Reflections for the Homily of Second
Sunday of Easter (27-04-2025) By anonymous
पुनरुत्थान काळातील दुसरा
रविवार
दैवी दयेचा रविवार
प्रस्तावना:
आज आपण पुनरुत्थानानंतरचा दुसरा रविवार साजरा करीत आहोत. त्याचप्रमाणे आज आपण
दैवी दयेचा (Divine
Mercy) सण साजरा करीत आहोत. दैवी
दयेच्या विश्वासात वाढण्यासाठी आपणास संत फॉस्टीना ह्या महान संताची मदत आपल्या
दैनंदिन जीवनात होते. संत फॉस्टीना आपणास तिच्या बरोबर, ‘हे येशू, माझी तुझ्यावर श्रध्दा आहे’ अशी प्रार्थना
करावयास आव्हान करते.
प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, येशूवरील विश्वास धरणाऱ्याचा समुदाय एक दिलाचा व एकजीवाचा होता, ह्या समुदयात विविध लोक एकत्र आले. आजचे दुसरे वाचन प्रकटीकरण ह्या पुस्तकातून
घेतले आहे, आणि ह्या वाचनात आपणाला, संत योहानला झालेल्या
येशूच्या प्रकटीकरणाविषयी ऐकायला मिळते. आजच्या शुभवर्तमानात संत योहान, आपल्याला थोमाचे अविश्वासातून विश्वासाकडे झालेल्या परिवर्तनाबद्दल सांगतो.
दैवी दयेचा सण साजरा करत असताना, देवाची दया, आपली श्रद्धा प्रकट करताना अनुभवावी की त्याद्वारे आपण देवाच्या अधिका-अधिक जवळ रहावे. संत फॉस्टीनाच्या जीवनाचे आचारण आपण सतत करावे व ख्रिस्ती श्रध्देत वाढावे म्हणून आपण देवाकडे त्याच्या दयेसाठी प्रार्थना करूया.
मनन चिंतन:
"देवा तुझ्या
दयेची मज लागली तहान..."
आज दैवी दयेचा सण आपण साजरा करीत आहोत. दया म्हणजे दुसऱ्यांच्या दुःखाबद्दल
आपल्या अंतःकरणात निर्माण होणारी सहानुभूती. दुसऱ्यांची दुःखे, संकटे, आपत्ती आपल्याच
आहेत असे जो मानतो व त्या नाहीशी करण्याचा प्रयत्न करतो तो खरा दयाळू. येशू
ख्रिस्त हा खरा दयाळू होता. तो ममतेने व करुणेने भरलेला होता. अनेक अशी ख्रिस्ताची
उदाहरणे आपल्या समोर शुभवर्तमानात ठेवण्यात आली आहेत.
संत फौस्तीनाला झालेल्या दर्शनात येशू हा दैवी दयेचा व
करुणेचा महासागर अखिल मानवासाठी ओसांडून वाहताना तिने अनुभवला. म्हणूनच दैवी
दयेची प्रार्थना आपल्या सर्वाना येशुवरील श्रद्धेत वाढण्यासाठी प्रेरणादायी आहे.
प्रभू येशूच्या हृदयातून दयेचा व कृपेचा झरा अखंडितपणे वाहत आहे.
संत थोमाने
येशूला पाहताच, ‘माझ्या देवा! माझ्या प्रभो!’ हे शब्द
उच्चारले. जरी तो सुरूवातीला विश्वासात डगमगला तरी नतंर तो ख्रिस्ताचा खरा अनुयायी
झाला व ख्रिस्ताच्या शब्दांचा प्रचार सर्वत्र केला. आजच्या शुभर्वतमानात येशू
ख्रिस्त आपणास निमंत्रित करून म्हणत आहे, ‘न पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे ते धन्य.’ ह्याच पुनरूत्थित
ख्रिस्तामध्ये आपला विश्वास सदैव राहून तो आपल्या कार्यात दिसावा.
एकदिवस आर्चबिशप फुल्टन जे. शीन एका मोठ्या इस्पितळात आजाऱ्यांना साक्रामेंत
देण्यास गेले होते. त्या हॉस्पिटलमध्ये एका व्यक्तीने आर्चबिशपचा स्विकार केला
नाही, उलट त्यांना अपशब्द बोलले. ती व्यक्ती देवावर नाराज होती.
