने त्याच्याजवळ कारभाराचा हिशोब मागितला. तो हिशोब देताना त्याने धन्याला द्यायची असलेली रक्कम खूपच कमी दिली कारण त्याने कागदपत्रात बदल करून स्वतःचा फायदा मिळवला होता. तो आपल्या स्वभावाप्रमाणे वागला म्हणून या माणसाच्या गैरव्यवहाराला प्रभू येशूने मान्यता दिली असे नाही.
या दृष्टांताद्वारे, येशू आपल्याला शिकवीत आहे की, देवाच्या लोकांनी या जगातील धनाकडे योग्यप्रकारे पाहून, त्याचा योग्य तोच वापर करावा. दुसरी गोष्ट म्हणजे आपण विश्वासू कारभारी असलं पाहिजे. धनाची चाकरी न करता, उलट त्याचा उपयोग देवाच्या कार्यासाठी केला पाहिजे असे आपणास उद्देशून सांगण्यात आले आहे.

बोधकथा:

क्रोएसुस राजा त्याने निर्माण केलेल्या महालावर व परिसरात असलेल्या फुलबागेरवर अतिशय आनंदी आणि गर्विष्ट होता. त्याच्या बढाया तो सतत मारत असे. एके दिवशी त्याच्या दरबारात सलोन नावाचा एक ज्ञानी व्यक्ती त्याच्या सहकाऱ्यांसोबत त्याला भेटावयास आला. राजाने त्याला सर्वप्रथम त्याचा महाल न्याहाळण्यासाठी फिरवले तसेच नंतर त्याला फुलबागही दाखवली आणि विचारले, ‘तु माझ्यापेक्षा कोणी श्रीमंत आणि आनंदी बघितलाय का’? सलोन विद्वानाने विचार केला आणि सांगितले, ‘होय तुमच्याच दरबारातील तो गरीब व्यक्ती जो त्याच्याकडे काही नसूनसुद्धा तो अगदी आनंदी आणि समाधानी आहे’. त्यावर राजाला अतिशय क्रोध आला व म्हणाला, ‘तुला दिसत नाही का हा माझा महाल आणि ही बाग सर्वांचे येथ आकर्षण आहे आणि ह्या सर्वांचा शिल्पकार मी स्वत: आहे म्हणून माझ्यापेक्षा कोणी श्रीमंत आणि आनंदी असू शकतच नाही’. परंतु स्मितहास्य करत सलोन म्हणाला, ‘अहो राजे, सुखी मरण येईपर्यंत आपण म्हणू शकत नाही की आपण आनंदी व समाधानी आहोत’.

     काही दिवसानंतर सायरसच्या राजाने क्रोएसुस राजाच्या राज्यावर स्वारी करून त्याचा पराभव केला व त्याच्या महालाची आणि फुलबागेची धुळधान केली. त्याने क्रोएसुस राजालाही मारण्याचा विचार केला आणि त्याला सरण रचून त्यावर झोपवले.  परंतु क्रोएसुस राजाने सलोन ज्ञान्याच्या नावाने मोठी आरोळी ठोकली आणि म्हणाला, ‘तू जे काही म्हणाला होता ते सर्व सत्य होते की, मरणाच्या क्षणापर्यंत कोणी म्हणू शकत नाही की तो खरोखर सुखी, आनंदी, समाधानी आहे;  धनदौलतच फक्त समाधान देत नाही’. 

मनन चिंतन:

