Reflection for the Homily of Easter Sunday (20/04/2025) By Fr. Benjamin Alphonso
पास्काचा सण
(सकाळची मिस्सा)
दिनांक: २०/०४/२०२५
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १०:३४अ, ३७-४३
दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र ३:१-४
शुभवर्तमान: योहान २०:१-९
प्रस्तावना:
पुनरुत्थान व जीवन मीच आहे
प्रस्तावना
ख्रिस्त आज विजयी झाला, मरण जिंकून तो उठला —
आलेलूया, आलेलूया!
आज पवित्र देऊळमाता सर्वात महत्त्वाचा सण साजरा करत आहे: ‘पुनरुत्थान’. विशेष करून प्रभु येशूचे
पुनरुत्थान आपल्या ख्रिस्ती विश्वासाचा केंद्रबिंदू आहे, तसेच
पाया आहे. प्रभुने मरणावर विजय मिळविला, मृत्यूची भिंत फोडून
काढली आहे. मानवाचा सर्वात मोठा शत्रू हा मृत्यू आहे. त्यावर प्रभु येशूने विजय
मिळवला आहे.
आजची तिन्ही वाचने याची साक्ष (ग्वाही) देत आहेत. आपल्याला प्रभु येशूच्या पुनरुत्थानाविषयी माहिती व कल्पना देत
आहेत.
पहिल्या वाचनात, पेत्र, ज्यांनी
ख्रिस्ताची सुवार्ता ऐकली नाही व जे खऱ्या जिवंत देवाविषयी उत्सुक आहेत, त्यांना प्रभुच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देतो.
दुसऱ्या वाचनात, संत पौल आपल्याला आपले लक्ष स्वर्गीय
येशू ख्रिस्तावर केंद्रित करण्यास सांगत आहे, कारण प्रभु
येशूने मृत्यूवर व जगावर विजय मिळविला आहे.
शुभवर्तमानात आपण ऐकतो की, येशू ख्रिस्त
हा मरणावर विजय मिळवून उठला आहे.प्रभु येशू म्हणतो, "पुनरुत्थान
व जीवन मीच आहे, आणि जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो,
त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त होईल."
आपला ख्रिस्ताच्या व आपल्या पुनरुत्थानाचा विश्वास मजबूत व्हावा, म्हणून या मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.
मनन-चिंतन:
लंडन ह्या शहरात घडलेली ही सत्य घटना आहे. 1666 मध्ये संत पौलला समर्पित केलेल्या एका महामंदिराला भल्या पहाटे आग लागली
आणि काही क्षणातच ते महामंदिर त्या आगीने भस्म करून टाकले. तब्बल दहा-बारा
वर्षांचा काळ उलटल्यानंतर, पोप महाशयांनी ख्रिस्तोफर बेलेन या
नव्या शिल्पकाराला त्या चर्चच्या पुन:बांधकामासाठी हवा असलेला आराखडा बनविण्यास
सांगितला. ख्रिस्तोफरने त्या जागेचे चांगल्या प्रकारे निरीक्षण केले. सुरुवातीला
काम थोडे अवघड वाटत होते कारण हवे असलेले निकाल मिळत नव्हते. परंतु एके दिवशी,
उध्वस्त झालेल्या मंदिराच्या ढिगाऱ्यातून त्याने एक शिल्प उचलले व
त्यावर कोरलेल्या शब्दांना वाचून तो आश्चर्यचकित झाला. आता त्याचा विश्वास बसला की
मंदिराची पुन:बांधणी होणे शक्य आहे, कारण त्यावर शिल्पकाराने
कोरलेले शब्द होते: "होय, मी
पुन्हा उठेन."
आणि याच शब्दावर विश्वास ठेवून त्याने त्याचे काम पूर्ण केले व आपल्याला आज ते
भव्य महामंदिर पाहायला मिळते.
देऊळमातेकडून हे वर्ष आंतरराष्ट्रीय ज्युबिली वर्ष म्हणून घोषित केलेले आहे.