अनेक वर्षांपासून त्या व्यक्तीने साक्रामेंत व ख्रिस्तपसादाचा स्विकार केला नव्हता
व अत्यंत पापमय आयुष्य तो जगला होता. अनेक दिवस प्रयत्न करुनही त्याने
आर्चबिशपांना परतून लाविले होते.
ज्या रात्री त्याची शेवटची घटका जवळ आली होती त्या रात्री आर्चबिशप त्या
व्यक्तीजवळ गेले परंतु त्या माणसाने पुन्हा देवाचा धिक्कार करून ख्रिस्तप्रसाद
घेण्यास नकार दिला. आर्चबिशप त्याला म्हणाले, “माझ्या मुला तुला जरी नको
असेल तरी देवाची तुझ्यावर असलेली प्रिती, दया व करुणा ही अपार आहे”.
काही तासांनी ती व्यक्ती मरण पावली, परंतु नर्सनी आर्चबिशपांना
सांगितले की शेवटपर्यंत तो म्हणत राहिला “हे प्रभो मज पाप्यावर दया कर.”
देवाने आपल्यावर केलेली दया म्हणजे माणसाने आपल्या पराकष्टाने मिळविलेले
बक्षीस नव्हे तर देवाने माणसावर केलेले प्रेम व त्यासाठी त्याला मोठी किंमत मोजावी
लागली. संत पेत्र म्हणतो,
“तुम्ही तुमचे नव्हते.
तुम्हाला आपल्या प्रभू येशूच्या रक्ताने विकत घेतले आहे.”
आज आपण आपले दैनंदिन जीवन
जगात असताना, प्रभू येशूच्या दयेचा अनुभव घेऊया व
ही दया इतरांवर दाखवण्यासाठी आपले अंतःकरण, दयेने
भरावे. म्हणून प्रभू येशू
ख्रिस्ताची कृपा मांगूया.
तसेच आपण देखील ख्रिस्तामध्ये एक होऊन त्याची सुवार्ता, दया, करुणा, ममता व प्रेम इतरांपर्यंत आपल्या कार्याद्वारे व आपल्या वागणुकीद्वारे देता यावे म्हणून प्रयत्न करूया. दैवी दयेचा रविवार हा केवळ मुखाने नव्हे तर, दैनंदिन जीवनात आपल्या कृतीने व आपल्या वागणुकीद्वारे इतरांपर्यंत पोहोचवावे म्हणून आपण ह्या दानांकारीता प्रार्थना करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू, दया कर व तुझ्या
लोकांची प्रार्थना ऐक.
१. आपले परमगुरु पोप फ्रान्सीस, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ लोकांनी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या विश्वासपुर्वक
पार पाडाव्यात आणि लोकांना दैवी दयेचा अनुभव घेण्यास मदत करावी, म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया.
२. जे निराश
होऊन देवापासून दूर गेले आहेत, त्यांना प्रभूने स्पर्श
करून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडून आणावे व त्यांनी परत एकदा प्रभूने दाखवलेल्या
मार्गावर चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या
देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले गेले आहेत, त्यांनी आपल्या सद्सदविवेकबुद्धीला जागवून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून
जनतेचे प्रश्न व अडचणी जाणून घ्याव्यात व देशाच्या प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण
प्रार्थना करूया.
४. शांती
निर्माण करण्यासाठी व समेट घडवून आणण्यासाठी आज जगभरात अनेक संघटना कार्यरत आहेत, त्यांच्या कार्यात प्रभूचा आशीर्वाद त्यांच्यावर सदैव असावा म्हणून आपण
प्रार्थना करूया.
५. आपल्या
कुटुंबात प्रत्येक व्यक्तीला समानतेची व सन्मानाची वागणूक मिळावी तसेच प्रत्येक
सदस्यातील बंधुभावाची भावना वृद्धिंगत होऊन एकमेकांतील जवळीकता वाढावी म्हणून आपण
प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment