Reflection for the Maundy
Thursday (17/04/2025) By Dn. Jostin Pereira
आज्ञा गुरुवार
दिनांक – १७-४-२०२५
पहिले वाचन: निर्गम १२:१-८, ११-१४
दुसरे वाचन: १ करिंथ. ११:२३-२६
शुभवर्तमान: योहान १३:१-१५
प्रस्तावना
प्रिय भाविकांनो, आज आपण आज्ञा
गुरुवार म्हणजेच पवित्र गुरुवार साजरा करत आहोत. या विधीसाठी तुमचे हार्दिक
स्वागत. आजच्या उपासनेमध्ये आपण तीन गोष्टी प्रामुख्याने साजऱ्या करतो; त्या म्हणजे,
१) पवित्र मिस्साबलीची
स्थापना,
२) धर्मगुरूपदाची
स्थापना, आणि
३) प्रेमाची नवीन आज्ञा.
आपण पवित्र आठवड्यामध्ये
पदार्पण केले आहे. आणि पुढचे तीन दिवस आपण
येशूचे दुःख, मरण, व पुनरुत्थान हे जवळून
अनुभवणार आहोत. आजच्या पहिल्या वाचनाद्वारे मेंढराचे रक्त
शिंपडल्यावर देवाच्या लोकांची रक्षा कशाप्रकारे होते हे आपण
ऐकणार आहोत. तर, दुसरे वाचन आणि शुभवर्तमान ह्याद्वारे आपण
पहिल्या वचनातील मेंढराचे स्थान हे प्रभू येशू ख्रिस्त स्वतः घेऊन आपल्या प्राणाची
आहुती देण्यापूर्वी आपल्या बलिदानाची पूर्वकल्पना शिष्यांना देतो. मृत्यूला न
डगमगता, धैर्याने व
नम्रतेने आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा जाणून घेऊन येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसमवेत
शेवटचे सहभोजन घेतो. या सहभोजनाच्या वेळी
प्रेमाची एक नवीन आज्ञा आज या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या समोर ठेवत आहे.
त्याच्या प्रेमाचा स्वीकार
करून आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी इतरांवर प्रेम करावे आणि देवाच्या आज्ञेमध्ये राहून
नेहमी इतरांची सेवा करावी म्हणून आजच्या मिस्साबलिदानामध्ये विशेष
प्रार्थना करूया.
मनन
चिंतन
“हे माझ्या
आठवणीसाठी करा.”
ख्रिस्ताने त्याच्या
शिष्यांबरोबर शेवटचे भोजन केले. त्यावेळेस तो जुन्या करारातील वल्हांडणाचा सण
साजरा करत होता. ‘हे माझे शरीर आहे हे तुम्ही घ्या व खा, हे माझे रक्त आहे
हे तुम्ही घ्या व प्या.’ या पवित्र शब्दाने येशूने वल्हांडणाच्या भोजनाचे परिवर्तन
त्याच्या शरीर व रक्ताचा सोहळ्यात केले. त्याच्या स्मरणार्थ हा सोहळा दररोज साजरा
केला जातो. प्रभू येशूच्या पुनरागमनापर्यंत त्याच्या मृत्युची घोषणा केली जाईल, व या भक्तीतून
सार्वकालिक जीवनाचा करारच आपण साजरा करत असतो. त्याचा समय जवळ आला असता त्याने
त्याच्या शिष्यांवर शेवट पर्यंत प्रेम केले. आपल्या मित्रांकरिता त्याने आपला
प्राण दिला व मित्रांवर म्हणजेच त्याच्या शिष्यांवर असलेले प्रेम त्याने प्रकट
केले. जशी त्याने प्रीती केली तशी आपणही प्रीती करू या.
“तू याजक
युगा-युगाचा जगतातुनी मी तुला निवडीले.”
