Friday 15 September 2023

  Reflections for the 24rt  Sunday in Ordinary Time (17/09/2023) by Br. Reon Andrades




सामान्य काळातील चोविसावा रविवार

दिनांक: १७/०९/२०२३

पहिले वाचन: बेन सिरा ची बोधवचने २७:३३-२८:९

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १४:७-९

शुभवर्तमान: मत्तय १८:२१-३५





प्रस्तावना

आज जगामध्ये सूडाचे, क्रोधाचे, अशांततेचे वातावरण आपणास पहायला मिळत आहे. या सर्वांचे कारण म्हणजे गैरसमज, हेवा इत्यादि. विचारांचे मतभेद अपणास वैर भावाचा अनुभव देतात. या वैर भावाच्या स्थितीत आपण इतरांना क्षमादान देण्यास कमी पडत असतो. याउलट आपण इतरांकडून विशेषतः देवाकडून क्षमादानाची अपेक्षा करत असतो. आजची तीनही वाचने आपल्याला क्षमेचा महामंत्र जोपासण्यास व त्याची अंमलबजावणी करण्यास प्रेरित करत आहेत. आपण इतरांना क्षमा करावी व ती केल्याने स्वतः क्षमेस पात्र बनावेत म्हणून ह्या मिस्साबालीदानात आपण प्रार्थना करूया.

मनन चिंतन

सामान्य काळातील चोविसावा रविवार आपणास आपल्या जीवनात आवश्यक असलेले मूलभूत गोष्टीची शिकवण देत आहे, ती म्हणजे क्षमा. क्रोध, राग हा सर्वांनाच येत असतो. या जगात असा कोणीहि व्यक्ती नाही कि, त्याला राग येत नाही. नैतिकतेत क्रोधाला दोन्ही दृष्टीकोनातून सादर केलेले आहे. ते म्हणजे ‘सकारात्मक’ व ‘नकारात्मक’ होय. सकारात्मक दृष्टीकोण म्हणजे, ज्या रागामुळे आपण स्वतःला सिद्ध करतो, अन्यायाविरुद्ध लढतो, तो हाच होय. नकारात्मक दृष्टिकोण आपणा सर्वांना ठाऊक आहे, सूड घेणे, दुसऱ्यांचे वाईट योजणे इत्यादि. जीवनात अनेक/बहुतांश वेळेस आपण नकारात्मक क्रोधाच्या बंधनात पडत असतो. हे भौतिक जीवन जगत असताना, अनेक वेळेस आपल्या विचारांचे व कृत्यांची मतभेद होत असतात. असं म्हटलं जातं की, कौटुंबिक जीवन जगत असताना भांड्यावर भांड आदळत. पण त्याचा आवाज कोट पर्यंत पोहचू द्यायचा हे आपणावर असते. भावा बहिणींमध्ये  सासू-सुनेमध्ये, नवरा-बायकोमध्ये, लहान-थोरांमध्ये गैरसमज अथवा भांडणे होत असतात. ह्याचा अर्थ असा नाही कि, ते भांडण/गैरसमज लांबवावे.

अनेक वेळेस आपल्याला इतरांच्या पापांचा अथवा गैरकृत्याचा हिशेब ठेवायला आवडतो. शुभवर्तमानात देखील आपण असंच काहीतरी पाहतो. पेत्र आपल्या भावाच्या अपराधांचा हिशेब ठेवतो. आपण देखील इतरांचा वाईट गोष्टींचा/कृत्यांचा हिशेब ठेवत असतो व त्याच्या ओझ्याखाली आपण स्वत: पडत/चिरडत असतो. आपल्याला हे ओझ हलकं करण्यास अवघड जातं. सरळ शब्दांत सांगायचं झालं म्हणजे क्षमा करायला अवघड जातं. भांडण करण्यासाठी नव्हे तर क्षमा करण्यासाठी आपल्याकडे मोठं काळीज असणं गरजेचे आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, ‘Less Luggage  More Comfort’, म्हणजे जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा आपल्याकडे जितक कमी सामान असेल तितकाच अपला प्रवास आरामदायक होत असतो. म्हणून प्रभु म्हणतो “माझे ओझे हलके आहे”(मत्तय ११:३०), कारण त्याने इतराना क्षमा केली आहे. तो इतराने केलेल्या अपराधचा हिशेब ठेवत नाही. त्याने त्याच्या सर्व अपराध्यांना क्षमा केली, क्रुसावर असताना देखील त्याने क्षमेचा महामंत्र अपणास दिला आहे.

शुभवर्तमानात प्रभूने पेत्राच्या प्रश्नाला उत्तर देऊन सांगितले की, सातच्या सत्तर वेळा तुझ्या भावाला तू क्षमा कर. याचा अर्थ असा नाही की आपण एके एक अपराध मोजावा. इथे आपणास दर्शविण्यात येते कि आपण निस्सीम क्षमादानाचा आस्वाद इतराना द्यावा. आपण मोठ्या आवाजाने प्रभूची प्रार्थना म्हणतो की, जसे आम्ही आमच्या अप्राध्यांची क्षमा करतो तशी तू  आमच्या अपराधांची क्षमा कर. आपण स्वतःला प्रश्न विचारूया की, खरोखरच मी माझ्या अपराध्यांना क्षमा करतो का? की मी त्यांना क्षमा न करता माझ्या अपराधांच्या क्षमेची याचना/आशा बाळगत असतो.

ख्रिस्ती जीवन आपणास क्षमेचे जीवन जगण्यास आमंत्रित करत आहे. आपण ख्रिस्ती या नात्याने आपण क्षमा करणे अगत्याचे आहे. जर का आपण क्षमा केली तर आपल्या जीवनातील बरेच  प्रश्न/दु:ख हलके होतील. एक मुक्त जीवन जगण्याचा आनंद आपणास अनुभवता येणार आहे. क्षमा करणे अवघड आहे परंतु अशक्य नाही. क्षमा केल्याने माणूस छोटा होत नाही तर त्यामुळे आपली नातीसंबंध जोपासतात. आपल्या जीवनाला बहर येतो. बिघडलेली नाती अथवा गोष्टी परत जुडतात. जर का आपल्याला क्षमादान अनुभवायचे असेल तर प्रथम आपण आपल्या अपराध्यांना क्षमा केली पाहिजे व ख्रिस्ताच्या क्षमेची मूल्य इतरांपर्यंत पोहचविली पाहिजेत. आमेन.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१. आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरु, व्रतस्थ बंधू-भगिनी व इतर प्रापंचिक यांनी सतत ख्रिस्ताची शिकवण अंगीकारावी. आपल्या जीवनात उतरवावी, तसेच आपल्यासाठी एक चांगला आदर्श निर्माण करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आज बरेचशे लोक बेरोजगार झाले आहेत व मानसिक तणावाखाली आहेत अशांना प्रभूची कृपा लाभावी व लवकरात लवकर त्यांना काम-धंदा मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. जे कोणी आजारी आहेत अशांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा व ते लवकरात लवकर बरे व्हावेत, म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. या वर्षी आपल्याला चांगला पाऊस परमेश्वराच्या कृपेने लाभला आहे. येणाऱ्या दिवसातही चांगला पाऊस व्हावा व सर्व नैसर्गिक आपत्तीपासून आपला बचाव व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया.

No comments:

Post a Comment