Reflection for the Fifth Sunday of Lent (06/04/2025) By:
Fr. Pravin Bandya
दिनांक: ०६/०४/२०२५.
पहिले वाचन: यशया ४३:१६-२१.
दुसरे वाचन: फिलीपौकरांस पत्र ३:८-१४.
शुभवर्तमान: योहान ८:१-११.
प्रस्तावना
आज आपण
प्रायश्चित काळातील पाचवा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या उपासनेत पुन्हा एकदा आपण
परमेश्वराचे मानवावर असलेले प्रेम व दया ह्याविषयी ऐकत आहोत. परमेश्वराने आपणास
त्याच्या प्रतीरुपासारख निर्माण केले आहे
(उत्पत्ती १:२७); म्हणून तो आपणावर अमर्यादित प्रेम करतो. आपण सर्वजण पापी आहोत,
तरीही तो आपणास प्रायश्चित करण्याची आणखी संधी देतो. कि जेणेकरून आपण प्रायश्चित
संस्कार स्वीकारून पुन्हा त्याच्याकडे जाऊ.
आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा सांगतो कि, परमेश्वर आपला
उद्धारकर्ता आहे. जो आपल्याला अंधारातून बाहेर काढतो आणि प्रकाशात आणतो; जो
पाण्यातून आणि नद्यांतून मार्ग काढतो; आणि तोच परमेश्वर त्याच्या लोकांना
बंदिवासातून बाहेर काढून एका नवीन भूमीत घेऊन जाईल. हे आपणास आठवण करून देते कि, देव अगदी कठीण
काळातही नेहमीच आपल्यासोबत असतो. दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो कि, “खरोखर, माझा
प्रभू ख्रिस्त येशूला ओळखण्याचा श्रेष्ठ मुल्यामुळे मी सर्वकाही तोटा मानतो”. हे
आपणास आठवण करून देते कि ख्रिस्ताचा आपला पाठलाग हा आपला सर्वोच्च प्राधान्य असला
पाहिजे आणि इतर गोष्टी दुय्यम मानल्या पाहिजे. तसेच आजच्या शुभवर्तमानात ख्रिस्त
दाखल्याद्वारे आपणास परमेश्वराचे आपणावर असलेलं प्रेम दाखवत आहे. आपण पापी असून
देखील परमेश्वर आपणावर प्रेम करतो; हे त्या व्यभिचारी स्त्रीला क्षमा करून ख्रिस्त
परमेश्वराचे प्रेम व दया दाखवत आहे. ह्या उत्तम संधीचा लाभ घेऊया व प्रायश्चित
संस्कार स्वीकारण्यास आपल्या मन-अंतःकरणाची तयारी करूया.
मनन
चिंतन
रविवारचा दिवस
होता, आम्ही तीस ते पस्तीस मुल-मुली धर्मशिक्षणाच्या वर्गात गप्पा मारत होतो.
तेव्हा फादर जेम्स आमच्या वर्गात आले; आम्ही सर्वांनी त्यांना सकाळच्या शुभेछ्या
दिल्या. फादारांनी एक-दोन विनोद केले ज्यावर आम्ही सर्वजण हसलो. तेव्हा फादर बोलले
कि, चला आपण एक खेळ खेळू. आम्ही सर्वांनी होकार दिला. फादर बोलले कि, “मी काही
शब्द उचारणार आणि जर का तुम्ही त्या प्रमाणे वागत असणार, तर तुम्ही स्वःतावर बोट
दाखवा आणि जर त्या प्रमाणे वागत नसाल तर जो कोणी तो किंवा ती व्यक्ती त्याप्रमाणे असेल
त्यांच्यावर तुम्ही तुमचे बोट करा. पुन्हा एकदा आम्ही सर्वांनी होकार दिला. तेव्हा
फादर बोलले, “हुशार कोण आहे?”. आम्ही सर्वांनी आम्हा स्वतःवर बोट दाखवले. फादर
बोलला, “शहाणा कोण आहे?” पुन्हा एकदा आम्ही सर्वांनी आम्हा स्वतःवर बोट दाखवले.
पुन्हा फादर बोलला, “चोर कोण आहे?” तेव्हा आम्ही इतरांवर बोट दाखवले. ह्यावर फादर
बोलला कि, थोडावेळ तुमचे हात तशेच ठेवा आणि एकदा तुमच्या हाताकडे पहा. एक बोट
तुम्ही इतरांकडे दाखवले आहे; परंतु तीन बोटे तुम्ही स्वतः तुम्हावर दाखवली आहेत;
आता मला सांगा कि तुमच्यात चोर कोण? त्या वेळेला आम्हाला समजलं कि, जेव्हा आपण एक
बोट इतरांवर दाखवतो तेव्हा तीन बोटे आपण स्वतःवर दाखवतो; म्हणजे जेव्हा आपण
इतरांना दोषी ठरवतो, तेव्हा आपण स्वतः दोषी ठरतो. हा उत्तम धडा मी आठ ते नऊ
वर्षाचा असतांना त्या फादरांकडून शिकलो.
मत्तय ७:१ मध्ये ख्रिस्त सांगतो कि, “तुम्ही इतरांचे दोष काढू
नका म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही”. तसेच मत्तय ७: १२ मध्ये ख्रिस्त
सांगतो कि, “लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे, तसेच
तुम्हीही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र आणि संदेष्टग्रंथ ह्याचे सार हेच
आहे.” मराठीत एक सुंदर म्हण आहे, “स्वतःच ठेवा झाकून आणि दुसऱ्यांच पहा
वाकून.” म्हणजे आपण स्वतःचे दोष नेहमी झाकून ठेवतो व इतरांना दोषी ठरवतो. आपण
स्वतःला संत समान समजतो व इतरांना पापी समजतो.
आजच्या शुभवर्तमानात अशाच प्रकारच चित्र आपण पाहतो. काही
शास्त्री व परुशी एका स्त्रीला येशूकडे आणतात व तिच्यावर दोषारोप करतात कि, “ही
स्त्री व्यभिचार करत असता धरण्यात आली. मोशेच्या आज्ञे प्रमाणे हिला दगड मार केला
पाहिजे; परंतु आपण तिच्याविषयी काय म्हणता?” ख्रिस्त त्यांचे विचार, त्यांचे
अंतःकरण अगोदरच ओळखून होता. त्यांना एका दगडात दोन पक्षी मारायचे होते; एकाच
वेळेला त्या स्त्रीला व ख्रिस्ताला देखील दोषी ठरवायचं होत. कारण जर का ख्रिस्ताने
त्या स्त्रीला मोशेच्या आज्ञेप्रमाणे शिक्षा देण्यास सांगितले, तर तो स्वतःच्या शिकवणुकी
विरूद्ध शिकवतो किंवा वागतो म्हणून त्याला दोषी ठरवतील (कारण ख्रिस्ताची शिकवण ही
प्रेमाची शिकवण होती), आणि जर का त्याने देवप्रेमाखातर त्या स्त्रीला सोडलं तर
मोशेच्या आज्ञे विरुद्ध जाण्यास ते त्याला दोषी ठरवतील. अशा प्रकारचं त्याचं
षडयंत्र ख्रिस्त अगोदरच जाणून होता. म्हणून तो त्यांना प्रश विचारतो कि, “तुमच्या
मध्ये जो कोणी निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड फेकावा?” ख्रिस्ताचे हे
शब्द ऐकून लहानापासून ते थेट थोरांपर्यंत सर्व तेथून निघून गेले; फक्त ती स्त्री
आणि ख्रिस्त हे दोघेच तिथे राहिले. कारण ह्या जगात असा एकही व्यक्ती नाही कि जो
निष्पाप किंवा नीतिमान आहे. हेच संत पौल रोमकरांस ३:१० मध्ये म्हणतो कि, “शास्त्रात
असे लिहिले आहे कि, ‘नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही.” परंतु आजचं
शुभवर्तमान आपणास सांगत कि, “सर्व निघून गेले फक्त ख्रिस्त व ती स्त्री तेथे
राहिली”. ह्याचा अर्थ ती स्त्री त्या घटकेपासून नीतिमान झाली. आणि हे आपणास
दाखवून देते कि, जेव्हा आपण ख्रिस्ताकडे पश्चातापी अंतःकरणाने जातो, तेव्हा तो
आपल्या सर्व अपराधांची क्षमा करतो; तो आपणास निष्पाप व नीतिमान बनवतो.
शास्त्री आणि परुश्यांच्या दृष्टीने, ती स्त्री पापी होती, तिला मृत्युदंडाची शिक्षा देण्यास येशूकडे आणले होते, परंतु येशूच्या दृष्टीने, ती स्त्री निष्पाप होती. आपण पाप्यांशी कसे वागतो आणि देव
त्यांच्याशी कसा वागतो यातील फरक यावरून अधोरेखित होतो. परुश्यांच्या हातातील दगड
हे दाखवतात की मानव किती क्रूर असू शकतात, तर येशूच्या हृदयातील दया आपला देव किती प्रेमळ आहे हे
दाखवते. आपल्याला दोन परस्परविरोधी वैशिष्ट्ये दिसतात: मानवी क्रूरता (दगडमार करून
मारण्याची शिक्षा) आणि दैवी दया (बरे करणारे क्षमाशील प्रेम). परुशांकडे दोषी
ठरवण्यासाठी कायद्याचे दगड होते, तर येशूकडे क्षमा
करण्यासाठी प्रेमाचे हृदय होते. एक गोष्ट लक्षात ठेऊया, निर्जीव दगडापेक्षा
प्रेमहीन हृदय अधिक हानिकारक असते.
विश्वासू
लोकांची प्रार्थना
प्रतिसाद: “हे प्रभो, आम्हांला तुझ्या दयेचे
प्रतिक बनव.”
१.आपले परमचार्य, पोप फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू-भगिनी व
सर्व प्रापंचिक यांच्या कार्याद्वारे, येशू ख्रिस्ताच्या दयेची ओळख
संपूर्ण जगाला मिळावी म्हणून प्रभूकडे आपण प्रार्थना करूया.
२. ज्या विश्वासू
लोकांनी कॅथोलिक संस्कार स्वीकारून देवाच्या कराराशी अतूट नाते जोडले आहे, अशांना आप-आपल्या
कुटुंबात प्रेमाने व दयेने राहण्यास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. नवीन विवाहबद्ध
झालेल्या जोडप्यांनी एकमेकांना दिलेल्या वचनांचे पालन करून, एक दुसऱ्यांना
समजून घेऊन एक चांगले ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या गावात, धर्मग्रामामध्ये
व कुटुंबात जे लोक क्षमा करण्यास अशक्त आहेत, अशांना व इतरांना क्षमा
करण्यास प्रभूकडून प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत
राहून आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment