Thursday, 24 April 2025

Reflections for the Homily of Second Sunday of Easter (27-04-2025) By anonymous

 

पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार

दैवी दयेचा रविवार

दिनांक: /०४/२०२५   
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:४२-४७
दुसरे वाचन: १पेत्र १:३-९
शुभवर्तमान: योहान २०:१९-३१

प्रस्तावना: 

आज आपण पुनरुत्थानानंतरचा दुसरा रविवार साजरा करीत आहोत. त्याचप्रमाणे आज आपण दैवी दयेचा (Divine Mercy)  सण साजरा करीत आहोत. दैवी दयेच्या विश्वासात वाढण्यासाठी आपणास संत फॉस्टीना ह्या महान संताची मदत आपल्या दैनंदिन जीवनात होते. संत फॉस्टीना आपणास तिच्या बरोबर, ‘हे येशूमाझी तुझ्यावर श्रध्दा आहे’ अशी प्रार्थना करावयास आव्हान करते.

प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो कीयेशूवरील विश्वास धरणाऱ्याचा समुदाय एक दिलाचा व एकजीवाचा होताह्या समुदयात विविध लोक एकत्र आले. आजचे दुसरे वाचन प्रकटीकरण ह्या पुस्तकातून घेतले आहे, आणि ह्या वाचनात आपणाला, संत योहानला झालेल्या येशूच्या प्रकटीकरणाविषयी ऐकायला मिळते. आजच्या शुभवर्तमानात संत योहान, आपल्याला थोमाचे अविश्वासातून विश्वासाकडे झालेल्या परिवर्तनाबद्दल सांगतो.

दैवी दयेचा सण साजरा करत असताना, देवाची दया, आपली श्रद्धा प्रकट करताना अनुभवावी की त्याद्वारे आपण देवाच्या अधिका-अधिक जवळ रहावे. संत फॉस्टीनाच्या जीवनाचे आचारण आपण सतत करावे व ख्रिस्ती श्रध्देत वाढावे म्हणून आपण देवाकडे त्याच्या दयेसाठी प्रार्थना करूया. 

मनन चिंतन:

"देवा तुझ्या दयेची मज लागली तहान..."

आज दैवी दयेचा सण आपण साजरा करीत आहोत. दया म्हणजे दुसऱ्यांच्या दुःखाबद्दल आपल्या अंतःकरणात निर्माण होणारी सहानुभूती. दुसऱ्यांची दुःखे, संकटे, आपत्ती आपल्याच आहेत असे जो मानतो व त्या नाहीशी करण्याचा प्रयत्न करतो तो खरा दयाळू. येशू ख्रिस्त हा खरा दयाळू होता. तो ममतेने व करुणेने भरलेला होता. अनेक अशी ख्रिस्ताची उदाहरणे आपल्या समोर शुभवर्तमानात ठेवण्यात आली आहेत.

          संत फौस्तीनाला झालेल्या दर्शनात येशू हा दैवी दयेचा व करुणेचा महासागर अखिल मानवासाठी ओसांडून वाहताना तिने अनुभवला. म्हणूनच दैवी दयेची प्रार्थना आपल्या सर्वाना येशुवरील श्रद्धेत वाढण्यासाठी प्रेरणादायी आहे. प्रभू येशूच्या हृदयातून दयेचा व कृपेचा झरा अखंडितपणे वाहत आहे. 

संत थोमाने येशूला पाहताच, माझ्या देवा! माझ्या प्रभो! हे शब्द उच्चारले. जरी तो सुरूवातीला विश्वासात डगमगला तरी नतंर तो ख्रिस्ताचा खरा अनुयायी झाला व ख्रिस्ताच्या शब्दांचा प्रचार सर्वत्र केला. आजच्या शुभर्वतमानात येशू ख्रिस्त आपणास निमंत्रित करून म्हणत आहे,  पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. ह्याच पुनरूत्थित ख्रिस्तामध्ये आपला विश्वास सदैव राहून तो आपल्या कार्यात दिसावा.

एकदिवस आर्चबिशप फुल्टन जे. शीन एका मोठ्या इस्पितळात आजाऱ्यांना साक्रामेंत देण्यास गेले होते. त्या हॉस्पिटलमध्ये एका व्यक्तीने आर्चबिशपचा स्विकार केला नाही, उलट त्यांना अपशब्द बोलले. ती व्यक्ती देवावर नाराज होती. अनेक वर्षांपासून त्या व्यक्तीने साक्रामेंत व ख्रिस्तपसादाचा स्विकार केला नव्हता व अत्यंत पापमय आयुष्य तो जगला होता. अनेक दिवस प्रयत्न करुनही त्याने आर्चबिशपांना परतून लाविले होते.

       ज्या रात्री त्याची शेवटची घटका जवळ आली होती त्या रात्री आर्चबिशप त्या व्यक्तीजवळ गेले परंतु त्या माणसाने पुन्हा देवाचा धिक्कार करून ख्रिस्तप्रसाद घेण्यास नकार दिला. आर्चबिशप त्याला म्हणाले, “माझ्या मुला तुला जरी नको असेल तरी देवाची तुझ्यावर असलेली प्रिती, दया व करुणा ही अपार आहे”. काही तासांनी ती व्यक्ती मरण पावली, परंतु नर्सनी आर्चबिशपांना सांगितले की शेवटपर्यंत तो म्हणत राहिला “हे प्रभो मज पाप्यावर दया कर.”

देवाने आपल्यावर केलेली दया म्हणजे माणसाने आपल्या पराकष्टाने मिळविलेले बक्षीस नव्हे तर देवाने माणसावर केलेले प्रेम व त्यासाठी त्याला मोठी किंमत मोजावी लागली. संत पेत्र म्हणतो, तुम्ही तुमचे नव्हते. तुम्हाला आपल्या प्रभू येशूच्या रक्ताने विकत घेतले आहे.”

आज आपण आपले दैनंदिन जीवन जगात असताना, प्रभू येशूच्या  दयेचा अनुभव घेऊया व ही दया इतरांवर दाखवण्यासाठी आपले अंतःकरण, दयेने  भरावे.  म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा मांगूया.

तसेच आपण देखील ख्रिस्तामध्ये एक होऊन त्याची सुवार्ता, दया, करुणा, ममता व प्रेम इतरांपर्यंत आपल्या कार्याद्वारे व आपल्या वागणुकीद्वारे देता यावे म्हणून प्रयत्न करूया. दैवी दयेचा रविवार हा केवळ मुखाने नव्हे तर, दैनंदिन जीवनात आपल्या कृतीने व आपल्या वागणुकीद्वारे इतरांपर्यंत पोहोचवावे म्हणून आपण ह्या दानांकारीता प्रार्थना करूया. 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू, दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१. आपले परमगुरु पोप फ्रान्सीस, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ लोकांनी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या विश्वासपुर्वक पार पाडाव्यात आणि लोकांना दैवी दयेचा अनुभव घेण्यास मदत करावी, म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया.

२. जे निराश होऊन देवापासून दूर गेले आहेत, त्यांना प्रभूने स्पर्श करून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडून आणावे व त्यांनी परत एकदा प्रभूने दाखवलेल्या मार्गावर चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले गेले आहेत, त्यांनी आपल्या सद्सदविवेकबुद्धीला जागवून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून जनतेचे प्रश्न व अडचणी जाणून घ्याव्यात व देशाच्या प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. शांती निर्माण करण्यासाठी व समेट घडवून आणण्यासाठी आज जगभरात अनेक संघटना कार्यरत आहेत, त्यांच्या कार्यात प्रभूचा आशीर्वाद त्यांच्यावर सदैव असावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपल्या कुटुंबात प्रत्येक व्यक्तीला समानतेची व सन्मानाची वागणूक मिळावी तसेच प्रत्येक सदस्यातील बंधुभावाची भावना वृद्धिंगत होऊन एकमेकांतील जवळीकता वाढावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Thursday, 17 April 2025

Reflection for the Homily of Easter Sunday (20/04/2025) By Fr. Benjamin Alphonso


पास्काचा सण

(सकाळची मिस्सा)

दिनांक: २०/०४/२०२५

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १०:३४अ, ३७-४३

दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र ३:१-४

शुभवर्तमान: योहान २०:१-९


प्रस्तावना:

पुनरुत्थान व जीवन मीच आहे
प्रस्तावना
ख्रिस्त आज विजयी झाला, मरण जिंकून तो उठला — आलेलूया, आलेलूया!

आज पवित्र देऊळमाता सर्वात महत्त्वाचा सण साजरा करत आहे: ‘पुनरुत्थान’. विशेष करून प्रभु येशूचे पुनरुत्थान आपल्या ख्रिस्ती विश्वासाचा केंद्रबिंदू आहे, तसेच पाया आहे. प्रभुने मरणावर विजय मिळविला, मृत्यूची भिंत फोडून काढली आहे. मानवाचा सर्वात मोठा शत्रू हा मृत्यू आहे. त्यावर प्रभु येशूने विजय मिळवला आहे.

आजची तिन्ही वाचने याची साक्ष (ग्वाही) देत आहेत. आपल्याला प्रभु येशूच्या पुनरुत्थानाविषयी माहिती व कल्पना देत आहेत.

पहिल्या वाचनात, पेत्र, ज्यांनी ख्रिस्ताची सुवार्ता ऐकली नाही व जे खऱ्या जिवंत देवाविषयी उत्सुक आहेत, त्यांना प्रभुच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देतो.

दुसऱ्या वाचनात, संत पौल आपल्याला आपले लक्ष स्वर्गीय येशू ख्रिस्तावर केंद्रित करण्यास सांगत आहे, कारण प्रभु येशूने मृत्यूवर व जगावर विजय मिळविला आहे.

शुभवर्तमानात आपण ऐकतो की, येशू ख्रिस्त हा मरणावर विजय मिळवून उठला आहे.प्रभु येशू म्हणतो, "पुनरुत्थान व जीवन मीच आहे, आणि जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त होईल."

आपला ख्रिस्ताच्या व आपल्या पुनरुत्थानाचा विश्वास मजबूत व्हावा, म्हणून या मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.

मनन-चिंतन

लंडन ह्या शहरात घडलेली ही सत्य घटना आहे. 1666 मध्ये संत पौलला समर्पित केलेल्या एका महामंदिराला भल्या पहाटे आग लागली आणि काही क्षणातच ते महामंदिर त्या आगीने भस्म करून टाकले. तब्बल दहा-बारा वर्षांचा काळ उलटल्यानंतर, पोप महाशयांनी ख्रिस्तोफर बेलेन या नव्या शिल्पकाराला त्या चर्चच्या पुन:बांधकामासाठी हवा असलेला आराखडा बनविण्यास सांगितला. ख्रिस्तोफरने त्या जागेचे चांगल्या प्रकारे निरीक्षण केले. सुरुवातीला काम थोडे अवघड वाटत होते कारण हवे असलेले निकाल मिळत नव्हते. परंतु एके दिवशी, उध्वस्त झालेल्या मंदिराच्या ढिगाऱ्यातून त्याने एक शिल्प उचलले व त्यावर कोरलेल्या शब्दांना वाचून तो आश्चर्यचकित झाला. आता त्याचा विश्वास बसला की मंदिराची पुन:बांधणी होणे शक्य आहे, कारण त्यावर शिल्पकाराने कोरलेले शब्द होते: "होय, मी पुन्हा उठेन."

आणि याच शब्दावर विश्वास ठेवून त्याने त्याचे काम पूर्ण केले व आपल्याला आज ते भव्य महामंदिर पाहायला मिळते.

देऊळमातेकडून हे वर्ष आंतरराष्ट्रीय ज्युबिली वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. यावर्षी आपण "आशेचे सहप्रवासी" या विषयावर मनन-चिंतन करीत आहोत. सध्याच्या आधुनिक जगात अनेक कारणांमुळे भरपूर लोक निराश आहेत. अनेक लोक आत्महत्या करत आहेत. लोकांमध्ये शांती नाही. अशा या गडबडीच्या वेळेला देऊळमाता आपल्याला सगळ्यांना आशावादी होण्यास आमंत्रित करत आहे. ज्याप्रमाणे ख्रिस्ताच्या क्रूसावरील मरणाने ख्रिस्ताचे शिष्य निराश व भयभीत झाले होते, आणि ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाने त्यांच्यात एक नवीन आशा निर्माण केली, त्याच्या जीवनाला कलाटणी दिली.

आजच्या योहानलिखित शुभवर्तमानात आपण ऐकतो की, मरिया माग्दालेना सकाळी येशूच्या कबरीकडे जाते आणि तिला रिकामी कबर आढळते. तेव्हा मरिया माग्दालेना पळत-पळत जाऊन ही गोष्ट दोन शिष्य: पेत्र व प्रिय शिष्य योहान यांना सांगते. ही गोष्ट कळताच, पेत्र व योहान दोघेही धावत-धावत कबरीकडे जातात व त्यांना मरिया माग्दालेनाने सांगितल्याप्रमाणे कबर रिकामी दिसते. येशूचे अंगावरचे पांढरे वस्त्र पडलेले दिसते आणि त्यांना येशूचे शब्द आठवतात: "मी मेलेल्यांतून उठेन." तेव्हा ते विश्वास ठेवतात व आनंदित होतात. ही गोष्ट ते आनंदाने इतरांना, विशेषतः इतर शिष्यांना सांगतात.

संत आगुस्तीन म्हणतात की, आपला विश्वास हा पुनरुत्थानीत विश्वास आहे. प्रभुने मरणावर विजय मिळवलेला आहे. प्रभुने आपली निराशा दूर केलेली आहे. आपणही जीवनातील दुःख व अडचणी विसरून आनंदित झाले पाहिजे. ही सुवार्ता सर्वत्र पोहोचवली पाहिजे.

बायबल पंडित डब्ल्यू. एच. वेल म्हणतात, "शुभवर्तमान पुनरुत्थान समजावून देत नाही, तर पुनरुत्थान शुभवर्तमानात समजावून दिले जाते." होय, पुनरुत्थानाचा सोहळा हा आनंदाचा आणि आशेचा सोहळा आहे. तो आनंद सर्वांना वाटूया आणि येशूची सुवार्ता सर्वत्र पोहोचवूया.

आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसादहे परमेश्वरा आमची विनंती ऐक.

आमचे परमगुरु फ्रान्सिससर्व महागुरूधर्मगुरुव्रतस्थ आणि ख्रिस्ती प्रापंचिक यांनी येशूच्या पुनरुत्थानावर मनापासून विश्वास ठेवावा आणि आपल्या रोजच्या जीवनात त्याची इतरांना साक्ष द्दावी म्हणून प्रार्थना करू या.

जे कोणी वेगवेगळ्या पापाच्या कबरेत अजूनही पडून आहेत त्यांनी येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारावं आणि पापाचा त्याग करावा म्हणून प्रार्थना करू या.

आपल्या आजूबाजूला जे कोणी विविध आजरामुळे  निराश आणि हताश झालेले आहेत त्यांना परमेश्वराने आशेचा मार्ग दाखवावा व त्यांनी नवजीवनाचा अनुभव घ्यावा म्हणून प्रार्थना करू या.

प्रभू येशू जसा दुखःसहनाला सामोरा गेला आणि त्याने आपल्या तारणासाठी देवाची योजना स्वीकारली तसे आपण आपल्या जीवनात देवाची योजना स्वीकारावी व येणाऱ्या लहान-सहान संकटाला सामोरं जावं म्हणून प्रार्थना करू या.

५. आता आपण आपल्या वैयक्तिककौटुंबिक व सामाजीक हेतूसाठी प्रार्थना करू या. 

तुम्हा सर्वांना पास्काच्या सणाच्या हार्दीक शुभेच्छा!


          Reflection for the Homily of Easter Vigil (19/04/2025) By Fr. Rackson Dinis

पुनरुत्थान रविवार

(जागरण विधी)

दिनांक: ९/०४/२०२५

पहिले वाचन: उत्पत्ती १:१-२,

दुसरे वाचन: उत्पत्ती २२:१-१८

तिसरे वाचन: निर्गम १४:१५-१५:१

चौथे वाचन: यशया ५४:५-१४

पाचवे वाचन: यशया ५५:१-११

सहावे वाचन: बारुख ३:९-१५.३२-४:४

सातवे वाचन: यहेज्केल ३६:१६-२८

आठवे वाचन: रोमकरांस पत्र ६:३-११

शुभवर्तमान: लूक २४:१-१२

प्रस्तावना:

ख्रिस्ताठायी, माझ्या प्रिय भाविकांनो, आज संपूर्ण जगासाठी आणि विशेषरित्या  ख्रिस्ती बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज आपण पास्काचा सण साजरा करीत आहोत. पास्काचा सण म्हणजेच प्रभू येशूने मरणावरती मिळवलेला विजय. हा सण मोठ्या उत्साहाने, आनंदाने ख्रिस्ती समाज साजरा करत आहे. आजची वाचने आपल्याला "नवीन सुरुवात" ह्या विषयावर संदेश देत आहेत. आजच्या पहिल्या वाचनात देवाने बनवलेली नवीन सृष्टी कशी निर्माण केली, ह्याविषयीचा संदेश आपल्याला मिळतो. दुसऱ्या वाचनात परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी तांबडा समुद्र दुभागून मार्ग तयार केला व त्यांची फारोच्या गुलामगिरीतून सुटका केली, असे आपण ऐकतो. तिसऱ्या वाचनात यशया संदेष्टा म्हणतो, "तू एकटा नाहीस, तर देव तुझा निर्माणकर्ता तुझ्याबरोबर आहे," असे आश्वासन तो इस्रायल लोकांना देतो. तसेच रोमकरांस पत्रात आपण बाप्तिस्माद्वारे एक नवीन निर्मिती म्हणून ख्रिस्तामध्ये एकरूप होतो व नवीन जीवन जगण्यासाठी पवित्र आत्म्याद्वारे चालतो, याविषयीचा संदेश दिला जातो.

आजच्या शुभवर्तमानात येशू जिवंत आहे व त्याने मृत्यूवर विजय मिळवला आहे. अंधारातून त्याने प्रकाशाचं दार उघडलं आहे व ह्या सर्व विश्वासासाठी प्रत्येकाच्या पुनरुत्थानाचा मार्ग मोकळा केला आहे.

आजच्या ह्या मिसाबलिदानामध्ये भाग घेत असताना आपण जुनं ते मागे टाकून नव्या जीवनात चालण्यासाठी, पुनरुत्थित येशूकडे प्रार्थना करूया.

मनन-चिंतन:

"नवे आकाश, नवी पृथ्वी, नवे नवे होणार."

माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आज आपण "नवीन सुरुवात" या विषयावर मनन चिंतन करणार आहोत. ईस्टर म्हणजे अंधारात आशा शोधणे, मृत्यूतून जिवंत होणे, व जुनं ते मागे टाकून नवीन जीवनाच्या मार्गावर चालणे, असे होय. आज प्रभू येशूच्या पुनरुत्थानामुळे नव्या जीवनाची पहाट उगवलेली आहे.

नवीन जीवनाचे सुरुवातीचे रहस्य हे उत्पत्तिच्या पुस्तकात चालू झाले होते. पहिल्याने सृष्टी रिकामी व अंधारलेली होती परंतु देव म्हणाला प्रकाश होवो आणि प्रकाश झाला. तोच प्रकाश  आपण ईस्टरच्या मेणबत्तीने आज प्रत्येक चर्चमध्ये पेटवत आहोत व अंधाराला प्रकाशातून सरकवून पुन्हा एकदा आपन ही सृष्टी, सुंदर, सुशोभित व प्रकाशमय बनवत आहोत.

आजच्या ह्या दिवशी आपण नवीन पवित्र पाणी सुद्धा आशीर्वादित करतो. जुन्या करारात आपण पाहतो, जेव्हा इस्राएल लोकांची फारोच्या गुलामगिरीतून सुटका झाली, तेव्हा ते समुद्राच्या काठाशी अडकले होते. पुढे पाणी आणि मागे शत्रू, तेव्हा देवाने समुद्र दुभागून त्यांच्यासाठी मार्ग तयार केला व त्यांनी सुखरूपपणे समुद्र ओलांडला.

परंतु ज्या शत्रूंनी इस्राएल लोकांचा पाठलाग केला, त्यांचा त्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.
ह्यावरून आपल्याला समजते की प्रभूच्या नावाने आशीर्वादित केलेले पाणी किती शक्तिशाली व पवित्र असते. हे पाणी आपण आपल्या घरावर व लोकांवर शिंपडतो, कारण हे पाणी आपले शत्रूंपासून संरक्षण करत असते.

तसेच आज ईस्टरच्या दिवशी नवीन सदस्य चर्चमध्ये आणले जातात. ह्या नवीन सदस्यांबद्दल प्रभू यशया संदेष्ट्याच्या पुस्तकात म्हणतो, "मी हरवलेल्यांना पुन्हा माझ्याजवळ आणेन, तुटलेल्या हृदयात परत प्रेम निर्माण करेन. मी तुला क्षणभर सोडलं, पण आता मी तुला कायमचं जवळ घेईन." हेच प्रेम, हीच दया आपल्याला आज चर्चमध्ये पाहायला मिळते, जेव्हा नवीन सभासदांना चर्चमध्ये सामावून घेतले जाते.

आजचे रोमकरांस पत्र आपल्याला नवीन व पवित्र जीवन जगण्यासाठी बोलावत आहे.
जुने जीवन सोडून नवीन जीवनाला सुरुवात करावी, व ज्याप्रमाणे ख्रिस्त मरणांतून उठला, त्याचप्रमाणे आपणही आपल्या जुन्या वाईट सवयी सोडून नवीन जीवन जगण्यास सुरुवात करावी.

तसेच आजच्या शुभवर्तमानात देवदूत सुंदर प्रश्न कबरेजवळील स्त्रीला विचारतो: "तुम्ही का जिवंत व्यक्तीला मृतांमध्ये शोधता? तो मरणांतून उठला आहे." होय, माझ्या प्रिय भाविकांनो,
आपण सुद्धा अनेक वेळा आशेचे व आनंदाचे उत्तर अंधारात शोधत असतो. जिथे जग संपते तिथे देव नवीन मार्ग काढतो, हे लक्षात ठेवावे. आपण बोधकथेत ऐकलं, आरव मरण पावला असं सर्वांना वाटलं, लोक रडले व म्हणाले, "आता सर्व काही संपून गेलं." परंतु तीन दिवसानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण तो जिवंत होता!

अशीच घटना प्रभू येशूच्या जीवनातही घडली. शिष्य व लोक म्हणाले, "येशू मरण पावला आहे, आता सर्व काही संपले." पण तीन दिवसानंतर अचानक कबर प्रकाशाने भरून गेली व प्रभूने मरणावर विजय मिळवला.

प्रिय बंधूंनो, कितीही मोठा अंधार असो, देव नेहमी त्या अंधारातून प्रकाश निर्माण करतो. कितीही खोल वेदना असो, देव त्यातून आपल्याला नवजीवन देतो. आज ईस्टरच्या दिवशी फक्त येशू मरणातून उठला याचीच जाणीव ठेवू नये, तर आपणही आपल्या जीवनाच्या अंधारातून, हरवलेल्या आशेतून उठूयानवीन जीवनाला सुरुवात करूया.

फक्त प्रभु मध्येच आपल्याला नवजीवन आहे. कारण प्रभूचे वाचन म्हणते कि, "मीच पुनरुस्थान व जीवन आहे. " (योहान: ११: २५) तसेच संत पौल  करिंथकरास दुसऱ्या पत्रास म्हणतो कि, "जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले; पहा ते नवे झाले आहे, हो सगळी देवाची करणी आहे. (करिंथ: ५: १७-१८)

आजच्या या मिस्साबलिदानात सहभाग घेत असताना येशूच्या पुनरुस्थानावरील आपली श्रद्धा बळकट करून नवीन जीवन ख्रिस्ता मध्ये जगण्यास व त्याच्या नवया कृपा आशीर्वादाचा अनुभव घेण्यास तयार राहूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे पुनरुत्थित ख्रिस्ता आमची प्रार्थना ऐक.

१. आपले परमगुरुस्वामी फ्रान्सीसआध्यात्मिक मेंढपाळ बिशपसर्व धर्मगुरूधर्मबंधू व धर्मभगिनिंना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा अनुभव त्यांच्या कार्यात यावा. ख्रिस्ती श्रद्धावंतांना त्यांच्या श्रद्धेत व विश्वासात वाढण्यास त्यांनी आपल्या कार्याद्वारे प्रेरित करावे व स्वर्गीय नवजीवनाचा आनंद उपभोगण्यास मनोबळ द्यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

२. पुनरुत्थित येशू ख्रिस्ताच्या विजयाचाआनंदाचा व प्रकाशाचा संदेश जे धर्मगुरू व धर्मभगिनी आज इतरांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करतात त्यांना त्यांच्या कार्यात प्रभूची कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

३. आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले गेले आहेतत्यांनी आपल्या विवेकबुद्धीला जागवून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून जनतेचे प्रश्न व अडचणी जाणून घ्याव्यात व देशाच्या प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

४. सर्व धर्म सहभावसर्व धर्म स्नेहभावसर्व धर्म समीपभाव व सर्व धर्मसन्मानभाव या चौकटीवर विविध धर्मांच्या लोकांनी एकत्रित येऊन ऐकमेकांचा उध्दार व सन्मान करावागुण्यागोविंदाने नांदत राहावे व जगात शांतीचे व प्रेमाचे वातावरण निर्माण करावेम्हणून आपण प्रार्थना करू या.

. आपल्या कौटुंबिक व सामाजिक गरजेसाठी प्रार्थना करू या.



Wednesday, 16 April 2025

Reflection for the Good Friday (18/04/2025) By Br. Criston B. Marvi

शुभ-शुक्रवार

दिनांक: १७/०४/२०२५

पहिले वाचन: यशया ५२:१३-५३:१२.

दुसरे वाचन: इब्रीलोकांस पत्र ४:१४-१६, ५:७-९.

शुभवर्तमान: योहान १८:१-१९:४२.

प्रस्तावना:

आज आपण प्रभुच्या दुःखसहनाचा शुक्रवार साजरा करत आहोत ज्याला शुभ शुक्रवार असे म्हटले जाते.

प्रभुने मानवाच्या तारणासाठी दुःख व मरण पत्करले व आम्हाला पुनरुत्थानाचा मार्ग दाखवला. ह्याच प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या अति पवित्र पाण्याने व अति पवित्र रक्ताने पापी मानवाची मुक्तता करून संपूर्ण मानव जातीला तारण प्राप्त करून दिले.

आजच्या या मंगल विधीसाठी आपण एकत्र जमलेलो असताना आजच्या या तीन विधीमध्ये भक्ती भावाने सहभाग घेऊया.

भाग पहिला प्रभू शब्द वधी. येथे आपण सामान्य व विविध हेतूनसाठी प्रार्थना करणार आहोत.

भाग दुसरा पवित्र क्रुसवंदना. दुसऱ्या भागात दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार क्रुसदर्शनाचा दुसरा प्रकार क्रुसवंदनाचा.

भाग तिसरा.  ह्या तिसऱ्या भागात पवित्र ख्रिस्त शरीर वाटप केले जाईल.

म्हणून आजच्या या पवित्र विधीत भक्तीभावाने व प्रार्थनामय वातावरणात सहभाग घेऊया व प्रभूयेशुच्या दुःखसहनात सामील होऊया 

मनन चिंतन:

मला तहान लागली आहे

आजच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखसहनात आपण ऐकले की, येशू ख्रिस्ताने क्रुसावरून उच्चारलेल्या शेवटच्या सात शब्दांपैकी एक शब्द तो म्हणजे मला तहान लागली आहे. दोन हजार वर्षा अगोदर कदाचित येशू ख्रिस्ताला पाण्याची तहान लागली असेल. परंतु प्रिय बंधू भगिनीनो आजही हेच शब्द आपण ऐकत आहोत. तर खरोखर आजही येशू ख्रिस्ताला पाण्याची तहान लागलेली आहे, की दुसरी कुठली तहान लागली आहे? ह्यावर खरोखर आपण आज न चिंतन करायला हवे.

येशू ख्रिस्त जेव्हा तहानलेला होता तेव्हा त्याने याकोबाच्या विहिरीजवळ येऊन समारिया स्त्री कडे पिण्यासाठी पाणी मागितले (योहान ४:). यावरून आपल्याला दिसून येईल की मानव या कारणाने येशूला शारीरिक तहान लागली होती. अनेक अशे कष्ट, यातना सहन केल्यावर व थकलेल्या व भागलेल्या येशूला पाण्याची तहान लागली असावी. हाच येशू जेव्हा वधस्तंभवर होता तेव्हा तो पाण्याच्या थेंबासाठी व्याकुल झाला असावा म्हणून त्यांने म्हटले असावे मला तहान लागली आहे”. आज सुद्धा येशू वधस्तंभावर असताना म्हणत असेल की, मी तहानलेला आहे. कारण आजच्या आधुनिक जगात आपण पाहतो की, पाण्याचा गैरवापर खूप प्रमाणात होत आहे. पाणी वाया घालवले जाते. बऱ्याच ठिकाणी पाण्याची कमतरता आहे. तसेच पाणी दषित केले जाते. व त्याच पाण्याच्या अभावामुळे अनेकांचे तहानेने जीव जात आहेत. अशा लोकांची तहान कोण भागवणार? फक्त येशू ख्रिस्तकी जो जिवंत पाण्याचा झरा आहे. त्याच्याच सेवनाने प्रत्येकाची खरी तहान तृप्त होणार. परंतु तोच येशू ख्रिस्त आज तहानलेला आहे व कशासाठी? तसेच कसली ही तहान असावी? येशूला आध्यात्मिक तहान लागली होती.

जर का आपण लूकलिखित शुभ वर्तमानात (२३:४३) पाहिले तर आपल्याला समजून येते की, येशू ख्रिस्त क्रुसावर टांगलेला असताना त्याने त्याच्या उजव्या हाताकडील चोराला म्हटले, मी तुला खचित सांगतो की, आज तू माझ्याबरोबर स्वर्गात असशीलआणि त्याच्यानंतर आपण योहानाच्या शुभ वर्तमानात पाहतो (१९:२८) येशू ख्रिस्ताचे शब्द “मला तहान लागली आहे”. एकदम शेवटच्या घटकेपर्यंत येशू ख्रिस्त आपल्यासाठी तहानलेला आहे जेणेकरून आपण आपल्या पापांची कबुली देऊन देवाकडे वळावे म्हणून येशू ख्रिस्त आपल्याला पश्चाताप करण्यास बोलावत आहे.

आजही येशू ख्रिस्ताला तहान लागत आहे. आज आपण जगात पाहतो की उष्णता वाढत आहे. जमीन कोरडी होत आहे. परंतु आपण जेव्हा उष्णता म्हणतो तेव्हा कसली ती उष्णता असेल हे सर्वप्रथम आपण स्वतःला विचारायला हवे. ती सूर्याची उष्णता असेल की आपल्या पापांची उष्णता असेल? आणि जेव्हा आपण कोरडी जमीन म्हणतो तेव्हा कोणती ती कोरडी जमीन असेल? शेतातली कोरडी जमीन की चर्च मधली कोरडी जमीन, जिकडे आपल्या पापांमुळे आपण चर्च मध्ये जात नाही किंवा कामामध्ये मग्न राहून देवापासून दूर जातो. येशू ख्रिस्त वधस्तंभावार असताना म्हणाला, “मला तहान लागली आहे”. येशू ख्रिस्ताला पापी लोकांच्या आत्म्याची तहान लागली होती. आणि आपल्याला देवाच्या भेटीची तहान लागली पाहिजे. येशू ख्रिस्त मानवाच्या तारणासाठी तहानलेला होता. आजही प्रभू येशू मानवाची मुक्ती व्हावी त्याचे खरे तारण व्हावे म्हणून पापी मनुष्याच्या शोधात आहे.

दोन हजार वर्षा अगोदर कदाचित येशू ख्रिस्ताला पाण्याची तहान लागली असेल परंतु मानव ती तहान तृप्त करू शकला नाही. कारण मानवाला पापांची तहान लागली होती. म्हणून तो देवापासून दूर गेला आणि देवाच्या पुत्राची तहान तृप्त करू शकला नाही. आजही येशू ख्रिस्ताला तहान लागली आहे. व ती मानवाच्या पश्चातापाची आहे. आज मानव काय करत आहे हे मानवाला सुद्धा कळत नाही म्हणूनच येशू ख्रिस्त वधस्तंभावरून उच्चारून सांगतो की, “हे बाबा त्यांना क्षमा कर कारण ते काय करत आहे हे त्यांना समजत नाही” (लूक २३:३४).

माझ्या प्रिय बंधू भगिणीनो येशू ख्रिस्ताला लागलेली मानवाच्या पश्चातापाची- क्षमेची तहान आपण कशाप्रकारे भागवू शकतो? यावर आपण मनन चिंतन करूया. ही तहान भागवण्यासाठी आपल्याला एका दूरवर तिर्थस्थानात जाऊन भेट देणे किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला दान देऊन करणे नाही, तर आपल्या स्वतःच्या घरात, कुटुंबात, आपल्या स्वतःच्या परिवर्तनाने आपण ही तहान भागवू शकतो. आज देवाला आपल्या परिवर्तनाची गरज आहे. जेव्हा आपण आपल्या जीवनाचे परिवर्तन करू तेव्हाच आपण देवाच्या सानिध्यात राहू शकतो.

देवाला प्रसन्न करण्याचा मार्ग म्हणजे स्वतःचे परिवर्तन करणे आहे. देव आम्हा सर्वांवर प्रेम करतो कारण देव प्रेम आहे. देवाचे प्रेम हे पाण्यासारखे आहे. ज्याच्यामध्ये आपण पडू शकतो, आपण पोहू शकतो, आपण त्याच्यातून अनुभव घेऊ शकतो, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण त्याच्या विना राहू शकतच नाही. प्रिय भाविकानो देव त्याचे प्रेम हे तहानलेल्या मानवासाठी मोफत देत असतो परंतु मानव हा नेहमी तहानलेला राहणे पसंत करतो. म्हणून आजच्या या प्रभूयेशूच्या दुःखसहनात सहभाग घेताना देवाचा अस्सिम प्रेमाचा अनुभव घेऊया व आपल्या स्वतःच्या परिवर्तनाने देवाच्या अधिका अधिक जवळ राहून त्याची तहान भागवण्यास तत्पर राहूया.