Thursday 9 January 2020


Reflection for the Homily of Solemnity of Baptism of the Lord (12/01/2020) by Fr. Michael Fernandes.


येशूच्या स्नानसंस्काराचा सण



दिनांक: १२/०१/२०२०
पहिले वाचन: यशया ४२:१-४, ६-७
दुसरे वाचन: प्रेषितांची कृत्ये १०:३४-३८
शुभवर्तमान: मत्तय ३:१३-१७


                     “तू माझा प्रिय पुत्र आहेसतुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.
प्रस्तावना:
          आज देऊळमाता आजच्या उपसानेद्वारे आपणा प्रत्येकाला आपल्या स्नानसंस्काराच्या वेळी घेतलेल्या वचनांचे स्मरण करण्यास बोलावत आहे. कारण आज ख्रिस्तसभा प्रभू येशूच्या स्नानसंस्काराचा सण साजरा करीत आहे. आजची उपासना, ‘स्नानसंस्काराद्वारेआपल्या श्रद्धेत व विश्वासात वाढ होत असते, ह्या महत्वाच्या मुद्द्यावर मनन-चिंतन करीत आहे.
          आजच्या पहिल्या वाचनाद्वारे यशया संदेष्टाने केलेल्या भविष्यवाणीची परिपुर्णता आजच्या शुभवर्तमानात आपणास ख्रिस्ताद्वारे झालेली दिसून येते व ह्याच भविष्यवाणीला सत्याचा दुजोरा देत आजच्या दुसऱ्या वाचनाद्वारे संत पौल म्हणतो, "नासोरी येशूला देवाने पवित्र आत्माचा व सामर्थ्याचा अभिषेक केला; तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला; कारण देव त्याच्याबरोबर होता".
                 स्नानसंस्कारहा आपल्या ख्रिस्ती जीवनातील महत्वाचा संस्कार आहे. त्याद्वारे आपली ख्रिस्ती श्रद्धेत व विश्वासात वाढ होत असते. हीच ख्रिस्ती श्रद्धा अधिक भक्कम होण्यासाठी लागणारी कृपा शक्ती आपणास मिळावी म्हणून आजच्या मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ४२:-, -
यशया संदेष्टा, देवाचा सेवक कशाप्रकारे व कोणत्या व्यक्तिमत्वाचा असेल हे जाहीर करताना आपणास सांगतो की, तो नम्र व लीन असेल. त्याच्याठायी देवाचा आत्मा वास्तव्य करील, जेणेकरून तो सत्याने न्यायाची प्रवृत्ती करील, राष्ट्रांना प्रकाश देईल, आंधळ्याचे डोळे उघडील आणि बंदिशाळेतून बंदिवानांस मुक्त करील.

दुसरे वाचन: प्रेषितांची कृत्ये १०:३४-३८
          'देव पक्षपाती नाही' असे पौल कनैल्यास ठामपणे सांगून स्पष्टीकरण करतो की ज्याची कृत्ये नैतिक आचाराणाशी सहमत आहेत त्याच्याठायी प्रभू वास्तव्य करतो, ज्याप्रमाणे देवाने नासोरी येशूबरोबर वास्तव्य करून; नासोरी येशूवर पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला, त्याचप्रमाणे जर का आपली कृत्ये नैतिकतेशी सहमत असतील, तर देव आपणावर पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा वर्षाव करील.

शुभवर्तमान: मत्तय ३:१३-१७
          योहानाने लोकांना पश्चाताप करायला सांगितले आणि बाप्तीस्माची प्रथा सुरु केली. बाप्तिस्मा हे नाव "बैप्टांयझेन" या ग्रीक शब्दावरून आले आहे. त्याचा अर्थ डुबणे, डुबविणे अथवा बुडवून काढणे असा होतो. जणु ते ख्रिस्ताच्या मृत्युत पुरले जात आणि नवीन निर्मिती म्हणून त्याच्या पुनरुस्थानात सहभागी होत. येशू ख्रिस्त म्हणतो, "पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही"(योहान ३:५). ह्याच ख्रिस्त वचनानुसार बाप्तीस्मा संस्काराला "पवित्र आत्म्याठायी नवजीवन" असे सुद्धा म्हटले जाते.

बोधकथा:
          अलेक्झांड्रियाची संत कॅथरीन एक अक्षत आणि शिकलेली युवती होती. तिला शहरात मान-सन्मान व प्रसिद्धी होती. तिने बाप्तिस्मा घेऊन ती ख्रिस्ती झाली होती. तिला स्नानसंस्कार काय आहे व त्याद्वारे कसे तारण होऊन आपण देवाचे होतो ह्याची जाणीव होती. अलेक्झांड्रिया मध्ये ख्रिस्ती लोकांचा छळ केला जात होता. सम्राटाने जणू काही ख्रिस्ती लोकांविरुद्ध बंड पुकारले होते. ख्रिस्ती लोकांना फक्त दोन पर्याय दिले होते. एक म्हणजे सम्राटाची उपासना करणे. जे ख्रिस्ती श्रद्धेनुसार पहिल्या आज्ञेचे उल्लंघन होते, आणि दुसरा पर्याय मृत्यूला सामोरे जाणे. ख्रिस्ती लोकांनी सम्राटाची उपासना न केल्यामुळे ठार मारले जात असे. अलेक्झांड्रियाच्या राज्यपालांने ख्रिस्ती लोकांचा अपमान व त्यांना श्रद्धेपासून दूर करण्यास एक संमेलन आयोजित केले. या संमेलनासाठी सर्वोत्तम व हुशार असे मूर्तिपूजक, तत्वज्ञ आणि वक्ते चर्चा करण्यास आमंत्रित केले व संत कॅथरीनला सुद्धा ह्या संमेलनात सहभाग घेण्यास बोलाविले. राज्यपालाला फक्त ख्रिस्ती लोकांचा अपमान व त्यांना नैतिकदृष्ट्या दुःखवण्यासाठी कट रचला होता. पण तिने आवाहन स्वीकारून सर्व पंडितांना चर्चेत हरवून टाकले. ख्रिस्ती विश्वास व स्नानसंस्कार कसे शक्तिमान आहेत, हे आपल्या अनुभवाने त्यांना समजावून सांगितले. सर्व तत्वज्ञानांचे परिवर्तन झाले व त्या सर्वांनी स्नानसंस्कार स्वीकारला. सर्वांनी आपल्या आत्म्यात व हृदयात येशूला स्वीकारून स्नानसंस्काराची कृपा प्राप्त करून घेतली.

बोध:
      येशू ख्रिस्ताची कृपा प्राप्त करण्यासाठी मैत्री व सर्वांना सोडून दिले. हीच देवाच्या प्रेमाची व स्नानसंस्काराची शक्ती आहे.

मनन चिंतन:
          स्नानसंस्कार देवाच्या प्रेमाविषयी साक्ष देण्यास कृपा व सामर्थ्य देतो. आपल्यामध्ये एक पवित्री अग्नी व ज्वाला निर्माण करून त्याचा शब्द जो, अनंत काळच जीवन देतो, त्याची साक्ष व ग्वाही देण्यास आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यात नेतो. स्नानसंस्कार आपल्याला देवाच्या प्रीतीने, अग्नीने पेटवत असतो. आपला आत्मा व हृदय, जीवन सुंदर होऊन ख्रिस्ताच्या कृपेने भरून जातो.
          आज देऊळ माता येशूच्या स्नानसंस्काराचा उत्सव साजरा करीत आहे. आपल्याला स्नानसंस्कारात मिळालेल्या ज्वालामध्ये उधळण करून ख्रिस्ताच्या कृपेत वाढून, मोठे होऊन ख्रिस्ता सारखे होण्यास आमंत्रण करीत आहे. ख्रिस्ताच्या स्नानसंस्काराचा चार शुभवर्तमानात उल्लेख केलेला आहे. म्हणजे ही घटना फार महत्त्वाची आहे. ह्यावेळी देवाने येशू त्याचा पुत्र आहे असे जाहीर केले;
येशूसाठी हा क्षण: १.आपणाबरोबर व आपल्यासारखा होण्याचा आहे.
                   २.सार्वजनिक सेवा सुरू करण्याचा क्षण.
                   ३.प्रिय पुत्रअसे पित्याने संबोधण्याचा क्षण.
       ख्रिस्ती म्हणून आपल्या सर्वांचा ख्रिस्तामध्ये स्नानसंस्कार झाला आहे. आपणाला स्नानसंस्काराचा अर्थ, महत्त्व कळते का? आम्ही तसं ख्रिस्तासारखे जीवन जगतो का? स्नानसंस्कार म्हणजे; ख्रिस्ताला परिधान, धारण करणे. आपलं सुंदर व पवित्र जीवनात रूपांतर होणे व एक नवीन जीवनाला सुरुवात. यहुदी (ज्यू) धर्म स्वीकारण्यास तीन मूलभूत गोष्टींची आवश्यकता होती.
१.एक गायी किंवा कासवाची जोडी याजकाकडे आणून परमेश्वराला होमबली म्हणून बलिदान किंवा अर्पण करणे. ह्यात सर्व खर्च समाविष्ट असतो. नवीन व्यक्ती होण्यासाठी त्याग करणे आवश्यक आहे.
२.सुंता करणे: माणसाच्या शरीरातून देहाचा तुकडा कापून काढणे. नवीन व्यक्ती होण्यासाठी तीव्र वेदना, अपार वेदना आणि अगदी रक्त सांडण्याची आवश्यकता आहे.
३.बाप्तिस्मा घेणे: सर्व कपडे काढून टाकावे, नग्न होऊन पाण्यात उतरणे, संपूर्ण शरीर पाण्याखाली विसर्जित केले जाते. नवीन माणूस होण्यासाठी खूप नम्रता आणि आत्मत्याग करणे आवश्यक असते.
          ख्रिस्ती स्नानसंस्कारांमध्ये यहुद्यांसारखे बाह्य चिन्हे व क्रिया नाहीत.जो ख्रिस्ताकडे स्नानसंस्कार घेतो; त्याला जुन्या जीवनाला झुगारून देऊन नवीन जिवन जे पवित्र आत्म्याचे असते त्याला आलिंगन द्यावे लागते. स्वतःचा त्याग, पैसा, प्रतिभा, वेळ, इत्यादी गोष्टींचा त्याग करून जीवन अर्पण करण्याची पवित्र इच्छा असावी. येशू म्हणतो, “ज्याला माझ्यामागे येण्याची इच्छा आहे, त्याने स्वतःला नाकारले पाहिजे, त्याने आपला वधस्तंभ घ्यावा व माझ्या मागे यावे.मनमोकळेपणे, दुःख व वेदना आणि जीवनातल्या अनेक परिस्थितीतून जाण्यास नेहमी तयार असावे. देव म्हणतो, “तुमचा देव परमेश्वर तुमच्या अंत:करणाची सुंता करील. परमेश्वरावर खऱ्या अंत:करणाने व पूर्ण जीवाने प्रीती करा.
         नम्रतेचे जीवन जगून व संपूर्णपणे देवावर अवलंबून राहण्याची इच्छा असावी; देवाच्या कृपेवर अवलंबून राहून आपला अभिमान, स्वार्थ, इच्छा, ह्यांवर विजय मिळवावा. पेत्र म्हणतो, “म्हणून देवाच्या समार्थ्याखाली स्वतःला नम्र करा, म्हणजे तो योग्य वेळी तुम्हाला उंच करील.
          आपण लहान असताना आपला स्नानसंस्कार झाला आहे. पण ज्यांनी आमच्यावर प्रेम केले आणि आमची काळजी घेतली; त्यांना पूर्ण जाणीव होती. आज महान सोहळास्नानसंस्कारनिमित्ताने साजरा करत असतात. पण स्नानसंस्कार काय आहे हे समजून घेण्यास थोडासा वेळ काढतो का?
          आज गरज आहे ती; स्नानसंस्काराची, जी प्राथमिक मुल्ये आहेत त्याचे पुनर्जीवन करणे. आपल्या जीवनात देव परिवर्तन करून, स्नानसंस्कार एक निव्वळ प्रक्रिया नसून एक पवित्र जीवनाची सुरुवात अशी समजूत देते. एक दिशा जी ख्रिस्ताकडे नेते. कृपेची जीवन जगून व परमेश्वराबरोबर एक सुंदर, निर्मळ, पवित्र प्रवास करावा. परमेश्वराचा आत्मा आपल्यात आहे. ख्रिस्त आपल्यास उठवीत आहे, जर झोपेत असाल तर कारण स्नानसंस्काराद्वारे आपल्या प्रत्येकाला एक मोठी जबाबदारी दिली आहे; ती म्हणजे येशूच्या प्रेमाची जगाला साक्ष देणे.
-निष्क्रिय होऊ नका.
-सुस्त होऊ नका.
         देऊळ माता आपल्याला आलिंगन देण्यास थांबली आहे. मरिया माता, देवदूत, व सर्व संत आपल्याला संत होण्यास प्रोस्ताहित करीत आहेत.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद:  ‘हे प्रभू तुझ्या बाप्तिस्मा द्वारे आमचे नूतनीकरण कर.’
१.    ख्रिस्त सभेत कार्य करणारे आपले पोप, बिशप्स व इतर सर्व प्रापंचिक ह्यांना देवाची सुवार्ता पसरविण्यास कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.    आपल्या राजकीय नेत्यांनी आपला स्वार्थीपणा बाजूला ठेवून जन कल्याणासाठी नेहमी कार्य करत राहावे व देशाची नेहमी प्रगती करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपले सर्व मिशनरी बंधू भागीनींवर देवाचा आशीर्वाद असावा व त्याचे कार्य करण्यास व येणाऱ्या संकटाना सामोरे जाण्यास परमेश्वराकडून प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे तरुण-तरुणी देवापासून दूर गेलेले आहेत, ज्यांना जगण्यात अर्थ उरला नाही व जे इतर वाईट मार्गाला लागले आहेत अश्यांना परमेश्वराने चांगला मार्ग दाखवावा व ते परमेश्वराकडे परत वळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपल्या व्ययक्तिक, कौटुंबिक, व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.

1 comment:

  1. If you need, I would give liturgy prepared for one Sunday.
    Fr. Michael G. Nanbhat Vasai, 401202.

    ReplyDelete