यावर्षी आपण "आशेचे सहप्रवासी" या
विषयावर मनन-चिंतन करीत आहोत. सध्याच्या आधुनिक जगात अनेक कारणांमुळे भरपूर लोक
निराश आहेत. अनेक लोक आत्महत्या करत आहेत. लोकांमध्ये शांती नाही. अशा या
गडबडीच्या वेळेला देऊळमाता आपल्याला सगळ्यांना आशावादी होण्यास आमंत्रित करत आहे. ज्याप्रमाणे
ख्रिस्ताच्या क्रूसावरील मरणाने ख्रिस्ताचे शिष्य निराश व भयभीत झाले होते,
आणि ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाने त्यांच्यात एक नवीन आशा निर्माण
केली, त्याच्या जीवनाला कलाटणी दिली.
आजच्या योहानलिखित शुभवर्तमानात आपण ऐकतो की, मरिया
माग्दालेना सकाळी येशूच्या कबरीकडे जाते आणि तिला रिकामी कबर आढळते. तेव्हा मरिया
माग्दालेना पळत-पळत जाऊन ही गोष्ट दोन शिष्य: पेत्र व प्रिय शिष्य योहान यांना
सांगते. ही गोष्ट कळताच, पेत्र व योहान दोघेही धावत-धावत
कबरीकडे जातात व त्यांना मरिया माग्दालेनाने सांगितल्याप्रमाणे कबर रिकामी दिसते. येशूचे
अंगावरचे पांढरे वस्त्र पडलेले दिसते आणि त्यांना येशूचे शब्द आठवतात: "मी मेलेल्यांतून उठेन." तेव्हा ते विश्वास ठेवतात व आनंदित होतात. ही
गोष्ट ते आनंदाने इतरांना, विशेषतः इतर शिष्यांना सांगतात.
संत आगुस्तीन म्हणतात की, आपला विश्वास
हा पुनरुत्थानीत विश्वास आहे. प्रभुने मरणावर विजय मिळवलेला आहे. प्रभुने आपली
निराशा दूर केलेली आहे. आपणही जीवनातील दुःख व अडचणी विसरून आनंदित झाले पाहिजे.
ही सुवार्ता सर्वत्र पोहोचवली पाहिजे.
बायबल पंडित डब्ल्यू. एच. वेल म्हणतात, "शुभवर्तमान पुनरुत्थान समजावून देत नाही, तर पुनरुत्थान
शुभवर्तमानात समजावून दिले जाते." होय, पुनरुत्थानाचा
सोहळा हा आनंदाचा आणि आशेचा सोहळा आहे. तो आनंद सर्वांना वाटूया आणि येशूची
सुवार्ता सर्वत्र पोहोचवूया.
आमेन.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे परमेश्वरा आमची विनंती ऐक.
१. आमचे परमगुरु फ्रान्सिस, सर्व महागुरू, धर्मगुरु, व्रतस्थ आणि ख्रिस्ती प्रापंचिक यांनी येशूच्या पुनरुत्थानावर मनापासून
विश्वास ठेवावा आणि आपल्या रोजच्या जीवनात त्याची इतरांना साक्ष द्दावी म्हणून
प्रार्थना करू या.
२. जे कोणी वेगवेगळ्या पापाच्या
कबरेत अजूनही पडून आहेत त्यांनी येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारावं आणि पापाचा
त्याग करावा म्हणून प्रार्थना करू या.
३. आपल्या आजूबाजूला जे कोणी विविध
आजरामुळे निराश आणि हताश झालेले आहेत
त्यांना परमेश्वराने आशेचा मार्ग दाखवावा व त्यांनी नवजीवनाचा अनुभव घ्यावा म्हणून
प्रार्थना करू या.
४. प्रभू येशू जसा दुखःसहनाला
सामोरा गेला आणि त्याने आपल्या तारणासाठी देवाची योजना स्वीकारली तसे आपण आपल्या
जीवनात देवाची योजना स्वीकारावी व येणाऱ्या लहान-सहान
संकटाला सामोरं जावं म्हणून प्रार्थना करू या.
५. आता आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक
व सामाजीक हेतूसाठी प्रार्थना करू या.
तुम्हा सर्वांना पास्काच्या सणाच्या हार्दीक शुभेच्छा!
No comments:
Post a Comment