Thursday 23 January 2020


Reflections for the homily of the Third Sunday In Ordinary Time (26/01/2020) by Br. Aaron Lobo  

सामान्य काळातील तिसरा रविवार

दिनांक: २६/०१/२०२०
पहिले वाचन: यशया ८: २३ - ९: ३
दुसरे वाचन: पौलचे करिंथकरांस पहिले पत्र १: १-३
शुभवर्तमान: मत्तय ४: १२- २३




विषय: “माझ्या मागे या.”
प्रस्तावना:

ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनीनो; आज देऊळमाता सामान्य काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला देवाच्या हाकेस होकार देण्यास आमंत्रण देत आहे. आपल्याला, दर दिवशी आपल्या मोबाईलवर किती तरी फोन येत असतात. त्यातले काही आपण नाकारतो तर काहिकांचा आपण स्वीकार करत असतो. परंतु प्रत्येक कॅालचा आपल्या जीवनावर काहीतरी परिणाम होत असतो. जोपर्यंत आपण एखादा कॅाल स्विकारत नाही, तो पर्यंत आपल्याला त्या कॅालचे महत्व समजून येत नाही. त्याच प्रमाणे परमेश्वराचे पाचारण किंवा हाक असते. परमेश्वराची हाक किंवा पाचारण इतर कॅाल पेक्षा अधिक महत्वाचे आणि फायदेशीर असते. हे पाचारण जीवनाचे परिवर्तन किंवा जीवनाचा कायापालट करण्यासाठी असते. परमेश्वराची मुले होण्यासाठी ही-हाक असते. ही-हाक आपणास अंधकारातून प्रकाशाकडे व नवजीवनाची सुरुवात करण्यासाठी दिलेली असते.
          आपल्या जीवनातील सर्व गोष्टी परमेश्वराला माहिती आहेत. आपली कित्पत क्षमता आहे किंवा आपण काय करू शकतो, हे फक्त आणि फक्त त्यालाच माहिती आहे. आपल्याला ह्या सृष्टीत त्याने अशासाठी पाठविले आहे कि, आपल्याकडून काहीतरी उत्कृष्ट असे कार्य व्हावे व त्यासाठी तो आपल्याला पाचारण करीत आहे. आज आपला देश ७० वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहे. ह्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारतीय ह्या नात्याने आपल्याला, देशाची उन्नती व प्रगती होण्यासाठी, तसेच देशात घडणाऱ्या अनेक अनैतिक कृत्यांवर आवाज उठवण्यासाठी पाचारण केले आहे. ह्या पाचारणास प्रतिसाद देणे हे आपले आद्य कर्तव्य किंवा जबाबदारी आहे. तर ह्या परमेश्वराच्या पाचारणास होकार देण्यास लागणारी कृपा आणि शक्ती आपणा सर्वाना मिळावी म्हणून आपण ह्या पवित्र मिस्साबलीदानात प्रार्थना करू या.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: यशया ८: २३ - ९: ३
          आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा मसीहा किंवा तारणाऱ्याच्या येण्याच्या दिवसाचे भाकीत सांगत आहे. तो येण्यास विलंब लावणार नाही. येत्या दिवसात अविश्वासू लोकांमध्ये, काही विश्वासू लोक हे जणू महान प्रकाशासारखे असतील. त्यांचे अंधकारात काम करण्याचे दिवस संपुष्ठात येतील. त्यांचा अन्याय व पिळवणूकीचा कालावधी संपणार आहे कारण मसीहा किंवा तारणारा त्यांचे तारण करील.

दुसरे वाचन: पौलचे करिंथकरांस पहिले पत्र १: १-३

          आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपले लक्ष लोकांमध्ये असलेल्या भांडणावर किंवा मतभेदावर केंद्रित करीत आहे. जरी आपणा सर्वांना परमेश्वराची मुले म्हणून पाचारण झाले आहे, तरी अनेक लहान गटामध्ये लोकांचे विभाजन झालेले दिसून येते. म्हणून संत पौल असे सांगतो की, आपण सर्व एक कुटुंब आहोत, आणि ख्रिस्त हा ह्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख आहे. तो जे काही सांगतो ते आपण ऐकले पाहिजे व त्याप्रमाणे जीवन जगले पाहिजे.

शुभवर्तमान: मत्तय ४: १२- २३

          आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू हा यशया संदेष्ट्याद्वारे केलेली भविष्यवाणी जणूकाही पूर्णत्वास आणतो. प्रभू येशू हा आपल्या जीवन कार्यास सुरुवात करतो. तसेच आपल्या पहिल्या शिष्यांना म्हणजेच शिमोन, आंद्रेया, याकोब आणि योहान ह्यांस पाचारण करतो. जेव्हा प्रभू येशू आपल्या शिष्यांना “माझ्या मागे या” अशी आज्ञा करतो तेव्हा ते आपले सर्वकाही म्हणजेच आपली नौका व जाळी सोडून त्याच्या मागे जातात.

बोधकथा:
“मला तहान लागली आहे.”
          १० सप्टेंबर १९४३ साली कलकत्यावरून वरुन दार्जलिंगला जाणाऱ्या, एका रेलगाडीत “मला तहान लागली आहे!” असे उदगार एका अत्यंत गरीब भिकाऱ्याच्या कोरड्या ओठातून निघालेले होते. तेरेजा नावाच्या एका धर्म-भगिनीच्या कानावर ते उदगार पडले. अनेक प्रवाश्यांनी ते ऐकले असतील, परंतु सिस्टर तेरेजानेच फक्त त्याच्यावर लक्ष दिले. ती तेवढ्यावरच थांबली नाही; तर त्या गरीब व्यक्तीला तिने पाणी सुध्दा पाजले. त्या पाण्याने तिने फक्त त्या गरीबाची तहान भागवली ऐवढेच नव्हे, तर त्याने तिचे समाधान पण झाले आणि स्वतःसाठी स्वर्गीय संपत्ती व संतपद सुद्धा जिंकून घेतले. त्या माणसाच्या मुखी निघालेले शब्द हे क्रुरसावर मरत असलेल्या माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताचाच आवाज आहे; असे तिला समजून आले. हे देवाचे बोलावणे किंवा ही देवाची हाक माझ्यासाठी आहे आणि त्याचा मी स्विकार करायला पाहिजे; त्याला उत्तर किंवा प्रतिसाद दिला पाहिजे; असा निश्चय तिने मनात धरला, आणि देवाच्या ह्या हाकेला आपल्या जीवनाचे ध्येय बनवून, सिस्टर तेरेजा ही आज संत मदत तेरेजा म्हणून ओळखली जाते.

मनन चिंतन:

