Friday 7 October 2022

 Reflections for the homily for 28th Sunday in Ordinary Time (9-10-22) by Fr. Benher Patil
सामन्य काळातील अठ्ठावीसावा रविवार 



दिनांक:  ०९/१०/२०२२

पहिले वाचन: २ राजे ५:१४-१७

दुसरे वाचन: २ तीमथी २:८-१३

शुभवर्तमान: लूक १७:११-१९


प्रस्तावना: 

    असं म्हणतात कि, “कृतज्ञता हे उन्नत आत्म्याचे लक्षण आहे आणि तो शिष्टाचाराचा सर्वोत्तम प्रकार आहे.” आजच्या वाचनाचा मुख्य विषय “कृतज्ञता” आहे. विशेषत: देव आपल्याकडून कृतज्ञतेच्या अभिव्यक्तीची अपेक्षा करतो. आपल्या दैनदिन जीवनात, देव आपणावर नेहमीच त्याच्या असंख्य आणि अनंत आशीवार्दाचा आणि कृपेचा वर्षाव करत असतो. आजची तिन्हीही वाचणे देवाच्या आपल्यावरील अपार प्रेमाचं दर्शन घडवतात. त्याबद्दल आपण त्याचे रास्तपणे आणि उदारपणे आभार मानने, हे आपलं आद्यकर्त्यव आहे आणि तशी त्याची इच्छाही आहे. जर आपल्या कृतघ्नतेमुळे आपण आपल्या प्रेमळ परमेश्वराला दुखवले असेल तर पश्चातापी अंत:करणाने त्याची आपण क्षमा मागुया.

मनन-चिंतन: 

    कलकत्त्याच्या मदर तेरेसा, नेहमीप्रमाणे एके दिवशी तिच्या अत्यंत गरीब शहरातील गरीब वस्तीमध्ये जात असताना, त्यांना एक वृद्ध माणूस रस्त्यावर पडलेला आढळला. तो आजाराने आणि दुखाने त्रस्त झालेला होता आणि मरणाची घटका मोजत होता. मदर तेरेसाने त्याला आपल्या खांद्यावर उचलले, तिने गरीबांसाठी स्वतः स्थापन केलेल्या रुग्णालयात नेले आणि तेथे एका स्वच्छ पलंगावर झोपवले. मग त्यानी त्याच्या सुकलेल्या ओठांवर पाण्याचा प्याला धरून, त्याची तहान भागवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला दुर्दैवाने एक घोटही घेता आला नाही; पण अचानक त्याचा चेहरा उजळला आणि स्मितहास्य करत तिला म्हणाला: "धन्यवाद". त्यानंतर लगेचच तो कालबाह्य झाला.

    फक्त “आभारी किवा धन्यवाद” ह्या एका शब्दाने, त्या मरणासन्न झालेल्या म्हाताऱ्याने, मदर तेरेसांनी त्याच्यावर केलेल्या उपकाराची परतफेड तर केलीच, पण कृतज्ञतेची भावना ही प्रेमाची एक शक्तिशाली अभिव्यक्ती आहे हेही दर्शवून दिले. आजच्या प्रभू शब्दाविधीत हेच सत्य नमूद केलेलं आढळते. सिरीयाचा नामान आणि शमरोनी, हे दोघेही कुष्टरोगी होते. त्यांना देवाने चमत्कारीकरित्या आजारातून बर केलं आणि त्यांना शुध्द केलं. ह्या महान चमत्कारास त्यांनी आपल्या ऋणी हृदयाने प्रतिसाद दिला आणि देवाने दर्शवलेल्या प्रेमाची परतफेड आपल्या विश्वासाद्वारे आणि उपकारी भावनेने व्यक्त केली.

    बायबलमधील दोन परिच्छेदांची रचना एकसारखी आहे; ते दोघेही दोन भाग आणि दोन नायक ठळक करतात: देवाचा भाग, जो मनुष्याच्या बाजूने चमत्कारिकपणे हस्तक्षेप करतो, त्याचे आरोग्य आणि आनंद पुनर्संचयित करतो; आणि मनुष्याचा भाग, ज्याला देवाचे अगणित उपकार आठवणे, त्याचे आभार मानणे आणि त्याची स्तुती करणे ह्याची गरज भासते. सीरियाच्या नामानाने, स्वतःला कुष्ठरोगातून बरे झालेले पाहून, इस्रायलच्या देवाची महानता आणि वैभव ओळखले, त्याचे आभार मानले आणि परमेश्वराशिवाय इतर देवांना यज्ञ न करण्याचे वचन दिले. त्याचप्रमाणे आजच्या शुभवर्तमानात संत लूक सांगतो की, येशूने बरे केलेल्या दहा कुष्ठरोग्यांपैकी, फक्त शमरोनी हा असा एकमेव मनुष्य होता कि, ज्याने स्वतःला बरे झालेले पाहून, तो हर्षाने आणि कृतज्ञतेने येशूकडे परत आला आणि मोठ्या आवाजात स्तुती करून त्याचे आभार मानण्यासाठी येशूच्या चरणी लोटांगण घातले. येशूने त्याच्या मनपूर्वक आभाराचा स्वीकार केला, त्याची वाहवा केली आणि आशीर्वाद देऊन त्याला पाठवून दिले.

    साधारणत: इतरांनी आपण त्यांच्यासाठी केलेल्या कामाची नोंद घ्यावी आणि त्याबद्दल कृतज्ञ असावे, ही इच्छा बहुतांश लोकांच्या मनात असते. काहींच्या मनात सुप्तपणे, तर काहींच्या अगदी उघडपणे. पण समोरच्या व्यक्तीला केलेल्याची कदर नाही, हा अनुभव आपल्यापैकी बऱ्याचजणांचा असतो. असं म्हणतात की, “ज्या गोष्टी आपल्या कृतज्ञतेला पात्र आहेत त्या गोष्टी आपण अनेकदा गृहीत धरतो.” कृतज्ञतेचा अभाव तेव्हाच प्रत्ययास येतो- जेव्हा आपण आपले आयुष्य, त्यातल्या घडामोडी, व्यक्ती आणि वस्तू गृहीत धरतो. मला मार्गक्रमण शक्य करून देणारे पाय, सुंदर कलाकृती निर्माण करू देणारे हात, हे सुंदर जग दाखवणारे डोळे, चविष्ट पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी जिव्हा, सुरक्षित राहण्यासाठी छत, प्रेमभावाची माणसे या व इतर गोष्टी रोजच्या सवयीच्या झाल्यामुळे गृहीत धरल्या जातात.

    बायबल उताऱ्यातील येशूचा प्रश्न: “दहाचे दहा शुध्द झाले होते ना? मग नऊ जण कोठे आहेत?”, ही बाब स्पष्टपणे अधोलेखीत करते. दहाही कुष्ठरोग्यांवर येशूने दया केली, त्यांची याचना ऐकली, त्याचं दुख जाणलं आणि त्यांना भयानक अश्या आजारातून मुक्त केलं. तरीपण ते कृतज्ञतेने वागले नाही आणि उपकाराची परतफेड करायचे विसरून गेले. अश्याप्रकारे त्यांनी येशूने दयाळूपणे, कनवाळूपणे आणि उदारपणे केलेला चमत्कार ते गृहीत धरतात.

    आजची वाचणे आपणास स्पष्टपणे कृतघ्न न राहता, देवाबरोबर, इतराबरोबर कृतज्ञतेने वागण्यास आमंत्रण देतात. आपण जे काही आहोत आणि आपल्याकडे जे काही आहे ते सर्व देवाचे आणि केवळ देवामुलेच शक्य आहे. तोच आपला निर्माता, दाता, पोषणकर्ता, आणि तारणारा आहे. म्हणूनच देवाच्या महानतेची घोषणा करणे आणि त्याचे आभार मानणे हे खऱ्या ख्रिस्ती जीवनाचे सार आहे. तथापि, आपला अनुभव सांगतो की, इतर नऊ कुष्ठ रोग्याप्रमाणे, आम्हांलाही कृतज्ञता व्यक्त करणे कठीण जाते. जगात कृतज्ञतेची गोडी असणारे लोक खूप कमी आहेत. त्यांना फक्त गरज असेल तेव्हाच धन्यवाद कसे म्हणायचे हे माहित आहे; परंतु हृदयातून आणि मनोभावे आभार कसे मानावे ह्याची कल्पनाच नसते. तर, “धन्यवाद” हे शब्द काहींच्या फक्त तोंडीच असतात, परंतु  हृदयात अजिबात नसतात.

    ख्रिस्त प्रत्येक कृतीपूर्वी परमेश्वर पित्याला धन्यवाद देतो. संत पौल म्हणतो, कि प्रत्येक गोष्टीत देवाचे आभार मानात. तर आज प्रभूच्या वचनावर मनन-चिंतन करताना, आपल्या जीवनात नेहमीच देवाचे सदैव गौरव गाता यावे, त्याची उपकार-स्तुती करता यावी, आणि मनोभावे त्याचे आभार-स्तवन करता यावे, यासाठी विशेष प्राथना करूया.

विशासू लोकांच्या प्रार्थना:

हे प्रभू, आम्हाला कृतज्ञ व्हायला शिकव.

१. देवाने निवडलेले सर्व धार्मिक पुढारी: आपले परमगुरु पोप फ्रान्सीस, सर्व महागुरू, धर्मगुरू आणि धर्म-भगिनींनी, देवाने त्यांना दिलेल्या सर्व देणग्यांचा, कृपादानांचा वापर त्यांनी  उदारपणे व प्रेमाने, देवाच्या गौरवासाठी आणि मानवी समाजाच्या उन्नतीसाठी आणि कल्याणासाठी करण्यास ईश्वरी मदत मिळावी म्हणून प्रार्थना करूया.

२. देवाने आपल्याला प्रेमळ आई-वडील, बहिण-भाऊ, नातेवाहिक आणि मित्र-परिवार दिलेले आहेत. त्यांच्या देणगीबद्दल आणि त्यांच्याद्वार आपल्यावर केलेल्या उपकाराबद्दल देवाचे आभार मानूया. त्यांच्या बरोबर शांतीने, सौख्याने, प्रेमाने जगण्यास आपणास कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करूया.

३. देवाने उत्पन्न केलेली सुंदर सृष्टी हे देवाचे महान वरदान आहे. त्याद्वारे देव आपल्या जीवनासाठी आवश्यक ते आपल्याला पुरवतो आणि आपल्या सर्व गरजा भागवत असतो. तिच्या अमूल्य देणगीबद्दल देवाची स्तुती करूया आणि त्या धरती मातेची सर्व प्रदूषणापासून मुक्ती करून, तिची चांगली निगा राखून, ती अधिक सुंदर आणि लाभदायक करण्यास सर्वांनी झटावे म्हणून प्रार्थना करूया.

४. ह्या जगात सर्व सेवाभावी आणि मिशनरी संस्था, निस्वार्थीपणे, समर्पितपणे आणि तन्मयतेने समाजातील गरजू, आजारी, अनाथ, अपंग आणि गरीब लोकांची सेवा करतात, त्यांना परमेश्वराने चांगलं स्वास्थ्य द्याव, ईश्वरी सहाय्य त्यांना मिळावं तसेच उदार लोकांनी  त्याचं हे पवित्र कार्य पुढे नेण्यास हातभार लावावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. ह्या उपासनेत सहभागी झालेल्या सर्व बंधू-भगिनींना, भाकररूपी ख्रिस्ताने अभिषिक्त करून, त्यांना पवित्र आत्म्याने भरून, आपलं दैनंदिन जीवन, ख्रीस्ताप्रमाणे प्रेमाने, उदारतेने, उत्साहाने, आणि कृतज्ञतेच्या भावनेने जगण्यास, त्यांना सुबुद्धी आणि कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करूया.


    











.

No comments:

Post a Comment