मानवाचा जन्म हा देवाची स्तुती, आराधना आणि सेवा करण्यासाठी झालेला आहे. हेच मानवी जीवनाचे परमध्येय आहे. ज्या परमेश्वराने आपल्याला जीवन दिले आहे, तो परमेश्वर आपल्यावर अखंडितपणे प्रिती करतो, त्या परमेश्वराला आपण जेव्हा प्रतिसाद देत असतो तेव्हा परमेश्वराचे जीवन नदीच्या प्रवाहासारखे अविरतपणे आपल्यामध्ये संथ वाहत असते. म्हणून आजची उपासना आपल्याला हेच सांगत आहे की, आपण जाणीवपूर्वक परमेश्वराची निवड करायला हवी की ज्यामुळे परमेश्वराचे जीवन आपल्या जीवनामध्ये प्रतिबिंबित होईल; देवाचे जीवन सखोल आणि सुदृढ होईल. जो परमेश्वराला व परमेश्वराची सेवा चाकरी करण्याचा मार्ग स्वीकारतो त्याला परमेश्वर कधीही एकटे सोडत नाही. परमेश्वर त्याच्या शब्दातून, कृतीतून इतरांना प्रकट होत असतो.
देवाने जी माणसे निर्माण केली तीच माणसे देवाला विसरून चकाकणाऱ्या नाण्याच्या मागे लागली आहेत. खरा आनंद देवाच्या प्रेमात, करुणेत सामावलेला आहे, हे सत्य आज आपण विसरलेलो आहोत. म्हणून आपण मन-आनंद मिळविण्यासाठी सतत खटपट करीत असतो. सत्य, पद, प्रसिद्धी वा विविध गोष्टीमध्ये हा आनंद दडलेला आहे, अशी आपली समजूत झाल्याने त्या गोष्टी हस्तगत करण्यासाठी आपण धडपड करीत असतो, काहीजण तर पैशाने जग मिळविण्याची धडपड करत असतात. जीवन जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे. पण या पैशाचा अतिरेक जर झाला तर ‘सर्व पापांचे मूळकारण पैसाच बनते’.
म्हणून येशू ख्रिस्त आपणास सांगतो, ‘कोणत्याही चाकराला दोन धन्यांची सेवा-चाकरी करता येत नाही; कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रिती करील; अथवा एकाला धरून राहील व दुसऱ्याला तुच्छ मानील (लुक १६:१३). समुद्रातील प्रवास कोणीही दोन बोटीवर पाय ठेऊन करीत नसतो. अन्यथा लाटा आणि हेलकावे यामुळे तोल जाऊन त्याला त्याचा प्राण गमवावा लागेल. त्याचप्रमाणे आपल्या या जीवनातील प्रवासामध्ये आपण देवाची सेवा व धनाची सेवा करू शकत नाही. म्हणून आपण सर्वांनी देवाचीच सेवा करावी असा संदेश प्रभू आज आपल्याला देत आहे.
देवाने आपल्या प्रत्येकाला या जगात एक विशेष कामगिरीसाठी पाठविले आहे. मग तो गरीब असो किंवा श्रीमंत, वयाने लहान असो की मोठा, विद्वान असो की अज्ञानी. आजच्या शुभवर्तमानातून आपणास सांगण्यात आले की, परमेश्वराने आपल्या सर्वांना या जगात त्याच्या मालमत्तेचे कारभारी म्हणून काम करण्यासाठी पाठविले आहे. शुभवर्तमानामध्ये चांगला कारभारी आपल्या धन्याची इच्छा प्रमाण मानतो, त्याची वागण्याची पद्धत कोणती याचा नीट अभ्यास करतो आणि धन्याला आवडेल तेच कार्य करतो. शुभवर्तमानातला श्रीमंत मनुष्य किंवा धनी हा दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः परमेश्वर आहे आणि आपण सर्वजण त्याचे कारभारी आहोत. म्हणून आपण आपल्या जीवनात देवाची इच्छा प्रमाण मानली पाहिजे. आपला धनी जसा दयाळू व क्षमाशील आहे, तसे आपणही दयाळू बनले पाहिजे.
पहिल्या वाचनात आमोस लोकांना सांगत आहे की, पापी लोकांचा ‘अंतसमय’ जवळ आला आहे. त्यांची वेळ भरली आहे. ज्याप्रमाणे कोणतेही पीक त्याच्या स्वतःच्या आंतरिक वाढीने कापणीसाठी पिकून तयार होते, त्याचप्रमाणे न्यायदंड भोगण्यास पापी लोक पिकून तयार झाली आहेत. ते देवाची सेवा न करता धनाची सेवा करीत आहेत म्हणून त्यांच्या पापांची घडे भरली आहेत. देव त्यांचा दिव्य न्याय करील. कारण त्यांची शेवटची वेळ भरली आहे.
आपण सर्वजण देवाचे कारभारी आहोत. देवाची इच्छा व देवाचे कार्य करण्यासाठी त्याने आपल्याला या जगात पाठविले आहे. आमोस सुद्धा आपल्याला आठवण करून देतो की, ‘तुम्ही देवाचीच चाकरी व त्याचीच सेवा करा, कारण आपलाही ‘अंतसमय’ एक दिवस येणार आहे’. देव आपलाही दिव्य न्याय करणार आहे. एक दिवस आपण सर्वांना त्याच्या समोर उभे राहायचे आहे. परमेश्वर पिता आपल्या सगळ्यांना जाब विचारणार आहे. ही वेळ आपल्या जीवनात कधीही येऊ शकते, त्यामुळे सदैव तयार राहण्यातच खरे शहाणपण आहे.
आपला धनी प्रभू परमेश्वर प्रेमाने, दयेने व करुणेने श्रीमंत आहे. आपणदेखील त्याचे कारभारी त्याच्यासारखे श्रीमंत व्हावे म्हणून त्याने आपल्या सर्वांचे तारण करण्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यामध्ये पाठविला अशासाठी की, ‘जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे’. संत पौल ह्याची ग्वाही आपल्याला दुसऱ्या वाचनात देत आहे. देवाने पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविला. कारण देवाची इच्छा आहे की आपणा सर्वांचे तारण व्हावे. यासाठी आपण आपल्या धन्याची सेवा करून त्याच्यासारखे बनायला हवं. संत लुक आपल्याला सांगत आहे – “जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा” (लूक ६:३६).
परमेश्वर त्याचे करुणामय हृदय कोणालाही कधीही बंद करीत नसतो. जगाच्या दुःखापासून परमेश्वर कधीच दूर जात नसतो. तो स्वतः ख्रिस्ताद्वारे मानवाच्या देहात अवतरला. मात्र आपणच त्याला आपल्या जीवनात प्रवेश देत नाही. आपण फक्त आपल्या नोकरीवर व जास्त पैसा कसा कमावता येईल ह्यावरच आपले लक्ष केंद्रित करून भीतीचे आणि चिंतेचे जीवन जगतो. त्यात आपलेच नुकसान होत असते. खरा आनंद आपल्याला कोणत्याही भौतिक गोष्टींमध्ये मिळत नाही तर तो फक्त देवामध्येच मिळतो, म्हणून आपण देवाचीच सेवा करूया व आपल्या धन्यासारखे दयाळू व करुणामय प्रतिबिंब या जगात त्याचा प्रेमप्रसार करूया. आमेन.

विश्वासू लोकांचा प्रार्थना:

प्रतिसाद : हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१. आपले परमाचार्य पोप फ्रान्सिस, कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू-भगिनी व सर्व प्रांपचिक ह्यांनी देवाच्या कृपेने व सामर्थ्याने ख्रिस्ताची सुवार्ता पसरावी व देव आपला खरा धनी आहे ह्याची साक्ष जगाला दयावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपण सर्वजण देवाचे कारभारी आहोत म्हणून आपण सर्वांनी देवाची इच्छा व देवाचे कार्य विश्वासाने करावे, त्याच्यासारखे दयाळू व करुणामय बनून त्याचे प्रतिबिंब या जगात बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे लोक देवाला विसरून पैशाचे मागे धावत आहेत, अशांना परमेश्वराचा स्पर्श व्हावा व प्रभू आपला धनी प्रेमाने, दयेने व करुणेने श्रीमंत आहे ह्याचा अनुभव त्यांना प्राप्त व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या धर्मग्रामात जे लोक असाध्य आजाराने पछाडलेले आहेत त्यांना परमेश्वरी कृपेचा अनुभव यावा आणि नवजीवनाची वाट त्यांना दिसावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करूया.

No comments:

Post a Comment