Saturday 23 September 2023

 Reflections for the 25h Sunday in Ordinary Time (24/09/2023) By. Br. Benher Patil. 


सामान्य काळातील पंचविसावा रविवार

दिनांक: २४/०९/२०२३

पहिले वाचन: यशया ५५:६-९३

दुसरे वाचन: फिलीपीकरांस १:२०-२४,२७

शुभवर्तमान: मत्तय २०: १-१६




प्रस्तावना: आजची उपासना आपल्याला देवाच्या आश्चर्यकारक प्रेमाची आणि आगळ्या-वेगळ्या चांगुलपणाची आणि उदारतेची ओळख करून देते. परमेश्वर सर्वाचा निर्माता असून त्याच्यासाठी सर्व एक आहे, समान आहेत. तो आपल्यावरील  प्रेमात, करुनेत, किवा चांगुलपणात  भेदभाव करत नाही किवा त्यांच्याशी पक्षपातीपणे वागत नाही. मानवांच्या कल्पनेपलीकडे असलेल्या त्याच्या दयावंत आणि कृपावंत प्रेमाचे आपण साधन बनावे, म्हणून ह्या पवित्र मिस्साबलीत प्रार्थना करूया.

मनन-चिंतन: 

मनुष्याचे मार्ग, त्याचे आचार-विचार ह्यांच्याशी आपण चांगलेच परिचित आहोत, परंतु देवाच्या मार्गांबद्दल नाही. आपला परमेश्वर हा नवलांचा धनी आणि आश्चर्यांचा देव आहे. त्याचे मार्ग आणि त्याचे विचार हे खूप रहस्यमय आणि अचंबित करणारे असतात. आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा म्हणतो कि, ज्याप्रमाणे स्वर्ग उंच आणि अनाकलनीय आहे, अगदी त्याच प्रमाणे देवाचे विचार आणि मार्ग हे उंच आणि विचित्र आहेत. देवाचे मार्ग त्याच्या सर्वज्ञता आणि सर्वव्यापीपणाचे प्रदर्शन करतात आणि मनुष्याला आश्चर्यचकित करणाऱ्या मार्गांनी नेहमीच अपेक्षित परिणाम घडवून आणतात.

        आपल्यासाठी देवाचे विचार आणि मार्ग किती भिन्न आहेत हे आजच्या सुवार्तेतील द्राक्षबागेच्या मालकाच्या दृष्टान्तातून स्पष्टपणे सांगितले आहे. कथेतील महत्त्वाचे घटक लक्षात घेणे आवश्यक आहे. पहिला लक्षात घेण्याजोगा घटक म्हणजे मालक स्वतःच त्याच्या द्राक्षमळ्यासाठी कामगारांच्या शोधात बाहेर पडतो. येशूच्या काळात ही सामान्य प्रथा नव्हती. जर मालकाला अतिरिक्त कामगारांची गरज असेल तर तो त्याच्या कर्मचार्‍यांपैकी एकाला बाजारात पाठवायचा. हा द्राक्षबागेचा मालक मात्र स्वतः बाजारात जातो. आणि ते सुद्धा दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी, द्राक्षे काढण्यासाठी कामगारांच्या शोधात अनेक वेळा बाजारपेठेत जातो. त्याला फक्त त्याच्या व्यवसायाचीच काळजी नाही. त्यांना नोकरीसाठी कोणीतरी मिळेल या आशेने दिवसभर उभ्या असलेल्या लोकांच्या दुरवस्थेबद्दलही तो स्पष्टपणे चिंतित आहे.

        कथेतील दुसरा महत्त्वाचा घटक हा कामगारांना मिळणाऱ्या वेतनाशी संबंधित आहे. येशूच्या काळातील वेतन देण्याची प्रक्रिया अशी होती कि ज्यांनी शेवटी काम केले होते त्यांच्यापासून सुरुवात करून, ज्यांनी सुरुवातीपासून काम केले होते त्याना शेवटी वेतन दिला जात असे. मालकाने जे शेवटच्या क्षणाला काम करण्यासाठी आले होते त्यांना प्रत्येकी एक रुपया इतका पगार दिला. साहजिकच ज्यांनी भर उन्हात संपूर्ण दिवस काम केले होते, त्यांना जास्त मजुरी मिळण्याची अपेक्षा केली होती. परंतु वास्तवात त्यांनासुद्धा तितकाच पगार दिला गेला. बोधकथेत स्पष्ट केल्याप्रमाणे त्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी पैसे मिळाल्यामुळे ते मालकाविषयी कुरकुर करतात. त्याच्याशी हुज्जत घालून त्याला अन्यायी म्हणतात.

        शेवटी, आपण बोधकथेच्या मुख्य मुद्द्यावर येतो, ते म्हणजे द्राक्षमळ्याच्या मालकाचे शेवटचे शब्द: ‘मी तुझा अन्याय करीत नाही. जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीप्रमाणे करावयास मुखत्यार नाही काय? अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यात सलते काय?” हे शब्द आपल्याला काम आणि वेतन, औद्योगिक संबंध किंवा सामाजिक न्याय याबद्दल सांगत नाही. तर देवाच्या हृदयाच्या उदारतेबद्दल, त्याच्या अमर्याद औदार्याबद्दल आहे, विशेषत: उशीरा येणाऱ्या लोकांसाठी, ज्यांना दुर्लक्ष केले गेले, मागे सोडले गेले किंवा समाजाच्या कड्याकडे ढकलले गेले. न्याय सुंदर आहे, परंतु औदार्य चांगले आहे. ह्या दाखल्याद्वारे देवाचा न्याय म्हणजे त्याची उदार करुणा, त्याची अपार दया हे सिद्ध होत. परमेश्वर ह्या जगातील सर्व लोक, जी त्याची लेकरे आहेत, त्यांच्याबरोबर प्रेमाने, उदारतेने आणि समानतेने वागतो.

        हा दाखला आपल्याला दैवी तर्क, दैवी प्रेम, दैवी न्याय ह्याची फक्त ओळख करून देत नाही, तर तो आम्हाला एकमेकांसोबतच्या नातेसंबंधात देवाच्या विचार आणि वागण्याच्या पद्धतींचे अनुकरण करण्याचे आव्हान देखील देतात. देवाची लेकरे म्हणून, आम्ही फक्त आमच्या न्यायावर, हक्कांवर लक्ष केंद्रित न करता; किवा मानवी वृत्ती, विचार, स्पर्धा आणि बक्षिसे यांच्या संकुचित जगातून, दैवी तर्कशास्त्राच्या भव्य जगात जाण्यास म्हणून आव्हान करतात. जिथे काहीही कमावायचे नसते आणि सर्वकाही भेट असते; सर्व काही विनामूल्य आहे. दुसरा आणि महत्वाचा बोध म्हणजे देव, जो आपलं पिता आहे, त्याच प्रेम हे सर्वव्यापी आहे आणि तो सर्वच भल करू इच्छितो, सर्वच हित आणि तारण व्हावं हीच त्याची तीव्र इच्छा प्रगट करतो.

        'माझे विचार तुझे विचार नाहीत, किंवा माझे मार्ग तुझे मार्ग नाहीत... 'आपले विचार किती लहान असू शकतात, आणि आपली पाहण्याची आणि न्याय करण्याच्या पद्धती किती संकुचित आणि मर्यादित असू शकतात. आपण कंजूष विचार करतो काइतरांशी कृपाळूपणे वागतो का? आज प्रभुने आमची मने उघडावी, आमची अंतःकरणे वाढवावी, आणि त्याच्यासारखे उदार, दयावंत, आणि करुणामय जीवन जगण्यास कृपा मिळावी म्हणून त्याच्याकडे विशेस प्रार्थना करूया..

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

हे प्रभू, तुझ्या मार्गाने आणि विचाराने चालण्यास आम्हाला प्रेरणा दे.

१. आमचे परमगुरु फ्रान्सीस, सर्व बिशप्स, धर्मगुरू आणि धर्मभागिनी, ह्यांना प्रभूच्या मळ्यात प्रेमाने, निस्वार्थाने, आणि औदार्याने सेवा करण्यास ईश्वरी कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करूया.

२. आमच्या राजकीय पुढाऱ्यानी, देशातील बेरोजगारना रोजगार पुरवावा, जे गरीब आहेत त्यांच्या मुलभूत अधिकाराची पूर्तता करावी आणि समाजातील जे घटक वंचित आहेत अश्यांना आधार दयावा आणि आवश्यक सहाय्य कराव म्हणून त्यांच्यासाठी प्रभूकडे प्रार्थना करूया.

३. ह्या जगात जे ख्रिस्ती लोक छळ, द्वेष आणि वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासांचा सामना करत आहेत, अश्यांना प्रभूने सहनशक्ती द्यावी, त्यांचा विश्वास दृढ करावा आणि सर्व संकटापासून त्याचं रक्षण कराव म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.

४. जी ख्रिस्ती कुटुंब अनेक आर्थिक, मानसिक आणि नैतिक समस्येमुळे वैतागलेली आहेत, अश्यांनी साक्रामेंताच्या कृपेने आणि शक्तीने प्रेरित होऊन एकीने, गुण्या-गोविंदाने, प्रेमाने आणि धैर्याने जगण्यास सहाय्य मिळावे म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया.

५. ह्या मिस्साबलीत सहभागी झालेल्या सर्वाना, ख्रिस्ताच्या पाऊलावर पाऊल ठेवून आणि त्याच्या शब्दाच्या प्रेरणेने पवित्र, अर्थपूर्ण आणि सेवामयी  जीवन जगण्यास पवित्र आत्म्याची शक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करूया.

 

No comments:

Post a Comment