Wednesday 12 October 2022

 Reflection for the Homily of Mission Sunday (16-10-2022) By Fr. Suhas Pereira.
 

सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार




मिशन रविवार


दिनांक: १६/१०/२०२२

वाचन: निर्गम १७:८-१३ 

दुसरे वाचन: २ तिमथी  ३:१४-४:२

शुभवर्तमान: लूक १८: १-८

प्रस्तावना

       आजची उपासना आपल्याला चिकाटीने, अचलतेने आणि विश्वासाने भरलेल्या हृदयाने प्रार्थना करण्यास शिकण्याचे आमंत्रण देत आहे. त्याचप्रमाणे आजची तिन्ही वाचने देवाची विश्वसनीयता आणि गरीब, दुर्बल लोकांपर्यंत पोहोचून त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सक्षम बनवणाऱ्या दैवी न्यायाबद्दल आपल्याला सांगत आहेत.

          आजच्या पहिल्या वाचनात आपण वाचतो कि, यहोशवा आपल्या सैन्याबरोबर अमालेकी लोकांविरुद्ध लढत असताना मोशे हा परमेश्वराकडे इस्रायली सैन्यासाठी अविश्रांत प्रार्थना करत होता. आजच्या दुसऱ्या वाचनात तिमथ्याला पाठवलेल्या दुसऱ्या पत्रात संत पौल तीमथ्याला त्याचे मिशनकार्य पुढे चालू ठेवण्यास, सर्व परिस्थितीत देवाचे वचन चिकाटीने गाजवण्यास आणि देवाचा शब्द सत्य समजण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास वापरण्याचे आवाहन करत आहे. आजच्या शुभवर्तमानात विधवा स्त्री आणि न्यायाधीशाच्या दृष्टांताद्वारे प्रभू येशू आपल्याला दैनंदिन आणि नियमित प्रार्थनेचे महत्व समजावून देत आहे. प्रभू येशू आपल्याला निराश होता, विश्वासात डळमळता सतत प्रार्थना करण्यास सांगत आहे. प्रार्थनेमध्ये दाखवलेली चिकाटी आपल्या जीवनामध्ये किंव्हा कृत्यांमध्ये उतरवलेल्या आपल्या विश्वासाची आपल्याला जाणीव करून देते. आपणसुद्धा चिकाटीने प्रार्थना करतो का? देवाकडून शांती, क्षमा आणि आनंदाचे दान मिळवण्यासाठी आपण नेटाने प्रयत्न करतो का? अनेक वेळा परमेश्वराने आपल्या प्रार्थना ताबडतोब ऐकाव्यात असं आपल्याला वाटते. आणि जर आपल्या प्रार्थना ऐकल्या गेल्या नाहीत तर आपण हताश होतो आपला देवावरील विश्वास कमी होतो. आपण प्रार्थना करणे सोडून देतो. परंतु परमेश्वर हा काही अल्लाद्दिनच्या जादुई दिव्यातील दूत नाही जो आपल्या सर्व इच्छा चुटकीसरशी पूर्ण करतो. देव हा आपला प्रेमळ पिता आहे. आणि आपल्याला कधी आणि काय द्यावं हे त्याला माहिती आहे.

मनन-चिंतन

        मनुष्य हा सदैव चिन्हे, प्रतीके, आणि सूचनांवर अवलंबून असतो, आपल्याला मार्गदर्शनासाठी एखाद्या गोष्टीची माहिती करून घेण्यासाठी, एखादी गोष्ट नीट समजून घेण्यासाठी उदाहरणांची गरज भासते. असंच एक अप्रतिम उदाहरण आपल्याला आजच्या पहिल्या वाचनात पाहावयास मिळते. हे उदाहरण आहे, प्रार्थना करणाऱ्या किंव्हा प्रार्थनेत असणाऱ्या मोशेचे. वाळवंटातून प्रवास करत असताना इस्रायली लोकांचा अशा लोकांबरोबर सामना होतो ज्यांच्यावर इस्रायली लोकं फक्त देवाच्या मदतीने आणि मध्यस्थीद्वारेच विजय मिळवू शकत होते. म्हणून युद्धाच्या दिवशी मोशे टेकडीच्या माथ्यावर जाऊन आपले हात वेळ उंचावून उभा राहिला. "जेव्हा मोशे हात वर करी तेव्हा लढाईत इस्राएलाची सरशी होई; परंतु जेव्हा तो हात खाली करी तेव्हा पिछेहाट होई." मोशेचे वर उंचावलेले हात हे फक्त विश्वासाचेच नव्हे तर आदर्श आणि अनुकरणीय अशा प्रार्थनामय वृत्तीचे चिन्ह आहेत. मोशेकडून आपण आज काय शिकू शकतो? इस्रायली लोकांसाठी प्रार्थना करणाऱ्या मोशेकडून आपण खऱ्या प्रार्थनेचे तीन पैलू किंव्हा दृष्टिकोन शिकू शकतो:

