Reflection for the Palm Sunday (13/04/2025) By
Fr. Rakesh Ghavtya.
झावळ्यांचा रविवार
दिनांक: १३/०४/२०२५
पहिले वाचन: यशया ५०:४-७
दुसरे वाचन: फिलीपैकरांस पत्र २:६-११
शुभवर्तमान: लूक २२:१४-२३:५६
प्रस्तावना
आज आपण प्रभूयेशूच्या
दुःखसहनाचा रविवार साजरा करत आहोत. ह्या रविवाराला झावळ्यांचा
रविवार असेही
संबोधले जाते. तसेच, आज आपण पवित्र आठवड्यात पदार्पण
करतो. आजची उपासना आपल्याला प्रभू येशूच्या दुःख, मरण व पुनरुत्थान या
रहस्यांवर मनन-चिंतन करण्यास आमंत्रित करत आहे. येशूने दुःख, यातना व
मरण जगाच्या
उद्धारासाठी सहन केले आणि पुनरुत्थानाचा मार्ग मोकळा
केला.
आजच्या उपासनेचा हेतू
हाच आहे की, आम्ही
प्रभू येशूच्या नम्रता व सहनशीलतेचा आदर्श
अंगी बाळगावा. किंबहुना, प्रभूयेशूच्या नम्रता व सहनशीलतेच्या गुणांचा अनुभव घेऊन
आम्ही आमचे जीवन ख्रिस्ताप्रमाणे जगावे.
या मिसा-बालिदानात
सहभाग घेत असताना, प्रभूयेशुच्या दुःखसणावर सखोलपणे
मनन-चिंतन करूया व भक्तिभावाने त्याच्या
रहस्यात समरस होऊन, आपल्या जीवनाची पडताळणी करून कृपेचे जीवन जगण्यासाठी विशेष
कृपा व आशीर्वाद मागूया.
मनन चिंतन
प्रभूच्या नावाने येणारा राजा!
धन्यवादित असो!
स्वर्गात शांती, आणि उध्वलोकी गौरव! (लूक
१९:३८)
आजचा हा रविवार म्हणजे आनंद आणि
दुःख यांचे
मिश्रण! आनंद यासाठी की, प्रभू येशूचा यहुदी लोकांनी जयजयकार केला आणि दुःख
यासाठी की, याच
लोकांनी येशूचा तिरस्कार केला व त्याला नाकारले. एका क्षणी जयजयकार आणि
दुसऱ्या क्षणी धिक्कार, अपमान व विरोध! खरं पाहिलं, तर एकच दिवस प्रभूच्या
सन्मानासाठी होता व त्यानंतर त्याला
दुःखाच्या दरीत टाकण्यात आले.
ख्रिस्त आमचा
तारणकर्ता होता आणि तारणकर्ता म्हणून त्याला दुःख, मरण आणि
पुनरुत्थान या अवस्थांतून जाणे अगत्याचे होते. याचसाठी ख्रिस्ताने
मोठ्या विजयाने येरूसलेमच्या पवित्र नगरीत प्रवेश केला. ज्या प्रवेशाने
आमच्या तारणकार्याला सुरुवात झाली. त्या प्रवेशाचे आपण भक्तिभावाने स्मरण करतो व
ख्रिस्ताबरोबर श्रद्धेने मार्गक्रमण करतो, हे आपण आजच्या उपासनेत ऐकतो.
आजची उपासना आपल्याला प्रभू
येशूच्या नम्रता व सहनशीलता या दोन
पैलूंवर चिंतन करण्यास पाचारण करते. त्याचबरोबर, आजच्या तिन्ही
वाचनांमधून आपल्याला हाच संदेश मिळतो की, परमेश्वरासाठी
सर्वकाही नम्रतेने सहन करावे, हीच परमेश्वराची इच्छा पूर्ण करणे आहे.
पहिल्या
वाचनात, यशया संदेष्टा
म्हणतो की, “मी
परमेश्वरासाठी नम्रतेने व विनयशीलतेने सर्व अपमान व तिरस्कार सहन केला. कारण
परमेश्वर माझ्या सहाय्यास आहे, यावर माझी श्रद्धा आहे.”
दुसऱ्या
वाचनात, संत पौल फिलीपिकरास
लिहिलेल्या पत्रात प्रभूयेशुविषयी सांगतो कि, प्रभू
येशू, देव असूनही त्याने दास्यत्व स्वीकारले.
तो आम्हासाठी रिक्त झाला, लीन झाला व आम्हापुढे नम्रतेचे
व सहनशीलतेचे उदाहरण ठेवले. म्हणूनच देवाने त्याला अत्युच्च केले.
आजच्या
शुभवर्तमानात, संत लुक प्रभू येशूच्या दुःखसहनाबद्दलची घटना कथन
करतो. जे शिष्य त्याच्याबरोबर राहिले, त्यापैकीच एकाने
त्याला विकले, दुसऱ्याने
नाकारले आणि तिसऱ्याने त्याचा घात केला. तरीही हे सर्व येशूने नम्रतेने सहन केले.
प्रभू येशूने कोणालाही दोषी ठरवले नाही, परंतु त्यांना जीवन
बदलण्याची संधी बहाल केली.
प्रभू येशूच्या संपूर्ण दुःखसहनाच्या मार्गात
आपल्याला पुढील गोष्टी दिसून येतात:
१. प्रभू
येशूचे स्वतःवर नियंत्रण होते.
२. त्याने
देवाच्या इच्छेला प्राधान्य दिले.
३.
देवासाठी नम्र अंतःकरणाने सर्व काही सहन केले.
प्रभू येशूने पापरहित असूनही, आम्हा
पाप्यांकरिता स्वेच्छेने दुःख सहन केले. निर्दोष असूनही, आपल्याला
दोषमुक्त करण्यासाठी त्याने मरण स्वीकारले. त्याच्या मरणाने आपली पापे
नष्ट झाली. आपल्या पुनरुत्थानाने त्याने आम्हाला आध्यात्मिक
नवजीवन मिळवून दिले.
हाच तर आजच्या उपासनेचा खरा अर्थ आहे.
जरी प्रभू येशूला ठाऊक
होते की, जी प्रजा
"होसान्ना!" म्हणत जयजयकार करत होती, तीच लोकं पुढे पलटवार
करणार, तरी
येशूने त्यांना रोखले नाही. याच लोकांनी आपल्या मुखाने येशूची स्तुती केली, घोषणा करत
म्हणाले, “होसान्ना, दावीदाचा
पुत्र!” पण त्यांनीच पुढे “त्याला वधस्तंभी
खिळा!” “त्याला ठार मारा.” असे म्हटले. ज्या लोकांनी येशूचे स्वागत केले, त्याच लोकांनी
त्याचा तिरस्कार केला. कारण त्यांनी येशूला अध्यात्मिक तारणारा मसीहा म्हणून
ओळखले नाही. खरे पाहता ज्या तरणारयाची यहुदी लोक वाटत पाहत होते, त्यांची
अपेक्षा अशी होती कि, येणारा मसीहा राजेशाही रुपात
येईल, घोड्यावर राजेशाहि
पद्धतीने थाटामाटात गाजत-वाजत येईल. परंतु येशूने राजासारखा
घोडा न निवडता, येशू गाढवावर बसून आला व त्याने मंदिरात प्रवेश केला. हाच
होता प्रभू
येशूचा खरा नम्रपणा.
परंतु हे यहुदी
लोकांच्या विचारसरणीच्या पलीकडे होते. त्यांना वाटायचं की, तारणारा
मसीहा हा ऐश्वर्यात येईल. यास्तव , यहुदी लोकांनी येशूला
आपला तारणारा मसीहा म्हणून स्वीकारले नाही.
आज ‘झावळ्यांचा
रविवार’ आपल्याला हीच आठवण करून देतो की, ख्रिस्त
हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा व हृदयाचा खरा राजा आहे. तो आपल्या
कुटुंबाचा व संपूर्ण विश्वाचा राजा आहे.
पोप फ्रान्सिस यांनी म्हटलं
आहे की, “ख्रिस्त
एक नम्र व
शांतीप्रिय राजा म्हणून येरुसलेमेत दाखल झाला व तोच सर्व द्वेष, हिंसाचारापासून
मानवतेला वाचवू शकतो.”
आपले रोजचे जीवन
जगताना, जरी
आपल्याला असंख्य अशा त्रासांना, वेदनांना, त्रास, छळांना सामोरे
जावे लागले, तरी ते आनंदाने
सहन करावे व
जीवनात खचून न जाता, “माझ्याबरोबर चाला” म्हणजे तुमच्या
दुःखाचे सुखात व मरणाचे पुनरुस्थानात रुपांतर होईल. असे येशूला प्रकट करायचे असेल,
यात शंका नाही
आज प्रभू येशूच्या दुःखसह्नाच्या रविवारच्या, उपासनेत सहभाग घेत असताना, प्रभू येशूच्या दु:ख, मरण व पुनरुस्थानावर मनन चिंतन करून नम्रता व सहनशीलतेचा आदर्श प्रभू येशुकडून घेऊन कृपेचे जीवन जगण्यास विशेष प्रार्थना करूया
विश्वासू लोकांची प्रार्थना
आपला प्रतिसाद :- हे
प्रभू आमची प्रार्थना ऐक.
धर्मगुरू: प्रिय
भाविकांनो, प्रभू
येशूने येरूसलेममध्ये
प्रवेश करून
आपल्या दुःखसहणाच्या
विधीला आरंभ
केला. या पवित्र आठवड्यात प्रवेश करताना, आपण प्रभू येशूच्या दुःखसहनात सहभागी
होऊया व आपल्या सर्व विनंत्या व गरजा त्याच्या चरणाजवळ भेटूया.
१. आपले पोप महाशय
फ्रान्सिस, धर्मगुरू, धर्मभगिनी
व प्रापंचिक यांना प्रभू येशूच्या दुःखसहनाच्या रहस्यातून शक्ती व
सामर्थ्य लाभो. इतरांच्या दुःखांवर व अडचणींवर मात करण्यासाठी ईश्वरी
प्रेरणा लाभो, म्हणून प्रार्थना
करूया.
२. पवित्र
आठवड्यातील सर्व धार्मिक विधींमध्ये सहभागी होताना, आम्हाला देवाच्या
अस्तित्वाची जाणीव व्हावी. त्याचबरोबर आमच्या विश्वासात
व श्रद्धेत वाढ होवो, म्हणून प्रार्थना
करूया.
३. जे लोक देउळमातेपासून
दुरावलेले आहेत, जे जीवनात
निराश व हताश झाले आहेत, त्यांना प्रभू येशूचा स्पर्श व्हावा की
जेणेकरून त्यांच्या स्वभावात व आचरणात बदल होवो आणि ते प्रभू येशूच्या अधिक जवळ
यावेत, म्हणून
प्रार्थना करूया.
४. हे जुबिली
वर्ष परमेश्वराच्या
कृपेचे आहे. जे तरुण-तरुणी जीवनात योग्य मार्ग शोधत आहेत, त्यांना
प्रभू येशूने योग्य दिशा दाखवावी व त्यांनी ईश्वरी
हाकेला योग्य प्रतिसाद द्यावा, म्हणून विशेष
प्रार्थना करूया.
५. या क्षणी
आपण आपल्या वैयक्तिक व सामुदायिक गरजांसाठी विशेष
प्रार्थना करूया (क्षणभर शांततेने व्यक्तिशः प्रार्थना करा).
धर्मगुरू:
हे दयावंत
पित्या, आम्ही
तुझ्यासमोर विश्वासाने व श्रद्धेने आमच्या
काही गरजा व विनंत्या सादर केल्या आहेत. त्या तू दयेने
स्वीकारून घे, व आम्हाला तुझ्या
कृपाशिर्वादाने भर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याकडे करतो, आमेन.
No comments:
Post a Comment