Thursday 16 January 2020



Reflections for the homily of the Second Sunday In Ordinary Time (19/01/2020) by Fr. Suhas Pereira  





सामान्य काळातील दुसरा रविवार



दिनांक: १९/ ०१/ २०२०
पहिले वाचन: यशया ४९: ३, ५-६
दुसरे वाचन: पौलाचे करिंथकरांस पहिले पत्र १: १०-१३
शुभवर्तमान: योहान १: २९-३४

विषय: पाहा, हे देवाचे कोकरू. जगाचे पाप हरण करणारे."

प्रस्तावना:
          प्रिय बंधू आणि भगिनींनो, नाताळचा काळ समाप्त झालेला आहे आणि आपण सामान्य काळात प्रवेश केलेला आहे. आज आपण सामान्य काळातील दुसरा रविवार साजरा करत आहोत. आपलं जग हे मानवी स्वार्थामुळे, अहंकारामुळे, दृष्टपणामुळे, क्रूरपणामुळे नाशाच्या दरीकडे कूच करत आहे. कदाचित आपल्याला प्रश्न पडत असेल कि देवाने निर्माण करून सुशोभित केलेल्या आणि चांगुलपणाने भरलेल्या या माझ्या सुंदर जगात रोगराई, नैसर्गिक आपत्ती, दुष्टपणा, क्रूरता आणि अमानुषपणा कुठून आला? या सगळ्यांना जबाबदार कोण आहे? आणि हे सर्व आपल्या जगातून नष्ट कसं होऊ शकते? आपलं जग पुन्हा चांगल कसं होऊ शकते?
          आपलं जग पुन्हा चांगल कसं होऊ शकते? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आजच्या शुभवर्तमानात मिळू शकते. बाप्तिस्मा करणारा योहान आपल्याला आज हे उत्तर देतो. जेव्हा तो प्रभू येशूला येताना पाहतो, तेव्हा तो म्हणतो: “पाहा, हे देवाचे कोकरू. जगाचे पाप हरण करणारे." होय ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तामध्येच सर्व प्रकारच्या बदलास आणि नाविण्यास आणि खास करून आपल्या ख्रिस्ती जीवनात बदल होण्यास सुरुवात होते. ख्रिस्त हाच आपल्या परिवर्तनाची आणि कायापालटाची सुरुवात आहे. ख्रिस्तासारखे जीवन जगणे आणि त्याच्या प्रेमाच्या, दयेच्या आणि क्षमेच्या शिकवणुकीप्रमाणे आपले जीवन जगणे हाच आपल्यासाठी शांती आणि समेटाचा एकमेव मार्ग आहे.
          आपण परमेश्वराकडे दयेची आणि क्षमेची याचना करू या. त्याने आपल्याला आपल्या पापांतून मुक्त करावे आणि ख्रिस्ताने दिलेल्या जीवनमार्गावर येणारे अडथळे त्याने काढावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ४९: ३, ५-६
          आजच पहिले वाचन यशया  संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेल आहे. परमेश्वराच्या सर्व लोकांसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या योजना आणि इच्छा आहेत. इस्राएली लोकांना परमेश्वराने खास रीतीने आपल्या सेवेसाठी पाचारण केले होते. परमेश्वराचे आपल्या प्रजेवर इस्राएलवर खूप प्रेम होते. कारण इस्राएलद्वारेच परमेश्वराचा गौरव होणार होता. इस्राएलद्वारेच परमेश्वराच्या तारणाचा प्रकाश संपूर्ण जगात पसरेल.
दुसरे वाचन: पौलाचे करिंथकरांस पहिले पत्र १: १०-१३
          आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथ येथील ख्रिस्ती भाविकांना 'देवाला समर्पित केलेले' असे संबोधितो. पौलाच्या मते करिंथ येथील ख्रिस्ती भाविक त्यांच्या बाप्तिस्म्याद्वारे परमेश्वराच्या कुटुंबाचे सदस्य बनलेले आहेत आणि तो त्यांच्यासाठी सर्वात मोठा मान आणि सन्मान आहे.