) खऱ्या प्रार्थनेचा पहिला पैलू आहे प्रतिनिधित्व. खऱ्या प्रार्थनेचा अर्थ एकट वैयक्तिक रीतीने देवापुढे उभं राहून फक्त स्वतःसाठी प्रार्थना करणे नव्हे. तर खऱ्या रीतीने प्रार्थना करणे म्हणजे अखिल मानवसमाजाचा मी एक भाग आहे हि भावना मनात बाळगून सर्वांसाठी प्रार्थना करणे: जी लोकं देवापासून दूर गेलेली आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करणे; जी लोकं प्रार्थना करू शकत नाहीत आणि ज्या लोकांची प्रार्थना करावयाची इच्छा नाही, देवाबरोबर संभाषण करावयाची इच्छा नाही अशांसाठी प्रार्थना करणे, त्यांच्या नावाने देवापुढे उभा राहणे, त्यांचं प्रतिनिधित्व करणे, अशा लोकांसाठी मध्यस्थी मागणे आणि देवापुढे साकडे घालणे.

) खऱ्या प्रार्थनेचा दुसरा पैलू आहे चिकाटी. ज्या चिकाटीने मोशे इस्रायली लोकांसाठी हात वर करून प्रार्थना करत राहिला, तीच चिकाटी आपल्याला आजच्या शुभवर्तमानात विधवेमध्ये आपल्याला दिसून येते. हि चिकाटी अशी चिकाटी आहे जी प्रार्थनेद्वारे चांगला मार्ग मिळवल्याशिवाय किंव्हा शोधल्याशिवाय थांबत नाही. याचीच चिकाटी आपल्या प्रार्थनेमध्ये वाढावी म्हणून संत पौल आपल्याला आवाहन थेसलोणीकाकरांना पाठवलेल्या पहिल्या पत्रात आपल्याला करतो: "नेहमी प्रार्थना करा. सर्व परिस्थितीत देवाची उपकारस्तुती करा."आणि अशीच चिकाटी प्रार्थनेमध्ये आपल्या अंगी बाणवण्यासाठी प्रभू येशूसुद्धा आपल्याला बोलावतो: "मागा, म्हणजे तुम्हाला मिळेल."

) श्रद्धा किंव्हा देवावरील विश्वास: मोशेच्या  प्रार्थनाशीलतेमध्ये आपण खऱ्या प्रार्थनेचा अजून एक पैलू ओळखू शकतो, जो चिकाटी या पैलूच्या खूप जवळचा आहे. तो पैलू आहे श्रद्धा किंव्हा देवावरील विश्वास. अनेक वेळा प्रार्थनेबद्दलची आपली कल्पना फारच आगळी-वेगळी असते. आपल्याला वाटते कि प्रार्थना हा देवाबरोबर केलेला सौदा आहे, ज्यात देव आपल्याला प्रार्थनेच्या बदल्यात आपल्याला जे काही हवं आहे ते देतो. परंतु प्रार्थना म्हणजे सौदा नाही. प्रार्थनेचा अर्थ हा सुद्धा नाही कि, फक्त आपण गरजेच्या असतो तेव्हाच आपण परमेश्वराकडे जावे आणि त्याच्यापुढे हात जोडावेत. प्रार्थना म्हणजे संवाद. प्रार्थना म्हणजे विश्वासाने भरलेल्या हृदयाने आणि जीवनाने परमेश्वरापुढे उभं राहणे. आपल्या गरजेच्या देवाकडे जाणारा मनुष्य हा खऱ्या अर्थाने प्रार्थनाशील मनुष्य नाही. तर प्रार्थनाशील मनुष्य हा आपलं संपूर्ण जीवन हे दैवी दृष्टिकोनातून पाहू शकतो आणि तसं जगतो.