संत अगस्तीन म्हणतो, माझ्या समोर देवदूत व धर्मगुरू आले तर प्रथम मी धर्मगुरूंना व नंतर देवदूतांना वंदन करीन कारण, धर्मगुरू प्रतिख्रिस्त आहेत. त्यांच्या हाताने पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ते येशूला उपस्थित करतात. ख्रिस्तीजनांना तेच हात कम्युनियन देत असतात. खरोखर आपलं भाग्य आहे की आपल्यासाठी धर्मगुरू आहेत. ते आपल्यासाठी साक्रामेंत साजरे करतात व परमेश्वराची अदृश्य कृपा घेऊन येत असतात. त्यांचे दुर्बल हातच कृपेचा झरा बनतात. अपात्र असूनही ईश्वरी कृपेमुळे ते उपासना विधी साजरा करतात. आपण धर्मगुरूंसाठी प्रार्थना करायला हवी. जे आजारी आहेत, एकाकी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करायला हवी. आपल्या धर्मग्रामात सेवा करतात त्यांना सहकार्य करायला हवे. आज खरोखर धर्मगुरूंसाठी प्रार्थना करणे, त्यांची काळजी घेणे, त्यांना सहकार्य करणे, हे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचे कर्तव्य आहे. एक बाई बिशपांकडे आली. स्थानिक धर्मगुरूबद्दल त्यांच्याकडे तिने तक्रार केली व म्हटले, आमच्या धर्मग्रामासाठी तरुण व तडफदार धर्मगुरू पाठवा. बिशपांनी त्या महिलेला म्हटले, तरुण, तडफदार धर्मगुरू माझ्याकडे नाही, तुम्ही तुमचा मुलगा मला देऊ शकता का?. त्या बाईने उत्तर दिले की 'मला एकच मुलगा आहे, मी त्याला फादर होण्यासाठी कसे पाठवू.' बिशपही त्या बाईला म्हणाले 'माझ्याकडे जे धर्मगुरू आहेत त्यांनाच मी पाठवू शकतो. तुम्ही त्यांना सहकार्य करा तुमच्या धर्मग्रामात नवचैतन्य नांदेल.'
"नवीन आज्ञा
तुम्हास माझी..."
आजच्या दिवशी ख्रिस्ताने
आपल्याला नवीन आज्ञा दिली आहे: “तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. जशी मी तुम्हावर
प्रीती केली आहे, तशीच तुम्हीशी एकमेकांवर
प्रीती करा.” (योहान: १२:३४) त्याहीपेक्षा त्याने आपल्याला प्रभू भोजन व गुरुपदाची
उत्तम देणगी दिली आहे. पवित्र मिस्सा हाच आपल्याला एकमेकांची सेवा करण्यास कृपा
देत असतो. जसे झऱ्यातून पाणी वाहत असते, तशी प्रीती व सेवा पवित्र
मिस्सातून सतत पाझरत असते.
ख्रिस्ताने प्रेमाचा हा संदेश
संपूर्ण जगासमोर ठेवला. जेव्हा त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतले. आज ख्रिस्ताच्या
प्रेमाची व सेवेची शिकवण आत्मसात करून चांगले खिस्ती जीवन जगण्यास प्रभूकडे विशेष
प्रार्थना करूया.
विश्वासू
लोकांची प्रार्थना
प्रतिसाद: “हे
प्रभू आमची प्रार्थना ऐक.”
१. ज्या प्रमाणे
ख्रिस्ताने आपल्या शिष्यांचे पाय धुवून एक आदर्श सेवेचा महामंत्र दिला, त्याचप्रमाणे पोप
सर्व महागुरू व धर्मगुरू ख्रिस्तसभेची सेवा करुन आपल्या समोर सेवामय जीवन जगुन एक
आदर्श ठेवत आहेत. ख्रिस्ताप्रमाणे त्यांनी ख्रिस्तसभेची सेवा अखंडित करत असता
आपणास त्यांच्यात ख्रिस्त दिसावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. सर्व जगातील
ख्रिस्ती व विविध पंथातील लोकांनी जरी आपण वेगवेगळ्या पंथाचे असलो तरी ख्रिस्ताने
दिलेला सेवेचा मूलमंत्र अंगीकारून तो आपल्या दैनंदिन जीवनात आत्मसात करावा म्हणून
आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या सर्व भारत
देशवासीयांनी ख्रिस्ताप्रमाणे बंधू-प्रेमाची भावना जोपासून आपापसातील असलेले वाद, गैरसमज विसरून
शांती व सलोख्याने एकत्रीत जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या मुलांना
ख्रिस्ताने केलेल्या सेवेची ओळख व्हावी व त्यांनीही प्रभूसेवेसाठी देवाच्या हाकेला
प्रतिसाद देऊन त्याच्या लोकांची सेवा करण्यासाठी स्वखुशीने पुढे यावे म्हणून आपण
प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत
राहून आता आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक
गरजांसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment