Thursday 7 September 2023

  Reflections for the 23rd Sunday in Ordinary Time (10/09/2023) by Br. Jostin Pereira

सामान्य काळातील तेविसावा रविवार



मी कुठे ही कसा ही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो”. 


दिनांक: १० /०९/२०२३

पहिले वाचन: यहेज्केल ३३:-.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १३:-१०

शुभवर्तमान: मत्तय १८:१५-२०

प्रस्तावना

आज आपण सामान्य काळातील तेविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणाला देवाच्या प्रेमात आणि क्षमेत आदर्शमय चांगले जीवन जगून इतरांना देवाजवळ आणण्यास आव्हान करीत आहे. परमेश्वर संदेष्टा यहेज्केलला पापाच्या विळख्यात अटकलेल्या लोकांना सावध करुन कुमार्ग सोडून सन्मार्ग धरण्याची जबाबदारी देत आहे. संत पौल शेजार प्रीतीचा महामंत्र देत आहे, “जशी आपणांवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर”. आपणातील वैर्य, गैरसमजणूक प्रेमाने धुवून एकमेकांना क्षमा करून सलोख्याने एकत्र राहण्यास येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानात सांगत आहे. कारण जेव्हा आपण एकत्र राहतो प्रार्थना करतो, तेव्हा येशू आपणांसमवेत उपस्थित असतो. शेजारप्रीती रुजवून, एक ख्रिस्ती समुदाय म्हणून एकत्रितपणे प्रभूच्या मार्गावरती मार्गक्रमण करण्यास आपणाला शक्ती-सामर्थ्य, कृपा-आशीर्वाद लाभावा म्हणून मिस्साबलिदानांमध्ये सहभागी होत असताना विशेष प्रार्थना करूया.

मनन चिंतन:

मी कुठे ही कसा ही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो”. आजची उपासना आपणाला हृदयाचे परिवर्तन करण्यास सांगत आहे. पापी वृत्ती, कपटीपणा बदलून, नियमशास्राने नव्हे तर प्रेमाने एकमेकांची हृदये जिंकली पाहिजेत. जीवनातील आध्यात्मिक प्रवासात आपल्यावर दोन जबाबदाऱ्या आहेत, स्वतःचे मनपरिवर्तन ख्रिस्ती या नात्याने पाप्याचे मनपरिवर्तन करण्याची जबाबदारी. आपण पवित्रतेच्या मार्गावर एकमेकांना साथ द्यायची आहे आणि एकमेकांना आपल्या पापीपणावर मात करण्यास मदत करायची आहे.

जीवनात आपल्याला अनेक जबाबदाऱ्या घ्यायला लागतात. बालपणात अभ्यासाची, तारुण्यात नोकरीची, प्रौढावस्थेत कुटुंबाची, सामाजीक, राजकीय, धार्मिक (चर्चची) जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. ह्या जबाबदाऱ्या पार पाडताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली वृत्ती, आपली विचारसरणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वचनबद्धता आणि समर्पण. आपण विश्वासू कि अविश्वासू सेवक आहोत हे आपल्या कृतीतून दिसून येईल.

दुसऱ्यातील दोष, उणीवा शोधण्यामध्ये त्याच्यावर दोषारोप करून तुच्छ कमी लेखण्यात आपण प्रतिभावंत आहोत, जणू आपण सर्वात परिपूर्ण व्यक्ती आहोत. आज परमेश्वर संदेष्टा यहेज्कीयलद्वारे आपल्याला आठवण करून देतो की आपण एकमेकांसाठी जबाबदार आहोत. विशेषतः कुमार्गावर जीवन जगणाऱ्याला सल्लामसलत करून सावध करण्यासाठी. जो जबाबदारीपासून लपेल किंवा पळेल त्याला परमेश्वर योनाप्रमाणे जबाबदार ठरवेल. आपले बंधुभगिनी, मित्र आणि नातेवाईक जेव्हा त्यांचा मार्ग चुकतात तेव्हा आपण त्यांना सल्ला देऊन सावध केले पाहिजे. आपल्या कुटुंबातील किंवा समाजातील (विशेषत: नैतिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक) विकृतीबद्दल गप्प राहणे हानिकारक आहे. म्हणून, देव आपल्यावर भावाचा रक्षक होण्याची जबाबदारी सोपवितोय.

दुर्दैवाने, आज गोष्टी चुकीच्या होत असताना, आपण गप्प बसणे, बहुसंख्य लोकांमध्ये सामील होणे किंवा काहीही चुकीचे नसल्याची बतावणी करणे पसंत करतो. आपण स्वतःला ऐकवले पाहिजे. कारण आपण दाखवलेली मौनता उद्या आपल्याला त्रास देऊ शकते. तथापि, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की देव म्हणतो: "मला पापीच्या मृत्यूने आनंद होत नाही .त्याला पश्चात्ताप करून जगू द्या" (यहेज्केल १८:२३). म्हणून, आपण जी काही कृती करतो ती चुकीच्या मार्गावर असलेल्याला सावध करण्यासाठी, पुनर्बांधणीसाठी आणि परत आणण्यासाठी असावी.

आजच्या शुभवर्तमानातून येशू आपल्याला सलोख्याची तत्त्वे देतो. याचा अर्थ नातेसंबंधांमध्ये, कुटुंबांमध्ये आणि समुदायांमध्ये भांडण-तंटे संघर्ष अपरिहार्य आहे. तरीही, प्रश्न हा आहे की आपण ते कसे हाताळतो? संवाद हा येशूच्या तत्त्वाच्या केंद्रस्थानी आहे, तसेच समस्यांवर बोलणे, विचारविनिमय करणे, परिस्थिती दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून पाहणे महत्त्वाचे आहे. म्हणून, ख्रिस्त आपल्याला सलोख्याचे त्रिमितीय तत्त्व देतो. प्रथम, आपण बसून एकमेकांशी आणि समोरासमोर संवाद साधला पाहिजे. मग, एका चांगल्या मित्राची मध्यस्थी घ्या आणि शेवटी, आपल्या समुदायाची किंवा कुटुंबाची मध्यस्थी घ्या. ख्रिस्ती या नात्याने, आज आपण आपल्या समस्या कशा सोडवतो? आपण दोन हात करतो किंवा कोर्टाची पायरी चढतो. ख्रिस्त आज आपल्याला देत असलेल्या तीन मूलभूत पायऱ्या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत.

दुर्दैवाने, आपण या सर्व मूलभूत पायऱ्यांकडे दुर्लक्ष करतो आणि सरळत्याला पापी जकातदाराप्रमाणे वागवितो.” सर्वप्रथम, आपण संवादाद्वारे इतरांशी समेट करण्याचे सर्व प्रयत्न केले पाहिजेत. संवादामुळे एकमेकांबद्दलचा आदर वाढतो; तसेच कोर्टाचा खर्च, वेळ वाचतो. शेवटी, परस्पर प्रेम वाढते, नातेसंबंध जुळवून येतात आणि परमेश्वराचा आशीर्वाद सहवास लाभतो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू दया करून आमची प्रार्थना ऐक.

. ख्रिस्तसभेचे धुरा वाहणारे पोप फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू व्रतस्थ ह्यांनी प्रभू येशूची प्रेमाची क्षमेची शिकवणुक साऱ्या जगात पसरावी म्हणून प्रार्थना करूया.

. प्रभूच्या मळ्यात काम करण्यासाठी अनेक युवक युक्तींनी पुढे यावे त्यांना योग्य असा पाठिंबा मार्गदर्शन मिळावे म्हणून प्रभूचरणी प्रार्थना करूया.

. सर्व आजारी पिडीत लोकांना प्रभूच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा त्यांची आजारातून सुटका होऊन त्यांच्या वेदना कमी व्हाव्यात यासाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

. आपण सर्व ख्रिस्ती भाविकांनी प्रभू येशूने दिलेल्या प्रेमाच्या क्षमेच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगावे समाजात योग्य असा आदर्श निर्माण करावा यासाठी प्रार्थना करूया.

. आपण शांत राहून आपल्या वैयक्तिक सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment