Friday 30 September 2016



Reflection for the Homily of Feast of St. Francis of Assisi (04-10-2016) By Fr. Bemjamin Alphonso



संत फ्रान्सिस असिसिकर

दिनांक : ०४/१०/२०१६
पहिले वाचन : बेनसिरा - ५० : १,३-४,६-७
दुसरे वाचन : गलतीकरास पत्र – ६ : १४-१८
शुभवर्तमान : मत्तय – ११ : २५-३०



 "तुम्ही मजकडे या आणि मी तुम्हांला विश्रांति देईन."





प्रस्तावना


आज आपण निसर्गप्रेमी, पर्यावरणाचा आश्रयदाता संत फ्रान्सीस असिसिकर ह्या महान संताचा सण साजरा करत आहोत. पोप फ्रान्सिस ह्यांनी हे वर्ष आंतरराष्ट्रीय असाधारण दयेचे वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. तर फ्रान्सिस असिसिकर ह्यांनी आपल्या पवित्र जीवनाद्वारे जगाला दाखवून दिले आहे की आपण प्रत्येक जण दयेचे, शांतीचे, प्रेमाचे उदाहरण जगामध्ये बनू शकतो. देवाचं दुसरे नाव दया आहे. ही दया संत फ्रान्सिसने दाखवलेल्या मार्गाद्वारे आपण जगामध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण ख्रिस्ती म्हणून आपल्या जीवनाद्वारे दया प्रदर्शित करतो का? ह्यावर आपण मनन चिंतन करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन - बेनसिरा - ५० : १,३-४,६-७

पहिले वाचन हे बेनसिरा ह्या पुस्तकातून घेतलेले आहे. महापुरोहित सियोन ह्याने मंदिर दुरुस्त करून शहराची मजबुती केली व लोकांना नाशापासून रक्षण करायची दक्षता घेतली.

दुसरे वाचन : गलतीकरास पत्र – ६ : १४-१८

दुसऱ्या वाचनात संत पौल म्हणतात की आपण सर्वांनी प्रभूच्या वधस्तंभाचा अभिमान बाळगला पाहिजे. आपण आपल्या शरीरावर येशूच्या खुणा धारण केल्या पाहिजे आणि आपल्याला प्रभूची कृपा मिळत जाईल.

शुभवर्तमान : मत्तय – ११ : २५-३०

 शुभवर्तमानात आपण ऐकतो की, देवाने गुप्त गोष्टी बालकास आणि नम्र लोकांस प्रकट केल्या आहेत आणि विद्वान व विचारवंत लोकांपासून दूर लपवून ठेवल्या आहेत. जो कोणी ख्रिस्ताद्वारे पित्याकडे जातो, तो योग्य वाटेने जातो. पित्यावाचून पुत्राला कोणी ओळखीत नाही. आणि पुत्रावाचून व ज्या कोणाला त्याला प्रगट करायचं इच्छा असेल त्याच्या वाचून पित्याला कोणी ओळखीत नाही. तसेच सौम्य व लीन मनाच्या लोकांना प्रभू त्यांच्या कडे बोलावत आहे.
ख्रिस्त पित्याची दया लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी जगात आला होता. पोप फ्रान्सिस म्हणतात देवाचे नाव दया आहे आणि देवाचा पहिला आणि महत्वाचा गुण दया हाच आहे. स्तोत्राच्या पुस्तकामध्ये आपल्याला दयेविषयी अनेक स्तोत्रे ऐकायला मिळतात. नवा करार आणि ख्रिस्त दयेचा चेहरा आहे. म्हणून प्रभूयेशुच्या प्रत्येक कार्यात आणि प्रवचनात दयेचा फार मोठ्या प्रमाणात उल्लेख आढळतो. पवित्र देऊळमाता ही दया सर्वांपर्यंत पोहचवण्यास प्रयत्न करते. ख्रिस्ताने महारोग्याला व आजाऱ्याना बरे केले व ख्रिस्ताने सर्वाना शत्रुनां मारेकऱ्यांना क्षमा केली. हा सुद्धा दैवी दयेचा एक मोठा भाग आहे.

मनन चिंतन

एकदा एक तरुण झेन गुरूकडे आला. त्याला मठबंधू व्हायचे होते. त्याने गुरुजीना म्हटले मी जीवनात काही महत्वाचे शिकलो नाही परंतु माझ्या वडिलांनी मला सतरंज (Chess) खेळण्यास शिकवले आहे परंतु ज्ञानी होण्यासाठी त्याचा वापर होईल असे मला वाटत नाही. गुरुनी एक सतरंज त्याच्या समोर आणला व एका मठबंधूला त्या ठिकाणी बोलावले आणि त्याबरोबर सतरंज खेळण्यास सांगितले आणि अशी आज्ञा केली की, जो हरेल त्याला मरण स्विकारावे लागेल. त्या तरुण माणसाला कळले की ही जीवन आणि मरणाची गोष्ट आहे. त्याला सतरंजच्या सर्व कला माहिती होत्या आणि त्याला कळले की समोरचा माठबंधू हरणार व त्याला त्याचे जीवन गमवावे लागणार आणि त्याला त्याची दया आली. त्याला कळले की समोरचा मठवासी पवित्र आहे आणि जगाला त्याची जास्त गरज आहे आणि म्हणून तो चुकीच्या हालचाली करू लागला. गुरुजीने सतरंजचा ताबा घेतला आणि त्या युवकाला म्हटला तू जीवनात महत्वाच्या गोष्टी शिकला आहेस. कारण तू दयाळू आहेस. जीवनात तुला सिद्धी प्राप्त होईल.
आपला धर्म दयेचा / प्रेमाचा धर्म आहे. संत फ्रान्सिस असिसि ख्रिस्तापासून हेच नक्की शिकला. परिवर्तना अगोदर संत फ्रान्सिस महारोग्यापासून दूर पळत असे तोच संत फ्रान्सिस परिवर्तनानंतर महारोग्याबरोबर राहू लागला. त्याच्या वागण्यात आणि बोलण्यात प्रेम व दया होती. एकदा संत फ्रान्सिस घरात नसताना काही चोर घरात आले. इतर बंधूनी त्याना हाकलून लावले. परंतु संत फ्रान्सिसला जेव्हा ही गोष्ट समझली तेव्हा त्याने त्या बांधून पाठवून चोरनां बोलावून आणायला सांगितले. व ते चोर आल्यावर संत फ्रान्सिस ने त्यांच्याकडून क्षमा मागितली व नंतर त्यांना जेवण दिले.
संत फ्रान्सिसचे पर्यावरणावर प्रेम होते. त्याची तो काळजी घ्यायचा कारण
पर्यावरणामध्ये देवाची दया त्याला साकारलेली दिसायची. संत फ्रान्सिस मनाने लीन, नम्र व दयाळू होता म्हणून ख्रिस्ताने त्याला आपल्या पाच घायचे वरदान दिले. आपण सुद्धा आज ह्या महान संताचा सण साजरा करत असताना आपल्यासाठी प्रार्थना करूया की आपण सुद्धा नम्र, व दयाळू व्हावे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
आपला प्रतिसाद :  हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१.     आपण आपले पोप फ्रान्सिस, महागुरू व सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी ह्यांच्यासाठी खास प्रार्थना करूया की संत फ्रान्सिस प्रमाणे ते दयेचे व शांतीचे साधन बनावेत.
२.     आपण सर्व तरुणासाठी जे मार्ग चुकले आहेत त्याच्यासाठी प्रार्थना करूया. संत फ्रान्सिस असिसिकरचे उदाहरण त्यांनी जीवनात पाळावे व त्यांनी जीवनात योग्य मार्ग निवडावा.
३.     आपण जे आजारी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया की संत फ्रान्सिसच्या विनंतीद्वारे ते बरे व्हावेत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया.
४.     आपण सर्व मिशनरी व जगाच्या दुर्गम भागात येशूची सुवार्ता पसरविणाऱ्या सर्व बंधू आणि भागीनिसाठी प्रार्थना करूया की त्यांना नेहमी देवाची कृपा, प्रेम व दयेचा साथ मिळावा व योग्य कार्य करण्यास शक्ती मिळावी.




No comments:

Post a Comment