शुभवर्तमान: योहान १: २९-३४
          आजच शुभवर्तमान आपल्याला ख्रिस्ताची आणि त्याच्या मिशनकार्याची ओळख करून देते. आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो कि, लोकांचा मोठा समुदाय बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाभोवती यार्देन नदीपाशी जमला होता. तेथे, योहानाने प्रभू येशुवरील आपला विश्वास प्रकट केला. त्याने प्रभू येशूला "देवाचे कोकरू" असे संबोधिले आणि प्रभू येशू हा खरोखरच देवाचा पुत्र आहे अशी येशूबद्दल लोकांना साक्ष दिली.
बोधकथा:
          एका पर्यटकाने एकदा जर्मनी देशातील एका चर्चला भेट दिली. त्या चर्चला दोन उंच मनोरे होते आणि त्या दोन मनोऱ्याच्या मध्ये वरच्या भागावर कोकराचे एक चित्र होते. ते पाहून त्या पर्यटकाला आश्चर्य वाटले. त्याने त्याबद्दल विचारले असता, कोणीतरी त्याला सांगितले, कि, त्या चर्चचे बांधकाम चालू असताना एक कामगार त्या मनोऱ्यावरून खाली पडला. तो कामगार मेलेला असेल असे समजून त्याचे इतर सहकारी त्याचा मृतदेह आणायला खाली गेले. परंतु त्यांच्यासाठी आश्चर्याची आणि आनंदाची गोष्ट अशी कि, तो कामगार जिवंत होता आणि त्याला फक्त थोडेसे खरचटले होते. उंचावरून पडलेला तो कामगार कसा वाचला? त्या वेळेला मेंढरांचा एक कळप त्या चर्चच्या समोरुन जात होता. तो कामगार वरून पडला तेव्हा तो त्या मेंढरांच्या कळपातील एक मेंढरावर पडला. ते मेंढरू त्या मनुष्याच्या ओझ्याखाली चिरडले गेले आणि मेले. परंतु तो कामगार मात्र वाचला. या चमत्काराची आठवण म्हणून त्या मृत्युमुखी पडलेल्या मेंढराची प्रतिमा जेथून तो कामगार त्या चर्चच्या मनोऱ्यावरून पडला, तेथे कोरण्यात आली. बाप्तिस्मा करणारा योहान आज येशूविषयी म्हणतो: "हे पहा देवाचे कोकरू, जगाची पापे नष्ट करणारे". प्रभू येशूने आपली पापे स्वतावर घेतली. आपल्या पापांसाठी त्याने स्वतःचे बलिदान दिले. "आमच्या दुष्कृत्यांबद्दल त्याला दु:ख भोगावे लागले. आमच्या अपराधांमुळे तो भरडला गेला. आमचे कर्ज, आमची शिक्षा, त्याच्यावर लादली गेली. त्याने दु:ख सहन केले. म्हणून आम्ही बरे झालो" (यशाच्या ५३:५). "त्याला इजाही झाली आणि शिक्षाही झाली. पण त्याने कधीही तक्रार केली नाही. ठार मारायला नेणाऱ्या मेंढीप्रमाणे तो अगदी गप्प राहिला" (यशाच्या ५३:७). त्याच तारणाऱ्याविषयी, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बाप्तिस्मा करणारा योहान आजच्या शुभवर्तमानात साक्ष देतो.
मनन-चिंतन:
          योहानाने येशूला आपणांकडे येताना पाहिले आणि तो म्हणाला, “पाहा, हे देवाचे कोकरू. जगाचे पाप हरण करणारे." येशूबद्दलच्या अशा भाष्याचा अर्थ काय होता? त्या भाष्याचे अनेक अर्थ आहेत. येशू देवाचे कोकरू आपल्याला वल्हांडणाच्या कोकराची आठवण करून देते. मिसर देशातील शेवटच्या रात्री इस्रायली लोकांनी मेंढ्याचा किंवा बकऱ्याचा वध करून त्याचे रक्त गोळा करून ते त्यांच्या दाराच्या कपाळ पट्ट्यांवर व दोन्ही बाजूंच्या चौकटींना लावले आणि त्यामुळे मिसर मधील प्रथम जन्मलेल्याना ठार मारणाऱ्या दूताने त्यांना मात्र स्पर्शसुद्धा केला नाही (निर्गम १२:३-१४).

यज्ञपशूचे कोणतेही हाड मोडू नये:
          क्रुसावर खिळलेल्या प्रभू येशूबद्दलसुद्धा अशा प्रकारचे एक वक्तव्य संत योहान करतो (योहान १९:३२-३६). या वाक्याचा प्रभू ख्रिस्ताशी काय संबंध? संत योहानाला आपल्या शुभवर्तमानात दाखवून द्यावयाचे आहे कि, प्रभू येशू हाच खरा वल्हांडणाचा कोकरू आहे. कारण प्रभू येशू हा शास्त्रांची पूर्तता करण्यासाठी आलेला आहे. जुन्या करारात मेंढरांच्या रक्ताद्वारे इस्रायली लोकांचे सर्व संकटांपासून आणि मोठ्या आपत्तीपासून संरक्षण झाले. आता ख्रिस्त वल्हांडणाचा नवा कोकरू त्याच्या रक्ताद्वारे आपल्याला आपल्या पापांतून मुक्त करतो. ज्या प्रमाणे वल्हांडणाच्या कोकराचे किंव्हा यज्ञपशूचे कोणतेही हाड मोडलेले नसले पाहिजे होते, त्याचप्रमाणे क्रुसावर खिळलेला असताना प्रभू येशूचे कोणतेही हाड मोडले नव्हते (योहान १९:३२-३६).
          संत योहानाला आपल्याला सांगावयाचे आहे कि, परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे या जगात नाविन्य आणले आहे, प्रभू ख्रिस्ताद्वारे सर्व नवीन केले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपण परमेश्वराशी नव्याने संबंध किंव्हा नाते जोडू शकतो. जुन्या शास्त्रात वेगवेगळ्या विधींद्वारे, सोहळ्यांद्वारे आणि पशुबळींद्वारे परमेश्वराकडे जायचा प्रयत्न केला जात होता. परंतु, आता मात्र आपण येशूद्वारे परमेश्वराकडे जाऊ शकतो. प्रभू येशू हाच आता परमेश्वराकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. ज्याप्रमाणे मेंढरांच्या रक्ताद्वारे इस्रायली लोकांचे सर्व संकटांपासून आणि मोठ्या आपत्तीपासून संरक्षण झाले, त्याचप्रमाणे प्रभू येशूने क्रुसावर सांडलेल्या आपल्या रक्ताने आपल्या सर्वांची, या संपूर्ण मानवजातीची पापांतून मुक्तता करून आम्हाला तारणाचे दान दिले आहे. म्हणूनच बाप्तिस्मा करणारा योहान येशूला आपल्याकडे येताना पाहून उदगारला: "पहा हे देवाचे कोकरू, जगाची पापे हरण करणारे." (योहान १:२९)
          जर आपण पहिले वाचन आणि शुभवर्तमान एकत्र वाचले, तर आपल्याला दिसून येईल, कि प्रभू येशू ख्रिस्त हाच तो सेवक आहे ज्याचा उल्लेख यशया संदेष्टा करतो. प्रभू येशू हा खरोखर सर्व राष्ट्रांना प्रकाश देणारा दिवा आणि जगातील सर्व माणसांचे रक्षण आणि तारण करण्याचा परमेश्वराचा एकमेव मार्ग आहे.” (यशया ४९:६) दुसऱ्या वाचनात पौल करिंथ येथील ख्रिस्ती भाविकांना जे सांगतो, ते त्याने आपल्या सर्वांसाठी सुद्धा सांगितलेले आहे: "आपण सर्वजण देवाच्या सेवेला समर्पित केले गेलेलो आहोत आणि देवाने आपल्याला पवित्र होण्यास पाचारण केलेले आहे.” (१ कारिन्थिकरांस पत्र १:२) होय परमेश्वराच्या पवित्र कोकराद्वारे, प्रभू ख्रिस्ताद्वारे आपण सर्व शुद्ध झालेले आहोत आणि आपलं देवाला समर्पण झालं आहे. ख्रिस्तामध्येच आपलं तारण आहे. ख्रिस्त हा सर्व राष्ट्रांचा प्रकाश आहे.
          प्रभू येशू हाच परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग आहे. तो आपला सर्वश्रेष्ठ आणि परममित्र आहे. तोच खरा वल्हांडणाचा कोकरु आहे, ज्याच्या रक्ताद्वारे आपण सर्व धुतले गेले आणि शुद्ध झाले आहोत. त्यांच्याद्वारे आपल्या जीवनातील पापांचा अंधकार नष्ट झाला आहे. कारण त्याने त्याच्या मृत्यूने आणि पुनरुत्थानाने मृत्यूवर विजय मिळवला आणि सैतानाचा, पापाचा नाश केला. तोच मृत्युंजय ख्रिस्त आहे. त्याच्या रक्ताद्वारे आपलं तारण झाले आहे आणि प्रत्येक मिस्साबलिदानामध्ये आपल्याला या सत्याची आठवण करून दिली जाते, जेव्हा धर्मगुरू ख्रिस्तप्रसाद संस्कारा अगोदर पवित्र भाकर उंचावून म्हणतात: "पहा प्रभू येशू ख्रिस्त, देवाचे पवित्र कोकरू. या कोकराच्या भोजनास बोलाविण्यात आलेले आपण सर्वजण धन्य."
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
          परमेश्वर हा आल्फा आणि ओमेगा, सुरुवात आणि शेवट आहे. त्याच्यामध्येच सर्व सृष्टीची आणि सर्व जीवनाची पूर्तता आणि परिपूर्णता आहे. देवाचा पवित्र शब्द आपल्याला जीवनात धैर्य, चिकाटी आणि आत्मविश्वास देतो. आपण आपल्या सर्व विनंत्या आणि गरज त्याच्या चरणी मांडू या:

प्रतिसाद: हे परमेश्वराच्या पवित्र कोकरा, आमची प्रार्थना .
) आमचे परमगुरुस्वामी, महागुरुस्वामी आणि ख्रिस्तसभेच्या सर्व धार्मिक पुढार्यांनी सर्व ख्रिस्ती भाविकांना श्रद्धामय, प्रेममय आणि करुणामय जीवन जगण्यासाठी आणि ख्रिस्ती ऐक्याने बांधले जाण्यासाठी मदत आणि प्रेरणा द्यावी आणि त्यांच्या या पवित्र कार्यात त्यांना परमेश्वरी सहाय्य लाभावे म्हणून प्रार्थना करू या.
) ख्रिस्तावरील विश्वासामुळे छळ, त्रास आणि अपमान सहन करावा लागणाऱ्या सर्व लोकांनी भिता आणि अढळ श्रद्धेच्या बळावर आपले ख्रिस्ती जीवन जगण्यास परमेश्वराकडून कृपा आणि सामर्थ्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
) सर्व आजारी, दुर्बल लोकांना परमेश्वराने आपल्या कृपेचा स्पर्श रून त्यांना नवजीवन द्यावे तसेच आत्म्याचे शरीराचे चांगले स्वास्थ्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
) सर्व ख्रिस्ती भाविकांनी जीवनातील अडी-अडचणींमुळे निराश होता आणि खचून जाता परमेश्वराच्या शरणात सहाय्य्य आणि सांत्वन शोधावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
) आपल्या कुटुंबातील आणि आपल्या धर्मग्रामातील सर्व मृत व्यक्तींना दयाळू परमेश्वराने त्याच्या स्वर्गीय नंदनवनात चिरंतर शांती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
) आपण आपल्या वैयक्तिक कौटुंबिक गरजांसाठी प्रार्थना करूया.

          हे दयाळू परमेश्वरा तुझ्या परम पुत्राच्या नावाने आम्ही तुझ्या चरणाशी आणलेल्या या आमच्या विनंत्यांचा तू स्वीकार कर आणि तुझा भरगोस आशीर्वाद आम्हावर येऊ दे. हि प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो.....आमेन


1 comment: