Friday 1 September 2023

 Reflections for the 22nd Sunday in Ordinary Time (03/09/2023) by Fr. Cajeten Pereira


साध्या काळातील बाविसावा रविवार

 

दिनांक: ०३/०९/२०२३

पहिले वाचन: यिर्मया २०:७-९

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १२:१-२

शुभवर्तमान: मत्तय १६:२१-२७




सैताना, माझ्यामागे हो, तू मला अडखळण आहेस

प्रस्तावना: मनुष्याला कोणत्याही संकटाविना आनंदी आणि समाधानी जीवन हवे असते. त्यासाठी सदैव प्रयत्नशील व तत्पर असतो. परंतु काट्याविना मुकुट नाही आणि हीच वस्तुस्थिती  आहे. दुःख आणि त्रास हे मनुष्याच्या जीवनाचा अपरिहार्य भाग आहे. आजची तिन्हीही वाचने आपणाला ह्याविषयी स्पष्टीकरण देत आहेत.

यिर्मया संदेष्टाला परमेश्वराने त्याची सुवार्ता इस्रायल लोकांना घोषित करण्यासाठी पाचारिले होते. परंतु  यिर्मया परमेश्वराला शंकेच्या स्वरात दोषात्मक तक्रार करत आहे. तर संत पौल ख्रिस्ती जनास नवीन जिवितक्रम अंगीकारण्यास पाचारीत आहे. शुभवर्तनामात येशू आपल्या शिष्यांना आणि आपणाला निष्ठावंत दासाचे स्पष्टीकरण देतो. येशूचा तारणाचा मार्ग हा काट्याने आणि क्रूसाने गुंफलेला होता, ह्याचा विसर शिष्यांना आणि आजही आपणाला होतो.

मिस्साबलिदानांमध्ये सहभागी होत असताना, येशूप्रमाणे क्रूसाला आलिंगन मारून काट्याचा मुकुट डोक्यावर रोवण्यासाठी म्हणजेच दुःखाचा, त्रासाचा, वेदनेचा प्याला पिण्यास आपणाला परमेश्वराची कृपा आशीर्वाद लाभावा म्हणून प्रार्थना करूया.

 

सम्यक विवरण:

पहिले वाचन: यिर्मया २०:-

यिर्मयाने देवाला शोकांतात सांगतो की त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला संदेष्टा म्हणून सामर्थ्यशाली देवाने भाग पाडले. त्याला वाटले की यहोवाशी त्याचे नाते लग्नाच्या बंधनासारखे आहे, परंतु त्याला फसवले गेले, यहोवाने फसवले; “हे परमेश्वरा, तू मला फसविले आणि मी फसलोदेवाने मला वापरले आणि बाजूला फेकले आहे. यिर्मया अनुभवामुळे असे म्हणत आहे. देवाच्या वचनानुसार यिर्मया लोकांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी केलेल्या चुका दाखवितो. याच कारणास्तव यिर्मयाला मारहाण होते. व त्याची निंदा होते. म्हणून यिर्मयाला वाटते की, देवाने आपल्याला संरक्षणाचे आश्वासन दिले असूनही आपल्याला विनाकारण संकटांना सामोरे जावे लागते.  हे सर्व त्याच्या मनाविरुद्ध चालले आहे. ह्यासर्व कारणांमुळे तो इतरांपासून अगदी एकाकी पडला आहे. 


दुसरे वाचन:  रोमकरांस पत्र १२:-

संत पौलच्या मते, देवाने आपणावर अपार दया दाखवली आहे, जी आपण स्वीकारून अनुभवली पाहिजे. देवाने  मृत्यू नवे, तर ख्रिस्तामध्ये जीवन आणि ध्येय दिले आहे. आपण अपात्र असूनही, परमेश्वराने त्याच्या गौरवात आपणाला सामील केले. ह्याला आपला काय प्रतिसाद असेल?

यहुदी लोकांनी पशु-प्राण्यांचा यज्ञ देवाला अर्पण केला, त्याऐवजी ख्रिश्चनांनी स्वतःला, आपले शरीर, जिवंत यज्ञ म्हणून अर्पण केले पाहिजे. दुस-या शब्दात सांगायचे तर, आपल्याला सार्वकालिक जीवन देण्यासाठी देवाच्या दयेचा एकमेव तर्कसंगत प्रतिसाद म्हणजे त्याला आपले जीवन त्याच्या उद्देशांसाठी वापरण्यासाठी बलिदान म्हणून देणे. ख्रिस्ती म्हणून परमेश्वराला आपल्या दैनंदिन जीवनाचे बलिदान मिळेल. हे उपासनेचे जीवन म्हणजे देवाने आधीच आपल्यावर केलेल्या दयेला योग्य प्रतिसाद आहे.

 

शुभवर्तमान: मत्तय १६:२१-२२

ख्रिस्ताने दुःखाला आणि क्लेशदायक मरणाला सामोरे जाणे शिष्यांच्या विचारसरणी पलीकडे होते. येशूचे दु:ख आणि मृत्यू दोन महान तथ्यांमुळे आवश्यक होते: मनुष्याचे पाप आणि देवाचे प्रेम. त्याचा मृत्यू हे देवाविरुद्ध माणसाच्या पापाचे अंतिम उदाहरण असले तरी, ते देवाच्या माणसावरील प्रेमाची सर्वोच्च अभिव्यक्ती देखील होती. येशूच्या दुःखाचे अगत्यहे अयोग्य दृढनिश्चय किंवा वीर निश्चयामध्ये नाही तर त्याच्या पित्याच्या इच्छेला स्वेच्छेने अधीन राहण्यात आहे.”

उल्लेखनीय धैर्यने पेत्र एकांतात येशूला निषेध करून म्हणतो, "या गोष्टी तुझ्या बाबतीत कधीही घडणार नाहीत!". पेत्राला मिळालेल्या शाबासकीमुळे (मत्तय १६:१७) त्याला वाटले परमेश्वर सर्व गोष्टी मलाच प्रकट करीत आहे. येशूचा जेरुसलेमला जाण्याचा विचार चुकीचा आहे. पेत्र स्वार्थी वृत्तीने विचार करीत होता, म्हणून येशू म्हणतो, “अरे सैताना, माझ्यामागे हो, तू मला अडखळण आहेस. कारण तू देवाच्या गोष्टींकडे लक्ष लावीत नाहीस तर मनुष्यांच्या गोष्टींकडे लक्ष लावतोस” (मत्तय १६:२३). येशूला माहीत होते की त्याला वधस्तंभावरील समर्पणापासून परावृत्त करण्याचा सैतानी हेतू होता आणि येशू तो उद्देश सफल होऊ देणार नाही.

ओरिजिन सुचवितो कि, "येशू पेत्राला म्हणत होता: ‘पेत्रा, तुझी जागा माझ्या मागे आहे, माझ्यासमोर नाही. तुझी जागा मी निवडलेल्या मार्गाने माझे अनुसरण करणे आहे, तुला आवडेल त्या मार्गाने मला नेण्याचा प्रयत्न करू नकोस.'’’

ख्रिस्त आपला वधस्तंभ उचलून घेऊन जाणार होता. क्रूस धार्मिक विधीचा किंवा आध्यत्मिक वा पारंपरिकतेचा भाग नव्हता तर लोकांना फाशी देण्याचा एक मार्ग होता. आज आपण क्रूसाला चमकदार रूप दिले आहे, परंतु येशू म्हणत आहे, "रोज मृत्युदंडाच्या खाली जा आणि माझ्या मागे या." शिष्यांनी सुध्दा आपला वधस्तंभ उचलून मला अनुसरावे अशी येशूची इच्छा होती. स्वत:ची इच्छा व ध्येय यांचा त्याग करून देवाची इच्छा मान्य करणे हे सोपे नसते. परंतू, येशू शिष्यांना त्यांच्या त्यागाद्वारे त्यांना मोबदला मिळेल असे आश्वासन देतो. देवाच्या इच्छेप्रमाणे न करता जो जगातील गोष्टी मिळविण्याच्या मागे लागतो तो सर्वच गमावून बसतो. म्हणून सैतानाच्या विचारांचा त्याग करून ख्रिस्ताच्या इच्छा अनुसरणे योग्य आहे.