          देव आपणा प्रत्येकाला बोलावीत असतो. आपल्या सर्वांनाच तो; “माझ्या मागे या” असे आमंत्रण देत असतो. अनेक वेळा “मला तहान लागली आहे किंवा मला मदत करा” अशा शब्दात सुद्धा तो आमंत्रण देत असतो. आज देऊळमाता आपल्याला पाचारणाची आगळीवेगळी अशी व्याख्या देत आहे. पाचारण हे फक्त तीन स्थरीय म्हणजे व्यावाहिक, एकेरी आणि धार्मिक ह्यावर लक्ष केंद्रित न करता मनुष्य हा मनुष्य कसा हवा ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मनुष्य हा मनुष्याशी कसा वागतो ह्यावर आपण आज मनन चिंतन करू या.
          मनुष्याला देवाने विचार करण्याची आणि कृती किंवा कार्य करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. ह्याच कारणाने मनुष्य स्वतःला सर्वाहून श्रेष्ठ समजतो आणि स्वतःला देवाच्या जागी उंचावीत असतो. तो हे विसरून जातो की; मानवी जीवनावर मृत्यूची सावली सतत पाठलाग करीत आहे. हा मृत्यु फक्त शारीरिक मृत्यू नव्हे, तर आत्मिक मृत्यू सुद्धा आहे. मागच्या आठवड्याच्या पहिल्या वाचनात देव यशया संदेष्ट्याद्वारे इस्रायल लोकांत आपला प्रकाश पाठविण्याचे भाकीत करतो. तर आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा जाहीर करतो की; तो प्रकाश आपल्यात हजर आहे. हाच तो प्रकाश जो मृत्यूचा अंधकार दूर करतो. आपल्या जीवनात आपण ह्या प्रकाशाला स्वीकारणे म्हणजेच येशू ख्रिस्ताच्या शब्दाला, त्याच्या आमंत्रणाला, त्याच्या हाकेला होकार देणे होय.
          देव आपल्या प्रत्येकाला जगाचा प्रकाश होण्यास बोलावित आहे. शिमोन, आंद्रेय, याकोब आणि योहान ह्यांना ज्या प्रकारे बोलावले आहे; त्याचप्रमाणे आपल्यालाही इतरांच्या जीवनात प्रकाश आणण्यास पाचारण केले आहे. आजच्या ह्या आधुनिक किंवा धक्का-बुक्कीच्या जगात कितीतरी सुद्धा अश्या व्यक्ती आहेत, ज्या प्रकाशात नव्हे, तर आंधकारातच राहण्याचा निश्चय करतात. सत्य काय आहे ह्याची जाणीव करून घ्यायची सुद्धा त्यांची इच्छा नसते. भ्रष्टाचार, द्वेष, अपवित्र नाते, इत्यादी ह्यांनाच ते आपल्या जीवनाचे सत्य बनवून घेतात.
          आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य ह्या नात्याने, अश्या लोकांच्या जीवनातही त्याचे म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताचे सत्य, त्याचा प्रकाश आणि त्याची प्रीती आणण्यास आपल्याला पाचारण केलेले आहे. त्यांना त्यांच्या चुका दाखवून देण्याचे धैर्य व अश्यांना नवीन जीवनाची सुरुवात करण्यास व देवाचा प्रकाश प्रस्थापित कण्यासाठी आपल्यात धैर्य असले पाहिजे. गरजवंतू लोकांना मदत करणे, चुकीच्या मार्गावर चालणाऱ्यांचे रूपांतर करणे. अश्या सर्व कार्यानेच आपली सृष्टी उजळीत होणार आहे. देवाच्या प्रकाशातच आपली खरी सुंदरता दडलेली आपले. त्याच्या प्रकाशातच आपले सौंदर्य दिसून येते. हाच प्रकाश व हेच तेज आपल्या प्रत्येकाच्या जीवनात नित्यपणे दिसून यावे म्हणून आपल्याला लागणारी कृपा व शक्ती त्याच तेजा कडे मागुया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे प्रभो, तुझ्या पाचारणास होकार देण्यास आम्हांला शिकव!”

१) आपल्या ख्रिस्तसभेची आध्यात्मिक काळजी घेणारे आपले पोप महाशय, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू-धर्मभगिनी आणि सर्व प्रापंचिक ह्या सर्वावर देवाच्या कृपेचा वर्षाव व्हावा व त्यांच्या कृतीतून देवाचे प्रेम लोकांकडे पोहचावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
२) आपल्या धर्मग्रामात जे कोणी आजारी आहेत. अशा सर्व आजारी लोकांना परमेश्वरी कृपेचा स्पर्श होऊन त्यांची आजारातून सुटका व्हावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
३) आज आपण आपल्या देशाचा ७० वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. ह्या दिवशी आपण आपल्या देशासाठी प्रार्थना करूया की, देशभर पसरलेली अशांतता नष्ट व्हावी व सर्वत्र शांतता व सलोखा नांदावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
४) आपल्या सर्व राजकीय पुढाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी आपला स्वार्थ बाजूला ठेऊन सतत देशाच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
५) येशू ख्रिस्त आपल्या आई-वडीलांच्या आज्ञेत राहिला व त्यांना मान व सन्मान दिला. आज मुल-मुली आई-वडिलांना अपशब्द बोलतात व दु:खवितात अशा मुला-मुलींना ईश्वराचे प्रेम मिळावे, जेणेकरून ही मुल-मुली आपल्या आई-वडिलांचा आदर राखतील म्हणून आपण प्रार्थना करू या.
७) आता थोडा वेळ शांत राहून आपल्या आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया.

No comments:

Post a Comment