प्रार्थना आणि काम हे दोन्ही एक आदर्श आणि यशस्वी विश्वासू जीवनाचा भाग आहेत. परमेश्वरावरील विश्वास आणि त्याच विश्वासाच्या आधारे केलेलं कृत्य या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि आजच्या पहिल्या वाचनात या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहावयास मिळतात: प्रार्थनाशील मोशे आणि शत्रूंशी झुंजणारा यहोशवा. या दोन वस्तुस्थिती आपण एकमेकांपासून वेगळ्या करू शकत नाहीत. मी फक्त प्रार्थनाच करिन किंव्हा मी फक्त काम करिन, कष्ट करिन असं आपण सांगू शकत नाहीत. आपल्या जीवनात असे क्षण अशी वेळसुद्धा असली पाहिजे जेव्हा आपण देवाबरोबर प्रार्थनेत संवाद साधतो, त्याच्याबरोबर बोलतो, त्याला आपलं सुख-दुःख सांगतो. आणि याच प्रार्थनेद्वारे परमेश्वरसुद्धा आपल्या संपूर्ण जीवनाचा आणि आपल्या सर्व कार्याचा ताबा घेऊ शकला पाहिजे. प्रार्थनाशील मोशे आणि झुंजणारा यहोशवा, प्रार्थना आणि जीवनात लढण्याची जिद्द, शक्ती आणि पुढे जाण्याची तयारी. दोन्ही गोष्टी  आपल्या मानवी जीवनात महत्वाच्या आहेत. तेव्हाच आपण जीवनात यशस्वी आणि विजयी होऊ शकतो आणि आपलं ध्येय गाठू शकतो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना 

प्रभू येशू म्हणतो, "मागा म्हणजे मिळेल". आणि आजच्या शुभवर्तमानातील विधवेचं उदाहरण घेऊन आणि तिच्याकडून प्रेरणा घेऊन मोठ्या विश्वासाने आपण आपल्या विनंत्या आणि गरज प्रभुचरणी आणू या.

प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐकून घे.

) आपल्या ख्रिस्तसभेच्या सर्व मेंढपाळांनी तसेच सर्व धर्मगुरू, धर्मबंधू आणि व्रतस्थ बंधू-भगिनींनी प्रार्थनेद्वारे परमेश्वराशी असलेल्या नात्यात मजबूत व्हावे आणि देवावरील विश्वासाने जीवन जागून संपूर्ण ख्रिस्तसभेला आणि संपूर्ण जगाला ख्रिस्तावरील विश्वासाची साक्ष द्यावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

) आपल्या समाजात आज प्रेम, दया, शांती या मूल्यांचा अभाव आहे आणि त्याऐवजी द्वेष, सूडभावना आणि हिंसाचार वाढत आहे. आज सर्व लोकांनी देवावर विश्वास ठेवावा आणि परमेश्वरमध्ये आपल्या सर्वांच्या निर्मात्याला आणि स्वर्गीय पित्याला ओळखावे आणि त्याच्यावरील विश्वासात दृढ होऊन प्रेम, क्षमा, शांतीच बीज आपल्या समाजात पसरवावे. म्हणून आपण प्रार्थना करूया.

) आपल्या कुटुंबातील आणि समाजातील ज्या व्यक्ती आजाराने पछाडलेल्या आहेत. त्यांना आपल्या करुणामय प्रभुने  प्रेमाचा स्पर्श करून त्यांना नवजीवनाचा निभाव द्यावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.

) आपल्या धर्मग्रामातील आणि धर्मप्रांतातील सर्व ख्रिस्ती लोकांना प्रार्थनेमध्ये देवाचं अनुभव यावा आणि तोच अनुभ आपल्या जीवनाद्वारे त्यांनी इतरांना द्यावा आणि इतरांना परमेश्वराची गोडी लावावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.

) आपल्या हृदयाच्या शांततेमध्ये आपण आपल्या वैयक्तिक आणि खाजगी गरजांसाठी  प्रार्थना करूया.

No comments:

Post a Comment