 

मनन चिंतन:

एक महत्त्वाचा प्रश्न आपण सर्वांनी स्वतःला विचारायला हवा तो म्हणजे एखादी व्यक्ती ख्रिस्ती कशी बनते आणि ख्रिस्ती म्हूणन काय अपेक्षित आहे? ख्रिस्ती कसे व्हावे याचे उत्तर देणे तुलनेने सोपे आहे, पेत्राने येशू ख्रिस्त देवाचा पुत्र म्हणून दिलेली कबुली. ख्रिस्ती व्यक्तीकडून काय अपेक्षित आहे ते अधिक कठीण असल्याचे दिसून येते जसे की पेत्राने येशूच्या मार्गावर निर्माण केलेला अडथळा. मानवी वृत्ती गौरव आणि सामर्थ्य कष्ट आणि त्रासाविना मिळविणे. बहुतांशी वेळा आपण ख्रिस्ताचा प्रभू म्ह्णून स्विकार करण्यास तयार असतो, परंतू त्याच्या वचनावराती विश्वास ठेवण्यास कुरकुर करतो. कारण ख्रिस्ती या नात्याने आपण ख्रिस्ताला आपले प्राधान्य द्यावे आणि त्याच्यासाठी सर्व काही सोडण्यास तयार असावे अशी अपेक्षा आहे.

पेत्र, येशूच्या सर्वात जवळच्या शिष्यांपैकी एक, ख्रिस्ताला जिवंत देवाचा पुत्र म्हणून कबूल केल्यानंतर, त्याचे प्राधान्य ख्रिस्तापासून स्वतःकडे वळते. त्याने ख्रिस्ताच्या शब्दांवर विश्वास ठेवण्यास नकार दिला की तो दुःख भोगेल आणि मारला जाईल आणि तिसऱ्या दिवशी उठविला जाईल. त्यापलीकडे ही ख्रिस्ताला आपल्या प्रभूला धिक्कारून म्हणतो, तो काय बोलत आहे हे त्याला माहीत नाही; म्हणजेच पेत्राला देवापेक्षा जास्त माहीत आहे. अनेकदा आपणसुद्धा असेच वागतो. आपण ख्रिस्ताला प्रभू म्हणून स्वीकारून त्याच्याकडे येतो आणि नंतर आपल्या जीवनात त्याच्यावर किंवा त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवण्यास नकार देतो. आपण ख्रिस्तावरती अवलंबून न राहता स्वतःवर अवलंबून राहणे निवडतो. 'सैताना माझ्यामागे हो' म्हणण्याऐवजी आपण देवाला आपल्या मागे करतो.

देवाऐवजी ऐहिक गोष्टींवरती लक्ष्य केंद्रित करणे म्हणजेच मनाची शुध्दता किंवा नूतनीकरण न करणे. आपण शारीरिक गरजांबद्दल अधिक चिंतित होता. आपणाला देवापेक्षा पैसा, संपत्ती आणि समृध्दी जास्त महत्त्वाच्या ठरतात. स्वार्थी बनून आपण स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी, वैभवासाठी, नामलौकिकतेसाठी कार्यशील होतो. अहंकाराने व गर्वाने फुगून आपण अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचाराचा मार्ग अंगीकारतो. मग पेत्राप्रमाणे येशू आपणाला म्हणेल, 'सैताना माझ्यामागे हो".

अरण्यात परीक्षा पाहताना सैतानाने (मत्तय ४:-११) आणि पेत्राने येशूचे लक्ष्य व मन मिशन कार्यपासून, देवाच्या इच्छेपासून आपल्या प्राणाची आहुती देण्यापासून विचिलित करीत होते. येशूला मोहात पडण्याचा प्रयत्न केला. परंतू येशू मोहावरीत विजय मिळवितो, देवपित्याच्या इच्छेला, मिशनकार्याला प्राधान्य देतो व तो दुःखाचा प्याला मानवाच्या तारणासाठी पितो (मत्तय २६:४२). पेत्र सैतानाचा मध्यस्थी बनून मानवी दृष्टीकरणातून येशूला सहाय्यकरण्याच्या हेतूने अडथळा निर्माण करीत होता. आपली दृष्टी देवावर खिळली पाहिजे त्याच्या इच्छेनुसार जीवन जगल पाहिजे. जेव्हा आपण आपल्या भावनांनुसार जगतो आणि ते देवाच्या वचनानुसार नसतात, तेव्हा आपण अंधाराच्या राज्याचे समर्थन करतो. आपल्याला काय वाटते यापेक्षा देवाला काय हवे आहे हे खूप महत्त्वाचे आहे आणि आपण देवाची व लोकांची सेवा करण्यास तत्पर असले पाहिजे. आपला प्रत्येक निर्णय देवाचे राज्य अथवा सैतानाचे राज्ये प्रकट करते, त्यामुळेच संत पौल म्हणतो, "खाताना, पिताना किंवा काहीही करताना सर्व काही देवाच्या गौरवासाठी करा" (1 करिंथ १०:३१).

देवाच्या गोष्टींवर आपले मन लावण्यासाठी आपल्याला प्रथम ख्रिस्ताच्या प्रभुत्वाच्या अधीन व्हावे लागेल, म्हणजेच आपल्या जीवनाचे प्रत्येक घडामोडी बदल्या पाहिजेत. परिपूर्ण समर्पण अखेरच्या श्वासापर्यत, ५०/५० नाही, गरजेनुसार देव बदलायचा नाही. ख्रिस्तासाठी आपला जीव देण्यास तयार असले पाहिजे. ख्रिस्ताला आपल्या संपूर्ण आज्ञाधारकतेची आवश्यकता असते, नाही म्हणजे नाही व होय म्हणजे होय; स्वतःच्या  नाही तर देवाच्या आवडीनिवडी. सर्व गौरव, वैभव, यश, पराजय ख्रिस्ताचा आहे आणि तोच उगम स्थान आहे. आपण त्याच्या हातातले हत्यार आहोत. ख्रिस्त आपल्या जीवनाचा स्त्रोत आहे. ख्रिस्ताने सैतानावर व पापावर विजय मिळवून आपले जीवन त्याच्या सामर्थ्याने आणि अधिकाराने भरले आहे. आपण आपले जीवन संपूर्णतः ख्रिस्ताला समर्पित करूया, सैतानाला मागे करूया व आपल्या जीवनाद्वारे देवाच्या नांवाला गौरव व महिमा देऊया.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

आपला प्रतिसाद : हे प्रभो, सैतानाला पाठ करण्यास आम्हाला साहाय्य कर.

. आपले पोप फ्रान्सीस, बिशप, धर्मगुरू आणि व्रतस्त जीवन जगणा-या सर्वांना प्रभूची कृपा लाभावी व त्यांनी स्विकारलेल्या जीवनात त्यांना स्वतःला नाकारण्यास व परमेश्वराच्या पावलावर पाऊल टाकून चालण्यास मदत मिळावी, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

. जे लोक आजारपण, दुख, कष्ट, कठीण कसोटीच्या प्रसंगांनी त्रस्त झालेले आहेत, त्यांना दुख सहन करण्यासाठी धैर्य आणि सहनशक्ती मिळावी व परमेश्वराची स्तुती करण्यास ते सतत सज्ज असावेत, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

. सर्व पालकांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यावेत, त्यांना देव राज्याविषयी शिकवण द्यावी स्वतः परमेश्वराच्या वचनाप्रमाणे व आज्ञेप्रमाणे वागून, मुलांपुढे चांगला आदर्श ठेवावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

. जे लोक देवावर श्रद्धा ठेवत नाही तसेच जे कोणी देवापासून दूर जात आहेत अशा सर्व लोकांची प्रभूवरील श्रद्धा बळकट व्हावी आणि त्यांनी देवाच्या सानिध्यात परत यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

. आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment